काश्मिर धोक्यात_१४.०३.२०१९

पुलवामातील हल्ल्यामुळे काश्मिरबद्दल चर्चा जोरात सुरु झाली आहे. त्यातून राजकीय फायदा घेणारे घेतच आहेत. अनेक ठिकाणी आपला राग लोकांनी काश्मिरी युवकाविरुद्ध काढला. त्यांना झोडपले. शाळा कॉलेजमधून काढून टाकले. हे करत असताना आपल्या गल्लीतील कुत्र्यांना कळले नाही कि ते पंतप्रधानांच्या शिष्यवृत्तीवर शिकत आहेत. त्यात सैन्यादलानी निवडलेले अनेक विद्यार्थी आहेत. ज्या लोकांनी सैन्याला मदत केलेली असते त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देऊन अन्य राज्यात प्रवेश घेवून देण्याची पद्धत सैन्याने सुरु केली. त्यानुसार स्थानिक नागरिकांना आपलेसे करून दहशतवाद निपटून काढण्याची सैन्याची पद्धत आहे. जेंव्हा सैन्य दहशतवाद्यांवर हल्ला करते तेंव्हा सामान्य नागरिकांची सेवा सुद्धा  करते. सैन्याला त्या लोकातच जगायचे असते. १००% नागरिक जर दहशतवादी झाले, तर सैनिकी छावण्या चारही बाजूने घेरल्या जातील. सैन्याला हलता येणार नाही. सुदैवाने सीमेवरील नागरिक जसे राजपूत, बाकर्वाल, गुज्जर ह्या जमाती आतंकवाद्यांच्या विरोधी आहेत. त्यांची मुले आपल्याकडे शिकायला आल्यावर त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे देशद्रोह आहे.

सैन्याचे ह्याबाबतचे तत्त्व स्पष्ट आहे. सैन्य म्हणते “बंदुकीच्या गोळीने आतंकवाद संपवता येत नाही, हृदय आणि मन जिंकून आतंकवाद संपवता येतो”.  ह्या तत्वावर सैन्याने भारतातील अनेक ठिकाणचे बंड संपविले. ह्याच तत्वावर अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा काश्मिरमध्ये शांती आणण्याचा प्रयत्न केला. पण मोदीने अगदी उलटेच केले. सद्दभावना हा शब्द त्यांनी आपल्या शब्दकोषातून काढून टाकला आणि बंदुकीच्या जोरावर काश्मिर जिंकण्याचा प्रयत्न केला त्याचा उलटा परिणाम झाला. शांत झालेला काश्मिर पेटला आणि ४० जवानांचा पुलवामामध्ये बळी घेतला.

११९५ मध्ये अनेक वर्षाच्या आमच्या प्रयत्नानंतर इखवान आतंकवादी गटाने २५०० दहशतवाद्यांसोबत श्रीनगरमध्ये आत्मसमर्पण केले. माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी कामगिरी मी समजतो. काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. त्यांचा प्रमुख कुका पेरे आमदार झाला. शांततापूर्ण निवडणूक झाल्या. त्यानंतर ह्या समूहाच्या व्यक्तींच्या हत्याचे पर्व सुरु झाले. कुका  पेरेचा पण खून झाला. आत्मसमर्पित दहशतवाद्यांची ससेहोलपट सुरु झाली. कारगिल युद्धाच्या वेळी ते मला भेटले. त्यावेळी श्रीनगरमध्ये मी जॉर्ज फर्नांडीस संरक्षण मंत्री यांना भेटलो आणि आग्रह धरला कि कारगिल युद्धानंतर आत्मसम्पर्पित दहशतवाद्यांना सैन्यामध्ये घेण्यात यावे. मला लोक वेडे म्हणत. पण अखेर वाजपेयींनी ती मागणी जॉर्ज मुळे मान्य केली व २००३  ते २००६ पर्यंत ८००० काश्मिरी मुसलमानांचे ८ पलटणी मध्ये हे  सैन्य बनले. ते आजही काश्मिरमध्ये महत्त्वपूर्ण  कामगिरी बजावत आहेत. देशाशी निष्ठावान आहेत.

हे शक्य झाले कारण अमेरिकेवरील ओसामा बिन लादेनने ९/११ ला हल्ला केला. त्याच अगोदर  २०००ला  श्रीनगर बदामी बागच्या सैन्य मुख्यालयावर फिदायीन हल्ला झाला होता, पण अमेरीकेने पाकची बाजू घेतली होती. ९/११ चा अमेरिकेवरील हल्ल्यानंतर मात्र अमेरिकेने भारताविरुद्ध कट-कारस्थान बंद केले. तालिबानशी अफगाणिस्तानमध्ये लढण्यासाठी पाकिस्तानची अमेरिकेला गरज होती आणि भारताचे सहकार्य देखील पाहिजे. म्हणून पाकवर अमेरिकेने दबाव आणला व मुश्राफने  भारताबरोबर संबंध चांगले करायला सुरुवात केली. भारतावर पण तसाच दबाव आणला गेला व अनाधिकृतरित्या अमेरिका दोघांमध्ये मध्यस्ती करू लागला. आग्रा येथे वाजपेयीनी मुश्राफला भारतात बोलावले. बोलणी अपयशी झाली पण काश्मिरच्या लोकांना समाधान वाटले कि काश्मिरबाबत चर्चा चालू झाली. २००२ ला मुफ्ती सरकार काश्मिरमध्ये सत्तेवर आले. पहिल्यांदाच केंद्र आणि राज्य सरकार एकसंघपणे काम करू लागले. कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या जखमा  भरून टाकण्याचे काम सुरु झाले. लोकांची झडती घेणे बंद झाले. चर्चा सुरु झाल्या. पाकिस्तानला उरी मधून बस सुरु झाली. सैन्याने सद्दभावना मोहीम सुरु केली. दहशतवाद्याना सैन्यात घेण्यात आले. २००३ पासून २००६ पर्यंत ८००० काश्मिरी तरुणांना आणि आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांचे सैन्य बनले. हुरियत नेत्यांना पाकिस्तानला जायला वाजपेयी सरकारने मदत केली. त्यामुळे काश्मिरचा प्रश्न सुटेल अशी आशा काश्मिरी लोकांना वाटू लागली. २००५ ते २०१० काश्मिरमध्ये १०० पेक्षा कमी आतंकवादी होते. मुश्राफने ४ कलमी प्रस्ताव दिला होता. सैन्य परत हटवणे, बोर्डरच्या आर-पार प्रवास खुला करणे, इंडिया-पाकचे सीमेवर एकत्र नियंत्रण करणे. काश्मिरला स्वायत्त देणे, पण स्वातंत्र्य नाही. अशाप्रकारे आतंकवाद संपत आला. दहशतवाद्यांना गावबंदी करण्यात आली. स्थानिक मुले आतंकवादापासून दूर गेली. फक्त पाकिस्तानहून येणारे आतंकवादी काश्मिरमध्ये उरले. जनता सुखी होऊ लागली.

८ फेब्रुवारी २०१३ला मी श्रीनगरला गेलो. सैनिकांनी मला ९ फेब्रुवारीला माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. ९ फेब्रुवारीलाच अफझल गुरूला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. त्याच्या कुटुंबियांना २ दिवसांनी पत्राद्वारे ही बातमी देण्यात आली. त्याचे प्रेत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले नाही. असा क्रूरपणा भारतीय सैन्य कधीच करत नाही. ७ दिवस काश्मिर बंद होता आणि १० वर्षात जो लोकांचा विश्वास आम्ही कमावला होता तो नष्ट झाला. काश्मिरी युवक चिडू लागले आणि हळूहळू संताप वाढू लागला. त्याचवेळी मोदिजींचा उदय होत होता. मोदींच्या वक्तव्यातून द्वेषाचे राजकारण प्रखरपणे पुढे येत होते. २०१४च्या  निवडणुकीत बेताल प्रचार सुरु झाला. मोदींना हिंदू समूहात कृत्रिम असुरक्षिततेचे वातावरण  निर्माण करण्यात यश आले. हिंदू संस्कृती धोक्यात आहे आणि आता काही तरी केले पाहिजे अशी  भावना भडकावण्यात यश आले. त्याचा उलट परिणाम म्हणजे  काश्मिरी मुसलमानांमध्ये भीतीची लाट निर्माण झाली. त्यातच बुर्हाण वणीचा उदय झाला. वणी हा युवकांचा प्रेरणास्थान झाला. भारताच्याविरुद्ध अत्याचार आणि शोषणाची भावना पुन्हा निर्माण होऊ लागली आणि मोदी  सरकार आले. काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना मिळू लागले.

मुफ्ती आणि मोदीची युती झाली. एकीकडे, मोदींचे बंदुकीच्या धोरणाचा आणि मुफ्ती व नंतर मेह्बूबाचे मवाळ धोरणात तणाव निर्माण झाला व पुन्हा काश्मिर पेटला. त्यात बुर्हाण वणीचा एनकाऊंटर २०१६ ला झाला व काश्मिरमध्ये दहशतवादाचा वनवा पेटला. त्यातूनच १४ फेब्रुवारीचा पूलवामा हल्ला झाला व ४० जवान शहीद झाले. ह्या दरम्यानच्या काळात, बुर्हाण वणी पासून स्थानिक युवक दहशतवादात गुरफटत गेला. २००३ ते २०१३ पर्यंत स्थानिक युवक दहशतवादातून दूर गेला होता. मोदी सरकार आल्यापासून, स्थानिक लोक दहशतवादात गुरफटत गेले व आता आतंकवादाचा अतिरेक वाढत चालला. सैन्याने स्थानिक दहशतवाद संपवला होता. मोदीने तो वाढवला. दहशतवादाला वाढवण्यासाठी २ गोष्टीची गरज असते. पहिला म्हणजे स्थानिक पाठींबा. सैन्याने दहशतवाद्यांचा स्थानिक पाठींबा काश्मिरमध्ये नष्ट केला होता. मोदी  काळात स्थानिक पाठींबा दहशतवाद्यांना वाढत चालला आहे. स्थानिक पाठींबा नसेल तर दहशतवाद वाढूच शकत नाही. मोदीने त्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी लोकांना दूर कसे करायचे हेच काम केले. दुसरी बाब म्हणजे परदेशी मदत. पाकमुळे ती मुबलक दहशतवाद्यांना मिळत आहे. पाक तर तुमचे ऐकणार नाही. मग पर्याय काय? युद्धाशिवाय मला तरी पर्याय दिसत नाही. म्हणून हिम्मत असेल तर एकदाचे युद्ध करा. नाहीतर खुर्ची खाली करा.

सर्जिकल स्ट्राईक हे एक नाटक होते का? खरच काही निर्णायक घडणार आहे ; त्यावर संशय निर्माण झाला आहे. कारण धमक्या तुम्ही पाकला दिल्या. पाकनेही तुम्हाला दिल्या. चर्चा करणार नाही असे तुम्ही गर्जना केली. मग आता वाघ बोर्डर वर कसली चर्चा करत आहात? दहशतवादी तर आत्महत्या पथक बनवतात. मरायला आणि मारायला येतात. तुम्ही त्यांना काय मारणार. आता जर तुम्ही मागे हटला तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. भारतात २०१३ ला ७८ दहशतवादी होते. आज १०००च्या वर आहेत. त्यासाठी मोदींना धन्यवाद दिला पाहिजे.  २०१८ ला सर्वात जास्त म्हणजे ३००  आतंकवादी मारले गेले. त्यात २५० काश्मिरी होते. फक्त ५० परदेशी होते. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. मोदी पुराणाने स्थानिक काश्मिरी आता दहशतवादी झाला.

आज  खतरनाक दहशतवादाचा जन्म झाला आहे. आतापर्यंत मवाळ दहशतवादी होते. ते धार्मिक कट्टरवादी नव्हते. आता मात्र वाहब्बी, म्हणजेच सौदी अरबचा  इस्लाम, दहशतवादात सुरु झाला आहे. सिरिया, इराकमध्ये इसीसचा पराभव झाला आहे. हे दहशतवादी जगभर पसरू लागले. मला नुकतीच बातमी मिळाली कि इसीसचे दहशतवादी काश्मिरमध्ये आले आहेत. काश्मिरी दहशतवादाच्या जागी जागतिक इस्लामिक दहशतवादी /जिहादी दहशतवाद जन्माला आला आहे. झाकीर मिर्झाच्या नेतृत्वाखाली, घाज्वत उल हिंद गट निर्माण झाला आहे. अल कायदा प्रमाणे हा गट काम करतो. २०१७ ला झाकीरने एक चित्रफीत प्रकाशित केली. त्यात त्याने हुरियतच्या नेत्यांचे हात तोडण्याचे जाहीर केले. ते म्हणतात मवाळ व काश्मिरातील सूफी काश्मिरी नेते हे शरीय  स्थापन करण्यात अडथळे आहेत. स्थानिक लोकांचा त्यांना विरोध आहे. पण हळूहळू काश्मीर हे जागतिक दहशतवादाचे केंद्र काश्मिर बनू शकतो. त्याचप्रमाणे, इसीसचा भाग म्हणून इसीस ऑफ जम्मू काश्मिर हा गट स्थापन  झाला. रात्र वैर्‍याची आहे, पण चौकीदार झोपला आहे. जगातील परदेशी प्रशिक्षित लोक जर काश्मिरमध्ये घुसले तर हिंसाचाराचा अतिरेक होणार. त्यासमोर पुलवामातील घटना नगण्य वाटणार. ते होण्याआधी स्थानिक लोकांना जवळ करा व पाकला धडा शिकवा.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS