छत्रपती शिवरायांच्या कल्पकतेची कमालच केली पाहिजे. ६ जून १६७४ ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी औरंगजेब अफगाणिस्तानच्या मोहिमेवर होता. पण मुघलसेनेची दहशत उभ्या महाराष्ट्राला भेडसावत होती. नुकतेच शाहिस्तेखान महाराष्ट्रात दहशत माजवून बोटे सोडून पळाला होता. पण मिर्झा राजा जयसिंगच्या हल्ल्यानंतर शिवाजी महाराजांना तह करावा लागला. महत्त्वाचे किल्ले द्यावे लागले. आग्र्याला जावं लागलं. तेथून ते शिताफीने सुटले. राज्याभिषेकानंतर त्यांच्या लक्षात आलं की औरंगजेब कधीतरी मोठ्या सैन्यानीशी दक्षिणेत उतरणार, तेव्हा असंच जर आपण लढत राहिलो तर स्वराज्याचे भविष्य धोक्यात येणार. त्याच दरम्यान व्यंकोजीराजांचे मदतनीस रघुनाथ पंतांनी शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं. त्यात व्यंकोजीनी राजांबद्दल तक्रारी केल्या की, ते वाईट लोकांची संगत धरून चांगल्या लोकांना बाजूला करत आहेत. शहाजीराजांनी मिळवून दिलेल्या दौलतीचा दुरुपयोग करत आहे. महाराजांनी मग रामचंद्र पंताना बोलवले यांच्याशी सल्लामसलत केले. व्यंकोजी राजांना पत्र लिहिले व आपला हिस्सा शहाजीराजांच्या दौलतीत मिळावा अशी मागणी केली. हे एक कारण झाले. पण औरंगजेबचा निपात करण्यासाठी त्यांनी एक सापळा रचला. दक्षिण भारतात स्वराज्य निर्माण करण्याचे ठरवले. रायगडापासून ते जिंजीपर्यंत म्हणजे महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत एक विशाल रणांगण बनवले. औरंगजेब आला तर त्याला तामिळनाडूपर्यंत खेचायचे, म्हणजे दहा लाख सैन्य विस्कळीत होऊन जाईल. हजार किलोमीटरच्या रणांगणावर औरंगजेबाचे सैन्य आपोआप शंभर तुकड्यात विभागले जाईल. मग त्यांना तुकड्या तुकड्यात वाटून त्यांच्यावर हल्ले केले जातील. त्याचबरोबर त्यांनी तेथील छोट्या छोट्या नायकांचे व जहागिरदारांची मने आपल्याकडे वळवून घेण्याचे ठरवले. भारताच्या राजकारणात पहिल्यांदाच स्थानिक लोकांची एक अभेद्य फळी निर्माण करण्याची योजना केली. तसेच उत्तरेतील लोकांना ह्या युद्धात बरोबर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
परिणामत: हजारो वर्षांचा साखळदंड तोडून एक स्वतंत्र राज्य निर्माण करणे ही संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. असा विचार पूर्वी कधीही झाला नव्हता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ज्याला साडेतीनशे वर्ष होत आहेत. पहिल्यांदाच स्वतंत्र भारताच्या विचार केला गेला. भारताच्या जनतेला ही घटना स्वागतार्ह वाटत नाही हे प्रचंड मोठ दुर्दैव आहे. २७ वर्षाचा स्वतंत्र लढा काही साधासुधा नव्हता. त्या पाठीमागे जिजामाता आणि शिवरायांची इच्छाशक्ती दिसत आहे. पारतंत्र स्विकारायचं नाही आणि आपला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं, ही गोष्ट साधीसुधी नव्हती.
छत्रपती शिवरायांना, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ज्याचं नाव इतिहासातून मिटवून टाकलं अशा ताराराणीने कडवी झुंज दिली. त्यात छत्रपती संभाजी महाराज हे शहीद झाले. अत्यंत क्रूरपणे औरंगजेबाने त्यांची हत्या केली. संभाजी महाराजांना तीन बाजूंनी युद्ध करावे लागले, ते म्हणजे मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज. ते इतक्या कडवटपणे लढले की शत्रू विस्कळीत झाला. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या युद्धनितीला एक नवीन स्वरूप दिले. गनिमी काव्यास एक नवीन रूप येण्यास सुरू झाले. शिवरायांनी दक्षिण दिग्विजयमध्ये व त्यानंतर अनेक प्रयोग करून युद्ध शास्त्राची नवीन पद्धत निर्माण केली. सुरुवातीला अचानक हल्ला करून शत्रूला आश्चर्याचा धक्का द्यायचा आणि मारून पळून जायचे. त्यावेळी महाराजांचे सैन्य निवडक होते. हळूहळू सैन्य वाढत चालले होते.
संभाजी महाराजांनी उघड मैदानात सुद्धा युद्ध सुरू केले. संभाजी महाराजांचे हेरखाते छत्रपती शिवरायापेक्षा जास्त सक्षम झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात शत्रूबद्दल त्यांना अचूक माहीती असायची. शिवरायांनी जी युद्धनीती निर्माण केली होती व दक्षिणेला जे राज्य निर्माण केले होते. त्यात हेर खात्याचे काम प्रचंड वाढले होते. माहिती मिळविल्यानंतर ती अचूकपणे छत्रपतीकडे पोहचविण्याचे काम अत्यंत जलदगतीने होत होते. म्हणून संभाजी राजाचा गनिमीकावा त्याला वेगवान घोडदलाची साथ होती. म्हणूनच संभाजी महाराज बृहानपुर लुटू शकले. तेवढ्याच जलदगतीने लुटीचा माल घेऊन माघारी येऊ शकले. संभाजी महाराजांचे युद्ध हे काही औरच होते. त्यांच्या सैन्याची आक्रमकता आणि धाडस हे वेगळ्या प्रकारचे होते. शिवाजी महाराजांचा गनिमीकाव्याच्या उत्क्रांतीत एक नवीन अध्याय निर्माण होत होता. संभाजी महाराजांवर तमिळनाडूपासून कर्नाटक ते महाराष्ट्र, पुढे जाऊन उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यावर नजर ठेवण्याची जबाबदारी आली होती. हा जो २७ वर्षाचा स्वतंत्र लढा झाला, त्यावेळी रणांगण विशाल होते. त्यामुळे हळूहळू गनिमीकाव्याची पद्धत बदलली. किल्ल्यावर आणि मजबूत ठिकाणी छोटी शिबंदी ठेवून विशाल रणांगणावर वावरायचे होते. त्यासाठी घोडदळ आणि हेर खाते यांचा जवळजवळचा संबध निर्माण झाला.
त्यामुळे या छोट्या शिबंदीच्या जोरावर छत्रूच्या तुकड्या कुठेही सापडल्या, तर घोडदळ घेऊन छापा मारणे. हे २७ वर्ष नित्यनियमाने विशाल रणांगणावर युद्ध चालू होते. दुर्देवाने संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर महाराष्ट्र हळहळला. जनता कमालीची दु:खी झाली, पण संतापली. हजारो मावळे सूड बुद्धीने पेटून उठले. म्हणून जागोजागी हल्ले होऊ लागले. यातच संताजीने थेट औरंगजेबच्या छावणीवर हल्ला केला. पण औरंगजेब वाचला, कारण तो नमाज पढायला दुसरीकडे होता. संताजीने त्याच्या तंबूचे कळस कापून राजाराम महाराजांना आणून दिले. त्यावेळी झुलफीकार खानने रायगडला वेढा घातला होता. त्यावर सुद्धा संताजीने हल्ला केला. या घटनेने मराठी मन सुखावली व पुन्हा त्वेषाने औरंगजेबशी लढा देण्यासाठी सज्ज झाली. येसूबाईने राजाराम महाराजांना छत्रपती केले आणि जिंजीला जायला आदेश दिला. राजाराम महाराज रायगडहून निघून प्रतापगडला आले व तेथून अत्यंत खडतर मार्गाने तृंगभद्रा नदी पार केली. या प्रवासात चित्तूरच्या राणीने महाराजांना मदत केली व शेवटी राजाराम महाराज जिंजीला पोहचले. जिंजी हा अभेद्य किल्ला होता. राजाराम महाराजांनी साडे आठ वर्ष जिंजीचा किल्ला लढवला. विचार करा की साडे आठ वर्ष महाराष्ट्रापासून तमिळनाडूपर्यंत सतत लढा चालू होता. थोड्या वर्षानी ताराराणी सुद्धा जिंजीला गेली. तेथे राजाराम महाराजांना ताराराणीची उत्कृष्ट साथ मिळाली.
राजाराम महाराज महाराष्ट्रात परत आले व तिथे गनिमीकाव्याचा तिसरा अध्याय सुरू झाला. त्यांनी औरंगजेबला झुंज दिली, पण कमजोर प्रकृतीमुळे १७०० साली सिंहगडावर त्यांचा मृत्यु झाला. परत महाराष्ट्राची जनता पोरकी झाली. पण छत्रपती ताराराणी उभी राहिली. २५ वर्षाची विधवा स्त्री घोड्यावर बसून थेट औरंगजेबवर हल्ला करायची. तिचे सैन्य नर्मदा पार करून शत्रूवर अनेक ठिकाणी हल्ला करत होते. औरंगजेब त्यावेळी एक एक किल्ला सर करायचा प्रयत्न करत होता. किल्ल्यावरील शिबंदी कडवटपणे औरंगेजेबला झुंज द्यायची आणि शेवटी पैसे घेऊन किल्ला मोघलांच्या हवाले करायची. यात किल्ल्यावरील सर्व मावळे किल्ल्याबाहेर यायचे. अशाप्रकारे एक किल्ला सर करायला जवळ जवळ १ वर्ष लागायचे. त्या काळात धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, कृष्णाजी सावंत, यांनी नर्मदा पार करून अहमदाबादपासून ऊजैनपर्यंत व ओरिसा-ढाका पासून हैदराबाद पर्यंत औरंगेजेबच्या राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला. त्यावेळी गनिमीकाव्याचे हे तंत्र उभे राहिले. बर्याचशा ठिकाणावर स्थिर शिबंदी ठेवण्यात आली. त्यांना आदेश देण्यात आले की लढता येईल तो पर्यंत लढायचे आणि मग किल्ला पैसे घेऊन औरंगजेबच्या हवाली करायचा. तोपर्यंत प्रचंड सैन्यांनीशी मध्यप्रदेशपासून तमिळनाडू पर्यंत घनघोर युद्ध करायचे. याला इंग्लिशमध्ये Mobile Warfare (गतिमान युद्ध) म्हणतात. अशाप्रकारे हे स्वातंत्र्य युद्ध अत्यंत कडवटपणे लढवले गेले आणि शेवटी ताराराणीने घोषणा केल्याप्रमाणे औरंगजेबला याच मातीत गाडण्यात आले. एक सम्राट जो महाराष्ट्रात स्वराज्य संपविण्यासाठी उतरला, तो परत आपल्या राजधानीकडे जाऊ शकला नाही.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९