जिंजी (भाग -२) – महाराष्ट्राचा स्वतंत्र लढा_६.७.२०२३

संभाजी महाराजांची हत्या ही देशाच्या इतिहासातील काळीकुट्ट घटना आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले.  ते अत्यंत शिताफीने संभाजी महाराजांनी पुढे चालवले व मोघलांना नऊ वर्ष झुंजवत ठेवले.  प्रचंड प्रयत्न करून सुद्धा औरंगजेबला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यातच १ फेब्रुवारी १६८९ मध्ये संभाजी महाराजांना कट करून अटक करून दिले. याचा इतिहास सर्वांना माहीतच आहे.  संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेली मंडळी रायगडला परत आली.  पण त्या अगोदरच झालेला प्रकार कळला होता आणि ज्या लोकांनी कट केला ते राजद्रोही ठरले.  कटात कोण कोण सामील होते, याबद्दल अजून पूर्ण माहिती मिळालेली नाही. औरंगजेबचा उद्देश होता राज्य बुडवायचं.  त्यासाठी संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचा खून अत्यंत क्रूरपणे ११ मार्चला केला.  पण त्यानंतर औरंगजेबचा डाव होता की, स्वराज्य बुडवायचे. म्हणून राजाराम महाराजांना मारण्याचा त्यांचा हेतू होता. पण तसे ते करू शकले नाहीत.  रायगडावर अनेक कटवाल्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर कठोर कारवाई देखील झाली. येसूबाईंनी दुःखात बुडून न जाता आपला पुत्र शाहू यांना छत्रपती न करता राजाराम महाराजांना छत्रपती केले.  त्यामुळे औरंगजेबला आणखी धक्का बसला.  त्याच्या मनामध्ये मराठा राज्य संपवून परत आपल्या राजधानीत जाऊन हुकूमत गाजवायची होती.  पण ते न होता येसूबाईंनी रायगड लढवण्याचा निर्धार केला व राजाराम महाराजांना व त्यांच्या साथीदाराला येथून निघायला सांगितले.  औरंगजेबने आदेश काढला की,  तातडीने रायगड कब्जा करावा, त्यासाठी जुल्फीखार खानला रायगडला वेढा देण्यासाठी पाठवले. या बातमीमुळे मराठा साम्राज्यातील प्रमुख व्यक्ती आणि जनता हतबल झाल्यासारखे वाटते.  राजाराम महाराज सुरुवातीला प्रतापगडावर गेले व तेथून पन्हाळ्याला गेले व स्वराज्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण जिवंत राहिले पाहिजे हे त्यांना कळले.  तशा हालचाली सुरू झाल्या. जिंजीला जाण्याचे ठरले हे नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनीच केले होते. आठ लाखाचे सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात आल्यावर तिथे बसून त्याच्याशी झुंज देणे हे अशक्य होते आणि पराभव अटळ होता.  त्यांनी हे जाणले होते म्हणून छत्रपती शिवरायांनी कर्नाटकची स्वारी केली व तिथे जिंजी आणि वेलोर असे मजबूत किल्ले आपल्या ताब्यात ठेवले.

एक नवीन स्वराज्य आजच्या तामिळनाडूमध्ये बनवले. ज्यावेळी औरंगजेब येईल त्यावेळी त्याला खाली खेचून पंधराशे मैलाचे रणांगण बनावावे.  या रणांगणात जागोजागी औरंगजेबच्या सैन्याला मारायचे व नष्ट करायचे ही मूळची शिवरायांची योजना.  शिवरायांच्या या युद्ध शास्त्राबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. पण शिवरायांच्या पुत्रांना आणि त्यांच्या सरदारांना ही योजना माहिती होती.  म्हणून ते सगळे तयार होते. संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर रायगडला वेढा घातल्यानंतर संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबच्या छावणीवर हल्ला केला.  त्यावेळी औरंगजेब वाचला, कारण तो नमाज पडत होता आणि शिवरायांच्या नियमाप्रमाणे पूजा करणाऱ्या माणसाची हत्या करायची नाही.  संताजींनी औरंगजेबाला मारलं नाही तर त्याच्या छावणीचे कळस कापून आणले व राजाराम महाराजांना सादर केले.  एवढे जबरदस्त शौर्य पाहून मराठे परत जोमाने लढाईला तयार झाले.  संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर महाराष्ट्राची जनता प्रचंड चिडली होती.  हतबल झालेली जनता  संताजी धनाजी सारखे योद्धे  समोर आल्यानंतर जोमाने उभे राहिली आणि सूड भावनेने औरंगजेबला मारायचे ठरवून पेटून उठली. कारण त्याच्यापूर्वी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर बरेच सरदार औरंगजेबला शरण आले आणि स्वराज्य सोडून स्वराज्याच्या विरुद्ध लढू लागले.  औरंगजेबाने देखील किल्लेदारांना, देशमुखांना, सरदारांना ओढून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि बरेच लोक औरंगजेबाकडे गेले. त्यामुळे सहा सात महिन्यांमध्येच अनेक किल्ले मोघलांचे झाले. पन्हाळा किल्ला गेल्यावर तर स्वराज्यात सामान्य जनता परत हतबल झाली आणि मोघली सत्तेच्या खाली काम करू लागली.  पण पन्हाळ्यामध्ये जसं यश मिळायचा होतं तसं मिळालं नाही.  प्रचंड पावसामुळे वेढा पडण्यास विलंब झाला. २४ सप्टेंबरला मग राजाराम महाराज व इतर मंडळीनी जिंजीकडे कुच केली व २८ ऑक्टोबरला ते बसनूर येथे पोहोचले.  वाटेत त्यांना प्रचंड त्रास झाला,  कारण औरंगजेबाने त्यांच्या पाठलागावर सैन्य  पाठवले  होते.  पण तरी देखील शत्रूच्या हातावर तुरी देऊन ते कर्नाटक मध्ये पोहोचले.

त्यानंतर त्याच पद्धतीने मराठ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला, पण सामान्य मराठा उभा राहिला आणि स्वराज्यासाठी लढण्यास तयार झाला. अचानक संभाजी महाराज गेल्यामुळे त्यांच्या सरदारांमध्ये मंत्रिमंडळामध्ये विस्कळीतपणा कमालीचा होता.  सुरुवातीला प्रल्हाद निराजी व रामचंद्रपंत यांनी प्रतिनिधी पद व सचिव पद आपल्याकडे करून घेतले.  त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात अविश्वास होता.  शिवाजी महाराजांनी रामचंद्र पंतांच्या घराण्यातून अमात्य पद काढून नवनाथ पंत हनुमंत यांना दिले होते.  ते त्यांच्याकडून दूर केल्यास राजाराम महाराजांना अडचण होण्यासारखी होती.  राजाराम महाराज जिंजीकडे निघाल्यामुळे महाराष्ट्रातील प्रशासनाची योग्य निवड करणे गरजेचं होतं आणि म्हणून त्यावेळेस ते रामचंद्र पंतास पूर्ण जबाबदारी द्यायला तयार नव्हते.  युद्धविषयक शक्ती सामर्थ्याची कामे शंकराजी पंताकडे राजाराम महाराजांनी दिली. त्यामुळे रामचंद्रपंत हे नाराजच होते.  पण शंकराजी नारायण यांनी महाराष्ट्राच्या पूर्ण कारभाराचा ताबा घेतला होता.  मालोजीरावांचा पुत्र संताजीला सेनापती करण्यात आले.  संताजी अतिशय तरुण आणि धाडसी माणूस होता. पण सत्तेचा वाटा कुणाला नको असतो आणि म्हणून हळूहळू धनाजी जाधव यांना संताजी बद्दल असूया निर्माण होऊ लागली.  त्याचबरोबर रामचंद्र पंतांनाही संताजीचा राग येऊ लागला. जुल्फीखार खानने जेव्हा जिंजीला वेढा दिला होता, त्यावेळेस मुद्दाम रामचंद्रपंताने धनाजी रावांना बोलावून घेतले.  संताजीला जिंजीकडेच ठेवले. हळूहळू त्याचे सेनापती पद सुद्धा काढून घेतले.  धनाजीने छ. राजारामांना संतांजी विरुद्ध भडकविले.  संताजी धनाजी मध्ये प्रचंड संघर्ष झाला व धनाजी महाराष्ट्रात पळून गेले.  राजाराम महाराजांना संताजीने कैद केले.

पण दुसऱ्या दिवशी सोडलं आणि माफी मागितली. तसेच आपलं काम अविरत चालू ठेवण्याची इच्छा त्यांनी राजाराम महाराजांना सांगितली.  संताजी लढत राहिला.  त्यांनी मोघलांविरुद्ध प्रचंड आक्रमण केले.  पण शेवटी या घडामोडीचा परिणाम वाईट झाला. संताजीवरील राजाराम महाराजांचा विश्वास उडाला आणि तो प्रकट होऊ लागला.  त्यामुळे संताजी महाराष्ट्रात परत गेले आणि तेथे मागोजी मानेने त्यांचा खून केला. मधल्या काळात राजाराम महाराजांनी वतन देण्याचे ठरवले होते आणि म्हणून नागोजी माने सारखे लोक औरंगजेबापासून परत स्वराज्यात आले.  पण त्या काळामध्ये जी काय कारण असतील त्यामुळे संताजीचा खून करण्यात आला व हे झाल्यानंतर नागोजी माने  व त्यांचे साथीदार हे पुन्हा औरंगजेबला मिळाले आणि स्वराज्याच्या विरोधात लढू लागले.

या सर्व घटनांमुळे मंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे स्वराज्य कमकुवत होऊ लागले.  त्यात पुन्हा जुल्फीखार खानावर औरंगजेबचा दबाव आला. राजारामाला पकड, नाहीतर तुझी माझ्याशी गाठ आहे.  अशा पावित्र्यामुळे आणि इतर सरदारांच्या आग्रहामुळे जुल्फीखार खानने राजाराम महाराजांना सांगितले की, मला आता जिंजीवर कब्जा करावाच लागेल, त्यामुळे तुम्ही किल्ला सोडून जा. त्याच काळामध्ये राजाराम महाराजांनी रामचंद्र पंताना धनाजी जाधवला जिंजीला पाठवण्याबद्दल अनेकदा मागणी केली.  कारण तिथे उरलेलं सैन्य कमकुवत होतं आणि त्यात लढण्याची क्षमता नव्हती.  पण धनाजी जाधव काही आले नाही आणि राजाराम महाराजांची दोन्ही कडून कुचंबना झाली की जुल्फीखार खान बरोबर लढा द्यायचा की सोडून जायचे. जुल्फीखार खानाच्या सल्ल्यामुळे त्यांनी सोडून जाण्याचा निर्णय घेतला व ते लढाईच्या मध्यावर जिंजीतून निघून गेले आणि वेल्लोरला राहिले.  त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्याबरोबर आल्या नाहीत, पण जुल्फीखार खानने गणोजी शिर्के यांच्या मदतीने त्यांच्या पत्नींना बाहेर काढले व सुखरूपपणे महाराष्ट्रकडे पाठवून दिले. त्यात ताराराणी देखील होत्या.  हे करत असताना जुल्फीखार खानने आपला संबंध राजाराम महाराजांशी चांगलाच ठेवला व राजाराम महाराजांना मदत केली.  कारण राजाराम महाराजांनी त्याला अनेक वेळा मदत केली होती. पण ह्या त्यांच्या संबंधांचा गैरसमज मात्र मराठा सैन्यामध्ये पसरला होता व त्यात रामचंद्र पंत यांच्या  चल ढकलपणामुळे मराठ्यांची दक्षिणेतली राजधानी जिंजी ही सोडून द्यावी लागली. महाराष्ट्रामध्ये संताजी सारखा माणसाला गमवावे लागले आणि दुष्ट लोकांना वतन देऊन मोठं केल्यामुळे जिंजीचा मोठा पराभव झाला.  पुढे जाऊन मराठा कमकुवत झाले. महाराष्ट्रात छत्रपती राजाराम गेले आणि आपली नवीन कारकीर्द सुरू केली.  या सर्व गोष्टींमुळे अत्यंत नुकसान स्वराज्याचे झाले होते. अशाप्रकारे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याचा दूसरा अध्याय संपला.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS