हा सरकार विरोधी कमजोर संघटना तंत्राचा एक भाग आहे. जिथे सरकारच्या विरोधातले लोक हत्यार उगारतात. आणि गनिमी कावाचा वापर करतात. पण जगामध्ये दहशतवाद कसा आला? ह्याचे मूळ पैसाच आहे. नाहीतर पूर्वी बंड हे प्रत्येक राष्ट्राला सहन करावेच लागले होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक भागामध्ये भारतात समाविष्ट होण्यास विरोध झाला. जसे गोवा आणि हैद्राबाद मध्ये उघड विरोध झाला. त्याला सैन्यदलाच्या मदतीने नेस्तनाबूत करावे लागले. पण अनेक दुर्गम भाग शस्त्र विरोध करू लागली. त्यातील कश्मीर व्यतिरिक्त, मिजोरम , नागालँड, त्रिपुरा, मणिपूर ही उत्तर पूर्वेतील राज्य तर आहेतच पण नक्षलवाद देखील भारताच्या अनेक प्रांतात पसरले. पण ही सर्व स्थानिक बंड होती. त्याला मोठे स्वरूप आले नाही. ऐंशीच्या दशकात मात्र हा खेळ वेगळाच झाला. अफुच्या तसकारीतून प्रचंड पैसा उभा राहू लागला. त्यातून दहशतवादी लोक हत्यार विकत घेवू लागले, दहशतवाद्यांची शक्ती वाढू लागली आणि राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठे धोका दहशतवाद्यांकडून निर्माण झाला.
दहशतवादाच्या वाढत्या प्रभावाला २ गोष्टी कारणीभूत ठरल्या. १९७९ ला रशियन सैन्य अफगाणिस्तान मध्ये घुसले. त्याला तोंड देण्यासाठी, अमेरिकेने पाकिस्तान च्या पश्चिम भागात म्हणजेच पठाणांच्या परिसरामध्ये, दहशतवादी गोळा करण्यास सुरवात केली. पाकिस्तान ने त्याचा सर्वात जास्त फायदा घेतला. प्रचंड आर्थिक मदत पाकिस्तानला झालीच पण प्रचंड हत्यारांचा साठा पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळाला. हळू हळू अमेरिकेने ह्या गटांना जिहाद पुकारायला लावला. १९८० पर्यंत जागतिक दहशतवादाचे केंद्र पाकिस्तान मध्ये उभे राहिले. पाकिस्तानात ISI त्याचा मुख्य आयोजक झाला. जागतिक जिहादचा पुरस्कर्ता अमेरिकन CIA आणि सौदी अरब झाले. त्याच साखळीत ओसामा बिन लादेन, तालिबान आणि इसीसची निर्मिती झाली. जे अमेरिकेने पेरले तेच अमेरीकेला भोगावे लागले. त्याच अमेरिकन षड्यंत्रातील ओसामाने अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००० मध्ये हल्ला केला व जागतिक व्यापार केंद्र जमीनदोस्त केले.
ह्या जिहादी टोळ्यांना पैसा कुठून आला. एवढा पैसा कुठल्या सरकारकडून मिळणे शक्य नव्हते. म्हणून अफगाणिस्तान मध्ये अफू ची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. अफगाणिस्तान मध्ये अफू व त्यातून निर्माण होणारी हेरोईन ह्या नशीली द्रव्यांचा प्रचंड व्यापार सुरु झाला. हेरोईन ची किंमत लंडन मध्ये आज २ कोटी रु प्रती किलो असेल. त्यामुळे अफगाणिस्तानातील नैसर्गिक हिरोईन ही दहशतवाद्यांच्या आर्थिक शक्तीचा पाया बनला. त्याच दरम्यान दाऊद इब्राहीम सारखे दस्त निर्माण झाले, ज्यांच्याक्कडे इतकी संपती जमली कि ते अनेक सरकार विकत घेवू शकत होते. दाऊद ची निर्मिती मुंबई मध्ये ऐंशीच्या दशकातच झाली. त्याच दशकात भारतीय आणि महाराष्ट्र सरकारमध्ये ह्या टोळ्या घुसल्या व मुख्यमंत्री ह्यांचे भागीदार झाले.
हा प्रवाह भारता पुरताच मर्यादित नव्हता तर ड्रग्सच्या सेवनामुळे युरोप आणि अमेरिकेत त्याची मागणी प्रचंड वाढली. युरोप मध्ये हेरोईन आणि अमेरिकेत कोकेन ह्याचा प्रचंड व्यापार सुरु झाला. संघटित गुन्हेगारीचा चेहरा मोहरा बदलला. गल्लीतील गुंडापर्यंत मर्यादित असलेली गुन्हेगारी आता आंतरराष्ट्रीय झाली. दक्षिण अमेरिकेतील कोलोंबिया मध्ये कोकेन चे साम्राज्य निर्माण झाले. इतके पैसे मिळू लागले, कि कोकेनचा त्यावेळचा बादशाह पाब्लो एस्कोबार जगातील श्रीमंतात ७ व्या नंबरवर गेला. कोलोंबियन सरकार त्याच्या दहशतीखाली वाकले. त्याने अनेक मंत्र्यांना, पोलिस अधिकारी, न्यायाधीशांना आणि ३ राष्ट्रपती उमेदवारांचा मुडदा पडला. पण डिसेंबर १९९३ मध्ये त्याला मारण्यात यश आले. अशाच प्रकारे जगात वेग वेगळ्या पातळीवर डॉन निर्माण झाले. ज्याची प्राथमिक कमाई ड्रग्स वर होती. ड्रग्समुळे पैसा व पैश्यामुळे हत्यारे मुबलक मिळू लागली. जगात अशे अनेक दाऊद उभे राहिले जे सर्व सरकारला त्रास देवू लागले. त्यातच बाबरी मस्जिद पाडण्यात आली. आणि निर्माण झाले हिंदू मुस्लीम द्वेषाचे राजकारण. जे अजून पर्यंत वेगवेगळ्या मार्गाने डोके वर काढत आहेत. भारतीय समाजाला दोन तुकड्यात विभागण्यात पाकिस्तानला यश आले. अजून सुद्धा आपण त्याचे परिणाम भोगत आहोत.
जगातील माफियानी अधिकृत सरकारला नगण्य करून टाकले आहे. म्हणून लोकशाहीबद्दल चर्चा करणे हास्यास्पद झाले आहे. मुंबईत १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यानंतर दाऊदचा प्रभाव इतका वाढला कि तो आता पाकिस्तानचा मुख्य दहशतवादी म्होरक्या झाला आहे. तसेच जगभरात अनेक देश आज माफियाच्या सावटाखाली कामं करत आहेत. ह्या प्रश्नाला मी खासदार म्हणून अनेकदा उघड करण्याचा प्रयत्न केला. १९९३ च्या मुंबईतील बॉम्ब हल्ल्यानंतर, मी भारत सरकारला गुप्तहेर संघटनांची एक समिती बनवण्याची मागणी केली. १०० खासदारांची सही घेवून ही मागणी सरकारला स्वाधीन केली. त्यावर सरकारने व्होरा समिती नेमली. देशात पहिल्यांदाच सर्व गुप्तहेर संघटनांची यादी बाहेर आली. त्याअगोदर, रॉ, IB ह्यांचे अस्तित्व देखील सरकारने मान्य केले नव्हते. पण मी स्वत: गुप्तहेर खात्यात काम केले असल्यामुळे ह्या सर्वांना अधिकृतपणे बाहेर आणले. वोरा समितीने ज्या शिफारसी दिल्या आहेत त्या भयानक आहेत.
वोरा समितीने ने स्पष्ट केले की, भारतामध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार देश चालवत नाही. तर माफिया, राजकीय पक्ष आणि भ्रष्ट अधिकार्याचे समांतर सरकार राज्य करत आहे. म्हणजेच पांढर्या कारभारापेक्षा काळा कारभार जास्त चालतो. तुम्ही सर्व हा अहवाल गूगल वर बघू शकता. हा अहवाल इतका भयानक आहे की या देशात निवडून आलेले सरकार हा एक मुखवटा आहे. व त्यासाठी खरी सत्ता ही समांतर सरकारकडे आहे. अहवाल प्रकाशित झाला लोकसभेने स्वीकारला पण त्यानंतर आलेल्या कुठल्याही सरकारने त्यावर काम केले नाही. उलट दहशतवाद वाढतच गेला. आणि अमली पदार्थांची तस्करी आणखी झपाट्याने वाढली. आज अनेक राज्यामध्ये तरुण लोक अफू च्या आहारी गेले आहेत. कश्मीरचा दहशतवाद सुद्धा अफू च्या धंद्यामुळे वाढला आहे. एकही आमदार – खासदार मारला जात नाही. पण असंख्य जवान मारले जातात, सामान्य नागरिक मारले जातात. पण आपण फक्त बघत बसतो. यामुळे देशातील राजकारण गेल्या दोन दशकामध्ये गल्लीछ झाले. चोर, लुटारू राजे झाले. आणि राष्ट्रभक्त बदनाम झाले. म्हणूनच जनतेचे किती हाल झाले तरी कुठल्याही सरकारला त्याचे काहीच नसते. समोर दिसणार्या मुखवट्यापेक्षा पाठी होणार्या कारस्थानला भारत बळी पडला आहे, कुंपण शेत खावू लागले आहे, आभाळ फाटले आहे. नुसते ठिगळ लावून चालणार नाही. ही आजची व्यवस्था आहे. जिथे सबसे बडा रुपया आहे. या देशामध्ये १२६ लोकांकडे भारताच्या अर्थ संकल्पपेक्षा जास्त पैसा आहे. पण शेतकर्याला आत्महत्या करावी लागत आहे. दुर्दैव हे की, हे दिसत असून सुद्धा कोणी काही करायला तयार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी एक निर्णायक लढा द्यावा लागणार आहे. कोरोना नंतर त्यासाठी सिद्ध होवूया.
लेखक: ब्रिगे. सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.