करोनाच्या नवीन लाटेने जगभर थैमान माजले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील मध्ये अनेक लोक मरत आहेत. ब्राझील मध्ये मार्च महिन्यात 60 हजार लोकांचा मृत्यू झाला. तसेच भारतामध्ये सुद्धा त्याचा प्रदुर्भाव वाढतच चाललेला आहे. करोनामुळे गरिबांचे अतोनात नुकसान झाले आहे व होत आहे. फ्रान्समध्ये जसा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आला त्याच वाटेने भारताला जावे लागेल का? या प्रश्नाला उत्तर देणे आवश्यक आहे. एक वर्ष करोना स्थितीमध्ये देश भरडला गेला आहे. करोना स्थितीमध्ये काम करण्याची व्यवस्था लोकांनी निर्माण केली आहे. करोना स्थितीत दिसल की ज्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात आहे त्यांना करोना होत नाही. मी महाराष्ट्रात सगळीकडे चौकशी करत होतो की सैनिकांना व निवृत्त सैनिकांना किती करोना झाला आहे. माझ्यासमोर दोनच अशा घटना आल्या आहेत, जिथे निवृत्त सैनिकांना करोना झाला आहे. यावरून हे स्पष्ट होतं की शरीरात प्रतिकारशक्ती असली तर करोना होत नाही. प्रतिकारशक्तीचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातून एकच आहे. ज्याच्या शरीरामध्ये श्वासोश्वास मोठ्या प्रमाणात होतो तो करोनापासून मुक्त राहतो. साधारणत: दिवसाचं जो 2 किलोमीटर पळतो किंवा 3 किलोमीटर जोरात चालतो त्याला करोना होत नाही. मी रोज 500 कपालभाती व 50 अनुलोम-विलोम करतो, त्यामुळे करोनापासून मुक्त राहिलो आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे उत्तम आहार. आहारामध्ये विटॅमिन ‘सी’, कॅल्शियम आणि इतर चांगली तत्त्वे राहिली तर प्रतिकारशक्ती चांगली राहते.
वरील सर्व गोष्टी या चांगल्या जीवन पद्धतीची उदाहरणे आहेत. आम्ही नुकतीच ‘समृद्ध आणि आनंदी’ गावाची संकल्पना मांडली व त्यावर एक वर्ष काम करत आहोत. ही संकल्पना आणि योजना सरकारला आम्ही दिली, सरकारने त्यावर गाव समृद्ध योजना जाहीर केली. पण हे एवढं सोपं नाही. सरकारची गाव समृद्ध योजना ही अर्धवटच आहे. आमच्या संस्थेने निर्माण केलेली समृद्ध आणि आनंदी गाव योजना यामध्ये रोजगार निर्माण करण्याच्या पद्धती आहेत. उत्तम आरोग्य ठेवण्याच्या पद्धती आहेत. सांस्कृतिक जीवन चांगले राहण्याच्या पद्धती आहेत. पाणी, पर्यावरण, स्वच्छता ठेवण्याच्या पद्धती आहेत. गाव समृद्ध आणि आनंदी झाला तर देश समृद्ध आणि आनंदी होईल ही कल्पना त्यात आहे. महात्मा गांधीजींनी सुद्धा हेच सांगितलं होतं. अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण शास्त्रशुद्ध असा प्रकल्प निर्माण झालेला नाही. कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग तर्फे आम्ही प्रस्तावित केलेला प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. करोना सारख्या संकटाला तोंड देण्यासाठी जीवन पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाला पाहिजे. नाहीतर वडापावची संस्कृती निर्माण झाली आहे, ती माणसाला बुडवल्या शिवाय राहणार नाही.
या संकटातून निघण्यासाठी काय केले पाहिजे याची कल्पना सरकारला दिसत नाही. लॉकडाऊन जर केला तर तो अतिशय प्रभावीपणे करावा लागेल. उगाच लॉकडाऊन म्हणायचं आणि बाजारपेठेमध्ये हुल्लड माजवायची याला काही अर्थ नाही. सुरूवातीला महाराष्ट्रात लॉकडाऊन झाला तो लोकांनी देखील पाळला आणि त्यामुळे करोनाचा प्रसार मर्यादित होता. अनेक जिल्ह्यात तो नव्हता देखील. पण करोना पूर्णपणे उठवल्याशिवाय तो शिथील करण्यात आला आणि मुंबईचे लोक गावागावात पळून गेले. उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक त्यांच्या गावी गेले आणि जाताना सोबत करोना देखील घेऊन गेले. म्हणून करोनावर पूर्ण नियंत्रण करण्यास सरकार अपयशी ठरले. जर सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर तो इतका कडक केला पाहिजे की मानवी संपर्क तुटला पाहिजे.
ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि ह्या आपत्ती विरोधात कणखरपणे लढले पाहिजे. ते होताना दिसत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे सरकारी यंत्रणेमध्ये नसलेली शिस्त. त्यामुळे नियम तोडण्याचे प्रकार जास्त व नियम पाळण्याचे प्रकार कमी असे होते म्हणून सरकार अपयशी होते. सरकारने आपत्ती विरोधात एक अभ्यासपूर्ण नियोजन करून प्रकल्प बनवला पाहिजे व त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यावेळेला हातात असलेली सर्व शस्त्रे आपण वापरली पाहिजेत. मी एक वर्षापूर्वी मागणी केली होती की सैन्याला सुद्धा ह्या लढाईत सहभागी करा. पण त्याबद्दल सरकारने विचार केला नाही. माझ्या मागणीला एक शास्त्रशुद्ध कल्पना होती. सैन्याकडे अशी काही साधने आहेत ती नागरी जीवनामध्ये नाहीत. 24 तासात सैन्य हॉस्पिटल बनवू शकते आणि त्यांच्याकडे तशी साधने देखील आहेत. जगातील सर्वात उत्कृष्ट हॉस्पिटल पुण्याला आणि मुंबईला आहेत व भारतात इतर ठिकाणी सुद्धा मिलेटरी हॉस्पिटल आहेत. त्याचा करोना काळामध्ये काही उपयोग करण्यात आला नाही. ज्या वेळेला मी सांगतो की सैनिकांना करोना फार कमी झालेला आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे उपलब्ध आहे. त्याचा वापर का करत नाहीत? हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. त्याचबरोबर दुसरीकडे जिथे जिथे संचारबंदी करायची असेल तिथे तिथे गर्दीच्या ठिकाणी सैन्याचा वापर करता येतो. त्यातून पोलीस दलाला मोठी मदत होईल. मास्क घालणे व सोशल डिस्टंसिंग ठेवणे हे लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यंत कडक रीतीने पाळले पाहिजे. आम्ही बघत आहोत की मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लोकांना विनवणी करत आहेत कि मास्क घाला, सोशल डिस्टंसिंग पाळा, पण असं कुठे होताना दिसत नाही. समाजामध्ये बंडखोर असतात ते सरकारी आदेश कसे झुगारून टाकायचे हे पाहत असतात अशा लोकांना विनवणी करून काहीच होणार नाही.
चीन, जपान, कोरिया सारखा देशात करोनावर नियंत्रण का घालता आले याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे. करोनावर मात करण्यासाठी सरकारचा एक दुसरा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. करोना लस मोठ्या प्रमाणात भारतात निर्माण होत आहे. श्री.पूनावाला यांच्या ‘शेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (SII) सारख्या लोकांनी व संस्थेने प्रचंड प्रयत्न करून भारताला लस उत्पादनामध्ये पुढे नेले आहे. उलट भारत काही गरीब देशांना लस सुद्धा पुरवठा करत आहे. आज भारतामध्ये 20 लाख डोस रोज देऊ शकतो. या गतीने 60 टक्के लोकांना लस देण्यासाठी दोन वर्षे लागू शकतात. याचा अर्थ महिन्याला 600 लाख डोस पण देऊ शकतो. महिन्याला 10 कोटी डोस दिले पाहिजेत. याचा अर्थ दररोज दुप्पट डोस देण्याची गरज आहे याकडे सरकारने आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त डोस आपण निर्माण करू शकतो आणि लवकरात लवकर आपण करोनावर नियंत्रण करू शकतो. एस्ट्रोजन लसमध्ये भारताने बऱ्यापैकी प्रगती केली आहे. म्हणून भारताला 45 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लस देणे शक्य झाले आहे.
दुसरीकडे करोनाचा परिणाम उद्योगधंद्यावर भयानक झालेला आहे. मी सांगितलेले तीन देश चीन, जपान आणि कोरिया हे प्रगतीच्या मार्गावर आहेत. कारण त्यांनी करोनावर मात केलेली आहे. अश्याप्रकारे प्रगती करत गेले तर चीन अमेरिकेच्या पुढे जाईल याची जाणीव अमेरिकेला आहे म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती बाईडन यांनी दोन निर्णय महत्त्वाचे घेतले आहेत. पहिला निर्णय म्हणजे ज्या लोकांना करोनामुळे त्रास होत आहे, ज्यांच्या नोकर्या गेल्या आहेत, त्यांना जगण्यासाठी मदत करण्याची भूमिका जाहीर केली. आता उद्योगधंदे बंद होत असल्यामुळे बाईडन यांनी दोन ट्रिलियन डॉलर इतका निधी पुढच्या 8 वर्षात खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात रस्ते, पूल, पाणी आणि ज्या ज्या सुविधा खराब झाल्या आहेत, त्यांना पूर्ण करण्यासाठी हा पैसा वापरला जाईल आणि त्यामधूनच प्रचंड प्रमाणात रोजगार सुद्धा निर्माण होईल, अशी त्यांनी अपेक्षा केली आहे. पण एवढा खर्च सरकारने करण्यासाठी त्याने आपला सिद्धांत म्हणजे अमेरिकन भांडवलशाहीचा सिद्धांत बाजूला केला आहे. त्याने उद्योगधंद्यावरील कर 10 टक्केने वाढवला आहे. त्याला भांडवलदार प्रचंड विरोध करत आहेत. भारतात अर्थसंकल्पात कर कमी करून 25% चे 15% टक्के केले. उद्योगपती आणि श्रीमंत लोक खूश झाले, पण गरिबांना ज्या सुविधा सरकार देऊ शकते त्या कमी करण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ जर का उद्योगधंदे आणि रोजगार वाढवायचा असेल तर श्रीमंतावर 10% कर लावून पैसा उभा केला पाहिजे व उद्योगपतीवर अवलंबून न राहता सरकारने भारताचा विकास केला पाहिजे. आरोग्य शिक्षण यावर प्रचंड खर्च केला पाहिजे तरच भारताची अर्थव्यवस्था एक लांब उडी घेईल, नाहीतर श्रीमंताना खूश करण्यासाठी जर आपण कर कमी ठेवले आणि सरकारकडून गुंतवणूक कमी ठेवली तर सामान्य माणसाला रोजगार मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मानवाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी श्रीमंतावर वाजवी कर लावलेच पाहिजेत व गरीबांना लागणार्या सुखसोयीचा आणि रोजगारचा प्रश्न सोडवला पाहिजे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.