चीन आणि भारतीय सैन्याने आपआपसात बोलणी करून ‘लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल’ (LAC) हून सैन्य पाठी मागे घेण्याचा निर्णय केला. १९६२ च्या युद्धानंतर सीमा भागामध्ये सैन्य तैनात झाले. भारतीय आणि चीनी सैन्य कधी समोरासमोर राहिले नाही. केवळ दोन-तीन जागी समोरासमोर राहिले. अलिकडे काही महिने अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीमध्ये चीन आणि भारत सीमेवर वादग्रस्त अशा प्रकारच्या घटना झाल्या. पण या सर्व घटनांमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की दोन्हीकडून बंदुकीचा वापर झाला नाही. धक्काबुक्की झाली त्यात काही जवान शहीद झाले ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यामध्ये हत्याराचा वापर न होणे हे दोघांमधील असलेल्या संयमाचे उत्तम उदाहरण आहे आणि असेच असले पाहिजे.
चीन आणि भारत हे दोन महाकाय देश आहेत. यांची लोकसंख्या प्रचंड आहे आणि म्हणून चीनच्या राष्ट्रपतीने विधान केले होते. ‘भारत आणि चीन यांच्यातील संबंध फक्त दोन राष्ट्रासाठी महत्त्वाचे नाहीत, पण जगासाठी महत्त्वाचे आहेत’ आणि ही खरी गोष्ट आहे. दोन्ही देश जवळ जवळ एकत्र स्वतंत्र झाले व अत्यंत दारिद्र्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे एक वेगळ्या दिशेने चीन गेला. अत्यंत कडक शिस्त व कमालीची मेहनत चीनच्या लोकांनी केली आणि आता जगामध्ये दुसरी आर्थिक महाशक्ती म्हणून चीनची गणना केली जाते. ऑलम्पिकमध्ये सुद्धा दिसून आले की दुसऱ्या नंबर वर चीन आला आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आव्हान केले. ऑलम्पिक मधून मनुष्यबळाची शक्ती निदर्शनास येते. भारताने एकच सुवर्णपदक मिळवले हे ही सुभेदार नीरज चोप्राच्या व्यक्तिगत ईच्छाशक्तीमुळे मिळाले. दुसरीकडे चीनला ५० सुवर्णपदके मिळाली आहेत. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा किंवा तिरस्कार करण्यापेक्षा त्या देशांमध्ये काय चांगले आहे ते बघणे आवश्यक आहे. चीन उत्पादनांमध्ये अग्रेसर आहे. चीनचा माल स्वस्त आहे. म्हणून पूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार होत आहे. त्याचे अनुकरण कुठेतरी भारताने केले पाहिजे. त्यापेक्षा सक्षम उत्पादन व्यवस्था निर्माण केली पाहिजे. हे भारताला सहज शक्य आहे. कारण ते सिद्ध झालेले आहे. अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञ आहेत. अनेक लोक भारतातून अमेरिकेत गेलेले आहेत. अमेरिकेत जाऊन आपले लोक अवकाशात सुद्धा बसलेले आहेत. त्यामुळे भारतामध्ये प्रगल्भ मनुष्यबळ आहे आणि सगळ्या शास्त्रामध्ये पुढे जाण्याची क्षमता आहे. आत्तापर्यंत आपण सिद्ध केलेले आहे की आपण कमी नाही. पण भारतात हे योगदान का होत नाही याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. त्याच कारण सरकारी यंत्रणेमध्ये शास्त्रज्ञ बसत नाहीत. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखालील जी काही प्रगती झाली त्याचे कारण इंदिरा गांधीनी लढाई नंतर सैनिक शस्त्र सामुग्रीच्या उत्पादनामध्ये स्वतः भाग घेतला. त्यानंतर राजीव गांधीच्या काळामध्ये सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रचंड प्रयत्न झाले. कॉम्प्युटर आणि आय.टी. मध्ये पुढाकार घेण्यासाठी अथक प्रयत्न झाले आणि त्यातूनच आज भारत एक आयटीबीटी मध्ये महाशक्ती झाला आहे. पण सरकारी यंत्रणेमध्ये शास्त्रज्ञांना कधीच जागा मिळाली नाही. जे काय निर्णय होतात ते अधिकारी घेतात त्यांचा अभ्यास फार कमी असतो. त्यात मंत्री संत्री यांचा अभ्यास जवळजवळ नसतो. त्यामुळे जी प्रगती भारतात व्हायला पाहिजे ती खुंटलेली आहे. अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञांच्या हातात निर्णय दिलेले आहेत, त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ अमेरिकेत निर्णय प्रक्रियेमध्ये मोठ्या स्थानावर आहेत.
पुढे जाऊन आपल्या लक्षात येतं की १९९१ मध्ये मनमोहन सिंगनी खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण म्हणजेच खाऊजा धोरण अंमलात आणले. त्याचे फायदे जे झाले असतील ते झाले आहेत. प्रचंड पैसा या देशामध्ये आला. पण तो पैसा अंबानी अडाणीकडे गेला आणि गोर-गरीब कंगाल ते कंगालच राहिले. त्यामुळे सरकारी धोरणाचा उपयोग सामान्य माणसाला कमी झालेला आहे आणि त्यामध्ये खाजगीकरणाचा पंथ निर्माण झाल्यामुळे भारताची शक्ती क्षीण झाली आहे. जसा भारतामध्ये विमान बनवण्याचे सोडून आपण राफेल विमान भारतामध्ये आणले. त्याच उत्पादन भारतात होत नाही. ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. या अगोदर जितकी काही विमान आणली, काही हत्यार आणली, त्याचे उत्पादन भारतात करण्याची अट नेहमी राहिलेली आहे. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञान विकसित होत गेल. एक लक्षात घेतल पाहिजे कि मिलिटरी क्षेत्रांमध्ये किंवा डिफेन्स क्षेत्रांमध्ये कधीही खाजगी कंपनी आपले पैसे घालत नाही. हे सरकारलाच घालावे लागतात. पण आता सरकारने खाजगीकरण आणलेले आहे तर सैन्यातले वर्कशॉप सुद्धा खाजगी व्हायला लागलेत. त्यामुळे नवीन शस्त्रासाठी जो पैसा लागतो तो खाजगी कंपन्या घालत नाहीत व सरकार सुद्धा घालत नाहीत आणि त्यामुळे आपल्या तंत्रज्ञानामुळे आणि वैज्ञानिक विकासामध्ये प्रगती थांबली आहे. त्याउलट चीनमध्ये ज्या सरकारी बाबी आहेत ते सरकारच करते. उद्योग सुद्धा सरकारच्या नियंत्रणात चालतो. चीनमध्ये भ्रष्टाचार कमी आहे असं मी म्हणू शकत नाही, पण सरकारी क्षेत्रामध्ये उत्पादन प्रचंड प्रमाणात होत आहे आणि म्हणून चीनची आर्थिक सुबत्ता ही सरकारच्या ताब्यात आहे. पण भारतात ती श्रीमंतांच्या ताब्यात गेली. चीनमध्ये अति श्रीमंत लोक निर्माण झाले नाही. काही श्रीमंत लोक निर्माण जरुर झाले आहेत, पण गरीबाचा स्तर सुद्धा उंचावलेला आहे. चीनमध्ये सर्व समाजाला शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि शाळा हे मोफत आहे. अन्नधान्य स्वस्त मिळते आणि त्यामुळे उत्पादन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळाला तरी त्यांचे जीवनमान उच्च राहते. हा फरक आपण समजून घ्यायला पाहिजे व भारतामध्ये सर्व समाजाला शिक्षण, आरोग्य आणि इतर सोयी सुविधा या मिळायला पाहिजेत. अन्नधान्य मुबलक मिळालं पाहिजे मग त्यांचा नोकरीतील पगार कमी असला तरी चालतो आणि नोकरीतील पगार कमी असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो आणि जागतिक स्तरावर आपण स्पर्धा करू शकतो. ह्या भूमिकेकडे भारताने कधी लक्ष घातल नाही. जी काय सरकारे आली त्या सर्व पक्ष्यांची सरकारे फक्त अंबानी आडाणीला श्रीमंत करण्यामध्ये मग्न राहिली आणि सरकारी क्षेत्र जे आहे हे आता खाजगीकरण करून त्यांच्या घशात घालण्याचा प्रकार चालू आहे. लवकरच एस.टी.सेवा ही खाजगीकरण करण्यात येईल. रेल्वेचे खाजगीकरण करण्यात येईल. विमानात खाजगीकरण करण्यात आलेले आहे. शिक्षण खाजगीकरण करण्यात येईल, आरोग्य खाजगीकरण करण्यात येईल म्हणजे स्वस्तात काहीच कुणाला मिळणार नाही. अमेरिकेमध्ये प्रचंड खर्च करून लोकांना आपल्या या सोयी सुविधा घ्याव्या लागतात. त्याचप्रमाणे भारतात देखील या सोयी सुविधा घ्याव्या लागतील आणि त्याच्यामध्ये श्रीमंताची तर चैनच होईल. पण गरीब हा भरडला जाईल. याकडे आपण लक्ष देत नाही तोपर्यंत प्रत्येक सामान्य माणसाला चांगल्या प्रकारचे जीवन मिळण्यासाठी त्याला समोर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे आपण करत नाही तोपर्यंत भारताची प्रगती होऊ शकत नाही.
याची जाणीव सर्वांनाच आहे, पण यावर काही करायला कोणी मागत नाही आणि भारतामध्ये एक नवीन दुष्टचक्र लोकांच्या मागे लावलेले आहे. दंगली, द्वेष भावना समाजात जाणीवपूर्वक निर्माण केली जाते आणि त्यामधून लोकांचं लक्ष हे रोजी, रोटी, शास्त्रज्ञ त्यांच्यापासून दूर नेऊन केवळ धर्म आणि जातीमध्ये लोकं आपला संघर्ष करत आहेत. त्यामधून भारत कंगाल होत चाललेला आहे. याची जाणीव फार कमी लोकांना आहे. जोपर्यंत भारताचे सर्व लोक एकसंघ होत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे “जाती राष्ट्र विघातक आहेत, जोपर्यंत जातीचा अंत होत नाही तोपर्यंत भारत एक राष्ट्र म्हणून उभे राहू शकत नाही”. ७० वर्षांनंतर सुद्धा पाकिस्तान सारख्या राष्ट्राने भारताला विकलांग करून टाकले आहे. तरी माझ्या देश बांधवानो वेळीच जागे व्हा आणि चीनच्या पुढे जाण्यासाठी एकसंघ व्हा.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट: www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९