कोरोनाची वाढती दहशत_११.६.२०२०

डॉ.संजीव ठाकूर हे सोलापूरचे प्रमुख डॉक्टर. ते म्हणाले कि लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन नाही केले तर कोरोनाची लागण वाढत जाईल. पण ह्या वक्तव्याला काय अर्थ आहे? कोरोनाची लागण सर्वदूर झाली आहे. कारण नियम पाळले गेले नाहीत. म्हणूनच आज देशात, महाराष्ट्र सर्वाधिक कोरोनाग्रस्त झाला आहे. भारतात जवळजवळ ३ लाख लोकांना कोरोना झाला आहे.  त्यात ८ हजार लोक मरण पावले आहेत. त्यात महाराष्ट्रात १ लाख लोकांना कोरोना झाला  आणि ३३०० लोक मृत्यूमुखी पडले.  त्यातल्या त्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५२ हजार लोकांना कोरोना झाला. त्यात २००० लोकांचा मृत्यू झाला आहे.   भारत हा जगात ४ नंबर वर आला आहे.  दुसरीकडे अमेरिकेत २५ लाख लोक कोरोनाग्रस्त झाली आहेत व त्यात १ लाख २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.  त्यापाठोपाठ ब्राजील मध्ये ७ लाख, रशिया ५ लाख, त्यापाठोपाठ इंग्लंड, स्पेन, इटली, पेरु, जर्मनी, सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत.  एकंदरीत पाहता श्रीमंत आणि पुढारलेल्या देशामध्ये कोरोनाग्रसतांची संख्या मोठी आहे.  हे सर्व लोकशाही प्रणालीचे देश आहेत.

            इतके दिवस फक्त मुंबई पुण्यात असलेला कोरोनाचा महाराष्ट्रात प्रचंड प्रसार झाला आहे. कमी न होता तो वाढतच चालला आहे. त्यातच लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. बाधित असलेले लोक बाहेर आले.  दुकाने, बस  सुरु झाली, प्रचंड गर्दी होऊ लागली. सामाजिक दुरी गेली खड्ड्यात. यावरून भविष्य विदारक दिसत आहे. पहिल्यांदाच मला काळजी वाटत आहे. आतापर्यंत कोरोना आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत होते पण आता सरकारच्या धोरणाचे काही समजत नाही. १५ मे पर्यंत अनेक जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. एका महिन्यात महाराष्ट्रभर कोरोना पसरला.  गावामध्ये कोरोना पोहचला, ह्याला जबाबदार कोण आहे? सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात कोरोना वाढत होता. मे महिन्यामध्ये असे वाटले कि ही आपत्ती लवकरच दूर होईल. पण निष्काळजीपणे  भांडवलदार आणि पैसेवाल्यांचा हस्तक्षेप वाढू लागला. लोकांचा ही धीर खचू लागला आणि पूर्ण नियंत्रण न करता कोरोनाकडून पैश्याकडे आणि त्यातल्यात्यात रोजगाराकडे सरकारची आणि लोकांची दृष्टी वळू लागली.  नोकरी धंदा नसेल तर लोक खातील काय? हा प्रश्न उपस्थित झाला.  गरिबांसाठी जीवन मरणाचा प्रश्न झाला. 

            लोक मुंबई पुणे सोडून गावाकडे पलायन करू लागले.  त्यांची तपासणी करण्याची आणि त्यांना गावी पोचवण्याची कुठलीच सोय नव्हती.  त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये व्याकुळ लोक मिळेल त्या मार्गाने पलायन करू लागले.  खाण्या-पिण्यापासून दूरच राहिले, उघड्यावर झोपू लागले, एवढी दुर्दशा गरिबाची कधीच झाली नव्हती.  सरकारी यंत्रणा पुर्णपणे कोलमडुन पडली.  आजचे हेच विदारक सत्य आहे.  म्हणूनच लोकांचे आणि सरकारचे लक्ष अर्थकारणावर वाढू लागले आणि कोरोनावरचे लक्ष कमी झाले. याचे भयानक परिणाम होऊ शकतात. कोरोना संपल्याशिवाय उद्योगधंदे वाढतील असे मला वाटत नाही. म्हणून सरकारने अगोदर कोरोना संपवला पाहिजे होता व नंतर उद्योगधंद्याचा विचार केला पाहिजे होता.  तोपर्यंत लोकांना सरकारने पूर्ण मदत केली पाहिजे होती.  पण आपल्याला एव्हाना माहीतच आहे कि सरकारवर कुणाची पकड आहे. सरकार लोककल्याणसाठी चालत नाही तर भांडवलदारांसाठी चालते. अचानक सरकार उद्योग सुरू करण्याची भाषा करू लागले, दुसरीकडे कोरोना वाढतच चालला आहे. ही प्रवृत्ती अमेरिकेत ट्रम्पने दाखवून दिलीआहे. पहिल्यापासून ट्रम्प लॉकडाऊनला विरोधच करत होता. अर्थव्यवस्था चालली पाहिजे म्हणून त्याने अमेरिकेत निर्बंध टाळले. परिणामत: २५ लाख लोकांना अमेरिकेत कोरोनाची लागण झाली आहे. लाखो लोक मेले आणि झपाट्याने मरत आहेत. त्याउलट, चीनमध्ये जिथे कोरोना सुरु झाला तिथे अत्यंत क्रूरपणे निर्बंध लावण्यात आले आणि चीन कोरोना मुक्त झाला.  तसेच जपान, कोरिया, वेतनाममध्ये कोरोनावर नियंत्रण करण्यात ते देश यशस्वी होत आहेत. अमेरिका, भारत आणि चीनमध्ये फरक एकच होता. तो म्हणजे शिस्तीचा.  सरकारची आणि लोकांची शिस्त जिथे नाही तिथे कोरोना जास्त आहे.

            आतापर्यंत सरकार काही तरी केल्याचे दाखवत होते. काही बाबी चांगल्याही केल्या. पण अंतिम परिणाम फार वाईट आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारला काय करायचे ते कळलेच नाही व समजून घेण्याचा प्रयत्न ही करत नाहीत. कोरोना ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. म्हणून त्याला रोखण्यासाठी अनेक पावले उचलली पाहिजे होती व नैसर्गिक आपत्तीशी युद्ध करण्याची क्षमता असणार्‍या लोकांना बरोबर घेऊन नियोजन करणे गरजेचे होते. ते झालेच नाही. सरकार विशेषत: मंत्री-संत्री नेहमीप्रमाणे सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहिले. सरकारी यंत्रणा मोठ्या नोकरशाहच्या हातात आहे. त्यांना सनदी अधिकारी म्हणतात. ते हुशार असतात त्यात वाद नाही, पण सर्व प्रश्नांचे अंतिम निर्णयकर्ते नक्कीच होऊ शकत नाहीत. आपले राजकर्ते, मोदीपासून ते आमदारापर्यंत सवयीने सनदी अधिकार्‍यांवर अवलंबून राहतात. दुसर्‍याचे ऐकतच नाहीत किंवा दुसर्‍यांना विचारत नाहीत.

            कोरोनावर उपाय म्हणजे शिस्त आहे. ती कुठेच दिसत नाही.  दुकानात जाताना एकमेकाबरोबर १ मीटरचे अंतर पाहिजे. पण कुठल्याही दुकानात ते दिसत नाहीत. एकमेकाला स्पर्श होता नये, हे सर्वाना माहित आहे. पण बस पकडताना, भाजी घेताना, हॉस्पिटलमध्ये जाताना; एकमेकांपासून अंतर कधीच ठेवले जात नाही. बांद्रा टर्मिनलला लोकांनी आंदोलन केले तेव्हा मी गेलो. लोकांना दूर करण्याचा प्रयत्न केला. पोलीस हतबल दिसले. किती लोक त्या दिवशी कोरोनाबाधित झाले आणि गावी हा आजार घेऊन गेले हे कुणालाच माहित नाही.  १५ मे पर्यंत एकही कोरोना बाधित सिंधुदुर्गात नव्हता आज १००च्या वर हा आकडा गेला. कारण बाहेरून लोक आले. वशिला लावला व गावात घुसले. काही लोकांना वेगळे ठेवण्यात आले, पण सगळ्यांनाच नाही. त्यात कोरोनाबाधित लोकांनी आपण कोरोनाबाधित असल्याचे लपवून ठेवले आणि गावात अनेक लोकांना कोरोनाबाधित केले. शासन हे खंबीर असले पाहिजे. जर ते लोकांच्या दबावाखाली निर्णय बदलत गेले तर फार मोठे नुकसान झेलावे लागते.  आज तसेच होत आहे.

      मी सुरुवातीलाच मागणी केली होती की भारतीय सैन्याला पाचारण करा.  नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती असो भारतीय सैन्य प्रत्येकवेळी यशस्वी झाले आहे. त्याचे कारण अडचणीत सुद्धा थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सैन्य काम करते.  म्हणूनच प्रत्येक आपत्तीमध्ये सैन्याला बोलावले जाते.  सन २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे पोलिस दल निष्प्रभ झाले व दिल्लीमधून सैन्याने येऊन दहशतवाद्यांना मारावे लागले.  पोलिस काय आणि सैन्य दल काय एकाच मातीतून जन्म घेतलेले लोक असतात.  फरक एवढाच असतो की सैन्य कायम प्रशिक्षण करते आणि पोलिस करत नाहीत.  दुसरे म्हणजे शिस्त.  सैन्य त्यात तडजोड करत नाहीत.  इतर सरकारी यंत्रणा शिस्त ही पाळत नाहीत व तडजोडी करतात.  काठेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करत नाहीत.

            कोरोना ही कधीही कल्पना नसलेली आपत्ती आहे.   तिला नष्ट करण्यासाठी माणसाचा माणसाशी शारिरीक संपर्क होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे.  ही दक्षता न घेतल्यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात कोरोना प्रचंड प्रमाणात वाढत आहे.  या आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणेचा वापर झाला पाहिजे.  आज पुन्हा विनंती करतो की सैन्याला या लढाईत सामील करा नाहीतर कोरोना वणव्यासारखा पसरला तर त्याचे परिणाम आम्ही अनेक वर्ष भोगू.  या काळात गरीबांना मुबलक अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तु पुरविल्या पाहिजेत व लोकांचा एकमेकांशी संपर्क टाळण्यासाठी सक्तीची उपाय योजना केली पाहिजे. त्यात लोकांनी देखील सहकार्य केले पाहिजे.  सैन्यदलाकडे उत्कृष्ट आरोग्य सेवा आहे ती वापरली पाहिजे.  तसेच सैन्यदलाकडे संरक्षक कपडेलत्ते असतात व शिस्त असते.  या युद्धामध्ये अडचणीच्या ठिकाणी त्यांना बरोबर घ्यावे.  महाराष्ट्रात तर पर्यायच दिसत नाही.  उगाच सैन्याला न वापरण्याचा कागदी सिद्धान्त नाचवू नये.  मी दहशतवादाविरोधात व नक्षलवादाविरोधात सैन्याच्या वापरला विरोधच केला आहे पण मानव हितासाठी सैन्याचा वापर करावाच लागणार. सैन्य त्याला तयार आहे. आताची आपत्ती फारच भयाण आहे.  तिला वेळीच रोखले पाहिजे, नाहीतर प्रचंड मनुष्यहानी होईल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS