आरोग्यम धन संपदाय_९.४.२०२०

            पंजाबराव देशमुख हे विदर्भातील उत्तुंग व्यक्तिमत्व. डा. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर घटना समितीत काम करून त्यांनी भारताला एक इतिहासकारी संविधान दिले व भारताच्या प्रगतीचा पाया रचला. राजकिय क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विलक्षण वाटचाल केली. श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिशा ठरवली. आज या संस्थेअंतर्गत 250 शाळा महाविद्यालये आहेत. दिड लाख विद्यार्थी त्यामधून शिक्षण घेत आहेत. रयत शिक्षण संस्थेनंतर भारतात ज्ञानदानाचे काम करणारी ही दुर्सया क्रमांकाची शिक्षण संस्था आहे.

            काही वर्षापूर्वी  मी शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदधिकार्‍यांना अॅड. अरूण शेळके यांच्या समक्ष मिशन ऑलिंपिक कार्यक्रम चालविला अशी विनंती केली.  सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक देशापासून खेळांची आवड निर्माण करावी. त्यांना सर्व सोयी निर्माण करून द्याव्यात. यामुळे दोन उद्दीष्टे साध्य होतील. पहिले म्हणजे खेळ हे आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे साधन आहे. लहानपणापासून मॄत्यूपर्यंत प्रत्येकाने रोज एक तास खेळावे म्हणजे प्रत्येकाचे आरोग्य पर्यायाने देशाचे आरोग्य चांगले राहील. सरकारला आरोग्यावर कमी पैसा खर्च करावा लागेल. 2030 पासून वॄध्दांची संख्या देशात जास्त होणार आहे. जर ही संख्या आजारी असेल तर देशाला बिलकूल परवडणारे नाही. विकासापेक्षा प्रचंड खर्च आरोग्यावर करावा लागणार आहे. औषधे देणे आणि उपचार करण्यापेक्षा आजार होवूच नये असा आपण प्रयत्न केला पाहिजे.

            दुसरे म्हणजे, आपला 130 कोटींचा देश ऑलिंपिकमध्ये पदक मिळवू शकत नाही ही लाजीरवाणी परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल. सरकार काहीच करणार नाही. पैसे खाण्यापलिकडे नेत्यांना व अधिकार्‍यांना खेळाचे काहीच ज्ञान नाही. कलमाडींचा प्रताप सर्वांनाच माहीत आहे. पण मुले आपली आहेत त्यांना वार्‍यावर आपल्याला टाकता येत नाही. म्हणून घरातून आणि शाळांमधून लोक चळवळीतून  क्रीडा संस्कॄती निर्माण करावी लागणार आहे. माझा हा प्रस्ताव अॅड. शेळके यांनी लगेच स्विकारला व संस्थेतर्फे शिवाजी ऑलिंपियाड हा कार्यक्रम आखला आणि लगेच कामाला सुरूवात केली. खेळांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी आतापर्यंत सहभागी झालो आहे. पण शिवाजी शिक्षण संस्थेसारखा कार्यक्रम मी कुठेच पाहिला नाही. गावागावांतून मुलांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. B.P.Ed. शिक्षकांना पहिल्यांदाच आपले कौशल्य दाखविण्याची या निमीत्ताने संधी मिळाली. अमरावती येथे अंतिम फेरीसाठी सर्व जिल्ह्मांतून आलेल्या युवकांनी शिवाजी ऑलिंपियाडमध्ये आपले सामर्थ्य प्रकट केले. ही खरच ग्रामीण मुलांसाठी नविन संधी आहे. पण त्यांनातर शिवाजी शिक्षण संस्थेने ही परंपरा खंडित केली. ही दुर्दवाची बाब आहे. पुढे जाऊन मला सुचवायचे आहे की, विदर्भातील व नंतर महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांनी अशाच प्रकारे काम सुरू करावे. ह्या सर्व संस्थांनी क्रीडा महासंघ बनवावा. त्यात क्रीडा संघटनांना सहभागी करून घ्यावे व एक जबरदस्त लोकचळवळ उभी करावी.

            कोरोनाच्या पार्श्भूमीवर आरोग्याचे महत्व सर्वांनाच कळून चुकले आहे. क्रीडा हे केवळ स्पर्धेसाठी नसून आपल्या जीवन शैलीचा एक भाग झाला पाहिजे. सैन्यदलात प्रत्येक सैनिकाला रोज खेळाच्या मैदानात उतरावे लागते. त्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकाला क्रीडा आणि व्यायाम  केला पाहिजे. ग्रामीण जीवनात सुद्धा प्रत्येक स्त्रीने  आधी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. ग्रामीण संस्कृतीमध्ये स्त्रियांनी पळायला जाणे हा टिंगलीचा भाग होतो. आणि आपल्या महिला सुद्धा क्रीडा क्षेत्रात भाग घ्यायला मागेच राहतात. हे भारतीय संस्कृतीचे दुर्दव् आहे.  भारतीय संस्कृतीच्या दबावाखाली स्त्रियांनी खेळात भाग घेणे हे हास्यास्पद होते. पण अलीकडे मुली चालल्या आहेत. पण लग्न झाल्यावर ह्याच मुली आपल्या शरीराकडे पुर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यांच्या स्वत: च्या आरोग्यावर पूर्ण दुर्लक्ष करतात.             पंजाबराव देशमुखांची दुरदॄष्टी ही त्यांच्या क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील कार्याने स्पष्ट होते. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मध्यप्रदेश आणि व – रहाड चे  ‘क्रीडा आणि अॅथलेटीक बोर्ड ’ स्थापन केले होते. नागपूर विद्यापिठात शारिरीक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू केला.  मात्र आताचे सरकार शारिरीक शिक्षणाच्या पदवीधरांना B. ED  पेक्षा कनिष्ठ दर्जा देवून हा शिक्षणक्रमच बंद करण्याच्या मार्गावर आहे. कारण शिक्षणात पैसे कमी खायला मिळतात. भांडवलशाहीच्या तत्वाप्रमाणे जास्तीत जास्त फायदा होतो तिथेच गुंतवणुक करण्यात येते.  आता क्रीडा शिक्षणामध्ये चिल्लर मिळते. म्हणून सर्वात जास्त पैसे खाण्याचे विभाग जलसंपदा, रस्ते बांधकाम, वीज, महसुल ही खाती मिळविण्यासाठी सर्व पक्षाचे नेते धडपडतात. क्रीडा, उद्योग, कॄषी अशा महत्वाच्या खात्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष होते.  पक्षातील कमी महत्वाच्या नेत्यांना या खात्यांची मंत्रीपदे मिळतात.

            मी शाळा – महाविद्यालयात क्रिकेटच खेळलो.  जेव्हा सैन्यात अधिकारी बनण्यासाठी युपीएससीची परिक्षा पास होऊन डेहराडून येथील मिलीटरी अकादमीत दाखल झालो.  तेव्हा सिनीयर कॅडेट ने पहिला प्रश्न विचारला, ‘खेळ कुठला खेळतोस मी म्हणालो, ‘क्रिकेट’.  तो गरजला,  ‘इथे तु सैनिक बनायला आलास की फिल्मस्टार बनायला आलास.?’ आणि कडाक्याच्या थंडीत रात्रभर मला झाडावर लटकावून ठेवले.  सैन्याची क्रिकेटबद्दलची ही भुमिका तिव्र विरोधाची होती व आहे.  सैन्यात मैदानी खेळालाच प्रोत्साहन दिले जाते. म्हणूनच देशाच्या अनेक क्रीडा संघांमध्ये सैनिकांचा मोठा वाटा आहे. जो चांगला खेळाडू असतो, तोच चांगला सैनिक असतो, चांगला विद्यार्थी असतो, चांगला नागरिक असतो.  साधारणत: खेळाडू दारू, सिगारेट, गुटख्यापासून दूर राहतात.  खेळाडुंमधून आव्हान उत्पन्न होते व तरूणांना आपले कतॄत्व दाखवण्याचे अगदी तरूण वयात संधी मिळते.  म्हणून सेक्स आणि शराबमध्ये तरूण जास्त वळत नाहीत. मी सैन्यात असताना आठ खेळ शिकलो.

            सद्यस्थितीत राजकिय नेत्यांनी सर्व क्रीडा संघटनांवर आपला कब्जा केला आहे. जसे शरद पवार यांनी क्रिकेट पुर्ण ताब्यात घेतले आहे. कारण क्रिकेट जुगाराचा आणि मॅचफिक्सींगचा धंदा आहे व शरद पवारांना या बाबीमध्ये विशेष रस दिसतो. प्रफुल्ल पटेल फूटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.  म्हणून भारताच्या फूटबॉलला फूटबॉल वर्ल्डकपमध्ये आजपर्यंत प्रवेश देखिल मिळाला नाही. प्रत्येक जिल्हयापासून देशपातळीपर्यंत सर्व खेळाडूंचा ताबा घेऊन राजकिय नेत्यांनी त्यात भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी आणून खर्‍या गुणवंत खेळाडूंना बाजुला टाकले.  शुटींग, बॉक्सिंग,  आर्चरी, वेटलिफ्टिंग व कुस्ती हे खेळ सैन्याच्या ताब्यात आहेत.  फक्त त्यातच प्रगती आणि पदके देशाला मिळत आहेत.  यावरून खेळातील राजकारण नष्ट केल्याशिवाय खेळात भारताची प्रगती कधीच होणार नाही.

            खेळ आणि आरोग्य हे व्यावसायिकदॄष्टया सुध्दा प्रगती करू शकतात. शाळाशाळांत व्यायामशाळा व क्रीडांगणे गावातील लोकांच्या सहकार्याने उभी राहीली पाहिजेत.  वयाच्या तीन वर्षापासून ते नऊ वर्षांपर्यंतच्या मुलांनी सर्व खेळांमध्ये भाग घ्यावा.  नऊ  ते दहा वर्षात मुलांचे मन आणि शरीर संतुलन साध्य होते.  ज्या खेळात  मुलांचे कौशल्य समोर येते त्या खेळात त्यांची शाळांमधून निवड करण्यात यावी. त्यांना स्पर्धेत भाग घ्यायला लावावे.  विशेष प्राविण्य निर्माण मिळविल्यास त्यांना जिल्र्हा राज्र्य राष्ट्रीय संघांमध्ये घेण्यात यावे.  अतिउच्च प्रशिक्षण देवून त्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करावे. ज्यांची या प्रक्रियेत निवड होत नाही त्यांना देखिल क्रीडा क्षेत्रात खेळण्यासाठी सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. खेळाची मैदाने हा आज कळीचा मुद्दा झाला आहे.  विशेषत: शहरामध्ये जिथे 40 टक्के लोकसंख्या राहते तिथे आमच्या राज्यकर्त्यांनी क्रीडांगणांसाठी असलेल्या खुल्या जागा बिल्डर लॉबीसाठी हडप केल्या. शहराच्या विकास योजनांत बदल करून भुखंडांचे श्रीखंड करून खाल्ले. शेवटी लोकांना मला एकच विनंती करायची आहे, कितीही पैसा मिळाला तरी त्याचा उपभोग घेता येतोच असे नाही.  ज्याचे शरीर मजबूत असते त्याचे मन मजबूत असते.  त्याच्यातच जीवनाची मजा लुटण्याचे सामर्थ्य असते.  त्यामुळे सर्व शिक्षण आणि सहभाग घ्यावा त्यातूनच  ‘आरोग्यम धनसंपदाय’ या भारतीय संस्कॄतीच्या प्रमुख सुत्राचे पुनर्जिवन होईल. कोरोना सारख्या आजारावर कायमचा तोडगा काढायचा असेल तर क्रीडा व व्यायाम हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य भाग झाले पाहिजेत. 

लेखक : ब्रिगे.सुधीर सावंत

मोबा : ९९८७७१४९२९

वेबसाईट: www. sudhirsawant.com

Please follow and like us:

Author: Brigadier SS