पुन्हा एकदा दिल्लीकरांनी आप वर विश्वास दाखवला आणि आपचा दणदणीत विजय झाला. बाप मोदींच्या ‘तोडो आणि फोडो’ राजकारणाला जनतेने जुमानले नाही. १९९१ पासून ह्या देशात फक्त मंदिर मस्जिद द्वेष वाढत चालले आहे. जाणिवपूर्वक, योजना बद्द पद्धतीने देशाला द्वेष आणि दंगलीच्या भोवऱ्यात अडकविण्यात आले. गेली ३० वर्ष पाकिस्तान आणि हिंदू मुस्लिम द्वेष हाच राष्ट्राचा अजेंडा बनला. हे काही आपोआप झाले नाही. कोणी तरी महाकाय शक्ती हे घडवत राहिली आणि आपण त्यामागे फरफटत गेलो. देशाचे प्रचंड नुकसान झाले. पण देशाचे १०६ लोक अब्जोपती झाले आणि पूर्ण देशाच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त पैसा त्यांच्याकडे गेला. दंगलीमुळे पैसा अब्जोपतीकडे कसा गेला? ही माहिती जनतेला असणे गरजेचे आहे.
ह्या दोन्ही घटना जोडलेल्या आहेत. मी अनेकदा लिहीले आहे की १९९१ ला जग बदलले. अमेरिका शीत युद्धात विजय झाली. रशियाचे अनेक तुकडे झाले. पण हा फक्त दोन देशातील संघर्ष नव्हता. ही विचाराची लढाई होती. एकीकडे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही आणि दुसरीकडे सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखाली साम्यवाद किंवा समाजवाद. त्यात पाकिस्तान अमेरिकेचे पिल्लू बनले. भारत सोव्हिएत संघाचा समर्थक झाला. शीत युद्ध १९४५ ते १९९१ पर्यंत लढले गेले. त्यात पराभव समाजवादी विचारांचा झाला आणि भांडवलशाही विजयी ठरली. त्याचवर्षी मी सैन्य सोडून लोकसभेत आलो. ह्या वैचारिक संघर्षाचा एक भाग झालो.
त्याच वर्षी भारताला सोने विकावे लागले. अमेरिका एकमेव शहेनशहा बनला. तो पूर्ण जगावर राज्य करू लागला. अमेरिकेने भारताला बंदुकीच्या निशाण्यावर ठेवले व देश कसा चालवायचा हे सांगू लागला. त्याने मनमोहन सिंगाना भारताचे अर्थमंत्री केले. अमेरिकेच्या मालकीची जागतिक बँकेत नोकरी करणारा माणूस भारताची अर्थव्यवस्था बनवू लागला. आम्ही काँग्रेसचे खासदार असून देखील त्यांना विरोध करू लागलो. त्यांनी पूर्वीची अर्थव्यवस्था गाडून टाकली. इंदिरा गांधींचा ‘गरीबी हटाव’ कार्यक्रम नष्ट केला. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण (खाउजा) धोरण लागू केले. हे भारताला धोक्याचे आहे. हे आम्हाला स्पष्ट दिसत होते. ह्या धोरणाला कडाडून विरोध होऊ लागला. म्हणून बाबरी मस्जिद पाडण्यात आली. देशात आग लागली. हिंदुत्वाच्या नावाखाली देश पेटवण्यात आला. लोक खाउजा विसरले. हिंदू-मुस्लिम द्वेष रुजविण्यात अमेरिकेचे हस्तक यशस्वी झाले. तेंव्हापासून आजपर्यंत राजकारण ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ ह्यावर चालत आहे.
बाबरी मस्जिद कांड हा केवळ मंदिर बांधण्यासाठी नव्हता तर लोकांचे लक्ष द्वेषाकडे वळवून खाउजा धोरण राबविण्यासाठी होता. आता मंदिर बांधण्याच्या प्रत्येक विटेवर द्वेष कोरण्यात येणार आहे. पुढे मंदिर बनो का मस्जिद बनो, ह्या देशात द्वेषाची निशाणी म्हणून लोकांना कायमची आठवण करून देत राहील. हे सर्व काही आहे पण लाखो शेतकऱ्यांच्या चितेवर ही अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. सामान्य माणसाच्या शोषणातून काही लोक श्रीमंत झाले ही भांडवलशाही आपल्यावर राज्य करत आहे. अमेरीकन तत्वज्ञानाचे आपण गुलाम आहोत त्याची जाणीव गुलामांना नाही.
३० वर्षाच्या खाउजा धोरणाने १०६ अब्जोपतीना गर्भश्रीमंत केले. भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे गेली. १% लोकांच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात ४६% वाढ झाली. ५०% गरीब जनतेची संपत्ती गेल्या एक वर्षात फक्त ३% नी वाढली. ह्यालाच खाउजा म्हणतात. ह्यालाच भांडवलशाही म्हणतात. केजरीवालने हे बदलले. त्याने विकासावर लक्ष दिले. दिल्लीमध्ये केजरीवाल देखील हिंदू-मुस्लिम राजकारणात जातीवादी सेक्युलर राजकारणात अडकला होता. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस बरोबर युती करण्यासाठी प्रचंड जोर दिला. त्यात तो हिंदू-मुस्लिम संघर्षाचा भाग झाला. विकास सोडून हे राजकारण केल्यामुळे, दिल्लीत लोकसभेमध्ये एक जागा सुद्धा मिळाली नाही आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात निवडणूक सुद्धा लढू दिली नाही.
ह्या विषयावर आमचे केजरीवालशी मतभेद झाले. माझा ठाम विश्वास आहे की भाजपला वेगवेगळ्या मार्गाने हिंदू-मुस्लिम द्वेषाचे वातावरण बिघडवत ठेवायचे आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष या भावनात्मक विषयाकडे खिळून राहते व विकासाचे मुद्दे नजरेआड होतात. म्हणून वेळोवेळी भाजप असे काही मुद्दे निर्माण करते की कॉग्रेस आणि इतर पक्ष हिंदू-मुस्लिम विषयात अडकून रहावेत. राहुल गांधीला जाणवेधारी हिंदू म्हणून कॉग्रेसने पुढे केले. हिंदू मते जिंकण्याची केविलवाणी धडपड कॉग्रेसला नष्ट करण्यामध्ये कारणीभूत ठरली.
भाजप सर्व पक्षाला खेळवत राहिले आणि सर्व पक्ष हिंदू-मुस्लिम मुद्दयावर प्रतिउत्तर करण्यात दंग राहतील. स्वत:चा अजेंडा पुढे करत नाहीत, म्हणून जितके सगळे पक्ष भाजपला सेक्युलर मुद्दयावर विरोध करत राहतील तितका भाजपचा फायदा. केजरीवालने त्या सापळ्यामध्ये अडकू नये म्हणून मी कायम प्रयत्न केला. पण यशस्वी झालो नाही. त्यामुळे लोकसभा आणि नंतर विधानसभेपर्यन्त आपची सगळीकडे पिछेहाट झाली. पण वेळेतच आपने युद्धनीती बदलली व त्यांच्या कार्यावर व दिल्लीच्या विकासावर भर दिला. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत भाजप सीएए-एनआरसी कलम ३७०, यावर प्रचार करत राहिली. त्याविरुद्ध केजरीवालने आपण केलेल्या ५ वर्षाच्या कामावर प्रचार केंद्रित केला. कामे तर प्रत्यक्षात आपने केली होती व त्याचा थेट फायदा सामान्य माणसाला झाला होता. त्याचाच परिणाम म्हणजे भाजपचे पिछेहाट कॉग्रेसचा झीरो बेजेट आणि आपचे प्रचंड यश.
इंदिरा, राजीव गांधीच्या काळापासून एक विषारी प्रचार करण्यात आला. इंदिरा गांधीचे ‘लायसन्स राज – गरीबी हटाव’ हे देशाच्या प्रगतीला घातक आहे. म्हणून मुक्त अर्थव्यवस्था आणली पाहिजे. लोकांना कुठलीही गोष्ट फुकट देणे म्हणजे पाप आहे. गरीबांना सवलत म्हणून सरकार अनुदान देते. त्यावर सरकारी हॉस्पिटल, शाळा, रेल्वे, एस.टी. चालतात. अनुदान देऊन स्वस्थ धान्याची दुकाने उघडतो. उत्पादन वाढण्यासाठी सहकारी क्षेत्राला अनुदान देतो. हे सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक आहे. म्हणून तीन पाऊले उचलली पाहिजेत.
१) मोफत काही द्यायचे नाही २) अनुदान कुणाला द्यायचे नाही. ३) सरकारचे काम – काम करणे नव्हे, म्हणजेच सरकारने कारखाने चालवू नये, एस.टी., रेल्वे, विमानसेवा, शाळा, रेशन दुकान, हॉस्पिटल चालवू नये. त्याचबरोबर असेही भासविण्यात आले की सरकारी यंत्रणा कुठलेही काम अकार्यक्षम पद्धतीने करते आणि खाजगी क्षेत्र हे कार्यक्षम असते. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंगचे खाउजा धोरण आले. वाजपेयी आणि मोदीने आणखी जोमाने चालविली आणि लोकांची वाट लागली. श्रीमंत प्रचंड श्रीमंत झाले आणि गरीब अत्यंत गरीब झाले.
केजरीवालाने दाखवून दिले हे वरचे सर्व खोट आहे. त्याने शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, बससेवा फुकट दिली. पण, त्याचबरोबर उत्कृष्ट प्रशासनाद्वारे सरकारचा फायदाच झाला. लोकांना फुकट दिल्यामुळे किंवा अनुदान दिल्यामुळे सरकारचे नुकसान होते ही गोष्ट खोटी आहे. म्हणून संविधानामध्ये लोककल्याणकारी राज्याची रचना आहे. त्यात लोकांना फुकट सुविधा देण्याची पूर्ण मांडणी आहे. या मांडणीला भांडवलशाहीने बदनाम केले व भारतीय जनतेची जी आर्थिक सुरक्षा होती ती हिरावून घेतली. त्याचाच परिणाम शेतकरी आणि कामगारांच्या आत्महत्येत झाला. पण सरकार निर्लज्जपणे हे अपयश हिंदू-मुस्लिम द्वेषाच्या पाठीमागे लपवत राहिली आहे.
खाजगी क्षेत्र कार्यक्षम असते, भ्रष्ट नसते ही कल्पना गेल्या ३० वर्षात वल्गनाच ठरली आहे. कारण खाजगी क्षेत्राची मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी, हर्षद मेहता यांनी कशी वाट लावली ते आपण पाहिलेच आहे. या भांडवलदारांनी बँकेच्या संगनमताने लाखो-कोटी रुपये लुटले. आता शंभरपेक्षा जास्त बँकेच्या अधिकार्यांवर खटले चालू आहे. मोदीचा लाडका अनिल अंबानी कर्ज बुडविण्यासाठी ब्रिटनच्या कोर्टात जबानी देतो की, त्याचे दिवाळे निघाले आहे व बँकेचा पैसा तो भरू शकत नाही. यालाच मोदींनी राफेल सारखे लढाऊ विमान बनवायला दिले. त्यामुळे मनमोहन सिंग आणि मोदीचे खाउजा धोरण पूर्ण अपयशी ठरले आहे. त्यात जनता भरडून निघाली आहे. ही स्थिती जगभर आहे. त्याला जबाबदार अमेरिका आहे व अमेरिकेचे चमचे आहेत.
म्हणून भारतातल्या अमेरिकन चमच्यांना गाडून टाकले पाहिजे व भारताला त्यांच्या कचाट्यातून मुक्त केले पाहिजे, हाच भारतीय स्वातंत्र्याचा दूसरा लढा आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.