अफगाणिस्तान मधून अमेरिकेचे पलायन_२२.७.२०२१

अलकायदाच्या दहशतवाद्यांनी २००१ ला अमेरिकेवर जबरदस्त हल्ला केला. ४  विमानांनी न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त केले. अमेरिकन सैन्यदलाचे पेंटोगॉन जमीनदोस्त केले.  ३००० लोक त्यात मारले गेले. अमेरिकेने प्रतिहल्ला करून अफगाणिस्तानवर कब्जा केला. तेथील तालिबान आणि अलकायदा पळून गेले. पाकिस्तानने ह्याचा फायदा घेत अमेरिकेच्या ‘वार ऑन टेरर’ ला मदत करत असल्याचे दाखविले. दुसरीकडे गुप्तपणे त्यांनी तालिबानला व बिनलादेनला मदत केली.

आता २० वर्षांनी जो.बाईडनने ११ सप्टेंबर, २०२१ ला अमेरिकन सैन्य मागे घेण्याचे जाहीर केले. हे अमेरिकेचे पूर्ण पलायन आहे. येथील अमेरिकेचे लष्कर प्रमुख जनरल मिलर. ते म्हणाले अमेरिकेचे सैन्य परत जाताच अफगाणिस्तानमध्ये यादवी युद्ध सुरू होईल. तालिबान हे पुन्हा जिवंत होतील व अफगाणिस्तानच्या अर्ध्या भागावर तरी कब्जा करतील.  त्यांनी अशी भीती व्यक्त केली.  तालिबान पळून जातील व काबूलचा कब्जा करतील. मिलर पुढे म्हणाले भयानक रक्तपात होईल.  याची दखल जगाने घेतली पाहिजे. तालिबानने हल्ला करून जवळजवळ १०० जिल्हयावर कब्जा केला.  हजारो लोकांची हत्या झाली.  लाखो लोक विस्थापित झाले. अमेरिकेचा तालिबान बरोबर करार झाला.  मग कुठलेही गोष्ट तालिबानने मान्य केली नाही तरी अमेरिकन सैन्याने  परत जायला सुरुवात केली.  आणि आता बरेच सैन्य पाठीमागे गेलेले आहे.  अमेरिका फक्त ७०० सैनिक अफगाणिस्तान मध्ये दूतवासाच्‍या संरक्षणासाठी ठेवत आहे.  जसजसे अमेरिकेचे सैन्य मागे जात आहे तसे तसे तालिबान पुढे पुढे येत आहे. २० वर्षापूर्वी जेव्हा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आले, त्यावेळी लोकांनी विरोध करायला सुरू केला व आता झपाट्याने तालिबान पुढे जात आहेत.  त्यात जनता अमेरिकेला पूर्ण विरोध करत आहे.  किती झालं तरी अमेरिका ही आक्रमण करता आहे.  अफगाण लोकांनी कधीही परदेशी आक्रमण स्वीकारले नाही.  ब्रिटिशांनी पूर्ण जगावर कब्जा केला, पण अफगाणिस्तानवर करू शकले नाहीत.  म्हणून अफगाण लोक अमेरिकन सैन्याचा प्रचंड तिरस्कार करतात.  कारण या युद्धामध्ये हजारो लोक मारले गेले.  अनेक लोक बरबाद झाले आणि पूर्ण देश अस्थिर झाला. त्यात प्रचंड क्रूरपणा वाढला.  अमेरिकेला प्रचंड विरोध असल्यामुळे जरी लोकांना तालिबान नको होता तरी लोकांनी अमेरिकेविरुध्द लढण्यासाठी  तालिबानला मदत केली. त्यात बऱ्याच देशांनी गुप्तपणे तालिबानला मदत केली. दोन दशकानंतर २००० बिलियन डॉलर खर्च केल्यानंतर अमेरिका आपले उद्दिष्ट अफगाणिस्तानमध्ये साध्य करू शकले नाही. हजारो लोकांना कार्पेटबॉम्बिंग करून मारले.  लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि आता अमेरिका परत जात आहे. अमेरिकेने उभे केलेले कमजोर आणि भ्रष्ट सरकार आता कोसळत आहे. जनता पूर्णपणे अफगाण सरकार विरोधात आहे.  कारण हे अमेरिकेने बसवलेले सरकार आहे असे लोकांना माहित आहे.  अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने अंदाज बांधला आहे की सरकार जास्तीत जास्त सहा महिने टिकेल. तालिबानने छत्रपती शिवरायांचे युद्धतंत्र अंगीकारले आहे आणि त्यांना डोंगरदऱ्यातून लढण्याची सवय आहे.  अफगाण सरकारचे सैन्य २ लाख आहे.  याला अमेरिकेने ट्रेनिंग दिले आहे ते तालिबान विरुद्ध लढण्यास अजिबात सक्षम नाहीत.

सुरुवातीला अमेरिकेला वाटलं होतं हे अफगाणिस्तान मध्ये गेल्यानंतर तिकडे तालिबान आणि अलकायदाला संपवून टाकू व परत जाऊ.  पण तसे झाले नाही.  अमेरिका अफगाणमध्ये घुसली आणि अडकली.  तिला परत येता येत नव्हतं. तिकडे अमेरिकेत लोकांचा या युद्धाला विरोध वाढत चालला. मागच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जो.बायडन यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं.  आम्ही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये लगेच परत आणू.  त्याला अनुसरून आता अमेरिकन सैन्य अमेरिकेला परत जात आहे. लाचार होऊन परत घेऊन जात आहेत. १९७९ ला रशियन सैन्य असेच अफगाणिस्तानमध्ये घुसले होते. त्यावेळी अमेरिकेने जगातले सर्व दहशतवादी पाकिस्तानमध्ये गोळा केले. पाकिस्तानच्या मदतीने दहशतवाद्यांचे हल्ले अफगाणिस्तानमध्ये चढवले आणि शेवटी रशियाला १९९० मध्ये परत जावे लागले.  पूर्ण पराभूत होऊन परत दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान वर राज्य करायला सुरु केलं.  शेवटी तालिबानची निर्मिती झाली.  अन्याय, अत्याचार विरुद्ध लढण्याचे आश्वासन तालिबानने दिलं आणि सर्व गुन्हेगारी टोळ्यांच्या विरुद्ध युद्ध करून त्याने अफगाणिस्तानवर राज्य स्थापित केले. कमीत कमी अफगाणिस्तान मध्ये कायदा आणि सुव्यवस्था परत आली.  अर्थात ती तालिबान पद्धतीची होती तरी मानवी हुकुमत लागू झाली, अगोदर जंगल राज्य होतं.

या युद्धाचा पाकिस्तानने पूर्णपणे फायदा उचलला.  ते अमेरिकेबरोबर अधिकृतपणे राहिले पण आतून त्यांनी तालिबानला मदत केलेली आहे.  अमेरिकेने पाकिस्तानला अफगाणिस्तान वरचे पूर्ण अधिकार दिले आहेत.  त्यात पाकिस्तानची एकच अट होती भारताला अफगाणिस्तानमध्ये येऊ द्यायचं नाही.  अमेरिकेने मान्य केले आहे.  आता पाकिस्तान तालिबानलाबरोबर घेऊन अफगाणिस्तानवर पूर्ण राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकंदरीत अमेरिकेच्या अफगाणिस्तान मिशनचा परिणाम पूर्ण जगाला भोगावा लागणार आहे.  त्यांचा ‘वॉर ऑन टेरर’ हा दहशतवाद संपविण्यासाठी होता.  पण झाले उलटेच.  आता अर्धवट युद्ध सोडून अमेरिका पळून जात आहेत आणि प्रचंड दहशतवाद वाढवून जात आहे. त्यात पाकिस्तानचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यांनी अफगाणिस्तानला पूर्णपणे उदध्वस्त केले आहे.  अफगाणिस्तानचे लोक अमेरिकेचा प्रचंड द्वेष करत आहेत.  त्याचबरोबर पाकिस्तान सुद्धा अस्थिर झाला आहे आणि अनेक टोळ्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर राज्य करत आहेत.  त्यातच ड्रग माफिया मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचा शहनशहा दाऊद इब्राहीम अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारतावर राज्य करत आहे. पाकिस्तान सरकार व सैन्य हे माफिया टोळ्याच्या नियंत्रणाखाली काम करत आहेत. अमेरिकेने आगीत तेल ओतले आहे.  आतंकवादी विचारधारा आणि कट्टरवाद प्रचंड वाढला आहे की पुढच्या अनेक वर्षात त्या भागात स्थिरता येणे शक्य नाही. अमेरिकेचा अफगाणिस्तानमधील हस्तक्षेप हा चार शतके आहे.  पहिल्यांदा रशियाच्याविरोधात नंतर आता तालिबान विरोधात प्रचंड हिंसाचारात अफगाणिस्तान भरडला गेला आहे. १९७८ सालामध्ये नूर मोहम्मद तराखीने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली होती.  त्याला मदत करण्यासाठी म्हणून रशियन सैन्य आले होते आणि त्याला विरोध करण्यासाठी अमेरिकन सैन्याने जिहाद निर्माण केला. त्याचे परिणाम आपण सर्व भोगत आहोत.

अमेरिकन सैन्य परत जात असल्यामुळे त्यांचा कट्टर शत्रू आणि भारताचा मित्र ईराण अफगाणिस्तान राजकारणात घुसत आहे. ते तालिबानला अमेरिकेविरुद्ध मदत करत आहे. चीन आणि रशिया देखील अफगाणिस्तान मध्ये पाय रोवण्यासाठी तालिबानला मदत करत आहेत. सुदैवाने भारत सरकार सुद्धा तालिबान बरोबर अनाधिकृत चर्चा करत आहे. एकंदरती अनेक देश अफगाणिस्तान मध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी तालिबान बरोबर संबंध सुधारत आहेत. १९९६ साली अफगाणिस्तान मध्ये तालिबान सरकार आले. त्यावेळी तालिबानला भारताबरोबर संबंध सुधारायचे होते. पण पंतप्रधान गुजरालने ते धुडकावून लावले.  त्यामुळे नाईलाजाने तालिबानला पाकिस्तानच्या गोठात आपण ढकलले.  आतंरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देशाने आपले राष्ट्रीय हित बघितले पाहिजे व भारताने आता संधीचा फायदा घेऊन इराण मार्फत तालिबान बरोबर संबंध सुधारून पाकिस्तानपासून तोडलं पाहिजे.  हा भारताचा मोठा राजनैतिक विजय होईल.  तिकडे पाकिस्तानचा प्रयत्न भारताला अफगाणिस्थान पासून दूर ठेवण्याचा आहे. अफगाणिस्तान मध्ये ईसिस सुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतावर दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.  तालिबान सध्या ईसिसला संपविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर पाकिस्तान ईसिसला भारताविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नवीन संकट टाळण्यासाठी भारताला तालिबानला पाकिस्तानपासून तोडून ईसिस विरुद्ध लढावे लागेल.

 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट: www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS