अबु-बक्र-अलबगदादीचा खात्मा_२१.११.२०१९

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प फुशारकी मारायची एकही संधी सोडत नाहीत. ते गरजले “बगदादीला कुत्र्यासारखे मारले.” बगदादी हा इसिस ह्या जहाल कट्टरवादी दहशतवादी संघटनेचा प्रमुख.  त्याच्या नेतृत्वाखाली इसिसने इंग्लड पेक्षा मोठे राष्ट्र उभे केले.  ही पहिली दहशतवादी संघटना आहे जिने राष्ट्र बनवून ३ वर्ष चालवले.  अगदी सिरियापासून बागदाद पर्यंत कब्जा करून एक कट्टरवादी इस्लामिक राष्ट्र स्थापन केले.  प्रचंड क्रुरतेने ते चालवले.  यसदी जमातीच्या बायकांचे गुलाम करून लैंगिक शोषण केले.  यसदी पुरूषांना क्रुरतेने मारले.  टेलिव्हीजन समोर कैद्यांचे सामूहिक गळे चिरले.  चोरांचे हात पाय कापले. व्यभिचार केल्याच्या आरोपावरून स्त्रियांना दगडांनी ठेचून मारले.  इसिसचे लोक वाहब्बी इस्लामचे पालन करत होते.  ९०% आतंकवादी लोक  वाहब्बी/ सलाफी इस्लामचे पालन करतात.  त्यात ओसामा-बिन-लादेन, हफिज सय्यद, जैश-ए-महम्मदचा अझर मासूद हे सर्व सलाफी / वाहब्बी इस्लामचे पालन करतात. 

सलाफी किंवा वाहब्बी इस्लामचा जन्म सौदी अरेबियात झाला. सौदी अरेबियाने पूर्ण जगाचा मदरसा बनविण्यासाठी आणि वाहब्बी इस्लामचा प्रसार करण्यासाठी प्रचंड पैसा ओतला.  भारतात सुद्धा अनेक ठिकाणी अशा मदरसा बनविण्यात आल्या आहेत.  ते दर्गा मानणार्‍या मुसलमानांना काफीर समजतात.  वाहब्बी किंवा सलाफी इस्लाम न मानणार्‍यांना विरोध करतात.  त्यांचे खून पाडतात. सौदी अरेबिया सिय्या इराणला आपला शत्रू मानते.  त्यातूनच इस्लाममध्ये जागतिक संघर्षाची आग पेटली आहे.  इराण, इराक, सिरिया एका बाजूला आहेत.  दुसर्‍या बाजूला सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त असे देश आहेत.  या संघर्षाचा अमेरिकेने पूर्ण फायदा उचलून आखातीच्या राष्ट्रांवर म्हणजेच तेलावर आपला ताबा ठेवला आहे.  सौदी अरेबियाच्या राजाचे आणि कुटुंबाचे संरक्षण पाकिस्तान सैन्य करते. एरवी पाकिस्तानातील मुसलमान सूफी किंवा दर्गा मानणारे होते.  पण पाकिस्तान सैनिकी शासक झिया-उल-हकने १९८७ साली पाकिस्तानात वाहब्बी इस्लाम लागू केला आणि जगातील सर्व आतंकवाद्यांचे केंद्र बनवले.  याचे परिणाम भारताला भोगावे लागत आहेत  आणि त्यात सर्वात त्रस्त असेल तर तो भारतीय मुस्लिम समुदाय आहे.  झाकीर नाईक हा वाहब्बी इस्लामचा प्रचार करणारा मुख्य धर्मगुरु होता.  याने अनेकांना वाहब्बी इस्लामची दिक्षा दिली. त्यांना सूफीइस्लाम समुदायाकडून पूर्ण विरोध झाला.  पण दुर्दैवाने कट्टरपंथी लोकांना विरोध करणार्‍या मुस्लिम समुदायला सरकारने कुठलीच मदत केली नाही.  आता कुठे त्याच्यावर वॉरंट निघाले आहे व तो फरार आहे.

आखाती देशातील या संघर्षामध्ये पूर्ण जग भरडून निघत आहे. कारण एकीकडे अमेरिकेचे मुख्य हस्तक सौदी अरेबिया आणि पाकिस्तान आहे.  त्यांनीच सुरुवातील इसिसला मोकळे रान दिले.   कारण इसिस इराणचा कट्टर विरोधक होता.  म्हणूनच सिया बहुल्य राष्ट्रात अर्थात इराण, इराक आणि सिरिया येथे इसिसला मोकळे रान मिळाले.  याच कारणास्तव अमेरिकेने इराकवर हल्ला केला व लाखो लोकांची कत्तल केली.  त्यातून इसिस निर्माण झाले.  त्याचबरोबर अमेरिकेने सिरियाची राजवट नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे इसिसला सिरियाचा मोठा भाग कब्जा करता आला. पण इराण प्रशिक्षित सिय्या सैनिकांनी इसिसला कडवी झुंज दिली.  बगदादी पहिल्यांदा प्रकाशात आला. जेव्हा त्यांने मोसुलचा ऐतिहासिक अल-नुस्त्री मस्जिदवरून स्वत:ला सच्चा मुसलमानांचा प्रमुख जाहीर केले.   त्याने इस्लामिक खलीफत जुलै, २०१४ ला स्थापन केली.  पहिल्या महायुद्धात तुर्कीच्या नेतृत्वाखाली चालणारी खलीफत नष्ट झाली.   त्याचा वारसा आपण असल्याचे बगदादीने जाहीर केले. इराकमध्ये सद्दाम हुसेनची राजवट सर्वधर्म समभाव मानणारी होती.  अमेरिकेने त्याचे २ तुकडे केले.  एका बाजूला सुन्नी अल्पसंख्याक गट हा इसिसला पूर्ण खाद्य पुरवत होता.  सर्व कट्टरवादी मुस्लिम समुदाय इसिसमध्ये सामील झाला.  सद्दाम हुसेनने या सर्वांना  दाबून टाकले होते. 

बगदादीचा जन्म १९७१ला सामर्रा या इराकी शहरात झाला.  अमेरिकन हल्ल्यानंतर २००३ ला तो पकडला गेला व अमेरिकन तुरुंगात ११ महीने राहिला.  अमेरिकेला त्याच्याविरुद्ध जास्त पुरावे मिळाले नाहीत  व त्याला आपला हस्तक बनवण्यासाठी सोडून दिले.  हे अमेरिकन गुप्तहेर खात्याचे मोठे अपयश होते.  तुरुंगामध्ये बगदादीचे अनेक आतंकवाद्यांबरोबर संबंध जुळले.  ते पुढे जाऊन बगदादीच्या सैन्यात सामील झाले.  त्याचबरोबर नेस्तनाबूत झालेल्या इराकी सैन्याचे अधिकारी व सैनिक इसिसला सामील झाले.  म्हणून बगदादीकडे कुशल लढवयांची मोठी फौज तयार झाली.  बगदादी हा अल-कायदाचा इराक मधील नेता अबुमुसद- अल- झरकावीचा शिष्य होता.  अमेरिकन सैन्याविरुद्ध त्यांनी कडवी झुंज दिली.  तो २००६ ला मारला गेला.  बगदादी व त्याच्या सैनिकांनी अलकायदाचे आपले पाश तोडले आणि स्वातंत्र्यपणे इसिस बनून काम सुरू केले.  त्यात सद्दाम हुसेनचा नं. २ इज्जत इब्राहीम सामील होता. 

इसिसची प्रगती होत गेली. त्यांनी इराकचे नं. ३ चे शहर मौसुलवर कब्जा केला.  त्याबरोबर इसिसचे महत्त्व पूर्ण जगात वाढले.  त्याचवेळी ट्रम्पने जाहीर केले की अमेरिकन सैन्य तेलाचे संरक्षण करण्यासाठी तिथेच राहील.  यावरून स्पष्ट दिसते की अमेरिका त्या भागावर आपले प्रभुत्व ठेवण्यासाठी वाटेल ते करेल.  त्यांचे राजकारण आता पूर्णपणे जगाला भोवत आहे.  या प्रक्रियेतच इसिस आणि अलकायदा कट्टर शत्रू झाले आहेत.  कारण बगदादीने अलकायदाचा प्रमुख अलमन-अल- झावेरीचे नेतृत्व मान्य करण्यास नकार दिला.  आता त्यांचे एकमेकाविरुद्ध युद्ध सिरिया, इराक आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा सुरू आहे.  अलकायदा व तालिबान कधीही काश्मिरमध्ये आले नव्हते. पण अलिकडे काश्मिरमधील कलम  ३७० च्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात इसिस काश्मिरमध्ये घुसली आहे.   इसिसच्या क्रूरपणाला अलकायदाने नेहमीच विरोध केला होता. त्यातल्यात्यात सिया-मकसिदना आणि शिय्या घरावरच्या हल्ल्याला अलकायद्याने प्रचंड विरोध केला.  एकदा इसीसने १७०० सिय्या सैनिकांचे मुडदे पाडले.   यजदी आणि ख्रिश्चन लोकांविरुद्ध प्रचंड अत्याचार केले.  ३ वर्षाच्या कारकिर्दीत इसिस हे जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटन बनले.  तेल आणि गॅस इसिसच्या ताब्यात आला होता.  म्हणून ते कुठलेही हत्यारे विकत घेऊ शकत होते आणि जगामध्ये अनेक देशात आपला संघटनेचे छुपे गट बनवत होते.  त्यात महाराष्ट्रात अनेक शहारामध्ये  इसिसची संघटना बनली आहे.  सर्वात मोठी दहशत सामान्य मुस्लिम नागरिकांवर आहे.  त्याबद्दल कुठलीही कार्यवाही करण्यास सरकार अपयशी ठरली आहे. 

            इराकी सैन्य आणि सिय्या अर्ध सैनिक दलांनी आणि इराणच्या सैन्यांनी इसिसला इराक, सिरिया मधून उखडून काढले.  त्यातच सिरियन सैन्याने हिजबुल्लाच्या मदतीने व रशियन वायुदलाच्या कृतीशील कारवाईने बगदादीला संपविले.  बगदादीला लपायाला फार कमी जागा राहिली.  सिरियाच्या इडलिग भागात तो होता.  तिथे अमेरिकेची ८ हेलिकॉप्टर घुसली व बगदादीने आपल्या ३ मुलांसह स्वत:ला उडवून घेतले.  याचे श्रेय ट्रम्प वाशिंग्टनमध्ये बसून घेत आहे.  बगदादी मेला पण इसिस संपली नाही.  त्याचे दहशतवादी जगातील अनेक राष्ट्रात दबून बसले आहेत.  काश्मिरमध्ये त्यांचा काळा झेंडा अनेक ठिकाणी भडकवलेला दिसतो. यामुळे बगदादी गेला तरी इसिसचा धोका टळला नाही.  सूडाने पेटलेले बगदादीचे सैन्य आणखी पेटून उठेल, याचा धोका भारतालाही पत्करावा लागणार आहे.

            लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

                                                                                                वेबसाईट  : www.sudhirsawant.com

                                                                                    मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS