जनरल थोरात आणि चीनचे युद्ध _१३.८.२०२०

चीनच्या युद्धाच रहस्य अजून लोकांच्या समोर आले नाही.  साधारणत: २५ -३० वर्षे झाल्यावर गुप्त कागदपत्रे प्रकाशित केली जातात. जसे अमेरिकेत १९७१ च्या युद्धाची कागदपत्रे प्रसिद्ध झाली. त्यात अमेरिकेने भारताविरोधात पाकिस्तानला कशाप्रकारे मदत केली व भारतावर हल्ला करण्याची योजना सुद्धा बनवली ते लोकांसमोर आले. पण चीनच्या १९६२च्या युद्धामध्ये झालेल्या घटना अजून प्रकाशित का होत नाहीत? मी मुद्दामहून दिल्लीमधील नेहरू मेमोरियल ट्रस्टमध्ये जाऊन १९६२ ची कागदपत्रे मागण्याचा प्रयत्न केला होता, पण ती गुप्त आहेत असे सांगण्यात आले.  त्यामुळे इतिहासकारांना १९६२ च्या युद्धांमध्ये संशोधन करता आले नाही व खरा इतिहास प्रकाशित करता आला नाही.  इतिहासाचा अभ्यास आपण का करतो? त्यातून बोध घ्यायला, शिकायला, पुन्हा त्याच चुका करू नये त्यासाठी.  पण साधारणत: भारतामध्ये झालेला सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.  त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत आहे.

            चीन बरोबरच्या युद्धाचे खरे साक्षीदार लेफ्टनन्ट जनरल एस.पी.पी. थोरात आहेत.  जनरल थोरात हे भारतातील असामान्य व्यक्तिमत्व होते.  १२ ऑगस्टला त्यांच्या जयंती निमित्त एक मोठे संमेलन झाले.  त्यात अनेक गोष्टींवर प्रकाश पडला.  जनरल थोरात यांचा जन्म वडगाव, जिल्हा कोल्हापूर येथे १९०५ ला झाला.  १९२५ला ते ब्रिटिश सैन्यामध्ये अधिकारी म्हणून दाखल झाले.  भारतीय लोकांना ब्रिटिश सैन्यामध्ये अधिकारी बनण्यास तेथूनच सुरुवात झाली.  त्यांच्याबरोबर जनरल करिअप्पा, जनरल थिमय्या हे ही अधिकारी झाले.  दुसर्‍या महायुद्धात नागालँड, मणिपूरमध्ये जपान विरुद्ध लढले व कमालीचे शौर्य दाखवले.  स्वातंत्र्यानंतर ते मेजर जनरल या हुद्दयावर काम करू लागले.  नविन देशाची नविन सेना उभारण्याचे काम ब्रिटिश सैन्यात असलेल्या त्या मूठभर लोकांनी केले.  त्यानंतर कोरियन युद्धामध्ये युनो तर्फे ते सहभागी झाले.  त्यांच्याबरोबर कोल्हापूरचे कॅप्टन महाडकर हे ही होते. १९५५ला जनरल थोरात लेफ्टनन्ट जनरल झाले व पूर्वी कमांडचे प्रमुख झाले. 

            त्याकाळी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर पूर्व भागाला ‘नेफा’ म्हणायचे. तो भाग परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत होता.   त्याभागात भारतीय सैन्य नव्हते.  तरीही जनरल थोरात यांनी त्या भागाचा पूर्ण अभ्यास केला व २८ ऑक्टोबर १९५९ ला चीनपासून धोक्याबद्दल एक पूर्ण अहवाल त्यावेळेचे सेना प्रमुख जनरल थिमय्या आणि संरक्षण मंत्री कृष्णमेनन यांना सुपूर्द केला.  त्या अहवालात त्यांनी स्पष्ट म्हटले की चीन हल्ला करण्याच्या तयारीत आहे आणि चीनचा हल्ला कसा होईल याचा सविस्तर अहवाल दिला.  पुढे जाऊन युद्ध भूमीमध्ये जनरल थोरातच्या अहवालाप्रमाणे चीनने हल्ला केला. त्यावेळी कृष्णमेनन हे जनरल थोरात आणि जनरल थिमय्याच्या विरोधात होते.  त्यांनी हा अहवाल फेटाळला.  ते म्हणाले की जनरल थोरात हे आपल्या मनाचेच म्हणणे मांडत आहेत.  आगीत तेल ओतण्याचे काम इंटेलिजन्स ब्यूरो (IB) प्रमुख मुळीक यांनी केले.  मुळीक हे पंडित नेहरूंचे सुरक्षा सल्लागार होते आणि अमेरिका धर्जिण्या होते.  अमेरिकेने त्याला काम दिले होते की भारत आणि चीनची मैत्री तुटली पाहिजे आणि दोघांमध्ये युद्ध झाले पाहिजे. कारण चीन कम्युनिस्ट राष्ट्र होते आणि भारत व चीनची मैत्री झाली तर अमेरिकेला प्रचंड धोका होता.  त्यातच पाकिस्तान अमेरिकेचा हस्तक झाला होता.  मुळीक यांने खोट्या बातम्या पसरवून युद्ध घडवून आणले आणि भारत सरकार भारतीय सैन्याविरोधात काम करू लागले. 

            परिणामत: कृष्णमेननने फॉरवर्ड पॉलिसी जाहीर केली.  आधीच कमी असलेल्या भारतीय सैन्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बॉर्डरवर पाठवले, त्यामुळे भारतीय सैन्य विस्कळीत झाले.  जनरल थोरात यांनी विरोध केला.  त्यांनी चीन विरुद्ध लढण्याची एक वेगळी योजना भारत सरकारला दिली होती.  त्याने सैन्याला ३ स्थरावर वाटले होते. सर्वात पुढे टेहळणी करणारे पथक जे चीन सैन्याबद्दल पूर्ण माहिती देतील.  दुसर्‍या स्तरावर चीनी सैन्याला त्रास देणारे पथक यामुळे चीनी सैन्याची हल्ल्याची दिशा स्पष्ट झाली असती  व आत तिसर्‍या स्तरावर मुख्य सैन्य.  म्हणजे चीनला आत ओढून मारणे.  कारण चीनी सैन्य जितके आत येईल तितके सापळ्यात अडकेल.  कारण डोंगरामध्ये सैन्य हे रसदीवर अवलंबून असते आणि जितके आत येईल तेवढी रसद कमी पडेल.  पण मेननच्या योजनेमुळे भारतीय सैन्य पुढे गेले आणि युद्धात त्यांना रसदच पोहचली नाही.  सैनिकांचे गोळा बारूदच संपले.  असो एकंदरीत सैन्यातील अधिकार्‍यांवर विश्वास नसल्यामुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले. आपले सैनिक अत्यंत शौर्याने लढले. शेवटची गोळी आणि शेवटच्या जवानापर्यंत लढले आणि मारले गेले.  १९६२ च्या युद्धाची नामुष्की आणि पराभव याला पूर्ण जबाबदार त्यावेळेचे राजकीय नेतृत्व होते. मे १९६१ साली सेना प्रमुख जनरल थिमय्या निवृत्त झाले.  वास्तविक अशा आणीबाणीच्या काळात सेनादल प्रमुखाला निवृत्त करणे यात राजकीय अपरिपक्वता दिसते.  दुसरीकडे युद्धाचा पूर्ण अनुभव असलेले जनरल थोरात यांना सेनादल प्रमुख न करता त्यांना निवृत्त करण्यात आले.  त्यामुळे युद्धाचा पूर्ण अनुभव असणार्‍या या दोन प्रमुखांना युद्धाच्या तोंडावर निवृत्त करून राजकीय नेतृत्वाने सैन्यदलाची प्रचंड हानी केली आणि अनुभव नसलेल्या लोकांच्या हातात सैन्यदलाची सूत्रे दिली.  यामुळे युद्धामध्ये भारतीय सैन्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये वाटून विस्कळीत केले आणि भारताला पराभव स्विकारावा लागला.  युद्धानंतर पंडित नेहरूंना जाणिव झाली आणि त्यांनी जनरल थोरात यांना भेटीसाठी बोलावले.  त्यावेळी जनरल थोरात यांनी १९५९ चा अहवाल पंडित नेहरूंना दिला आणि त्यांना सांगितलं या पराभवाची पूर्ण जबाबदारी संरक्षण मंत्री कृष्णमेननची आहे आणि त्यांना काढून टाकण्यात यावे.  पंडित नेहरू चिडले व म्हणाले की हा अहवाल त्यांना दाखवण्यात का आला नाही? पुढे जाऊन मेननला काढण्यात आले. पण तोपर्यंत भारताची प्रचंड हानी झाली.

            छत्रपती शाहू महाराजांच्या मुशीत तयार झालेले जनरल थोरात यांना भारतीय सैन्य दलाचा संस्थापक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.  राजकीय नेतृत्वात आणि सैन्य दलात संघर्ष असला तर काय होते, हे १९६२ च्या भारत-चीन युद्धात दिसून आले.  पण पुढच्या काळात सैन्याचे पुर्नघटन झाले व राजकीय नेतृत्व आणि सैन्य दलात संबंध सुधारायला लागले.  त्यातच यशवंतराव चव्हाण भारताचे संरक्षण मंत्री झाले.  त्यामुळे सैन्याच्या पुर्नघटनामध्ये जनरल थोरात यांचा मोठा वाटा आहे.  याचा परिणाम १९६५ च्या भारत–पाकिस्तान युद्धात दिसून आला आणि १९७१ च्या युद्धामध्ये इंदिरा गांधीसारखे  कणखर राजकीय नेतृत्व आणि सम मोनेक्सासारखे योद्धे यांनी भारताला प्रचंड विजय मिळवून दिला.  निवृत्त झाल्यानंतर जनरल थोरात स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी सैन्यदलाला वेळोवेळी मार्गदर्शन केले व भारतातील पहिली माजी सैनिक संघटना इंडियन एक्स सर्विस्मेन लीग (IESL) बनवली.  तिला  १२ ऑगस्ट २०२० ला ५० वर्षे झाली. जनरल थोरात हे पंजाब रेजिमेंट आणि महार रेजिमेंटचे प्रमुख होते. महार रेजिमेंटला सक्षम करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.  त्या निमित्त आताचे IESLचे अध्यक्ष कर्नल रानडे यांनी मोठा कार्यक्रम लावला होता. 

            त्या कार्यक्रमात कारगिल हीरो आणि सर्जिकल स्ट्राईक्सचे प्रमुख जनरल निंबुळ्कर म्हणाले की जनरल थोरात हे पुर्ण सैन्य दलाला एक आदर्श आहेत आणि भारताच्या सैन्यदलाला सक्षम करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. जनरल थोरात यांचे पुर्ण कुटुंब सैन्य दलात होते.  त्यांचे बंधु यशवंत थोरात हे नाबार्डचे प्रमुख झाले.  त्यांनी जनरल थोरात यांची आठवण काढली व सैन्यातील कामाप्रमाणेच जनरल थोरात देशाच्या सेवेसाठी कायम कार्यरत राहिले.  जनरल थोरात यांचे चिरंजीव कर्नल शिवाजी थोरात हे ही मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.  त्यांचे पुतणे कर्नल डी.डी.पी.थोरात हे उरीमध्ये माझे कंपनी कमांडर होते.  या निमित्ताने जनरल थोरात यांचे कार्य पुढे चालविण्यासाठी मी सरकारकडे सैनिक महासंघा तर्फे तीनच मागण्या करतो.  पहिली गोष्ट – सैनिकाला ५८ वर्षापर्यंत शाश्वत नोकरी दिली पाहिजे.  सैनिकाला ३३ – ४० वयोगटामध्ये तुम्ही निवृत्त करता जो देशासाठी लढतो त्याला नोकरीसाठी दरदर भटकायला लावता हा अन्याय बंद झाला पाहिजे.  दुसरे – सीमेवर असलेल्या सैनिकाला व त्याच्या कुटुंबाला समाजकंटक व गुंड प्रचंड त्रास देतात, ते थांबवण्यासाठी सैनिक महासंघ प्रत्येक तालुक्यात एक दक्षता समिती उभी करेल.  तिला पोलिसांनी पुर्ण मदत केली पाहिजे.  तिसरी – आयुष्यभर सैनिक सीमेवर राहतो, तो निवृत्त व्हायच्या अगोदर त्याला शहरामध्ये घरकुल दिले पाहिजे. 

            भारताच्या इतिहासात सैन्य दल आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील बेबनाव हा देशाला किती महाग पडू शकतो हे स्पष्ट होते. त्यामुळे राजकीय नेतृत्वाने सैन्यातील नेतृत्वात ढवळाढवळ करू नये.  सैन्यदल ही देशाची शेवटची शक्ति आणि शान असते.  त्याच्यामध्ये लुडबूड करणे म्हणजे देशाचा घात करणे आहे.  हिटलरने आपल्या सैन्यातील अधिकार्‍यांना कस्पटासमान वागवले आणि जर्मनी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे देशाला जर सशक्त आणि समृद्ध करायचे असेल तर सैन्याला ताकद द्या, त्यांचा सन्मान करा.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS