जिंजी (भाग -१)_२९.६.

छत्रपती शिवराय यांची दूरदृष्टी व युद्ध शास्त्रावरील पकड ही असामान्य होती. त्यामुळे कुठल्याही धोक्याची त्यांना आधीच कल्पना यायची व अतिशय योग्य नियोजन करून त्यांनी शत्रूचा अनेकदा पराभव केला.  तशीच एक गोष्ट जिंजी बद्दल सुद्धा सांगता येते.  शिवरायांचा राज्याभिषेक ही एक अलौकिक घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पूर्ण परिवर्तन झाले. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी आपल्या पुढील धोरणाबद्दल विस्तृत विचार केला आणि त्यांनी सर्वात मोठा धोका कुठून येणार हे अचूक ओळखले.  औरंगजेबच्या हातावर तुरी देऊन ते आग्र्याहून गुप्तपणे पसार झाले आणि महाराष्ट्रात आले.  रायगडावर गेल्यानंतर जिजामातेचे दर्शन घेतले.  ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.  अनेक वर्षांनी गुलामगिरीचे जंजीर तोडून टाकले व महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा प्रसार झाला.  पण छत्रपतीचे लक्ष दुसरीकडेच केंद्रित होते.  त्यांना माहीत होतं की औरंगजेब लवकरच महाराष्ट्रात येणार आणि पूर्ण दक्षिण भारत गिळून टाकण्याचा प्रयत्न करणार.  तो येत असताना लाखोच सैन्य घेऊन येणार आणि सर्वप्रथम महाराष्ट्रावर हल्ला करणार. सर्व किल्ले सर करायचा प्रयत्न करणार.  त्याचबरोबर लोकांना अतोनात कष्ट देणार.  मिर्झा राजा जयसिंग बरोबर लढताना जी स्थिती महाराष्ट्राची झाली ती परत होणार.  आपल्याला औरंगजेब समोर शरणागती पत्करावी लागणार. हे ओळखून शिवरायांनी आपल्या बुद्धी चातुर्याने औरंगजेबला तोंड द्यायची एक अत्यंत धाडसी आणि कल्पक अशी योजना बनवली.  त्यांनी कर्नाटकची स्वारी करण्याचा बेत बनवला.  दक्षिणेचे नवीन राज्य बनवायचा त्यांनी बेत केला.  दुर्दैवाने याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला फार कमी माहिती आहे.  कारण तो छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा विजय होता.  छत्रपती गेल्यानंतर २७ वर्ष मराठे लढले आणि औरंगजेबला तिथेच गाडावे लागले.  औरंगजेब एकदा महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला परत आपली राजधानी आग्रा किंवा दिल्लीला जाता आले नाही.  २७ वर्ष मराठे झुंजत राहिले, लढत राहिले, मराठ्यांनी घनघोर युद्ध करून त्याला महाराष्ट्रात संपवले.  जगातल्या सर्व लढायांमध्ये ही सर्वात प्रदीर्घ लढाई झाली आणि छत्रपती शिवरायांची योजना त्यांच्या नंतरच्या काळात त्यांच्या वंशजाने अत्यंत शौर्याने यशस्वी केली.

छत्रपती गेल्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली आणि ती अत्यंत कल्पक आणि चतुर बुद्धीने यशस्वी केली.  सुरुवातीलाच त्यांनी बुरहानपूरवर हल्ला करून त्याची प्रचंड लूट केली.  बुरहानपुर हे मोगलाला दक्षिणेत घुसण्याचे द्वारच होते.  त्याचप्रमाणे मोगल सैन्याला औरंगाबाद आणि परिसरात कमकुवत केले.  म्हणून औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला, त्याला फार काळ टिकता आले नाही. त्यांनी आपलं लक्ष दक्षिणेतल्या राज्यांकडे वळवले.  त्यांनी सुरुवातीला आदिलशाही संपवून कुतुबशाही संपवली आणि तो मोकळा झाला.  पुढचं लक्ष केवळ महाराष्ट्रच नव्हे तर स्वराज्य संपवण्याचं त्यांनी ठरवलं व तो महाराष्ट्रात आला  सगळीकडे हल्ले करण्याचा प्रयत्न केला.  पण संभाजी महाराज यांनी त्याला जेरीस आणले. मग कपटाने आणि आपल्याच लोकांनी संभाजी महाराजांना पकडून दिले.  औरंगजेबने त्यांना अतोनात यातना दिल्या.  अत्यंत क्रूरपणे या मराठ्यांच्या राजाला हाल हाल करून मारले.  ही जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत क्रूर अशी घटना होती,  पण त्यामुळे मराठे जरी अस्वस्थ झाले तरी त्वेषाने उभे राहिले. औरंगजेबाशी युद्ध जे सुरू झाले ते १७०७ साली त्याला गाडूनच संपले.

आता छत्रपतींची दूरदृष्टी कामाला आली.  कारण संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर मराठी सेना हतबल झाली, पण येसूबाईंनी धीर सोडला नाही.  औरंगजेबशी मुकाबला करण्याचे त्यांनी ठरवले.  प्रथम त्यांनी राजाराम यांना छत्रपती केले. मग येसूबाईंनी राजाराम महाराजांना आदेश दिला, रायगडावर राहून औरंगजेबाला युद्धामध्ये काहीच मिळू देणार नाही.  तोवर राजाराम महाराजांनी पूर्वीच्या योजनेप्रमाणे जिंजीला जावे व तेथे राज्य चालवावे.  असे झाल्यास औरंगजेबाचे सैन्य तामिळनाडूमध्ये चेन्नई जवळ असलेल्या जिंजी किल्ल्यावर औरंगजेबचे लक्ष वळेल व दीड हजार मैलाचे रणांगण निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे या पूर्ण परिसरामध्ये जागोजागी शिबंदी ठेवण्यात येईल.  जागोजागी गडकोटामध्ये औरंगजेबच्या सैन्याला विरोध करण्यात येईल आणि मग घोडा स्वारावर आधारित सैन्य बाहेर राहून मैदानात गनिमी काव्याने औरंगजेबच्या सैन्याला जेरीस आणण्यात येईल.

सुरुवातीलाच संताजीने औरंगजेबच्या छावणीवर हल्ला केला, पण औरंगजेब वाचला कारण तो नमाज पडत होता.  मराठ्यांनी शिवरायांच्या शिकवणीप्रमाणे पूजा करत असताना कोणावरही हल्ला केला नाही. पण संताजीने त्याच्या तंबूचे कळस कापले व राजाराम महाराजांना अर्पण केले. या घटनेमुळे सारा महाराष्ट्र उठून उभा राहिला.  एवढी मोठी बहादुरी संताजींनी दाखवली, म्हणून सर्वांचे मनोबल पुन्हा एकदा युद्ध करायला तयार झाले व या पंधराशे मैलावर जे नियोजन केले होते त्याचे परिणाम दिसू लागले.  औरंगजेबचे आठ लाखाचे सैन्य ऐंशी तुकड्यात विभागले गेले.  थेट महाराष्ट्रापासून तामिळनाडू पर्यंत त्याचे सैन्य पसरले आणि मग मराठ्यांनी त्याला जागोजागी नामोहरण करायला सुरुवात केली. इकडे जिंजीमध्ये राजाराम महाराजांनी सगळे नायक व छोट्या छोट्या राजांना एकत्र केले, तोपर्यंत व्यंकोजी राजांनी दक्षिणेकडे अनेक ठिकाणी जिंकली होती.  त्यांनी सुद्धा राजाराम महाराजांना मदतच केली.  संताजी आणि धनाजी महाराष्ट्रापासून तामिळनाडू पर्यंत मुक्तपणे वावरत होते.  औरंगजेबने मग जिंजी जिंकण्याचं काम जुल्फिखर खान, ज्याने रायगड कब्जा केला होता याला दिले व आपले सर्वोत्कृष्ट सेनानी जिंजीला पाठवले.  पण मराठ्यांचे युद्धशास्त्र जे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी निर्माण केले होते ते कामास आले.  मराठे औरंगजेबाची नोकरी सोडून परत स्वराज्यात येऊ लागले आणि औरंगजेबच्या सैन्याला पूर्णपणे बेजार केले.

एका बाजूला मराठी पूर्ण दक्षिण भारतापासून महाराष्ट्रपर्यंत अत्यंत शौर्याने लढत होते.  औरंगजेबच्या सैन्याला नामोहरण करून टाकले होते.  त्याचवेळी अंतर्गत कुरबुर मोठ्या प्रमाणात सुरू झाली.  नागोजी माने व इतर अनेक सरदार स्वराज्यामध्ये आल्यानंतर जे निष्ठेने स्वराज्यात राहिले व स्वराज्य वाचवले, त्यांच्यावर दुर्लक्ष व्हायला लागले. त्यात संताजी अत्यंत आक्रमक सेनापती होता.  त्याला घातपाताणे मारण्यात आले. अनेक वेळा असे होते की वरच्या स्तरावर किंवा राजाच्या स्तरावर ते निर्णय घेतले जातात व जी कारवाई केली जाते,  त्याबद्दल सैनिकांना माहिती नसते. मग गैरसमज होऊन संताजी सारखे सैनिक विरोध करू लागतात. औरंगजेबचा सेनापती जुल्फीखार खान व राजाराम महाराजांमध्ये एक विश्वासाचा संबंध प्रस्थापित झाला होता.  जुल्फीखार खानला जिंजी कब्जा करण्याची औरंगजेबने आदेश दिला होता, जर आदेशाचे पालन झाले नाही तर जुल्फीखार खानला संपविण्यात येईल असे औरंगजेबने बजावले होते. म्हणून जुल्फिखार खानने राजाराम महाराजांना सांगितले की त्यांनी आता जिंजी सोडून जावे. जुल्फिखार खानने प्रचंड हल्ला सुरुवातीला जिंजीवर चढवला, पण तो त्या हल्ल्यामध्ये यशस्वी झाला नाही आणि माघार घ्यावी लागली.  तसेच अनेक लढाया झाल्या.  त्याच्यामध्ये जुल्फीखार खानचा प्रचंड पराभव देखील झाला व त्याला माघार घेऊन वांडीवाश हे जिंजीपासून ३० किलोमीटरवर आहे, तिथे रहावे लागले.  पण साडेसात वर्ष जुल्फीखार खानने जिंजी कब्जा करायचा प्रयत्न केला.  छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी सोडून महाराष्ट्रकडे जाण्याचा मार्ग पत्करला.  पण राजाराम महाराजांचे पत्नी आणि जे साथीदार होते ते मागेच राहील त्यामध्ये तुंबळ युद्ध झाले.  अंततः जुल्फिखार खाने राजाराम महाराजांच्या कुटुंबाला तिकडून सोडवले व महाराष्ट्राकडे सुद्धा पाठवले.  अशाप्रकारे साडेसात वर्ष जिंजी लढवल्यानंतर औरंगजेबाचे प्रचंड हानी केल्यानंतर राजाराम महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले.  ते तिथून विशालगडाला गेले आणि तिथून पुढे लढा औरंगजेब विरोधात चालू ठेवला आणि अंतत:  सिंहगडवर १७०० साली राजाराम महाराजांचा त्यांचा मृत्यू झाला.

आता परत महाराष्ट्रात एक निराशेच आणि दुःखाचे सावट पसरले, पण छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी निर्धार केला व लढा पुढे चालू ठेवण्याचं ठरवले.  सैन्याची जमवाजमव केली. औरंगजेबला वाटलं की राजाराम महाराज गेल्यामुळे आता सहजपणे ताराबाईंना नेसतानाबूत करता येईल आणि मराठ्यांना संपवता येईल.  पण त्याचे हे स्वप्न फोल ठरले. २५ वर्षाची विधवा स्त्री ताराबाईंने परत किल्ले सर करायला सुरू केले आणि त्यांनी धनाजी जाधवला अहमदाबाद वर हल्ला करायला पाठवले.  नेमाजी शिंदे मध्यप्रदेश मध्ये धुमाकूळ घालू लागले.  कृष्णाजी सावंत सुद्धा या भागामध्ये प्रचंड प्रमाणात यश संपादन करू लागले. मोजकी शिबंदी किल्ल्यात ठेवून अशा सरदारांना आणि सेनापतींना ताराबाईने मोकळ्या मैदानात फक्त औरंगजेबचा सैन्याला बेजार करायला सोडले.  इतके मोगल सैन्य बेजार झाले की त्यांची लढण्याची इच्छा संपली.  अशा पद्धतीने म्हाताऱ्या औरंगजेबा बरोबर युद्ध चालूच राहिले आणि १७६० साली अहमदनगर येथे औरंगजेबने आपले प्राण सोडले.  स्वराज्य नेस्तनाबूत करण्याचे आणि महाराष्ट्रभर कब्जा करण्याचं त्याचं स्वप्न अपुरेच राहीले.  उलट छत्रपती शिवरायांनी बनवलेले स्वराज्य ते महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं तर एक मोठा भाग हा जिंजीचा सभोवताली कर्नाटकमध्ये होतो.  हा भाग सुद्धा मजबूत करण्यात आला.   मराठ्यांची शक्ती इतकी वाढली की पुढे जाऊन अटकेपार झेंडा मराठ्यांनी लावला आणि पूर्ण भारतावर आपला अनेक वर्ष दबदबा ठेवला.  स्वातंत्र्याची चिंगारी छत्रपती शिवाजी महाराजांनी लावली, ती पूर्ण करण्यात आली.  स्वातंत्र्य ज्यांनी टिकवले त्या मावळ्यांना सॅल्यूट करण्यासाठी जिंजीला जाता आहे, त्याबद्दल पूर्ण माहिती पुढच्या लेखात देण्यात येईल.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS