कम्युनिस्ट क्रांतीचा उगम_२६.११.२०२०

भारताच्या आधुनिक राजकारणाची सुरुवात पहिल्या महायुद्धामध्ये झाली. त्यावेळी एकीकडे ब्रिटिश साम्राज्य होते आणि दुसरीकडे तुर्कीचे साम्राज्य होते.  तुर्की ब्रिटनच्या विरोधात असल्यामुळे बऱ्याच जगामधील संघटना आणि लोक हे तुर्कीच्या बाजूने गेले. तुर्की सुन्नी मुस्लिम समाजाचा नेता होता. त्यामुळे भारतातील अनेक मुस्लिम युवक ब्रिटनच्या विरोधात भारतातून अफगाणिस्तानला गेले. त्यांना ‘मुहाजिर’ म्हणत असत. तुर्कीवर पूर्ण जगातील इस्लामिक राजकारण चालायचं. मुहजिर काबूलला गेले पण अफगाणिस्तान येथील राजवट ही ब्रिटन विरुद्ध तुर्कीला मदत करत नव्हते.  म्हणून काबूलच्या लोकांनी त्यांना साथ दिली नाही, याचं कारण म्हणजे अफगाणिस्तानचे लोक हे तुर्की बरोबरच राहिले नाहीत.  भारतीय मुहाजिर हे कट्टरवादी नव्हते. ते इस्लामिक चळवळीमध्ये नव्हते. पण ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी ते अफगाणिस्तान मध्ये गेले.  त्यांना तिथे मदत झाली नाही म्हणून ते रशियामध्ये ताश्कंतला गेले.  रशिया मध्ये त्यांनी एकत्र येऊन सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव तत्त्व स्विकारले.  १९२० साली त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची तिथे निर्मिती केली.  म्हणजेच ह्या भारतीय लोकांनी कम्युनिस्ट पार्टी ही ताश्कंत मध्ये बनवली आणि तिथे एम. एन. रॉय व त्यांचे साथीदार हे सगळे एकत्र झाले. त्यावेळी भारतातून प्रचंड प्रमाणात लोक ब्रिटीशांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अफगाणिस्तानला गेले होते, ते मग रशियाला गेले.  आज देखील एक मोठी भारतीय कम्युनिटी ही ताश्कंत येथे आहे. म्हणूनच १९६५ च्या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जो करार झाला तो ताश्कंतला झाला होता.

            मोठ्या प्रमाणात जवळजवळ चाळीस हजार भारतीय लोक ताश्कंतमध्ये गेले.  तिथे रशियन लोकांनी त्यांचे प्रचंड स्वागत केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते अफगाणिस्तानहून ताश्कंतला गेले.  तिथे रशियन क्रांतिकारकांनी त्यांचे भव्य स्वागत केले.   ते सर्व लोक हे रशियन क्रांती मध्ये भाग घेतलेले लोक होते आणि कम्युनिस्ट होते. हळूहळू हे सर्व मुहाजिर कम्युनिस्ट पार्टी मध्ये ताश्कंत मध्ये सामील झाले. त्यावेळी जी जमीन राजे राजवाड्याकडून क्रांतिकारकांनी हस्तगत केली होती त्याची वाटणी सुरू होती.   म्हणून क्रांतिकारी असे वातावरण होते.  त्याचे परिणाम भारतीय लोकांवर झाले.  एम.एन. रॉय हे राष्ट्रप्रेमी होते.   ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्याचे स्वप्न बघत होते. ते कम्युनिस्ट होत नव्हते.  एम.एन.रॉयला अधिकार कम्युनिस्ट पक्षाने तिथे दिले आणि त्यांनी एक फौज बनवण्याचा विचार सुरू केला. जे बोलशेविक म्हणजे रशियन क्रांतिकारकांच्या बाजूंनी लढतील व नंतर ट्रेनिंग घेऊन भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी लढा देतील,  असा त्यांचा विचार होता.  म्हणून त्यांनी ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून ‘रेड आर्मी’ म्हणजे रशियन कम्युनिस्ट आर्मीच्या बाजूने उभे केले. अर्थात या रशियन भागामध्ये  ब्रिटिश सैन्य क्रांतिकारकांच्या विरोधात लढा देत होते आणि म्हणून एम-एन. रॉय यांनी त्या ब्रिटिश  सैन्यातील पळून आलेल्या भारतीय लोकांना गोळा केले आणि रेड आर्मी मध्ये सामील करून ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायला सुरू केला. रॉय हे नंतर म्हणतात की हा अनुभव जो होता तो ब्रिटिश आर्मी विरुद्ध लढण्याचा अनुभव होता.  हा अनुभव प्रचंड समाधानी होता, यामुळे भारतीय सैनिक ब्रिटिश सैन्य सोडून रॉयच्या सैन्यामध्ये जमा होऊ लागले.  रॉयने कम्युनिस्ट पार्टी बनवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही म्हणून कम्युनिस्ट चळवळी ऐवजी  त्यांचं लक्ष मुख्यत: भारताला स्वतंत्र करण्याचा होता आणि त्या दृष्टिकोनातून ते सगळ्या लोकांना एकत्र घेऊन सैन्य बनवण्यामध्ये मशगुल होते.  त्याच दरम्यान त्यांच्या परिचय खुशी मोहम्मद ह्या कम्युनिस्ट  क्रांतिकारी बरोबर झाला आणि तरुण मुहाजिर सगळ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ताश्कंत येथे इंडियन मिलिटरी स्कूल उघडून या सर्वांना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न चालू झाले.

२०२० मध्ये भारतातील डाव्या चळवळीला १०० वर्षाची पूर्तता होत आहे. १९२० साली ताश्कंद, रशियामध्ये, एम. एन. रॉयच्या नेतृत्वाखाली नवी चळवळ सुरू झाली. त्यातून भारतात कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरू झाला. पहिल्या महायुद्धाच्या सावलीत रशियामध्ये लेनिन यांच्या नेतृत्वाखाली जनक्रांती झाली व राजेशाही नष्ट झाली. कामगारांचे राज्य आले. ‘कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही.’ हा सिद्धांत लागू झाला. त्यामुळे खाजगी मालकी नष्ट करण्यात आली. जसे आज मुंबईत दाऊद टोळी, अंबानी, अडाणी आणि भ्रष्ट राज्यकर्ते नोकरशाहीची प्रचंड संपत्ती, जमीन आणि मालमत्तेत गुंतली आहे. तशीच त्याकाळात संपत्ती ही राजाची आणि सरदाराची असे. बाकी शेतकरी, कामगार श्रीमंतांच्या जमिनीवर कसत असे. त्यांचे कुळ म्हणून जगणे ही शोषणाची दार्शनिक बाब तर होतीच, पण अन्याय अत्याचाराची संपूर्ण व्यवस्था होती.

            त्यातूनच कष्टकर्‍यांकडून समतेचा एल्गार निर्माण झाला. त्यालाच आपण ‘डावी चळवळ’ म्हणतो. त्याची मूळ संकल्पना ही समता आहे.  आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक समता. मानवाने मानवाचे शोषण बंद. एकीकडे गरीब शेतकरी आणि कामगार भरडला जातो, आत्महत्या करतो आणि दुसरीकडे अंबानी अडाणी जगातील पहिल्या दहा श्रीमंत लोकात गणले जातात. दाऊद इब्राहीमची संपत्ती ५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अंबानींची संपत्ती ४ लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. मग भारतात उपासमारी का?  २०२० मध्ये गावात शुद्ध पाणी का नाही?  गरिबांची मुले पौष्टिक अन्नासाठी भीक का मागत आहेत? तीच परिस्थिती १०० वर्ष पूर्वी होती. म्हणूनच लोक रस्त्यावर उतरले आणि राजे राजवाड्यांनी ठेचून मारले. अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही हे कोणी समजू नये. उलट वेळीच उपाय योजना केली पाहिजे.

            एम. एन. रॉय यांनी लेनिन समोर प्रस्ताव मांडला की, भारताचा स्वतंत्र लढा हा केवळ राष्ट्रवादी संघटनांकडे राहू नये. पण समतेच्या आधारावर शेतकर्‍यांना आणि कामगारांना एकवटत असताना ही चळवळ स्वतंत्र लढ्याची सुद्धा झाली पाहिजे.  त्यामुळे वर्ग लढ्याला स्वतंत्र लढ्याबरोबर जोडण्यात यावे.  त्याचबरोबर या लढ्यात सामील होण्यासाठी आणि ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी सर्व मुहाजिरकडून परत यायचा प्रयत्न होता.  इस्लामच्या लढयातून हे मुहाजिर कम्युनिस्ट झाले आणि त्यातून भारत मुक्तिच्या लढ्यामध्ये पुढाकार घेऊ लागले  त्यातील एक शौकत उस्मानी याचे प्रचंड योगदान आहे.  उस्मानी भारतात परत आले त्यांना १९२४ ला कानपूर बोलशेविक कारस्थांनामध्ये शिक्षा झाली. त्याच्याबरोबर मुज्जफर अहमद, डांगे आणि नलिनी गुप्ता यांना पण कैद झाली.   हे मुहाजिर भारतात परत यायला लागले त्यांना ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले.  आंतराष्ट्रीय इस्लामिक चळवळीला ते विरोध करू लागले. त्यातूनच हिंदू मुस्लिम बोलशेविककडे मोठ्या संख्येने वळू लागले.  आणि १९२५ ला कम्युनिस्ट पक्षाची निर्मिती झाली.  पण ब्रिटीशांनी तिच्यावर बंदी आणली आणि शेतकरी कामगार यांच्या नावावर वेगवेगळ्या संघटना बनल्या. 

            अशा विचित्र परिस्थितीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष उभा राहिला.  मुहाजिर म्हणून ब्रिटीशांच्या अत्याचारापासून पळून जाणारे मुहाजिर हे आतंरराष्ट्रीय इस्लामिक चळवळीतून कम्युनिस्ट झाले आणि तेथून परत भारतात येऊन स्वतंत्र लढ्यामध्ये सहभागी झाले.  पण भारतातील कम्युनिस्ट चळवळ भरकटत गेली आणि १९४२ च्या कॉंग्रेसच्या ‘चले जाव’ चळवळीपासून दूर राहिली.  दुसर्‍या महायुद्धात रशिया हा ब्रिटन बरोबर हिटलर विरुद्ध झुंजत होता. म्हणून त्या काळात इंग्रजांना विरोध न करण्याची भूमिका कम्युनिस्टने घेतली व स्वतंत्र लढयातून बाहेर फेकले गेले.  त्यामुळे भारत स्वतंत्र झाला तेव्हा कम्युनिस्ट मागे पडले आणि कॉंग्रेस पुढे आली. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहीतच आहे.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS