जगातील तत्त्वहीन राजकारणाचा खरा परिणाम गरिबांवर झालेला आहे. कारण सरकारी धोरण हे नसलेल्या राजा प्रमाणे आहे. दररोज राजकर्ते नवीन नवीन धोरण जाहीर करतात त्याच्या अंमलबजावणीचा विचार करत नाहीत. सर्व राजकीय पक्ष श्रीमंताच्या बाजूने झुकल्यामुळे सरकारी धोरणे आणि कार्यक्रम श्रीमंतांसाठी जास्त आणि गरीब जनतेसाठी कमी असे असतात. त्यामुळे आजच्या राजकारणाला दिशा नाही. राजकारण हे प्रगतीवर चालत नाही तर जातीद्वेष, धार्मिक कट्टरवाद यावर चालते. अमेरिकेत आपण बघतोय वर्णद्वेष. राष्ट्रपतीची पूर्ण निवडणूक ही काळया गोर्यांमध्ये विभागली गेली. गोऱ्या वर्णवादी लोकांनी भरभरून मतदान ट्रम्पला केले. त्याचबरोबर वर्णवाद न मानणार्या लोकांनी जो बाईडनला मतदान केले. सुदैवाने निवडून आले आहे. पण ट्रम्प हे मान्य करायला तयार नाही. ह्या वर्णवादी पक्षामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, पण त्याची काळजी कुणालाच नाही. मुख्यतः राजकारणाचा मूळ विषय हा देशांमध्ये संपन्न आणि आनंदी समाज निर्माण करण्याचा आहे. यासाठी सर्वात प्रथम आर्थिक सुबत्ता येणे आवश्यक आहे. पण पूर्ण जगामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था लादण्यासाठी घोडदौड चालू आहे. त्यामध्ये एक टक्के लोक प्रचंड श्रीमंत झाले पण गरीब लोक आत्महत्या करत आहेत. यावर विचार करायला कुणीही तयार नाही. पूर्वी राजकारण असं नव्हतं तत्त्वावर आधारित होते.
फ्रान्समध्ये १७९८ साली प्रचंड क्रांती झाली. राजे राजवाड्यांना त्यांना मारून टाकण्यात आले. भुकेपोटी जीवन जगणाऱ्यांना लोकांना आपला जीव गमवायचे नव्हता. म्हणून मरायला तयार झालेले लोक सैन्यावर तुटून पडले. त्या क्रांतीतून एक घोषणा निर्माण झाली लिबर्टी, इक्वलिटी, फ्रटरनिटी म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुत्व. जेथे न्याय मिळेल जगातील तत्वज्ञानाचा हे मूळ घोषवाक्य बनले. त्यातूनच १९१७ ला राशियामध्ये क्रांती झाली. राजेशाही नष्ट झाली आणि लोकांचे राज्य आले. ह्याच तत्वावर भारताची घटना बनलेली आहे. जगामध्ये अनेक देशात लोकशाही मान्य करणाऱ्या देशांनी हे तत्त्व लागू केले. पण ही तत्त्व कागदावर राहिलेले आहेत त्यांना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्न तर झालाच नाही. पण समतेचं तत्त्वज्ञान काढून टाकण्याचं काम मात्र झाले. आज जागतिक व्यवस्था विषमतेवर आधारित आहे.
१७ ऑक्टोबर १९१७ ला रशियाची कम्युनिस्ट क्रांती झाली. कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ चेग्वारा हे क्रांतीदुत झाले. जगामध्ये अनेक देशात त्यांच्या नावाने युवक पेटून उठले. अनेकजण स्वातंत्र्य लढ्यात देखील त्यांच्या प्रेरणेतून उभे राहिले. मानवाला अन्याय अत्याचारा विरुद्ध लढण्याची शक्ती मिळाली आणि मानव मुक्तीची, मानवी हक्काची कल्पना जगात रुढ झाली. त्याला जोडूनच महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समतेची क्रांती झाली. त्यातूनच कॉग्रेसची स्वातंत्र्याची चळवळ पुढे गेली. ह्या सर्व युद्धामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मशाल पेटली. एका माणसापासून दुसर्या माणसाचे शोषण करण्याची पद्धत कागदावरती तरी नष्ट झालीं. विसावे शतक हे मानव मुक्तीचे शतक ठरले. त्यातूनच कामगार कायदे, कसेल त्याची जमीन, आरक्षण, आर्थिक आणि सामाजिक न्याय, हिंदू विवाह कायदा / मॅरेज अॅक्ट हे सिद्धांत अंमलात आले.
कृषी क्रांती १०००० वर्षापूर्वी झाली आणि भटका माणूस गावात स्थिरावला. कृषी संस्कृती ही आता आता पर्यंत जगात जिवंतच आहे. त्यातूनच राजेशाही ही राज्य करण्याची पद्धत निर्माण झाली. मानवाच्या शोषणाची मुख्य पद्धत भारतात इंग्रज जाईपर्यंत होती. १९५० ला भारत हे प्रजासत्ताक झाले आणि तेव्हा लोकशाही भारतात आली. ह्याच दरम्यान पूर्ण जगात वसाहतवाद नष्ट झाली व एक नवीन राज्य करण्याच्या पद्धतीवर मानव पुढे जाऊ लागला. ह्याचाच अर्थ १९५० पर्यंत सम्राट अशोक आणि शिवरायांच्या राज्य करण्याच्या पद्धती वगळता मानव शोषण ही राज्य करण्याची पद्धत होती. लोकशाहीच्या जन्माला औद्योगिक क्रांती हे मुख्य कारण होते. त्याच औद्योगिक संस्कृतीने लोकशाही पद्धतीत प्रचंड विषमता निर्माण केली. आज १२६ लोकांकडे भारताच्या अर्थसंकल्पा पेक्षा जास्त संपत्ती आहे. ह्या लोकांकडे इतका पैसा आहे की हे लोक राजकीय पक्षाना व नेत्यांना विकत घेतात व आपले गुलाम बनवतात. म्हणून जरी भारतात लोकशाही असल्याचा भास होतो तरी ही लोकशाही पैशाची बटिक झाली आहे.
त्यामुळेच आज भारतामध्ये गरीब गरीब होत चालला आहे. ग्रामीण भागामध्ये मध्ये तर गरिबांचे हाल बेहाल झाले आहेत. उद्योग बंद झाले, त्यामुळे गरिबांना उत्पन्नाचे साधनच राहिले नाही व आज मानवाची दशा केविलवाणी झाली आहे. म्हणूनच ह्या जगामध्ये ज्या क्रांत्या झाल्या त्याला प्रचंड महत्त्व आहे. १७ ऑक्टोबर १९१९ ला भारतामध्ये कम्युनिस्ट चळवळीची निर्मिती झाली. आज शंभर वर्ष होत आहेत, समतेचा मंत्र त्यातल्या त्यात आर्थिक समतेचे मंत्र हे या चळवळीचे खरे स्वरूप होते. ही चळवळ मोडून काढण्यात आली आहे. मोडून काढण्याचे काम पैसेवाल्यांनी केले आहे. भारताच्या घटनेत देखील आर्थिक समतेचा मंत्र नमूद केला आहे. एवढेच नव्हे तर माणसाला माणसापासून वेगळे ठरवण्याचे काम हे बेकायदेशीर आहे. तरी आज भारतामध्ये प्रचंड श्रीमंत काही लोक झाले आहेत आणि मुख्यतः जनता ही गरीब राहिली आहे. शेतकऱ्यांचे तर हाल विचारायलाच नको त्यांना दरिद्रीच म्हणतात आणि शेतकरी दरिद्री रहावे अशी कल्पना राज्यकर्त्यांच्या आणि श्रीमंतांच्या मनात घर करून बसली आहे.
तसे पाहिले तर कम्युनिस्ट चळवळीची सुरुवात आणि आर. एस. एस. ची सुरुवात ही एकाच वेळेला झाली आहे. १९२५ साली कम्युनिस्ट पक्ष आणि आरएसएसची स्थापना झाली. ह्या दोन्ही संघटना परस्परविरुद्ध आजपर्यंत लढत आहेत. आताच्या काळात कम्युनिस्ट चळवळ कमी झाली आणि आरएसएस प्रचंड वाढली. हीच भारतीय राजकारणाची ओळख आहे. कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारधारा मानवाला आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण झाली. आर्थिक विषमता नष्ट करून गरीब श्रीमंत मधील फरक नष्ट करायचा अजेंडा घेवून काम करत होता. पण हा स्वप्नवाद आहे असे भासवण्यात आले. मतांसाठी लढणार्या संघटना त्यांना शह देण्यासाठी जातिवाद, वर्णवाद माणसा-माणसांमध्ये द्वेष निर्माण करणार्या चळवळी भांडवलदारांनी, पैसेवाल्यांनी उभ्या केल्या. स्पष्ट उद्देश असा होता ही जनतेला त्यांच्या दारिद्रयापासून वर येऊ न देणे. त्यांना घरापासून दूर ठेवायचं आणि त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग हा जाती, धर्म आणि वर्णावर देश निर्माण करण्यातच होता. म्हणूनच या जगामध्ये सगळीकडे वर्णवाद, जातीयवाद, धार्मिक कट्टरवाद फोपावत चालला आहे. समाजवादी आणि कम्युनिस्ट चळवळीचे शाहू, फुले, आंबेडकर चळवळीचे सूत्र ‘समता’ आहे, हे मोडून काढण्यात आले असून आता प्रतिगामी शासन जगामध्ये राज्य करत आहे. ह्याचा स्पष्ट पुरावा आत्ताचे अमेरिकन निवडणूका आहेत. निवडणुकीतील निकाल मान्य न करणे म्हणजे प्रतिगामी शक्तींची हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. जी व्यवस्था लोकशाही मान्य करत नाही ती समतेचे तत्त्वही मान्य करत नाहीत. भारतात आज प्रचंड आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. दारिद्रयात लोक होरपळून निघत आहेत. आर्थिक विषमता राबवण्यासाठी साहजिक देश हुकुमशाहीकडे वेगाने जात आहे. हे लोकशाहीच्या मुखवट्या पलिकडे बघाल तर स्पष्टपणे दिसेल.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.