कोण जिंकले कोण हरले_२४.१०.२०१९

निवडणूक झाली. ५ वर्ष सत्ता भाजप-सेनेच्या हातात गेली.  ती शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात जाऊ शकते. शरद पवार तोडफोड मध्ये मास्टर आहेत असे समजले जाते. अनेकदा शिवसेनेला वाढवण्यात, भाजपला पाठिंबा देण्यात, काँग्रेसला शह देण्यात शरद पवारांनी घोटाळे केले आहेत. पण आता तुल्यबळ नेता अमित शाह याने तोडफोडीचे उच्चांक गाठले. उलट अमित शाहने साम, दाम, दंड, इडी, CBI ला वापरून  काँग्रेस-राष्ट्रवादीची चिरफाड केली. अनेक शक्तीशाली बाहुबलीना फोडले.  नाहीतर भाजप सत्ता निश्चितपणे गेली असती. अमित शाहने शरद पवारांवर निवडणुकीच्या आधीच मात केली. ती सावरण्यातच काँग्रेस राष्ट्रवादीचा वेळ गेला.  प्रचंड गोंधळात पक्ष सांभाळता आले नाहीत. 

त्यातल्या त्यात शरद पवारांनी प्रचार मोहिमेत आपल्या दुष्कर्माचा परिणाम कमी करण्यासाठी ८० वर्षाच्या वयात सुद्धा प्रचंड मेहनत केली.  स्वत:ची व पक्षाची लाज राखली. काँग्रेसला मागे फेकून ३ नंबरला गेले व कमीतकमी विरोधी पक्ष नेत्याचे स्थान मिळवले. पवारांसारखा कर्तबगार नेता भारतात नाही. त्याला प्रामाणिक पणाची जोड नाही. त्यांची कर्तबगारी त्यांनी जनतेसाठी आणि देशासाठीही वापरली असती तर ते लोकनेते म्हणून इतिहासात नावाजले गेले असते. पण षडयंत्र हे पवार यांचे तंत्र आहे. त्यांनी आपल्या अवती-भवती अविश्वासाचे जाळे विणले. म्हणूनच ते केवळ पश्चिम महाराष्ट्राचे नेते ठरले.  ते महाराष्ट्राला प्रचंड समृद्धीकडे घेऊन जाऊ शकले असते.  पण योग्य दिशेने न जाता आपली कर्तबगारी चुकीच्या वृत्तीने वाया घालवली.  जरी त्यांनी ५५ जागा मिळविल्या असतील तरी उद्यापासून दूरच राहिले.

दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती पूर्ण खालावलेली होती.  पक्षामध्ये कुणीच येऊ नये, असा महाराष्ट्रातील नेत्यांनी चंग बांधला होता.  पक्ष कसा हरेल याची पूर्ण काळजी थोरात आणि त्यांच्या साथीदारांनी घेतली.  अनेक लोक पक्षात यायला तयार होते.  त्यातील २४ लोकांची नावे मी प्रस्तावित केली.  पण उमेदवारी द्यायचे तर सोडाच साधी चर्चा सुद्धा केली नाही. भाजपची हुकुमशाही वृत्ती आणि फालतू राजकारणांमुळे, जनतेची दिशाभूल करण्याची प्रवृत्ती ही देशाला पूर्ण हानिकारक आहे.  शेतकरी, कामगार, सैनिकांचे कल्याण करण्याचे सोडून टाकले आणि नको त्या विषयावर लोकांचे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला.  कलम ३७०, राम जन्मभूमी, सर्जिकल स्ट्राईक यावर महाराष्ट्राची निवडणूक लढवली आणि मिळेल त्या नेत्याला पक्षात घेतले.  अशा पक्षाला राज्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही. म्हणून आम्ही काँग्रेसला मदत करण्याची भूमिका घेतली. पण काँग्रेसला वाटेल ते करून हरायचेच होते.

मला दिल्ली येथे ३ वेळा बोलविण्यात आले. मी स्पष्ट केले होते की सोनिया गांधीशी भेट झाल्याशिवाय पक्षात येणार नाही. १९९८ साली सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांनी मला त्यांचा सचिव केला.  शरद पवार पार्टी फोडणार हे मी त्यांना १ वर्ष आधी सांगितले होते.  आम्ही त्याची पुर्ण तयारी केली होती.  म्हणून जेव्हा पक्ष फुटला तेव्हा आम्ही पार्टी शाबूत ठेवली व विजय मिळवून दिला. पण राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवावे लागले. मग आमच्या सारख्या निष्ठावान लोकांना बाजूला करण्यात आले. पुढे जाऊन माझ्यासारख्या अनेक लोकांना आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर जावे लागले.  हळूहळू चोर/लुटारुनी पक्षाचा ताबा घेतला आणि काँग्रेसची काय अधोगती झाली ते सर्वांना माहीतच आहे. म्हणून आम्हाला पक्षात बोलावल्यावर  आम्ही सोनिया गांधींबरोबर चर्चा करायची मागणी केली.  चर्चा करण्याचा पहिला विषय होता काँग्रेसची आर्थिक निती. मनमोहन सिंगच्या आर्थिक नितीला आम्ही पहिल्यापासून विरोध केला होता.  त्याविरुद्ध राहुल गांधींनी अनेक व्यक्तव्य केल्यामुळे त्याबद्दल चर्चा करणे आवश्यक होते.  कारण काँग्रेसची आर्थिकनीती आणि भाजपच्या आर्थिकनितीमध्ये काहीही फरक नाही.   चर्चेचा दूसरा विषय की काँग्रेसने भ्रष्टाचार, गुंडगिरी विरुद्ध लढण्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेसमध्ये लोकांशी संपर्क नसलेल्या अनेक नेत्यांनी पक्षाला वेठीस धरले आहे.   राहुल गांधीना देखील त्यांनी बाजूला काढले. त्यामुळे काँग्रेस जिंकण्याच्या मनस्थितीतच नव्हती.  पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या प्रचाराला देखील आल्या नाहीत.  काँग्रेसने सर्व पक्षांना एकत्र घेण्याचे जाहीर केले होते. पण मित्र पक्षांसाठी जागाच सोडल्या नाहीत व बाहेरून सुद्धा कुणाला आमंत्रित केले नाही.

एकंदरीत काँग्रेस, राष्ट्रवादी निर्धाराने लढले असते तर महाराष्ट्रात चमत्कार सुद्धा घडू शकला असता. पण महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी स्वत:च्या मतदार संघापलीकडे काहीच बघितले नाही.  पण जनतेनेच भाजपला रोखले.  २२० पेक्षा जागा जिंकण्याच्या वल्गना करणार्‍या भाजपला १०० च्या आसपास रोखण्यात आले.  मागच्या निवडणुकीत शिवसेना – भाजप वेगळे लढून सुद्धा भाजपला १३० जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांची घमेंड उतरवण्याचे काम जनतेने केले.

पक्षाचे राजकारण वरील सांगितल्याप्रमाणे घडत आहे. पण महाराष्ट्र कुणाच्या हाती आहे? तर खर्‍या अर्थाने सत्येवर कुणीही आले तरी अंबानी-अडाणीच्या, दलालांच्या हाती आहे.  दाऊद, छोटा राजनच्या हाती आहे. कारण मुंबई दंगलीनंतर गुप्तहेर खात्यांच्या प्रमुखांच्या वोरा समितीने अहवाल दिलाच आहे की “माफिया, भ्रष्ट राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे समांतर सरकार देशावर राज्य करत आहे” म्हणूनच असे सरकार कुणासाठी काम करणार? श्रीमंतासाठीच करणार व शेतकरी, कामगार, सैनिकांच्या मयतासाठी करणार.  सत्तेवर कुणीही आला तर ‘आलीया भोगाशी असावे सादर’. हे बदलण्यासाठी राजकारण जनतेला बदलावे लागेल. पक्ष तर श्रीमंतांची, गुन्हेगारांची दुकाने आहेत. ती हिसकावून घ्यावी लागतील. भारताच्या संविधानाने स्पष्ट आदेश दिला आहे की हा देश सर्वांसाठी आहे आणि या देशामध्ये समता स्थापित झाली पाहिजे.  त्यातल्या त्यात आर्थिक समता स्थापित झाली पाहिजे.  सन १९९१ नंतर जी सत्तेवर आली त्या सरकारांनी भारताचा अजेंडा बदलून टाकला.  प्रचंड विषमता स्थापित केली.  या सर्व सरकारांनी एकच काम केले. श्रीमंताना श्रीमंत केले व गरीबांना गरीब केले.  म्हणूनच शेतकरी, कामगार व सैनिक अनंत यातना भोगत आहेत.  १% लोक या स्वातंत्र्याचे सर्व फायदे हिसकावून घेत आहेत व बाकीच्याना देशोधडीला लावत आहेत.  प्रस्थापित पक्षांमध्ये हे बदलण्याची हिंमत नाही.  त्यामुळे जनतेलाच बदलावे लागणार आहे. पुढील काळ देशाला अत्यंत कठीण आहे. म्हणून देशाला वाचवण्यासाठी सर्व राष्ट्रभक्तांनी एकसंघ व्हावे व परिवर्तनाची लाट आणावी.  हे फक्त जन आंदोलनाने होऊ शकते.

राजकीय पक्ष हे उद्योगपतींवर अवलंबून आहेत.  राजकीय पक्षांनी प्रामाणिक, कर्तुत्ववान, लोकांना पक्षाबाहेर हाकलले आहे व हात वर करणार्‍या चमच्यांना मोठे केले आहे. राजकारणातून गुणवत्ता नष्ट झाली आहे. राजकीय पक्षाचे धोरण उद्योगपती ठरवतात आणि माफिया चालवतात.  भ्रष्टाचारातून प्रचंड काळा पैसा निर्माण होतो.  त्याचे संरक्षण, वापर, उलाढाल, माफिया आणि दलाल करतात. हे अनेक घोटाळ्यातून सिद्ध झाले आहे.  सरकारी पैसा जनतेकडे जाताना रूपायातील फक्त १५ पैसे पोचतात.  बाकी पैसा काळा होतो.  हे सर्व प्रश्न अधिक गहन होत चालले आहेत. म्हणून शेतकर्‍याच्या आत्महत्या कधीच थांबत नाहीत.  ही व्यवस्था लवकरात लवकर बदलली नाही तर देशाची अधोगती सातत्याने होत राहणार. झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची राजकीय इच्छाशक्ति नष्ट झाली होती.  जर काँग्रेस आक्रमकपणे लढली असती आणि तिकीटांची विक्री केली नसती तर काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या जवळ पोहचले असते.  तसेच वंचित  सारख्या छोट्या पक्षांचा काँग्रेस आघाडीमध्ये सहभाग असता व सत्ता पुरोगामी लोकशाहीची आली असती.   म्हणून नेत्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून एकत्र येण्याची नितांत गरज होती.  एकंदरती ह्या निवडणुकीत कोण जिंकले आणि कोण हरले हे ठरवावे लागेल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS