कोरोना कांड_२६.०३.२०२०

            कोरोना हळू हळू भारतात पसरू लागला तशी लोकांची चिंता वाढू लागली. आधी लॉक डाऊन ३१ मार्च पर्यंत होता आता मात्र १४ एप्रिल पर्यंत संचार बंदी आहे. पुढे ही परिस्थिती काय वळण घेणार ते आपण सांगू शकत नाही. पण लगेच काही सगळे सुरळीत होणार नाही हे निश्चित आहे. इटली, अमेरिका, स्पेन, इंग्लंड, फ्रांस ह्या पुढारलेल्या देशात सर्व आरोग्य सेवा असून देखील हा रोग आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. इटलीत आजपर्यंत ७५०३ लोक दगावले गेले आहेत. तर अमेरिकेत कोरोनाग्रसतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ह्यावरून पुढारलेल्या देशात आरोग्य व्यवस्था प्रचंड संख्येला संरक्षण देण्यास असमर्थ ठरली आहे. त्यातल्या त्यात चीन मध्ये वूहान प्रांतात सुरु झालेली कोरोनाची लागण थांबवण्यात आली. ह्याला मुख्य कारण म्हणजे, चीन मध्ये आरोग्य यंत्रणा पुर्णपणे सरकारी आहे. सरकारने सर्व शक्ती पणाला लावून कोरोनाचा प्रसार थांबवला. त्याउलट भारतासारख्या भांडवलदारी देशात आरोग्य यंत्रणा खाजगी आहे. ही  यंत्रणा लोकांचे शोषण करण्यासाठी जास्त व सेवेसाठी कमी राबते.

            जगातील महामारीला तोंड देताना प्रत्येक देशातील उपलब्ध यंत्रणेवर त्याचे यश अवलंबून आहे. भारतात देखील, अनेक वर्ष सरकारी यंत्रणेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आणि खाजगीकरणा कडे कल जास्त राहिला आहे. प्रचंड भ्रष्टाचार करून सरकारी यंत्रणेने आरोग्य क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात कोंबले आहे. हे सर्वच क्षेत्रात घडत आहे. पण मानव हानी त्यातल्या त्यात गरिबांची हानी सर्वात जास्त आरोग्य क्षेत्रात झाली आहे. खाजगीकरणामुळे नवीन हॉस्पिटल, आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालय अडगळीत पडली. लोकांनीही त्यांची मागणी आग्रहाने केली नाही. खाजगी डॉक्टरकडे खेटे मारायला सुरुवात झाली. आजारापोटी लाखो कुटुंब, कर्जबाजारी होऊन उध्वस्त झाली. जेजे, केइएम. सारखी उत्कृष्ट सरकारी हॉस्पिटले लाखो रुग्णांच्या दबावाखाली जीर्ण झाली. तुम्ही कधीही ह्या हॉस्पिटलात गेलात तर हजारो रुग्ण वरांड्यात/ जमिनीवर पडलेली दिसतात.  डॉक्टर आपल्या प्रयत्नांची कमतरता भासू देत नाहीत. पण सरकारी रुग्णालयात, सर्वच गोष्टींचा तुटवडा आहे. औषधे तर अपवादानेच मिळतात. साधारणत: रुग्णांना खाजगी दवाखान्यात पाठविले जाते आणि त्यांचे घर उध्वस्त केले जाते. डॉक्टरांचे बिल भरायला कर्ज घ्यावे लागते. त्यातून तो मरेपर्यंत सुटत नाही. अनेक शेतकर्‍यांच्या आत्महत्या देखील या कारणामुळे झाल्या आहेत.

            त्यात ग्रामीण भागात तर बघायलाच  नको. आधीच रुग्णालयाचा व डॉक्टरांचा तुटवडा असतो. त्यात चाचणी करणारी यंत्रणा नसते. खाजगी यंत्रणेकडे एक्स – रे किवा सी. टी. स्कॅन करायचे झाले तर गरिबांचे मरणच असते. मग ग्रामीण जनतेला, मुंबई, पुणे, नागपूरकडे धाव घ्यावी लागते. तरी देखील सर्वच सुविधा किंवा उपचार सरकारी रुग्णालयात न करण्याचे कारस्थान सरकारने केल्याचे आढळून येते. मी जे जे हॉस्पिटल मध्ये पित्ताशयाच्या उपद्रवामुळे अॅडमिट होतो पित्त्ननलिकेतून एक खडा काढायचा होता तर सरकारी होस्पिटल ने  मला खाजगी हॉस्पिटला पाठवले. तिथे रु. दोन लाख खर्च आला. माझे आरोग्य विमा योजनेमध्ये नाव असल्यामुळे मला परवडले. पण एका गरिबाची हालत काय होईल याची आपण कल्पना सर्वच करू शकता. १९९१  पासून प्रसार माध्यमातून प्रचार करण्यात आला. खाजगी चांगले आणि सरकारी वाईट हे जर खर असेल तर आता कोरोना ग्रस्तांची देखभाल कोण करणार. खाजगी क्षेत्र करू शकते का? पण सर्व जगामध्ये सर्व सरकारना पुढे यावे लागले आहे आणि कोरोना विरुद्ध लढा द्यावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाने एक मोठे थोतांड उध्वस्त केले आहे. की शेवटी लोकांची काळजी ही सरकारलाच करावी लागणार आहे. कोरोना विरुद्ध लढा हा सरकारलाच द्यावा लागणार आहे. कुठेही खाजगी क्षेत्र अशा सार्वजनिक कामासाठी पुढे येत नाही. कारण, सार्वजनिक सेवा करण्यात आर्थिक नुकसान होते. जिथे फायदा नसतो तिथे खाजगी क्षेत्र नसते.

            आपण पूर्ण देशात बघत आहोत सगळीकडे जिल्हाधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली कोरोनाशी लढा दिला जात आहे. सरकारी यंत्रणा सुसज्ज आहे. पोलिस सर्वत्र कार्यरत आहे. म्हणून आपले प्राण वाचणार आहेत. ही जर यंत्रणा नसती तर कुठल्या खाजगी लोकांनी आपल्याला सुविधा आणि संरक्षण पुरविले असते. हे आपल्याल माहीतच आहे. म्हणूनच अशा नैसर्गिक आपतीच्या काळात सरकारी यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सामान्य लोकांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास असतो. व सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याची पण मानसिकता असते. जनतेमध्ये आणि सरकारी यंत्रनेमध्ये एक अतूट नाते बनते. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आपले सरकार हे मायबाप सरकार आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि या यंत्रणा कार्यक्षम आणि सक्षम केल्या पाहिजे. जितकी सरकारी यंत्रणा सक्षम होईल तितकेच सामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल. म्हणून दैनंदिन जीवनात देखील आपण आपल्या तालुक्याच्या,जिल्हाच्या रुग्णालयात सर्व सुविधा, डॉक्टर, नर्स उपलब्ध करून घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.

            कोरोनाचा परिणाम दैनंदिन जीवनावर तर झालाच आहे पण रोगाबरोबर सर्वात मोठ संकट रोजगारावर पडले आहे. मजुरीवर जगणारा माणूस हवालदिल झाला आहे. त्याचबरोबर पूर्ण देशात कारखाने, सरकारी सेवा बंद झालेल्या आहेत. खाजगी कारखाने बंद पडल्यामुळे अनेकांचा रोजगार नष्ट झाला आहे. स्वयंरोजगारावर अवलंबून असणारे लोक हवालदिल झाले आहेत. शेतकर्‍यांचा माल शेतात अडकल्यामुळे विक्री होत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. अर्थ व्यवस्थेवर तर गंभीर परिणाम होतच आहे.पण सामान्य माणसाला, मजुराला,  शेतकर्‍याला कुठलाच आधार नाही. परिस्थिति अशी आली आहे की हयातून लोकांना मदत कशी करायची याची कल्पना सरकारला नाही.  जे कुटुंब मजुरीवर चालते त्याला दोन वेळेचे अन्न मिळण्यासाठी व कुटुंबाला सांभाळण्यासाठी आपल्याकडे कुठलाच कार्यक्रम नाही. वाहतूक यंत्रणा बंद पडल्यामुळे ग्रामीण व दूरगामी क्षेत्रात अन्न – धन्य व जीवनाश्यक वस्तु पोहोचविण्यासाठी कुठलीच योजना नाही. सरकारने पूर्ण देश बंद करून टाकला. पण देशातले लोक जगणार कसे याचा विचार केलेला दिसत नाही. आणि जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासन कुठलीच तरतूद करू शकत नाही. त्यामुळे सरकारला आणीबाणीची घोषणा करावी लागणार. व खाजगी आणि सरकारी यंत्रणेला लोकांचा कोरोना पासून संरक्षण करण्याबरोबरच त्यांचे दैनंदिन जीवन सुद्धा सुसह्य राहावे म्हणून ठोस कृती कार्यक्रम राबवावा लागणार आहे.

            अजून लोक विरोधाचा सुर काढत नाहीत कारण सर्वांनाच परिस्थितीची कल्पना आहे. व सरकारला सहकार्य करण्याची मानसिकता आहे. आणि ही सहनशक्ती कुठपर्यंत टिकेल हे आपण सांगू शकत नाही कारण उपासमारीने मरणारा माणूस जगण्यासाठी काहीही करू शकतो. जसे मोदी साहेबांनी लॉक डाउन ची घोषणा केल्याबरोबर दुकाने आणि बाजारपेठे मध्ये ही झुंबड लागली. ती आवरताना पोलिसांना कठीण झाले. आपल्या मुलाबाळांना अन्न मिळाले पाहिजे ह्यासाठी एक माणूस काहीही करू शकतो. अशी परिस्थिति आली तर जंगल राज्य काय दूर नाही. याची सरकारने वेळीच दक्षता घेतली पाहिजे. व लॉक डाउन च्या स्थितीमध्ये लोकांना जीवनाश्यक  वस्तूंचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ही वेळ अशी आहे की जनतेने देखील स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. सुदैवाने आपल्या  देशात पंचायत  राज्य व्यवस्था आहे म्हणून लोकापर्यंत पुरवठा करणारी यंत्रणा उपलब्ध आहे. या यंत्रणेला आपली जबाबदारी पार पडावी लागेल ग्रामपंचायती पासून जिल्हाधिकार्‍या पर्यंत उपलब्ध यंत्रणेला पुनगठन करून सेवाभावी संस्थाला बरोबर घेऊन पुढची तयारी करावी लागेल व येणार्‍या  संकटांना तोंड देण्यासाठी सर्व स्तरावर संघटित झाले पाहिजे.

लेखक: ब्रिगे. सुधीर सावंत

वेबसाईट :  www.sudhirsawant.com

मोबा : 9987714929

Please follow and like us:

Author: Brigadier SS