काश्मिर – 28th July 2017

काश्मिर

दहशतवादी  कमरेला बेल्ट बांधून स्वत:ला उडवून द्यायला प्रवृत्त कसे होतात? कशासाठी बलिदान करतात? दहशतवादी आत्मसमर्पण करायला तयार अनेक कारणांमुळे होतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे धार्मिक कट्टरवाद. दुसरा प्रकार म्हणजे स्वतंत्र लढा व तिसरा प्रकार म्हणजे व्यवस्था परिवर्तन. जसे कम्युनिस्ट किंवा माओवादी दहशतवाद.  पाकिस्तान धार्मिक कट्टरवादाचे मुख्य उदाहरण आहे. काश्मिरच्या दहशतवादामध्ये पाकिस्तानचा मुख्य भाग राहिलेलाच आहे. पाकिस्तानला सुरूवातीपासून काश्मिरमध्ये जास्त ढवळाढवळ करता आली नाही. १९७१ च्या युद्धामध्ये काश्मिरी जनतेने भारताला साथ दिली.

१९८० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्याविरुद्ध धार्मिक लढा निर्माण झाला. त्यावेळी पाकमध्ये अब्दुल्ला आझम या सौदी धर्मगुरूने या जिहादला नैतिक बळ देण्यासाठी वहाब्बी इस्लामचा प्रसार केला. जगभरातून अमेरिका आणि सौदीने दहशतवादी गोळा केले. या  धर्मयुद्धातून इस्लामिक कट्टरवादाचा पाया रोवला गेला, आझमचा मुख्य शिष्य ओसामा बिन लादेन होता. त्याचबरोबर लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सयीद, जयशे मोहम्मदचा अझहर मसूद हे सुद्धा आझमच्या तत्वज्ञानाने इस्लामिक दहशतवादी झाले.  वहाब्बी इस्लाम स्विकारणाऱ्या टोळ्यांनी वहाब्बी इस्लाम न स्विकारणाऱ्या मुस्लिम व मुस्लिम नसलेल्या लोकांना शत्रू मानले आहे, जसे सौदी अरेबिया शिय्या मुसलमानांना आपला प्रथम शत्रू मानते .

सौदी अरेबियाच्या दबावामुळे तत्कालीन पाकचा हुकुमशहा जनरल झिया उल हकने अधिकृतपणे पाकिस्तानला वहाब्बी इस्लामिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून आजपर्यंत इसिस सकट सर्व टोळ्यांनी वहाब्बी इस्लाम अधिकृत धर्म पाळला आहे. तेव्हापासून जगातील दहशतवादाचा संदर्भ  बदलत गेला. काश्मिरचा दहशतवाद हा त्याच धरतीवर ४ टप्प्यात बदलत गेला. पहिला टप्पा  १९८७ साली मुस्लिम UNITED FRONT अशी राजकीय आघाडी काश्मिरमध्ये निर्माण झाली व निवडणुक लढवली. आमच्या डोळ्यादेखत त्या निवडणुकीत फारुख अब्दुल्लाने बहुतेक मतदान केंद्र काबिज केले व घोटाळा करून सत्तेवर आले. सर्व कार्यकर्ते संतापले व जम्मू-काश्मिर  लीब्रेस्न फ्रंट(JKLF) च्या नेतृत्वाखाली आझादीचा नारा दिला. ते सर्व पाक व्याप्त काश्मिरमध्ये गेले. JKLF हा स्वतंत्र काश्मिर मागणारा प्रमुख गट होता. सुरुवातीला पाकने त्याला पुर्ण मदत केली. हत्यार व प्रशिक्षण दिले. अमेरिकन CIAची सुद्धा प्रचंड मदत झाली. १ ऑगस्ट, १९९९ ला JKLF ने काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष जाहीर केला. ही आझादी चळवळ सर्वधर्मसमभाव व लोकशाहीवर आधारित स्वतंत्र काश्मिर  निर्माण करण्यासाठी होती. पाकने JKLF चे प्रमुख अमानुल्ला खानला आपले मुख्यालय मुज्जाफराबादला स्थापन करू दिले. ८ डिसेंबर १९९० ला रुब्या सय्यद तत्कालीन भारताचे गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सयीदच्या मुलीला JKLF ने पळवले व  ओलीस धरले. बापाने मुलीसाठी अनेक दहशदवाद्यांना सोडले. तेव्हापासून आझादी चळवळीला गती मिळाली.

अमानुल्ला खानच्या म्हणण्याप्रमाणे १९९१ ला ६० ते ७० आतंकवादी गट तयार झाले. त्यात हिझबुल मुजाहिदीनसारखे अनेक गट धार्मिक कट्टरवादी होते.  JKLF चे तत्वज्ञान हे धार्मिक गटांच्या विरोधात होते, व काश्मिरियतवर आधारीत होते. त्यात सर्व धर्मीय लोकांना समतेच्या आधारावर सामावून घेण्याचा सिद्धांत होता. १९९० ते १९९२ मध्ये २२१३ दहशतवादी मारले गेले, त्यात बहुसंख्य JKLF चे लोक होते. म्हणून JKLF कमकुवत पडत चालला व धार्मिक कट्टरवादी लोकांची शक्ती वाढत गेली. हिजबुल मुजाहिदीन (HUM) हा काश्मिरचे विलीनीकरण पाकिस्तानमध्ये होण्यासाठी निर्माण झाला, म्हणून पाकिस्तानने JKLF ला बाजूला करून HUM ला पुढे आणण्यास सुरुवात केली

इथून दुसरा टप्पा सुरु झाला तो म्हणजे काश्मिरला पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा. त्यावेळी मला प्रत्यक्ष अनेक पकडलेल्या JKLF आणि इखवान गटांच्या आतंकवाद्यानी सांगितले की,१९९० पासून पाकने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना वहाब्बी इस्लाम स्विकारण्यास जबरदस्ती करायला सुरुवात केली. JKLFची माणसे फोडून HUM मध्ये जोडण्यास सुरुवात केली.  एवढेच नव्हे तर HUM ने त्यांची माणसे सुद्धा  मारली. १९९२ पासून पाकिस्तानने अमानुल्ला खान व त्यांच्या पाठीराख्यांना पाक व्याप्त काश्मिरमध्ये येण्यास बंदी घातली. पाकने आपली पूर्ण शक्ती HUM च्या पाठीमागे उभी केली. तो पर्यंत अफगाणिस्तानच्या युद्धातील गैरकाश्मिर लोक HUM मध्ये भरती होण्यास सुरुवात झाली. सय्यद आली शह गिलानीने जाहीर केले की, इस्लाम भौगोलिक राष्ट्रवाद मनात नाही, म्हणून स्वतंत्र सेक्युलर काश्मिरी राष्ट्र हे धर्माविरुद्ध जाते. या सर्व घटनांचा परिणाम असा झाला की HUM च्या धार्मिक कट्टरवादाला सुफी काश्मिरी मुसलमानांनी पूर्ण विरोध केला. याचवेळेला पाकिस्तान प्रणित गटांनी हुरियत कॉन्फरन्स निर्माण केली. त्यात २६ गट होते.

बाबरी मस्जिदच्या विध्वंसामुळे व त्यानंतरच्या दंगलीमुळे धार्मिक कट्टरवादी  गटांची शक्ती वाढत चालली. याच दरम्यान आम्ही तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांच्या पुढाकारामुळे  अनेक दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण करून भारतात आणले व काश्मिरमध्ये दहशतवादाला सुरुंग लावले.  इथून, तिसरे पर्व  सुरु झाले.  १९९९ साली पाकिस्तानस्तीत सात दहशतवादी गटाने HUMच्या नेतृत्वाखाली जेहादी कौन्सिल निर्माण केली व मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये युद्ध करणाऱ्या  गटांना काश्मिरी जिहादमध्ये शामिल केले. त्यातच कारगिल युद्ध झाले व तेव्हापासून काश्मिरी आतंकवादाचे धर्मयुद्धात परिवर्तन करण्याचा सतत प्रयत्न आहे. जागतिक आतंकवादी गट  मोठ्या प्रमाणात यात भाग घेऊन लागले.

१९९९ ला हाफिज सायेदने जाहीर केले की, फक्त काश्मिरलाच  स्वतंत्र करायचे नसून पूर्ण भारताला स्वतंत्र करायचे आहे. त्यांनी फिदायीन हल्ल्यांची सुध्दा सुरुवात केली. जेथे दहशतवादी हल्ला करतात व मरेपर्यंत लढत राहतात. १९९९ ला बदामी बाग येथील काश्मिरच्या सैन्य मुख्यालयावरच हल्ला केला. नंतर लालकिल्ला व संसदेवर सुध्दा हल्ला केला. २६ नोव्हेंबर, २००८ ला मुंबईवर सुध्दा फिदायीन हल्ला केला. एवढया काळानंतर HUM चा प्रमुख सालौद्दिनला २०१७ मध्ये मोदीच्या अमेरिका भेटीत आंतरराष्ट्रीय  आतंकवादी म्हणून जाहीर केले, हा केवढा मोठा विनोद आहे. ह्या  छोट्या विषयावर, आपले सरकार अमेरिकेवर कौतुक सुमनांचा वर्षाव करत आहे.  दुसरीकडे पाकिस्तान सालौद्दिन आणि HUM हे स्वातंत्र्यवीर आहेत असे जाहीर करतात.

कारगिल युद्धानंतर भारतीय सैन्याने आत्मसमर्पित अतांकवाद्यांना भारतीय सैन्यात घेतले व गावागावातून तरुण युवक त्यांच्याबरोबर शामिल करून ८००० काश्मिरी मुसलमानांचे सैन्य बनवले. त्यात वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडीस यांची पूर्ण मदत झाली. यामुळे काश्मिरमध्ये परकीय दहशतवाद्यांना गावबंदी करण्यात आली व काश्मिर  पूर्वपदावर येऊ लागले. तेवढ्यात काश्मिरमध्ये भाजप मेहबूबा सरकार आले. या सरकारने सर्वात मोठी चूक केली की सैन्य दलाला बाजूला काढून काश्मिर CRPF आणि BSF कडे सुपूर्द केले. त्यात धार्मिक संघटना व हुरियतच्या लोकांचे सुत मिळाली व काश्मिरचा संघर्ष धार्मिक संघर्ष करण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. काश्मिरचा सामान्य माणूस वहाब्बी इस्लाम विरोधात लढत पिसला जात आहे. बहुतांश काश्मिरी हे सुफी इस्लाम मानणारे होते. हे समजून फक्त सैन्याने घेतले. सरकारने कधीच लक्ष घातले नाही.

अलिकडच्या काळामध्ये आपण बऱ्याच निधर्मी काश्मिरी लोकांना HUM कडे लोटत आहोत. याचे भान सरकारने ठेवावे. म्हणूनच मी गेले अनेक वर्ष पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करायची मागणी करत राहिलो आहे. पण तशी कारवाई कुठल्याच सरकारकडून दिसत नाही.  जितका द्वेष मुस्लिम गाय-बैलाच्या, मंदिराच्या नावावर निर्माण करणार. तितक्या मुस्लिम तरुणांना आपण कट्टरवादाकडे ढकलू. तिथे इसिस आणि लष्कर-ए-तोयबा प्रचार करतच आहेत की, भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत. हे भारताच्या दृष्टीकोनातून अत्यंत धोकादायक आहे. आत्ताच्या काळात दहशतवाद्यांचे उद्दिष्ट पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचे  नसून जागतिक इस्लामिक राष्ट्र बनवण्याकडे आहे. याचाच अर्थ भावी इस्लामिक कट्टरवाद पुर्ण भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यात इसिस सकट लष्कर-ए-तोयबा/ HUM हे सर्व गट कार्यरत झाले आहेत. याचा प्रतिकार द्वेष भावना निर्माण करून करता येत नाही. तर सैन्यदलाचे मंत्र आणि तंत्र वापरून होतो. “दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपवू शकत नाही, तर हृदय आणि मन जिंकून करता येतो’. देशात यादवी युद्ध घडवण्यासाठी शत्रू काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी धार्मिक द्वेष निपटून काढू आणि पाकला नष्ट करू, हीच माझी देशवासियांकडे नम्र विनंती.

 

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS