कमला हॅरीस_२१.१.२०२१

अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे. त्याच शक्तिशाली राष्ट्राच्या उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस निवडून आल्या.  राष्ट्रपती म्हणून जो बाइडन निवडून आले. २० जानेवारीला यांनी पदभार स्विकारला. हा अमेरिकेच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे.   कारण कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्रपती महिला आहेत. याच बरोबर त्या पहिल्या भारतीय कृष्णवर्णीय महिला आहेत. सध्या अमेरिकेमध्ये प्रचंड संघर्ष चालू आहे. भारतीय लोकांवर  तेथील गोरे लोक  हल्ला करतात. त्यांना आपल्या देशामध्ये परत जायला सांगतात.  ‘आमच्या नोकऱ्या सोडून जा’ असे म्हणतात.  त्यामुळे या परिस्थितीत एक भारतीय  अमेरिकेत जाऊन उपराष्ट्रपती होऊ शकतात हे एक नवलच आहे.  भारताला तो एक अभिमानाचा क्षण आहे. कमला हॅरीस ज्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत, या पक्षाने भारताला अनेकदा उघडपणे विरोध केला आहे.  काश्मिरमध्ये ढवळाढवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. अशा स्थितीत जगातल्या सर्व शक्तिशाली देशाची उपराष्ट्रपती भारतीय व्हावी हा खरंच एक इतिहास आहे. त्यामुळे आपल्याला अपेक्षा करायला हरकत नाही की अमेरिकन भूमिका ही पाकिस्तान धार्जिन्य आहे, ती भारताच्या बाजूने होऊ शकते.

          त्यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. पुढे त्यांनी कॅलिफोर्नियाच्या हेस्टिंग्स कॉलेज मधून वकिलीचा अभ्यास पूर्ण केला.  त्यानंतर तिने येथील जिल्हा सरकारी वकिलीची नोकरी सुरू केली.  त्या कॅलिफोर्निया राज्याच्या अटॉर्नी जनरल म्हणून निवडून आल्या.  त्याकाळात त्यांनी क्रांतीकारी काम केले.  ड्रग माफिया विरोधात जोरदार मोहीम उघडली.  अनेकांना तुरुंगात टाकले.  महिलांच्या संरक्षणासाठी प्रचंड काम केले.  त्यांची हिंमत, धडाडी आणि कर्तव्यदक्षता पाहून त्यांना कॅलिफोर्निया मधून सेनेटवर निवडून जनतेने दिले.  एका राज्यातून फक्त दोन सेनेटर निवडले जातात.  सेनेट म्हणजे राज्यसभा पण अमेरिकेत राज्यसभेवर जनतेमधून निवडून जावे लागते. अमेरिकेच्या इतिहासातील ती पहिली भारतीय मुळाची महिला आहे. जी सेनेटवर निवडून आली. सेनेटर म्हणून तिने क्रांतिकारी काम केले.  आरोग्यसेवा गरिबांना मिळण्यासाठी एक नवीन कार्यक्रम आणला.  अमेरिकेत आश्रितांना नागरिकत्व मिळवून देण्याचे काम केले. खाजगी स्वयं:चलित हत्यारांवर बंदी आणली. तिला राष्ट्रीय ख्याती मिळाली, कारण तिने ट्रम्पच्या अधिकार्‍याना प्रश्न विचारून अडचणीत आणले. त्यांना जेरीस आणले. कमला हॅरिस यांचे दहशतवाद आणि ड्रग्स विरोधातील काम हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे.  २०२०च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी मिळवायचा प्रयत्न केला, पण उमेदवारी जो बाइडनला मिळाली. बाइडनने त्यांना आपल्याबरोबर उपराष्ट्रपती पदासाठी उभे केले, आता दोघे निवडून आलेले आहेत. ट्रम्पने त्यांची निवडणूक रद्द करण्यासाठी पुर्णपणे जिवाचे रान केले.  दंगल सुद्धा घडवली, पण अंतिमत: २० जानेवारीला दोघानी शपथ घेतली.  रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रपती ट्रम्प यांच्या पाठीमागे गोरे लोक एकत्रित झाले होते.

          कमला हॅरीस हिचा जन्म ऑक्टोबर, १९६४ ला झाला.  तिची आई शामला गोपालन ही एक बायोलॉजिस्ट होती.  तामिळनाडूमध्ये जन्माला आली होती.  ती अमेरिकेत गेली तिथे तिचं लग्न एका जमेकन प्राध्यापकाबरोबर झाले. कमला जेव्हा सात वर्षाची होती तेव्हा तिच्या आईचा घटस्फोट झाला.  सुरूवातीला ती आपल्या बहिणीबरोबर बरकले, कॅलिफोर्निया मध्ये राहत होती. तेथील नागरिकाने तिला चर्चमध्ये घेऊन जायची सवय लावली, पण तिच्या आईने तिला हिंदू धर्माचा पाठ पडवला. त्या तेथील मंदिरात जायच्या व भजन-कीर्तन सुद्धा करायच्या.  त्यांच्या आईने त्यांना भारतामध्ये अनेकदा आणले.  तिच्यावर विशेष प्रभाव तिच्या आजोबांचा पडला.  जे सरकारी नोकरीत होते व लोकशाही आणि स्त्रियांच्या हक्काबद्दल त्यांनी तिला प्रभोदीत केले.  कमलाने आपल्या भारतीय नातेवाईकांबरोबर कायम संबंध ठेवला आहे. त्याचबरोबर आपल्या वडिलांच्या देशात सुद्धा संबंध ठेवले आहेत.  त्यामुळे जगातील विविध समस्यावर त्यांचा मोठा अभ्यास झाला व भारताशी आत्मीयता सुद्धा निर्माण झाली. ही बारा वर्षांची असताना आपल्या आईबरोबर कॅनडाला सुद्धा गेली.  तिच्या आईने तिथे विद्यापीठात नोकरी धरली.  कमला तेथील फ्रेंच भाषेतील शाळेत शिकली. १९८२ साली शाळेतून पास झाल्यावर ती वॉशिंग्टनमध्ये हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाली.  तिने पॉलिटिकल सायन्स आणि अर्थशास्त्रामध्ये डिग्री घेतली व नंतर कॅलिफोर्निया मधून ती वकील झाली.

          वकिलीमध्ये तिचं काम उठून दिसलं. तिने २००५ ला पर्यावरण गुन्हेगारी विभाग सुरू केला.  तिचे सर्वात मोठं काम गुन्हेगारी विरोधात लढणे हे आहे. तिच्या कामामुळे अनेक गुन्हेगारांना शिक्षा झाली. अमेरिकेत सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे प्रत्येक नागरिकाला हत्यार बाळगायला सूट आहे.  त्यामुळे अमेरिकेत प्रचंड असे गुन्हे घडतात.  त्याला आळा बसवण्याचे काम काही प्रमाणात कमला हॅरीसने केले आहे. तो एक मोठा राजकीय प्रश्न आहे, कारण जी हत्यार बनवणारी लॉबी आहे, ती हत्यार बंदीला परवानगी देऊ देत नाही. खाजगी हत्यार बंदीच्या विरोधातला रिपब्लिकन पक्ष आहे, तो हत्यार बंदीला विरोध करतो. एकंदरीत एक सरकारी वकील म्हणून गुन्हेगारी विरोधातील लढाईत त्यांना बऱ्यापैकी यश आलं आणि म्हणूनच कॅलिफोर्निया राज्यांमध्ये त्यांचे मोठं नाव झालं.  पुढे जाऊन त्या सेनेटच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या व उपराष्ट्रपतीचे पद मिळाले.  एका भारतीय नारीला ही अशक्यप्राय अशी गोष्ट मिळणे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.  आजपर्यंत कुठल्याही महिलेला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीचे पद मिळालेले नाही आणि म्हणूनच अनेकांच्या आशा उंचावल्या आहेत की पुढे जाऊन कमला हॅरीस त्यांचे कर्तृत्व सिद्ध झाले तर या अमेरिकेचा राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात.  हे असामान्य असं कर्तृत्व भारत भूमीतून निर्माण होऊन अमेरिकेत जाते व तेथील राज्य सत्तेवर कब्जा करते ही कौतुकाची बाब आहे.  एवढच बघायचं आहे की अमेरिकेच्या राजकारणामध्ये कमला हॅरीस कितपत यशस्वी होतात.

अमेरिकेचे राजकारण श्रीमंताच्या हातात आहे. जरी डेमोक्रॅटिक पक्षाचा सुर जाती-धर्माच्या बाबतीमध्ये सर्वधर्म समभाव असा असला तरी त्यांचा पाठिंबा हा अमेरिकन अतिश्रीमंत लोकांनाच आहे.  दुसरा पक्ष रिपब्लिकन पक्षाचा सुद्धा पाठिंबा श्रीमंत लोकांनाच आहे.  त्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड संपत्ती असली तरी मूठभर लोकांच्या हातातच केंद्रित झाली आहे.  जशी भारताची स्थिती आज आहे.  आज भारतामध्ये शेतकऱ्यांची वाताहात होत असताना अंबानी मात्र पहिला १० श्रीमंत लोकांमध्ये पोहोचला आहे आणि त्यांचे साथीदार टाटा, बिर्ला, अडाणी यांच्याकडे प्रचंड संपत्ती गोळा झालेली आहे तर रस्त्यावरचा माणूस हा तडफडत आहे . 

          कमला हॅरिसने अमेरिकेचे उपराष्ट्रपती पद भूषविणे ही भारताच्या दृष्टीकोनातून आज महत्त्वाची बाब आहे. ट्रम्पने भारताला चीनविरुद्ध  उभ करायचं प्रयत्न केला व दुसरीकडे पाकिस्तानला प्रचंड सामर्थ्य दिले.  या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय राजकरणात भारताची स्थिती कमजोर झाली. कारण आसपासचे देश आणि दक्षिण पूर्व विभागातील सर्व देश हे चीनच्या बाजूने गेले आहेत. भारताला हे परवडणारे नाही. त्यामुळे कुणा एका देशाचा मांडलिक होण्यापेक्षा आपल्या हिताचे राजकारण स्वतंत्रपणे भारताने केले पाहिजे.  आजपर्यंत तरी अमेरिकेने भारताला फसवले आहे आणि पाकिस्तानला साथ दिली आहे. पुढील राजकारणात भारताची बाजू मजबूत कशी करता येईल हे बघितले पाहिजे.  एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान विरुद्ध उभे राहणे हे सोपे नाही. त्यात अमेरिकेने जर पाकिस्तानला विरोध करून भारताबरोबर काम करण्याची प्रामाणिक कृती केली तर भारताची बाजू मजबूत होईल. हे करण्यासाठी व अमेरिकन धोरण बदलण्यासाठी कमला हॅरिस काय करतात हे अति महत्त्वाचे आहे. पुढील ४ वर्षात याची निर्णायक कृती आपल्याला दिसेलच. पण भारताला सांभाळूनच पावले उचलावी लागतील.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS