अमेरिकेचे प्रदीर्घ युद्ध शेवटी शरमनाख पद्धतीने संपले. व्हिएतनाम नंतर अमेरिकेचा हा दारुण पराभव हेच सिद्ध करतो की कुठल्याही देशात जाऊन त्याच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न हा नेहमीच अपयशी ठरला आहे. अंतिमत: त्या देशातल्या लोकांनी आपला देश कसा चालवायचा हे ठरवले पाहिजे. २० वर्ष झुंज दिल्यानंतर जगातील सर्वात ताकदवान सैनिक शक्ती एका दुबळ्या गरीब मागासलेल्या भागातील लोकांनी उद्ध्वस्त केली. काबूलचा पाडाव सात दिवसात झाला. तालिबान हल्ल्याचा परिणाम असा आहे की त्यांच्या विरोधातील लोक तेथे राहिलेच नाहीत. पंतप्रधानच पळून गेले. वास्तविक पाहता अफगाण सैन्य हे तीन लाखाचे होते. ते तालिबान बरोबर लढत सुद्धा होते, पण राष्ट्रपती गाड्या-घोड्यामध्ये नोटांचे बंडल भरून उज्बेकिस्तानला पळून गेले. यामुळे अफगाण सैन्य ढासळले व एकही गोळी न वापरता काबुलवर तालिबानचा कब्जा झाला.
अमेरिकेने २००१ मध्ये सुड भावनेने हल्ला केला. ओसामा-बिन-लादेनने अमेरिकेवर ४ विमानांनी हल्ला करून २७०० लोक मारले. त्यात तालिबानचा काहीच संबंध नव्हता. पण ओसामा-बिन-लादेनला पकडण्याच्या किंवा मारण्याच्या कारणाखाली अफगाणिस्तानवर अमेरिकेने कब्जा केला. त्या अगोदरचा इतिहास हा विध्वंसकच आहे. १९७९ साली कम्युनिस्ट राजवट अफगाणिस्तानवर आली. ती अत्यंत चांगली राजवट होती. त्यामध्ये गोर-गरीबांना आणि महिलांना पूर्ण संरक्षण मिळाले होते. पण अमेरिकेच्या डोळ्यामध्ये ही कम्युनिस्ट राजवट सलत होती. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जगामधील इस्लामिक कट्टरवादी लोक गोळा केले व जिहाद पुकारायला लावला. कम्युनिस्ट म्हणजे देवधर्माला न मानणारे म्हणून ती राजवट इस्लामविरोधी म्हणून जाहीर करण्यात आले. अमेरिकेने आणि सौदी अरेबियाने या धार्मिक लढयाला पूर्ण पाठींबा दिला, हत्यारे दिली, पैसे दिले व दहशदवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये अफुची शेती करायला दिली. हळूहळू अफुचा व्यापार प्रचंड वाढला व दहशदवाद्यांनी अफु पाकिस्तानमध्ये आणली. तिथे तिला शुद्ध करून हेरोईन बनवली व पाकिस्तान मधून भारतात आणली व जगभर विक्री केली. परिणमत: अमेरिकन जिहादचा वापर करून पाकिस्तानने भारताविरोधात करून पंजाब, काश्मीर, आसाम आणि अनेक राज्यात दहशदवाद पेटवला. अफगाणिस्तानचा हा भयानक परिणाम भारतावर होत आहे. आज जवळजवळ जगातील ९० टक्के हेरोईन अफगाणिस्तानमध्ये बनते आणि त्याची तस्करी करण्याचा शहनशहा दाऊद इब्राहीम आहे असे अमेरिकेने अफगाणिस्तान हल्ल्यानंतर जाहीर केले. आज अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि आफ्रिकेवर दाऊद इब्राहीमचा पूर्ण ताबा आहे व जगातील पहिल्या १० श्रीमंत लोकांमध्ये अफुमुळे अंबानी बरोबर दाऊद इब्राहीम आहे.
भारताने अमेरिकेच्या फार आहारी जाऊ नये, स्वतःच्या मुलांना अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेश मिळवा म्हणून, उद्योगपतीना ठेके आणि सवलती मिळाव्यात म्हणून येथील राजकारणी अमेरिकेचा अंधपणे अनुनय करतो, पण अमेरिकेने सतत पाकिस्तानला मदत केली आहे, कारगिल युद्धात देखील पाकिस्तानी सैन्य भारताच्या सीमेत घुसले मात्र अमेरिकेने भारताला धमकी देऊन LOC (लाईन ऑफ कंट्रोल) पार करण्यापासून रोखले. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीत अमेरिकेने पाकिस्तानलाच मदत केली आहे. भारताला आजपर्यंत कुठलीही मदत केली नाही. तरीही भारत अमेरिकेचे तळवे का चाटतो? हा प्रश्न मी मनमोहन सिंग आणि वाजपेयीना सुद्धा विचारला होता. त्यामुळे भारताने अफगाणिस्तान मधील प्रश्न हा त्यांच्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे व अमेरिकेच्या बाजूने जाऊन अफगाणिस्तानबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. भारताने अफगाणिस्तान सोबत मधुर संबंध ठेवावेत. तिथले सरकार तालिबानचे असो किंवा दुसरे कोणतेही असो. आपण जे सरकार असेल त्याच्याबरोबर चांगले संबंध ठेऊन आपला फायदा केला पाहिजे. अमेरिकेच्या फायद्यासाठी आपले रक्त देण्याचे काही कारण नाही. तालिबानने अफगाणिस्तान मधील अफूची शेती नष्ट करून येथे १९९६ ला वेगळे राज्य निर्माण केले होते. मात्र पाकिस्तान, अमेरिका यांचा मोठा ड्रग्सचा व्यापार आहे. दाऊद इब्राहिम, जैश मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या सारख्या संघटना या धंद्यात आहेत. दाऊदला वारंवार अमेरिका पाकिस्तानच्या माध्यमातून मदत करत आली आहे. त्यामुळे भारताने भावनिक न होता देशाचा फायदा आणि सुरक्षा लक्षात घेऊन आपली भूमिका घेतली पाहिजे. भारताने आधीच अमेरिकेशी अवास्तव जवळीक करून चीन सोबत शत्रुत्व ओढवून घेतले आहे.
अमेरिकेने भारताला त्याच्या QUAD संघटनेत जबरदस्तीने सामील करून घेतले आहे. अमेरिकेचा येथील डाव आहे की, अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया असे गटबंधन करून भारताला वापरुन घ्यायचे. पण दुसरीकडे अमेरिका पाकिस्तानला बरोबर घेऊन तालिबानशी आपला संबंध चांगला ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच अमेरिकेने अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात दिले आणि २० वर्षे अमेरिकेबरोबर तालिबानशी लढणार्या त्यांच्या सहयोगी लोकांना तालिबानच्या तावडीत सोडून पळून गेले. आता तालिबानला पाकिस्तान अमेरिके तर्फे पूर्ण मदत करीत आहे. या प्रक्रियेत अमेरिकेने त्यांच्याच सहकार्यांना मृत्युच्या खाईत लोटले. ही अमेरिकेची निती आहे. त्यामुळे भारताने स्वत:चे हित पहावे असे माझे स्पष्ट मत आहे. १९९६ ला पाकिस्तानमधील तालिबानच्या राजदूताने मला फोन केला होता आणि विचारले होते की भारत तिलिबान सरकारला मान्यता का देत नाही? व मैत्रीचे संबंध का करीत नाही? त्यावेळेला मी त्यांना म्हटले की, तुम्ही पाकिस्तान धर्जिण्य आहात. त्यावर ते म्हणाले की “तसे काही नाही. पाकिस्तान हा घातकी देश आहे, त्याला दोन जिभा आहेत, एक अमेरिकेबरोबर बोलतो आणि दूसरा आमच्याबरोबर बोलतो. म्हणून अफगाणिस्तनाला भारताबरोबर संबंध सुधारायचे आहेत”. भारताचे पंतप्रधान गुजरल यांना भेटून ही गोष्ट मी सांगितली. पण गुजराल यांनी कट्टरवादाच्या कारणास्तव साधी चौकशीही न करता झिडकारून टाकली. परिणमत: भारताला प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. आता तालिबानने भारताला मैत्रीचा हात पुढे केला आहे व भारत सरकारने देखील संबंध चांगले ठेवण्याचा निर्धार कळविला आहे.
भारताने अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलर गुंतविले आहेत व अफगाणिस्तान बरोबर व्यापार १.४ मिलियन डॉलर आहे. त्यात भारताची निर्यात ८०० मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारताचा अफगाणिस्तान कडून प्रचंड फायदा आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम धार्मिक कट्टरवादाची मनोवृत्ती बाजूला करून आपल्या हिताच्या दृष्टीने अफगाणिस्तानबरोबर संबंध ठेवावेत. नाहीतर चीनने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला मान्यता देऊन टाकली आहे व रशिया सुद्धा मान्यता देण्याच्या भूमिकेत आहे. इराण जो भारताचा मित्र आहे. त्याला आपण अमेरिकेमुळे दुखावले आहे. अमेरिकेच्या दबावाखाली आपण इराणचे तेल विकत घेणे बंद केले आणि भारताचे प्रचंड नुकसान केले. कारण इराणचे तेल इतर तेलापेक्षा अर्ध्या किंमतीला मिळत होते. इराणला डावलून आपण भारतात पेट्रोल व डिझेल किती महाग केले याची जाणीव सर्वांनाच आहे. आता इराण चीन बरोबर मैत्रीचे संबंध वाढवत आहे. त्यामुळे एक नवीन समीकरण जागतिक पातळीवर निर्माण होत आहे. आपल्या गोर्या कातडीच्या पायाखाली काम करण्याची वृत्ती ही भारताला अधोगतीकडे घेऊन जात आहे.
भारताने आपला एकमेव शत्रू पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे. आज पाकिस्तानचे चार तुकडे होण्यास विलंब लागणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे जे जे मित्र देश असतील त्यांच्यापासून पाकिस्तानला तोडले पाहिजे. १९७१ च्या भारत पाक युद्धात अमेरिकेने आपले सैन्य पाकिस्तानच्या मदतीसाठी पाठविले होते. पण त्याला रशियाने रोखले. अमेरिकेने चीनला भारताविरुद्ध जमवाजमव करून भारतावर हल्ला करण्याचे सुचविले होते. पण चीन तटस्थ राहिला. त्यानंतर राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी चीनबरोबर संबंध सुधारण्याची भूमिका घेतली. त्याचा फायदा दोन्ही देशांना झाला आणि म्हणून चीनला भारता विरोधात अमेरिकेमुळे उभे करण्याची काही गरज नाही. या दृष्टीकोणातून अफगाणिस्तानातील तालिबानकडे सुद्धा बघितले पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्ष गुंडाराज चालू आहे. त्याला स्थिरता फक्त तालिबान देऊ शकतात असे सिद्ध झाले आहे. तालिबानचे काही तत्त्वे असतील त्यात भारताला जाण्याची गरज नाही. कारण प्रत्येक देशाची राजवट ही त्यांच्या संस्कृतीप्रमाणे चालते. भारताबरोबर अनेक मुस्लिम राष्ट्रे आहेत आणि विरोधात सुद्धा आहेत. हे कुठल्याही धार्मिक कारणांमुळे नाही, तर प्रत्येक देश राष्ट्रहित बघतो. भारताने सुद्धा फक्त आपले राष्ट्रहित बघावे आणि कुणाच्या नादाला लागून राष्ट्रीय निर्णय घेऊ नये. यातच शहाणपणा आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९