अर्थसंकल्पाची ऐसीतैसी_३.०२.२०२२

अर्थसंकल्प हा गरिबांसाठी असतो, असा विश्वास पूर्वी लोकांमध्ये होता. पण आता अर्थसंकल्पाची ऐसीतैसी झालेली आहे. १९९१च्या आधीअर्थसंकल्पाकडे बघताना कर कितीलावले आहेत ते बघायचे.  त्यावेळी सरकार जीवनावश्यकवस्तू वर कर कमी करायचे आणि श्रीमंतांवर कर जास्त लावायचे. लोकप्रिय अर्थसंकल्प त्याला म्हणायचे जिथे वस्तूंचे भाव कमी होतात. अर्थसंकल्पाचा संबध हा सरळ संविधानामधील तत्त्वांवर होतो  संविधानामध्ये एक तत्त्व लिहिलेले आहे.  ते म्हणजे समता.  भारत स्वतंत्रझाल्यानंतर समतामूलक समाज निर्माण करण्याची भूमिका सरकारने घेतली होती.  त्याकाळात राजे राजवाडे होते, भांडवलदार होते आणि संविधानाचे कलम ३८-३९प्रमाणे आर्थिकस्तोत्र मूठभर लोकांच्या हातात केंद्रित होऊ नये असा सरकारला आदेश होता. म्हणून प्रचंड श्रीमंती नसावी आणि गरिबी नष्ट करावी, हा आदर्श होता.  त्यामुळेअतिश्रीमंतावर जवळजवळ ८०टक्के त्यांच्या उत्पन्नावर कर लागू करण्यात येतहोता.  तत्व हे होते कि श्रीमंतांना वाजवी श्रीमंतीमध्ये ठेवायचे, पण अतिश्रीमंत होऊ द्यायचे नाही. करातून मिळालेले सरकारचे उत्पन्न हे गरिबांसाठीवापरायचे.  त्यामुळे शिक्षण, आरोग्य, निवास वगैरे मूलभूत गरजा गरिबांना मिळावेतव गरिबांचे जीवन सुसह्य व्हावे.

१९९१ला मनमोहन सिंग भारताचे अर्थमंत्री झाले व त्यांनी पूर्वीचे लोककल्याणकारी राष्ट्र उद्ध्वस्त केले. व त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणिजागतिकीकरण (खाउजा) हे धोरण आणले. थोडक्यात सरकारचे निर्बंध श्रीमंतावरून कमी करून, खुली अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही या देशांमध्ये सुरूकेली. त्यानंतर सर्व सरकारांनी हे धोरण आक्रमकपणे लागू केले. काँग्रेसकिंवा भारतीय जनता पार्टीचे धोरण हे सारखेच आहे.  या पक्षामधील आर्थिक धोरणात फरक काहीचनाही. फक्त हिंदुत्व हे गोंडस नाव काही लोकांनी दिले व दुसऱ्यांनीसर्वधर्मसमभाव हे धोरण लागू केले. हा शब्दच्छल करून भारतीय जनतेला झुलवतठेवण्यात आले आहे. प्रत्यक्षात याला काहीच अर्थ नाही. आज अंबानी जगातील पहिल्या दहा श्रीमंतातआले आहेत.दुसरीकडे करोना काळामध्ये गरिबांची ससेहोलपट होत आहे हे सर्वांनीअनुभवले आहे. सुरुवातीला आम्ही सर्वांनी मनमोहन सिंगच्या धोरणाला काँग्रेसमध्ये असून देखील या खाऊजाधोरणाला प्रचंड विरोध केला. हा विरोध नष्ट करण्यासाठी बाबरी मस्जिदपाडण्यात आली व मंदिराच्या नावाखाली आर्थिक धोरण लोकांच्यानजरेतून नष्ट करण्यात आले. मंदिर मस्जिदच्या वादापाठीमागे महाकाय बहू राष्ट्रीय कंपन्या भारतात कधी घुसल्या ते आपल्याला कळलेच नाही. परिणामत: देशाची अर्थव्यवस्था जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेंनिधी यांच्या आदेशावर चालते.

पुढे जाऊन सगळी धोरणं हीभांडवलदारांसाठी मुक्त अर्थव्यवस्थेसाठी आणि श्रीमंतांना श्रीमंतकरण्यासाठी राबविण्यात आली. अर्थसंकल्पातून कर अतिशय कमी करण्यात आले. म्हणजे ८०टक्के करातून आज जवळजवळ १५ टक्के पर्यंत श्रीमंतांच्याउत्पन्नावर कर कमी करण्यात आले आहेत.  म्हणूनच आता सरकारचे उत्पन्न कमीकरण्यात आले आहे व लोककल्याणकारी राष्ट्र नष्ट करण्यात आले आहे. याचा आधारघेऊन सरकार लोक कल्याणावर खर्च कमी करत आहे. सरकारी हॉस्पिटले बनवण्यातआली, जेणेकरून गरिबांना स्वस्तात आरोग्य सेवा मिळावी.  पण सरकारने आता सर्वसरकारी हॉस्पिटल बेचिराख करून टाकली आहेत.  आता गरीबांना श्रीमंत हॉस्पिटललाजावे लागते.तेथे लाखो रुपये त्यांना खर्च करावे लागतात. कुटुंबातली एकव्यक्ती आजारी पडली तर पूर्ण कुटुंब कर्जबाजारी होते आणि आत्महत्यावाढत चाललेल्या आहेत. त्यावर सरकार काहीच करत नाही. 

खाजगीकरणाच्यानावाखाली सर्व फायद्यात असणाऱ्या सरकारी कंपन्या व सुविधा सरकार कवडीमोलभावामध्ये श्रीमंतांना विकत आहे.  स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य माणसाची बँक आहे. ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे.  तिच्यामध्ये कर्जदेण्यासाठी २०टक्के भाग अडाणीला देण्यात आला आहे.  या कर्जाची परतफेडकरण्याची जबाबदारी बँकची असेल आणि अडाणीची नसेल.  पण फायद्यात मात्र अडाणीचा हिस्सा २०टक्के असेल.  हळूहळू ही बँक अडाणीच्या घशात कोंबली जाईल आणि पुढच्याकाळामध्ये सर्वच बँका श्रीमंतांना विकल्या जातील. जेणेकरून गरीबांना कधीच कर्ज मिळणार नाही. जसे एअर इंडियाचे झाले. सर्व सरकारांनी जाणीवपूर्वक एअर इंडियाची वाट लावली. आता ती टाटाला विकूनटाकली. ह्याच प्रमाणे रेल्वे विकण्यात येईल. जे जनतेचे मोठे कारखाने आहेत.ते सरकार विकून टाकणार आहे आणिभांडवलदारांना प्रचंड श्रीमंत करणार आहे. बर हे असू दे.  पण नोकऱ्या वाढतातका?१९९१नंतर फक्त १ टक्का नोकरी वाढली आहे आणि लोकसंख्या भरमसाठ वाढलीआहे. त्यात कंत्राटी कामगार निर्माण करण्यात आले आहेत. पुढच्या काळामध्येसरकारी नोकऱ्या सुद्धा पूर्णपणे कंत्राटी करण्यात येणार आहेत. 

आतासैन्यदलाचे सुद्धा खाजगीकरण करत आहेत. सैन्यात असताना मीकारगीलहूनश्रीनगरला येत होतो.मध्ये झोजीला खिंडीत माझी गाडी बंद पडली.  रात्रीचे दोनवाजले होते. बर्फ पडत होता.रात्रभर बर्फात काय झाले असते.  हेमला माहीत नाही, पण सुदैवाने माझ्याकडे रेडिओ सेट होता आणि मी जवळच युनिटलासंदेश दिला. त्यांनी EME, जे  गाडी आणि हत्यारे  दुरुस्त करण्याचे काम करतातत्यांना अर्ध्या तासात माझ्याकडे पाठवलं आणि कडाक्याच्या थंडीत बर्फ पडतअसताना मी माझी गाडी अर्ध्या तासात दुरुस्त केली आणि मी दोन तासातश्रीनगरला पोहचलो. आता या दलाला पूर्णपणे खाजगी करण्यात येत आहे.  या भागातलंसोडाच पण आता जिथे जिथे सैन्य आहे तिथे तिथे EME च्या तुकड्या आहेत. ह्यासर्व खाजगी लोकांना देण्यात येत आहेत. विचार करा खाजगी कंपनीचे लोक रात्री २ वाजता बर्फात गाडी दुरुस्त करायला जातील का? पूर्ण भारतामध्येमिलिटरीच्या गाड्या ह्या खाजगी लोकांकडे दुरुस्त होणार आहेत. माझी १००टक्के खात्री आहे की भ्रष्टाचाराने मिलिटरीच्या गाड्याअशाप्रकारेवापरल्या जातील आणि दुरुस्त केल्या जातील की लढाईच्या मैदानामध्ये ते कामचकरणार नाहीत. म्हणून भारताच्या सुरक्षेची ही वाट अत्यंत धोकादायक आहे.मिलिटरीच्या गाड्यामध्ये स्वयंचलित तोफा असतात, रणगाडे असतातआणि एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने सैन्याला नेणाऱ्या गाड्या असतात.भारतातील सर्वच वर्कशॉप खाजगीकरण करून टाकल्यानंतर ह्या सगळ्या उपकरणांची आणिगाड्यांची खाजगी लोक किती काळजीपूर्वक चांगल्या ठेवतील याची मला अजिबातखात्री नाही.

त्याचबरोबर भारतामध्येसैन्यदलाची सगळी साधनसामुग्री बनवणारा ऑर्डनन्स फॅक्टरीजचे खाजगीकरण करण्यातयेत आहे.  या फॅक्टरीमधून हत्यारापासून-विमानापासून-कपड्या पर्यंत अनेकगोष्टी उत्पादन करण्यात येते.  जर ह्या सर्व खाजगीकरण झाल्या तर  आजचादर्जा असलेले सामानसैनिकांना मिळणार नाही. भ्रष्ट्राचारामुळे हे सर्व खराब होणार आहे आणि खाजगी मालकगडगंज श्रीमंत होतील.  पण परिणामत: भारत गरीब होईल. सैन्याच्या अनेकविभागाचे खासगीकरण हे भारताच्या सुरक्षेला प्रचंड धोका आहे. कमीत कमी डिफेन्स हा विभाग  खाजगीकरणाच्या तडाख्यातूनसुटला पाहिजे. पण तसे होत नाही.

मुळत: लोकांच्याविकासासाठी सर्वत्र रोजगार निर्माण झाला पाहिजे.  पण खाजगीकरणामुळे  गेल्या तीस वर्षात कोट्यावधी लोक बेकार झाले. म्हणून जे लोक आरक्षणाची मागणीकरत आहेत त्यांना माझा सल्ला आहे.  आरक्षण मिळेल पण नोकरी मिळणार नाही आणिम्हणून खासगीकरणाच्या विरोधात सर्वांना आवाज उठवावा लागेल.  नाहीतर याभारतामध्ये अंबानी अडाणी तर प्रचंड श्रीमंत होत जातीलच.  देशात पैसा देखीलनिर्माण होईल.  पण गरीब गरीब होत जाईल आणि सरकारी नोकऱ्या संपतचालल्यामुळे या देशातले तरुण हवालदील होतील. आताच्याऐसीतैसीअर्थसंकल्पामध्ये नोकऱ्या प्रचंड प्रमाणात कमी करण्याचे पूर्ण कारस्तान आहे. शेतकरी, कामगार आणि सैनिक यांना प्रचंड अत्याचाराला सामोरेजावे लागत आहे. यातून भारताला पुन्हा बलवान करण्यासाठी जनतेने पुढे येऊन या दृष्ट कारस्थानाला विरोध केला पाहिजे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

 मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS