घोडेबाजार (भाग-२)_30.6.२०२२

शेवटी महाराष्ट्र सरकार कोसळलं. चुका ह्या प्रत्येकाच्याच होतात आणि प्रत्येकाच्या हाताने चांगलं काम सुद्धा होत.  सहा महिन्यापूर्वी एका उद्योगपतींनी मला सांगितलं होतं की राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी हे सरकार गडगडणार. एवढा अचूक अंदाज एक उद्योगपती करतो. सट्टा बाजारात पैसे सुद्धा लागतात.  म्हणजे सरकारमध्ये असणाऱ्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना सत्ता बदलाची जास्त माहिती असते. त्याचे कारण देखील आहे.  कारण उद्योगपतींना काळाबाजार वाल्यांना पैसे कमवायचे असतात आणि सरकार कुठले आहे आणि कुठलेयेणार? याची चांगली माहिती असते. याच्यावर सुद्धा पैसा कमवता येतो.  कारण त्यांना धंद्याचे अंदाज बांधता येतात.  म्हणून सरकार कोण बनवतो आणि सरकार कोण पाडतो हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे

            साधारणत: सत्तेत जे असतात ते आंधळे असतात. त्यांना काहीच माहिती नसतं.  काय चाललंय. जनता काय बोलते, जनता काय म्हणते, याची पूर्ण खोटी माहिती त्यांना सातत्याने पुरवली जात असते. गुप्तहेर खात्याकडून, पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आणि असंख्य चमच्यांकडून माहीती सरकारला मिळते. ती सरकारला खुश करण्यासाठी असते. त्यामुळे ते सत्यापासून दूर राहतात आणि घात झाल्याशिवाय राहत नाही. याला अपवाद मोदी सरकार आहे.  मला अनेकदा आश्चर्य वाटलं की मी कुठल्याही विषयावर चर्चा करतो,ज्या मागण्या करतो त्याची पूर्ण माहिती मोदी साहेबांना मिळते. हेच काँग्रेस बद्दल बोलायचं झालं तर नेत्यांना अजिबात माहिती नसतं की काय चाललंय. म्हणून सत्तेचा डावपेच यामध्ये मोदी साहेब नेहमीच दोन पावलं पुढे राहिलेले आहेत. पण त्यांची सुद्धा फसगत बंगालच्या निवडणुकीच्या वेळेला झालेली आहे. 

            महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे असं घडणारच होतं असं म्हणणारे बरेच लोक आहेत.  पण अनेक लोक हे घडणार आहे त्याचं भाकीत सुद्धा करत होते.  पण त्याचा अजिबात अंदाज महाराष्ट्र सरकारला आला नाही.  कारण महाराष्ट्र सरकारला खोटी बातमी पुरवली जात होती. पोलिसांची गुप्तहेर खाती यांचा अंदाज तर नेहमीच चुकतो.  पण त्यांनी सरकारला अंधारातच ठेवले.  भारतीय जनता पार्टी सरकार मोडण्यात, पक्ष तोडण्यात, अत्यंत निष्णात झाली आहे आणि दुसऱ्या पक्षांना काय चाललंय ते कळतच नाही. मध्यप्रदेश मध्ये ज्यावेळेला ज्योतिरदत्त शिंदे नाराजगी पक्षश्रेष्ठी समोरसांगत होते ज्याला महत्त्व कोणीच दिले नाही. शेवटी ज्योतिरदत्त शिंदे भाजपमध्ये गेले आणि एक अत्यंत चांगला माणूस काँग्रेसने गमावला. बिहार, मेघालय, पंजाब मध्ये तसेच झाले आणि तेथे काँग्रेसउद्ध्वस्त झाले. एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष कसा फोडता येतो. याचे तंत्र भाजपला चांगले अवगत झाले आहे.  अनेक आमदार फोडायचं काम कोण करणार? आणि ते कसे होणार?कारण भाजपने शिवसेनेच्या कुठल्याही आमदाराला फोडायचा प्रयत्न केला असता तर ती बातमी जगजाहीर झाली असती आणि शिवसेना वेळीच सावध झाली असती. हे काम करायला गुप्तता लागते. आणि कुणीही ४० आमदार फोडायचा प्रयत्न केला असता तर ती बातमी गुप्त राहिली नसती. म्हणून सर्वाच पक्षाकडे अशी काही श्रीमंत विशिष्ट माणस असतात. ती वेगवेगळ्या आमदारा-खासदाराबरोबर संबंध ठेवतात.  पैसे देऊन संबंध घट्ट करतात.  मग त्यांचे मानसिक परिवर्तन करायचं प्रयत्न करतात.   म्हणून भारतीय जनता पार्टीने एक चांगलं तंत्र सुरू केल आहे त्यांच्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते कधी बोलतच नाहीत तर ते उद्योगपतीला धरतात आणि त्यांना सांगतात हे दोन आमदार आहेत यांना तोडायचे आहे. तुम्ही यांना जवळ करा. मग तो उद्योगपती त्या दोन आमदारांना भेटतो व चांगले चांगलेबोलतो, थोडे पैसे पण देऊ करतो आणि हळूहळू संबंध जोडतो. आमदार खासदारांना उद्योगपती बरोबर संबंध जोडायला अतिशय आवडते. हे उद्योगपती कधीच कुणाला फुकटचा एक पैसा देत नाही पण त्यातून फायदा काढून घेण्यासाठी मात्र वाटेल तो पैसा खर्च करतात. उद्योगपती मग आमदार-खासदारांना बांधून घेतात. मग हळूहळू शत्रु पक्षाकडे सुपूर्द करतात. असे केल्यानेच ४० आमदार शिंदे गटाकडे गेले आणि पक्षाला शिवसेनेला याबद्दल काहीच माहिती नव्हती.

            साहजिकच हे उद्योगपती सरकार ज्याचे बनते त्यांना बांधले जातात आणि सरकार त्यांचा प्रचंड फायदा करून देतात. म्हणून हळूहळू उद्योगपती राजकारण चालवू लागलेले आहेत आणि हळूहळू उद्योगपतींची हुकूमशाही भारतात स्थापन होत आहे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे मांडणी केली होती की,हे मूठभर लोकांच्या हातामध्ये आर्थिक शक्ती केन्द्रित करू नये व आर्थिक समता ही तितकीच महत्त्वाची आहे, जितकी सामाजिक समता आहे. ह्या गोष्टीकडे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

            आता नवीन येणारे सरकार याचे आपण स्वागत करूया. पुन्हा व्यक्तीचं स्वागत करण्याचा यात प्रश्न येत नाही पण सरकारचे स्वागत आपण केलं पाहिजे.  कारण शेवटी मायबाप सरकार हे सर्व जनतेचे असते आणिहे नवीन सरकार उत्कृष्ट काम करेल अशी आशा आपण बाळगायची असते. त्यांनी योग्य काम केले नाही तर त्यांना जाबविचारायची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. साधारणत: पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षाचे गुलाम असतात. म्हणून त्या सरकारच्या चुका झाल्या तरी सुद्धा सरकारचे कौतुक करण्यासाठी ढोल बडवतात. आपण सर्व निपक्षपणे बघितलं पाहिजे आणि चांगल्याला चांगलम्हटलं पाहिजे वाईट त्याला वाईट म्हटलं पाहिजे यालाच लोकशाही म्हणतात. दुर्दैवाने पक्ष कार्यकर्ते ते पाळत नाहीत म्हणून लोकशाहीची अधोगती होत जाते. आम्ही खासदार असताना असं कधी वागलो नाही उलट आमच्या सरकारच्या विरोधात आम्ही मोठी पावले उचलली, पण तिकडे लक्ष न दिल्यामुळे काँग्रेसच्या हातातली सत्ता गेली. ती परत आणण्याचा प्रयत्न सुद्धा ते करत नाहीत. कारण नाना पाटोळे सारखे लोक आपल्या मित्रांना सुद्धा भेटत नाहीत. मग कार्यकर्त्यांना हे केव्हा भेटत असतील? याची सर्वांनी कल्पना करावी.

            उद्धव ठाकरे सरकारने बरीच चांगली कामे केली. पण तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे त्यांना बऱ्याच मर्यादा होत्या. उद्धव ठाकरे अत्यंत शांतपणे काम करत होते.  करोना आणि अनेक संकटे आल्यामुळे सरकारला उसंत मिळाली नाही.  त्यामुळे आम्ही त्यांना कुठलाही दोष देत नाही.  पण एवढे निश्चित आहे की, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना भेटण्याचा त्यांनी प्रयत्न करावा.  त्यामधून बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेला पक्ष एक नवीन उचल घेऊ शकतो.  माला त्यांच्या बद्दल एक गोष्ट विशेष आवडली.  साधारणत: राज्यसभेला आणि विधानसभेला उमेदवारी देताना मोठ्या श्रीमंत लोकांना उमेदवारी दिली जाते.  पण उद्धव ठाकरेंनी दोन्ही वेळा सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली.  नाहीतर  राजकीय पक्ष अशा उमेदवारी देतांना प्रचंड पैसा घेतात.  ते उद्धव ठाकरेंनी केल नाही.  त्यामुळे ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप झाले नाहीत.  आणि याच भांडवलावर ते पुढे जाऊ शकतात.  आम्हा सैनीकांना घरपट्टी माफ करून काही विशेष काम केले.  तरी बर्‍याच गोष्टी राहिलेल्या आहेत.  ती भाजप सरकार पूर्ण करेल अशी आशा करूया.  त्या सर्व मागण्या आम्ही भाजप सरकारपुढे ठेवणार आहोतच.  त्याचबरोबर शेतकर्‍यांची गत करोनानंतर अतिशय दयनीय झाली आहे.  त्यांना योगी न्याय भाजप सरकार देईल.  अशी अपेक्षा आहे.  फक्त उद्योगपतींना श्रीमंत करू नका. तळागळातील माणसांना श्रीमंत करा. एक सरकार गेल आणि दुसरं आलं. यात अनेक लोकांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आणि अनेक लोकांची स्वप्न साकार झाली. राजकारणात अस चलायचच. पण हा घोडेबाजार कुठेतरी थांबला पाहिजे.  एका पक्षाचे आमदार तुम्ही असाल त्या पक्षाच्या नावावर तुम्ही निवडून येता, मोठे होता, पैसे कमावता, समाजामध्ये तुमचे एक स्थान बनत.  ज्यांनी तुम्हाला इतक सगळं दिलेलं असत त्याचा तुम्ही घात करता.  हे सर्वच पक्षांनी थांबवल पाहिजे. कारण पक्ष म्हणजे केवळ आमदार – खासदार नव्हे, तर त्याच्या बरोबर लाखो लोकांचे स्वप्ने बांधील असतात.  म्हणून पक्ष तोडणे हा केवळ नेत्याचा घात नसतो, तर जनतेचा घात असतो. हे कुठेतरी, केव्हातरी थांबले पाहिजे. राजकारणात हल्ली पक्षाला आणि पक्षाच्या ध्येय धोरणाला काही अर्थच उरला नाही. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून केवळ सत्ता हस्तगत करायची आणि स्वत:च्या स्वार्थासाठी वापरायची हा प्रकार नितीमत्तेला आणि निष्ठेला गाडून टाकतो आणि केवळ सत्ता पिपासू लोकांना मोठे करतो. अशा लोकांना शेवटी जनताच धडा शिकवेलं. 

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS