कंगणा कांड_१०.९.२०२०

मला फिल्म इंडस्ट्री बद्दल फारसे माहीत नाही. त्यातील उद्योग म्हणजे व्यवसायाबद्दल मला बरीच माहिती आहे. पण  सिनेतारका, दिग्दर्शक, निर्माते याबद्दल मला काहीच माहिती नाही. कारण मी तसा सिनेमा पाहतच नव्हतो, चुकून कधीतरी हिंदी सिनेमा बघितला आहे. सिने जगतातील भानगडीत मला अजिबात रस नाही. सिने जगतातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे; संघटित गुन्हेगारांची सिने जगतावरील पकड. आपण सर्वांनी मोठ मोठे सीने जगतातील व्यक्ति दाऊद इब्राहीम बरोबर बघितले आहेत. कुठल्या चित्रपटात कोण काम करेल आणि कोण नाही करेल हे माफिया ठरवते. कुणी जुमानला नाही आणि एखादा पिक्चर बनवला तरी तो कुठल्याही थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही याची काळजी फिल्म इंडस्ट्री चालवणारी माफिया घेते.  फिल्म इंडस्ट्री कुठल्या आधारावर उभी आहे याची लोकांना कल्पना आहे. त्यावर पुर्णपणे नियंत्रण माफियाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण फिल्म इंडस्ट्री ड्रग्स वर उभारलेली  आहे.  उडता पंजाब पिक्चर काही लोकांनी बघितला असेलच पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या देशांमध्ये सिने जगतातील असलेली अर्थव्यवस्था ही गुन्हेगारांच्या हातात आहे. ड्रग्सचा पैसा सिने जगतात गुंतवला जातो. म्हणून तो काळा पैसा आहे. त्यामुळेच सिने जगतातील व्यवहार बँकेतून चालत नाही तर नगदी पैशावर चालतो.  

प्रत्येक कॉलेजमध्ये आणि प्रत्येक शहरांमध्ये ड्रग्स चा धंदा सर्हास चालतो. कॉलेजचे विद्यार्थी सांगतात की बहुतेक सर्वच  विद्यार्थी गांजा घेतात. बरेच लोक अफू, कोकेन घेतात.  सर्वात लवकर श्रीमंत होण्याची जर कुठली इंडस्ट्री असेल तर ती ड्रग्स  इंडस्ट्री आहे. फिल्म इंडस्ट्रीची माझी ओळख इथपर्यंत सिमीत आहे. त्यात काम करत असलेल्या व्यक्तीबद्दल  मला काही माहिती नाही.  कारण मी चुकूनच कधीतरी फिल्म इंडस्ट्री मधील पिक्चर बघतो.  म्हणूनच कंगना राणावत कोण आहे याची मला अजिबात माहिती नव्हती, पण आता झाली आहे. कंगना राणावत ने बॉल टाकला, त्याला राजकर्त्यांनी झेलून तिच्या विरोधात व्यक्तव्य केले आणि ती मीडियामध्ये झळकली. ती जे काय बोलली असेल किंवा काय व्यक्तव्य केले असेल हे एका बाजूला, पण सत्ताधारी पक्षातील मंत्री – संत्री  तिला धमकी देऊ लागले, तिच्याविरुद्ध बोलू लागले आणि  कंगना राणावत कोण आहे हे मला माहिती पडलं. नंतर मी चौकशी केली तेव्हा माहीत पडलं की पूर्वी प्रसिद्ध असलेली एक हिंदी पिक्चर मधील नटी आहे.  दुसऱ्याने सांगितलं की, अलीकडे तिचे  कुठलेही मोठे सिनेमा  प्रसिद्ध झाले नाहीत.  म्हणूनच एके काळची ही हिरोईन आता उतरणीला लागलेली असताना मिडीया मध्ये झळकली आणि ती सिनेतारका आजची हिरोईन झाली. तिला  हिरोईन  करण्यामध्ये राजकर्त्यांचा मोठा वाटा आहे. मला आश्चर्य वाटतं की, कंगना राणावत ने काहीही म्हटल असेल, तिच्या स्तराप्रमाणे ती बोलली असेल. किंवा काही म्हटले असेल पण तिला उत्तर द्यायची मोठ मोठ्या नेत्यांना काय गरज पडली हे मला कळत नाही.  राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अशा वादात उतरल्यामुळे कंगणा राणावतला आकारण महत्व आले. व ती राजकीय पक्षांच्या स्तराला जाऊन पोहचली. हे काय कुठल्या राजकीय पक्षाला शोभा देत नाही. याउलट त्यांनी आपल्या महिला विभागाला विरोध करायला सांगितले असते किंवा कुठल्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना बोलायला सांगितले असते तर फार फरक पडला नसता. आता शरद पवारांना सुद्धा म्हणावं लागलं की, हे तुम्ही जे आता कंगणा राणावत चे ऑफिस उध्वस्त केले आहे. तर तशी मागणी दुसर्‍या बाबतीत सुद्धा येऊ शकते. रामदास आठवलेला शिवसेने चे अनाधिकृत बांधकाम पाडा अस म्हणायला संधी  मिळाली.  मला कंगणा बद्दल काहीच माहिती नव्हती पण मुख्यमंत्री कोण आहे मला माहीत आहे. आणि माझे मित्र मंत्रीही मला तसेच प्रिय आहेत. कंगणा सारख्या व्यक्तीसाठी आपण आपली  प्रतिष्ठा पणाला लावायची गरज नाही. समाजात ज्यांना उच्च स्थान आहे अशा लोकांनी असे व्यक्त्व्य करू नये असं मला वाटतं. जेव्हा एक बाजू विरोध करते तेव्हा राजकारणात दुसरी बाजू तिचे समर्थन करते. आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये हे इतके भयानक संकट महाराष्ट्रावर आणि देशावर आलेले असताना  कंगनाला महत्व देणे कितपत योग्य आहे याचा सर्वांनी विचार करावा. भाजप लगेच मैदानात उतरली तर करणी सेना पण उतरली. कंगना राणावत ही राजपूत असल्यामुळे करणी सेना तिच्या बाजूने उभी राहिली असेल. पण हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी तिच्या बाजूने बोलावे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी तिच्या बाजूनी बोलावे हे पण त्यांना काही शोभा देणारी गोष्ट नाही असे मला वाटते. सूडबुद्धीने कंगणाच ऑफिस पाडण्याचा निर्णय हा चुकीचाच आहे. ही सूडबुद्धी जाणीवपूर्वक म्हणत आहे, कारण इतके दिवस ते अनधिकृत बांधकाम जर असेल तर त्याला आतापर्यंत हातही लावला नाही मग आताच कंगणाच्या व्यक्त्व्यानंतर बांधकाम पाडावे ह्यात जनतेला सूडबुद्धीच दिसते. सकाळी मी कंगणा राणावतच्या ऑफिस कडून चालत गेलो त्यावेळेला अनेक लोक ऑफिस बघताना दिसले.  टीव्ही चॅनल सकाळी ०७ वाजताच हजर होते. अशी प्रसिद्धी मिळण्यासाठी लोक लाखो रुपये देतात पण एवढी प्रसिद्धी मिळाली आणि ती कंगणाला आयुष्यात कधीही मिळाली नसेल.

          दुसरीकडे सुशांत सिंग – रिया हे प्रकरण चालूच आहे. पण सुशांत सिंग ची आत्महत्या/ खून हे बाजूलाच राहिले आहे. पण सिने जगतातील असलेला ड्रग्सचा प्रभाव लोकांसमोर आला आहे.  माफिया कडे प्रचंड पैसा आहे. त्यात सिनेजगत व त्याला जोडून असणारे अनेक धंदे, वेश्या व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, डान्स क्लब मध्ये ड्रग्सचा पैसा गुंतलेला आहे. एकंदरीत राष्ट्राच्या राहणीमानामध्ये ड्रग्सचा कारभार हा कुठल्याही उद्योगापेक्षा मोठा झालेला आहे. ड्रग्सचा व्यवहार इतका मोठा झालेला आहे की, कुठलाही राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष ड्रग्स विरोधात भूमिका घेत नाही. अफगाणिस्तान मधून ड्रग्स पाकिस्तानमध्ये येतात आणि दहशतवादी गट त्यांना भारतात आणतात. त्यातून मिळणारा प्रचंड पैश्यावर दहशतवादी गट उभे आहेत. त्यातला हा मोठा पैसा राजकरणात ओतला जातो. म्हणूनच १९९३ साली वोरा समितिने म्हणजेच सर्व गुप्तहेर खात्यांच्या प्रमुख समितीने म्हटले की, ह्या देशावर भ्रष्ट राजकीय नेते, माफिया आणि भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांचे समांतर शासन देशामध्ये राज्य करत आहेत. पण कुठल्याही सरकारने याविषयी कुठलेच पाऊल उचलले नाही. या सर्व प्रकारावरून स्पष्ट होते की या देशामधील राजकीय व्यवस्था संघटित गुन्हेगारांना काहीच करू शकली नाही. व दाऊद इम्ब्राहीम सारखे डॉन गेले ४० वर्षे राज्य करत आहेत. त्यामुळे समोर आलेले चित्र मुख्यमंत्र्यासह काही मंत्र्यांना धमक्या हे सर्व एका विकृत व्यवस्थेचे परिणाम आहेत. ह्यावर कारवाई करण्याची हिम्मत राजकर्त्यांमध्ये आहे का? हा खरा प्रश्न समोर आलेला आहे. 

 

 

                                                                   लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

                                                                   वेबसाईट : www.sudhirsawant.com

                                                                   मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS