आत्महत्या_८.७.२०२१

जवळजवळ २३ नवीन मंत्र्यांना राष्ट्रीय मंत्रिमंडळात नव्याने घेण्यात आले.  त्याचबरोबर अनेकांना काढण्यात आले. त्यामध्ये  जावडेकर, आर. एस. प्रसाद,  सदानंद गोडा, धोत्रे यांना काढण्यात आले. ज्या लोकांना घेण्यात आले, त्यामुळे सर्व जणांना आश्चर्य वाटले. तसे महाराष्ट्रामध्ये पक्षात नव्याने दाखल केलेल्या लोकांना मंत्रिमंडळात घेतले. जावडेकर, धोत्रे सारख्या भाजपचा निष्ठावंत अतिशय जुन्या कार्यकर्त्यांना डच्चू देण्यात आला. नुकत्याच आलेल्या लोकांना मोठी पदवी देण्यात आली. हा खुर्चीचा खेळ रंगत चाललेला आहे.  प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षातील लोक घेऊन त्यांना मोठे करतात व आपल्या पक्षातील पायाखालच्या दगडांना दगड करून टाकत आहेत.

सत्तेत नसताना पक्ष उभारण्यासाठी प्रामाणिक लोकांची गरज पडते.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार गोगटे यांनी भाजप पक्षाला मोठं केलं. आमचे प्रतिस्पर्धी असून सुद्धा आम्ही एकत्र काम केले व विकासाच्या कामांमध्ये राजकारण कधी आणले नाही. ही पूर्वीची पद्धत राजकारणाची होती. म्हणून विकासाची गती जलद होती. आजकाल बाहुबलीना, गुंडांना, प्रचंड पैसेवाल्यांना राजकीय पक्ष मोठे करतात आणि नित्तीमता जोपासणार्‍यांना राजकीय पक्षामध्ये जवळ जवळ स्थानच नाही असे झाले आहे. आजच्या राजकरणात सर्वात नशीबवान नारायण राणे दिसतात. बाळासाहेबांनी त्यांना निर्माण केले. खुनाचा आरोप असताना देखील बाळासाहेबांनी त्यांना १९९५ मध्ये मंत्री केले. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री देखील केले. त्याच काळात १९९९ ला काँग्रेस पक्ष फुटला. भाजप आणि शिवसेना नारायण राणे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात निवडणूक लढले.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या २ पक्षाविरुद्ध २ वेगळ्या पक्षाविरोधात १९९९ लढत झाली. त्यात युतीचा पराभव झाला. कपिल पाटील व श्रीमती पवार हे देखील आता भाजपचे मंत्री झाले आहेत. ते सुद्धा राष्ट्रवादीत होते. काँग्रेस फुटलेली असून देखील युतीचा दारुण पराभव झाला. तरी बाळासाहेबांनी नारायण राणेला विरोधी पक्षनेता केला.  त्यावेळी मी कोकणात काँग्रेसला जिवंत ठेवले होते. मी २ वर्ष आधी बाळासाहेबांना सांगितले होते की नारायण राणे  काँग्रेसमध्ये येत आहेत. त्यांचा विश्वास बसला नाही. सोनिया गांधींनी मला नारायण राणेबद्दल विचारले होते. मी विरोध केला होता. ही बातमी मी प्रेसला दिली. त्याबरोबर नारायण राणेंच्या लोकांनी माझ्यावर राजापूर कोर्टात हल्ला केला. २ वर्षानी नारायण राणेने काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यांना डायरेक्ट मंत्री केले गेले. त्या काळात मी काँग्रेसचा सचिव होतो. सोनिया गांधींबरोबर काम करीत होतो.  तरी देखील मी नारायण राणेंचा प्रवेश थांबवू शकलो नाही. इतके जबरदस्त नशीब नारायण राणेचे आहे की काँग्रेसचे सर्व नेते त्यांच्यावर पुर्णपणे लट्टू झाले आणि अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आले.  मी आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष सोडला.

त्यानंतरची कहाणी अत्यंत मनोरंजक आहे.  नारायण राणेने आपल्या एका मुलाला खासदार केला आणि दुसर्‍या मुलाला आमदार केला.  २ आमदार आणि १ खासदार एकाच घरात वावरू लागले. एवढ्या वर्षानी माझ्याबरोबर काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते शिवसेनेत गेले. ज्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या झाली होती. त्या श्रीधर नाईक यांचा पुतण्या वैभव नाईक हे नारायण राणेंच्या विरोधात उभे राहिले.  श्री. दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते हे सुद्धा शिवसेनेत गेले आणि २०१४ च्या निवडणुकीत आमदार झाले. नारायण राणेचा पराभव झाला. किंबहुना पूर्ण कोकणात एकच आमदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडून आला. मग काँग्रेसने नारायण राणेला विधान परिषद दिली. परत मुंबईहून आमदारकीचे तिकीट दिले.   तिथे देखील नारायण राणे पडले.  पण मंत्रिपद कायम चालू होते.  कालांतराने त्यांना काँग्रेस पक्ष सोडवा लागला. पण नशीब इतके मोठे की भाजपने त्यांना घेतले. तरी देखील खासदारकीला नारायण राणेचा मुलगा पडला. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचे सर्व उमेदवार पडले. सिंधुदुर्गात नारायण राणेचा एक मुलगा निवडून आला. या जबरदस्त पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना राज्यसभेच खासदार केले व आता केंद्रात मंत्री केले.  आमच्या जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री असल्यामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो  आणि आता तरी जनतेसाठी काहीतरी करतील अशी अपेक्षा करतो. 

भाजपचे हे तंत्र दुसर्‍या पक्षातील लोकांना घेऊन पक्ष वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांना किती यश देतो ते काळच ठरवेल.  किंबहुना सर्वच पक्षाची जी काही पद्धत आहे त्यातून पक्षीय तत्त्वज्ञान हे काही उरलेच नाही. तत्त्वज्ञानामुळे जे लोक अनेक वर्ष एका पक्षा बरोबर जोडलेले होते ते पर्व आता संपले आहे. सत्ता मिळवणे हा एकच उद्देश दिसतो.  त्यामुळे साम दाम दंड भेद हे एकमेव तत्त्वज्ञान सर्वांनी स्विकारले आहे. सत्तेवर कब्जा करणे हे उद्दीष्ट व्यक्तीगत प्रगतीला महत्त्व देते.  त्यामुळे देश व समाज हा बाजूलाच राहतो. त्यामुळे गोर-गरिबाची ससेहोलपट होत आहे. शेतकर्‍यांची आत्महत्या प्रकर्षाने वाढत आहे व त्यावर कोणी काही करू इच्छित नाही.  करोना काळात तर जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. नोकर्‍या नाहीत, उद्योगधंदे बंद आहेत, बेकारांची संख्या वाढत चाललेली आहे. देशातील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. जवळ जवळ ५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीला हाताळण्याची मानसिकता व क्षमता सरकारकडून नष्ट झाल्याचे दिसते.  त्यात श्रीमंत अति श्रीमंत होत चाललेले आहेत व गरीब आणखी गरीब होत चालले आहेत. या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन कुठेच दिसत नाही. अमेरिका युरोपमध्ये करोना काळात जनतेला आधार देण्यासाठी प्रचंड पैसा सरकारने दिला  आहे. पण, भारतात तसे काही दिसत नाही.  ही आजची शोकांतिका आहे.

सर्वात पहिले प्राधान्य शेतकर्‍यांना जगण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आहे व दुसरे सर्वांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आहे. त्यामध्ये सरकारी नोकर्‍या लोकांना उपलब्ध व्हाव्या यासाठी सरकारने पुर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. पण तसे होत नाही.  केंद्र आणि राज्य सरकारच्या लाखो जागा उपलब्ध असताना गेले ३ वर्ष सरकारी नोकर्‍याच बंद झाली आहेत. औरंगाबाद पोलीस प्रतीक्षा यादीमध्ये असलेले विद्यार्थी विठ्ठल खोत यांनी अखेर आत्महत्या केली.  हा गुणवंत विद्यार्थी यांने १८८ गुण घेऊन औरंगाबाद मध्ये अत्यंत वरच्या क्रमांकावर स्थान मिळवले.  पण २०१८  पासून जे प्रतिक्षा यादी मध्ये विद्यार्थी आहेत, त्यांना नोकरी न देण्याचा निर्णय  घेण्यात आला. तसेच एम.पी.एस.सी. मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी देखील आत्महत्या केली.  असे अनेक विद्यार्थी आज नोकरीच्या प्रतीक्षेत  अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत.

मी सैनिक फेडरेशनच्या मार्फत व विद्यार्थ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले होते.  तसेच आजचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या विद्यार्थ्यांना पोलीस दलात रुजू करावे असे पत्र देखील दिले होते. पण दु:खाची बाब ही आहे की अनेक आमदारानी, मंत्र्यांनी व  आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शिफारस करून देखील ह्या ५०० विद्यार्थ्यांना अजून पर्यंत रुजू करून घेण्यात आले नाही. यात जवळजवळ १५० माजी सैनिक देखील आहेत.  माजी सैनिकांचा तर प्रश्न आणखी गहन आहेच. त्यांना ३५ व्या वर्षी निवृत्त करण्यात येते आणि मग नोकरीसाठी त्यांना दर-दर भटकावे लागते.  त्यांना तसेच ४०० हून अधिक विद्यार्थी शेतकऱ्यांची मुले आहेत. त्यांना देखील दूर लोटण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत.

आज जनतेची  परिस्थिती अत्यंत बिकट आहे. करोनामूळे  इतर कुठेही नोकरी नाही.  सैनिकांचे व विद्यार्थ्यांचे वय उलटून जात आहे व त्यांना परत कुठल्याही खात्यामध्ये नोकरी मिळणार नाही हा  सरळ अन्याय व अत्याचार आहे.   आम्ही कारगीलमध्ये लढलो आहोत, तर त्या कारागिल विजयाच्या दिवसानिमित्त आता आम्हाला अटक करा अशी आम्ही मागणी सरकारकडे करत आहोत.  विद्यार्थ्याने आत्महत्या करावी ही दुर्दैवाची बाब आहे. शेतकरी आत्तापर्यंत आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत.  आता तरुण, बेरोजगारांनी सुद्धा आत्महत्या करायला सुरु केलेली आहे.  हे भारत किंवा महाराष्ट्र सरकारला शोभून दिसत नाही. यात सरकारचे पूर्ण अपयश दिसत आहे आणि म्हणूनच आमची मागणी आहे की तातडीने भरती करा.  २०१८ नंतर भरती झाली नाही.  आज जवळजवळ लाखो जागा रिक्त आहेत व प्रतीक्षा यादीत असलेला अल्पशा सैनिकांना व विद्यार्थ्यांना सरकार का घेत नाही. अशा स्थितीत मंत्रिमंडळ बदलले किंवा सरकार बदलले तरी त्याचा जनतेला काहीच फायदा होत नाही.  आता नवीन बनलेले मंत्री सत्कारामध्ये गुंग होतील आणि ज्य मंत्र्यांना काढलेले आहे ते दू:खाच्या सागरात बुडून जातील. जनता आहे तिथेच आहे.  जीवन जगने कठीण होत असताना त्यांना दिलासा देणारे काहीच घडताना दिसत नाही. शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत असताना त्याचे परिणाम राजकीय पक्षावर सुद्धा होणार. जनतेचा प्रक्षोभ वाढत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राजकीय पक्षाची सुद्धा आत्महत्या होऊ शकते. 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS