कोरोना_१२.११.२०२०

जगातील सर्व देश संकटात असताना चीन मात्र प्रगतीकडे झेप घेत आहे. कोरोनामुळे, जगातील आर्थिक व्यवस्था कोलमडून पडत असताना चीन मात्र आर्थिक प्रगतीकडे चालला आहे. जुलै ते सप्टेंबरमध्ये चीनची आर्थिक वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.९% दराने वाढली आहे. जेव्हा भारताची आर्थिक वाढ २५% नी घसरली आहे. अमेरिका युरोप सर्वाकडे आर्थिक परिस्थिती ढासळत आहे. ह्याचाच  अर्थ जग आर्थिक दृष्ट्या कोसळत असताना चीन मात्र प्रगतीकडे वाटचाल करत आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे चीनी सरकारी यंत्रणा. त्यात सर्वात शक्तिशाली चीनच्या बलाढ्य सरकारी कंपन्यांचा वाटा आहे. चीनने जेव्हा आर्थिक व्यवस्थेत १९७८ साली बदल केला, तेव्हा सरकारी कंपन्या खाजगीकरणाकडे लोटल्या नाहीत. उलट त्यांना आणखी शक्तिशाली बनवले. जशा हवाई विमान कंपन्या, त्यांना मजबूत केले. चीनच्या आर्थिक उन्नतीमुळे हवाई प्रवास प्रचंड वाढला. तो सर्व सरकारी हवाई कंपन्यांकडे गेला. त्याचा फायदा साहजिक चीनची सरकारी हवाई कंपनी प्रचंड फायद्यात आली . त्यामुळे सरकारला पैसा मिळाला.  तसेच प्रत्येक क्षेत्रात चीनच्या सरकारी कंपन्या श्रीमंत होत गेल्या. साहजिक सरकारी संपत्तीत वाढ होत गेली. त्याउलट भारतात खाजगीकरणाचे लोन आले. मनमोहनसिंह म्हणाले की सरकारचं धंदा, धंदा करणे नव्हे. भाजप सरकारने हेच धोरण आणखी जोरात वाढवले.  काँग्रेस सरकारने एयर इंडिया जाणीवपूर्वक तोट्यात आणली, तोट्यात आली म्हणून ती भाजप सरकारने विकली. आता मुंबईचे विमानतळ अडाणीला विकले. राफेल विमानाचे कंत्राट सरकारी कंपनी HAL कंपनीला न देता अंबानीला दिले. त्यात अंबानी कर्जबाजारी झाला आणि लाखो कोटी रुपये लोकांचे बुडवले.

            सरकारी कंपनी कश्या बनल्या?  भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताकडे पैसाच नव्हता खाजगी मालकांकडे ही पैसा नव्हता.  तेव्हा भारत सरकारने अनेक क्षेत्रात कंपन्या बनवल्या. रेल्वे, विमान कंपन्या शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये भारत सरकारने आपल्या कंपन्या बनवल्या.  पैसा कुठून आला? आपल्या सर्वांवर भारत सरकारने कर लावला, त्या करातून या सर्व कंपन्या बनल्या. या कंपन्या अशा ठिकाणी बनवल्या जिथे लोकवस्ती कमी होती किंवा तुरळक होती.  काही कंपन्या व हॉस्पिटल लोकवस्तीच्या ठिकाणी बनवले.  कालांतराने या जमिनींना प्रचंड किंमत आली.  मुंबईच्या गिरण्या सरकारी जमिनीवर बनल्या. जिथे सरकारी जमिनी  नव्हत्या व तिथे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने आपल्या मालकीच्या केल्या. त्याही कवडीमोल भावात.  म्हणूनच सरकारी कंपन्या ह्या जनतेच्या मालकीच्या आहेत.  ह्या कंपन्यांवर सरकारी नियम लागू करण्यात आल्या. जसे आरक्षणातील नियम लागू करण्यात आले. तसेच सरकारी सेवा रेल्वे, बस सेवा, हॉस्पिटल ह्या सेवा सरकारी दरात द्याव्या लागतात. तसेच प्रवासी नसताना सुद्धा बस सेवा गावा-गावात द्यावी लागते. म्हणजेच तोट्यात लोकांच्या सेवेसाठी चालवावी लागते. कर्मचार्‍यांना  पगार देखील सरकारी दराने द्यावा लागतो. त्याउलट खाजगी कंपन्यांना काही निर्बंध नाही. आता तर खाजगी कंपन्या कंत्राट पद्धतीने चाललात.  त्या उदारीकरणाच्या काळात कुणालाही ठेवू शकतात, कुणालाही काढू शकतात.  खाजगी बस सेवा फक्त फायद्याच्या ठिकाणी चालतात. आता भारत सरकार हळूहळू रेल्वे सुद्धा खाजगी करत आहे. मग खाजगी रेल्वे वाटेल ते तिकीट लावणार. नाहीतरी आता भारत सरकारने खाजगी रेल्वेला परवानगी दिली आहे. ही रेल्वे सुरुवातीला चालेल. मग हळू हळू सरकारी रेल्वे कमी करतील आणि शेवटी सरकारी सेवा बंद करतील व अंबानी सारख्या लोकांना देऊन टाकतील. म्हणतील सरकारी सेवा चांगली नाही. जसे आता सरकारी  हॉस्पिटलची ही सेवा जाणीवपूर्वक घाणेरडी करून टाकली आणि आरोग्य खाजगी सेवेकडे गेले.  सरकारी हॉस्पिटलकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आता आरोप करत आहेत की सरकारी सेवा चांगली नाही.  मग सरकारी सेवा बंद करून हॉस्पिटलांचे खाजगीकरण होईल व लोकांना भरमसाट पैसा आरोग्यासाठी खर्च करावा लागेल.

            आता आपण भारताच्या इतिहासातील सर्वात काळया काळात प्रवास करत आहतो. कोविडच्या भयानक प्रवासातून आपण जात आहोत.  लाखावर जास्त लोकांचा मृत्यु झाला. एक कोटीच्या जवळ करोनाबाधित लोक झाले. आता तर झपाट्याने कोविड रोगी वाढत जाणार.  म्हणजे जवळ जवळ पुढच्या ३-४ महिन्यात २ ते ३ लाख लोक मृत्यमुखी पडणार.  पण असे दाखवले जाते की काहीच नाही.  अमेरिकेमध्ये पण तेच चालले आहे.  जवळ जवळ सव्वा दोन लाख लोक मृत्यूमुखी पडले. पण राष्ट्रपती ट्रम्प म्हणतो की, काळजी करायचे काही कारण नाही.  युरोपमध्ये देखील कोविडची दुसरी लाट आली आहे. सर्व सरकारे जोरदार लॉकडाऊन करत आहेत.  त्यात भारत जगातील करोनाबाधित राष्ट्रात पहिला क्रमांक पटकावण्याच्या जवळ आला आहे.  भारतातील सर्व सरकारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. सर्व बंधने झुगारून जनता फिरू लागली आहे आणि भारत इतिहासातील सर्वात वाईट परिस्थितीत आला आहे.  बेरोजगारी आता ३५% वर आली आहे.  खनिज क्षेत्र २३% कमी झाले आहे. उत्पादन क्षेत्र ४०% खाली आले.  बांधकाम क्षेत्र ५०% ने कमी झाले.  व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण फक्त ४७% ने खाली आले.  ४२००० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.  लोकांच्या हाताला काम मिळेनासे झाले.  सरकारी कंपन्या सुद्धा कामगारांना काढून टाकायला लागल्या.  BSNL च्या २०,००० कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले.  त्यामुळे नोकर्‍या वाढल्या पाहिजेत, इथे नोकर्‍या कमी व्हायला लागल्या आहेत आणि पुढच्या काळात अति भयानक अशी परिस्थिती येणार आहे.  

            चीनने सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे कोरोनावर सक्तीने बंधने आणून कोरोनाचा प्रसार थांबवला.  वुहान येथे सर्वात प्रथम कोरोनाचा प्रसार सुरू झाला.  चीनने वुहान मधून कुणाला बाहेर जाऊ दिले नाही  आणि कुणाला आत येऊ दिले नाही.  वुहान जवळचे मुंबई सारखे शहर शांघाय पर्यंत कोरोना पोहचलाच नाही.  चीनची राजाधानी बिजिंग येथे कोरोना पोहचला नाही. सर्व सरकारी कंपन्यांची ठिकाणे सुरक्षित आहेत.  म्हणून चीनमध्ये आर्थिक वाढ झपाट्याने होत आहे व भारतामध्ये आपण खाली जात आहोत.  त्यामुळे युद्ध तर बाजूलाच राहिले पण चीन जगातील आर्थिक सम्राट होऊ शकतो व कोरोनाने अमेरिकेलाही पाठी टाकू शकतो.  असे झाल्यास भारताला प्रचंड धोका निर्माण होणार आहे.  एकीकडे अमेरिका पाकिस्तानला पूर्ण मदत करत आहे आणि दुसरीकडे चीन सुद्धा पाकिस्तानला पूर्ण मदत करत आहे.   भारताला स्वत:च्या हिंमतीवर आणि ताकदीवर आर्थिक वाढ करावी लागणार  आहे.  पण दुर्दैवाने गेल्या २५ वर्षात भारत सरकारने सरकारी कंपन्या कमकुवत करून टाकल्या  आणि म्हणून आर्थिक उन्नती करण्याचा एकमेव मार्ग नष्ट केला.  कारण खाजगी मालकांना काहीच फरक पडत नाही ते १ वर्ष कंपन्या बंद ठेवतील व कामगारांना देशोधडीला लावतील व स्वत:च कल्याण करून घेतील.  गेल्या २५ वर्षात खाजगीकरणाच्या नावावर लोकांनी भारताला बरबाद केले आहे.  भारताची संपत्ती जिथे सरकारी कारखाने होते ते नष्ट झाले, तिथे भारताची संपत्तीच नष्ट होईल.  तसेच कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काहीच करताना दिसत नाही.  परिस्थिती इतकी वाईट होईल की भारतचं बंद पडेल आणि आणखी दुर्दशा होईल.  वेळ तर निघून गेली आहे.  तरी सरकारने देशाची सर्व शक्ति पणाला लावून व्यवस्थित लॉकडाऊन करून कोरोना नष्ट केला पाहिजे.  तरच लांबच्या पल्ल्यात आपला देश वाचू शकतो.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS