जी.एम.बियाणे एक महासंकट_३०.०५.२०१९

इंग्रज भारत सोडून गेले पण आपली राज्य करण्याची  पूर्ण व्यवस्था इथेच सोडून गेले. इंग्रज मुळात भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे शेती नावाची कुठली पद्धत नव्हती.  पाण्यातून प्लेग होतो, म्हणून ते पाणी सुद्धा प्यायचे नाहीत, दारू प्यायचे आणि आंघोळ सुद्धा करायचे नाहीत. त्यामानाने भारत फार पुढारलेला होता.  ज्याला भारतीय संस्कृती म्हणतात, तिची पाळेमुळे वेगळ्या रसायनाने बनली होती.  ८०% लोकांचा व्यवसाय शेती हा होता. त्यामानाने इंग्लंडमध्ये २०% लोक शेती करायचे.  भारतात ५०% जमीन शेती लायक होती.  १२ महीने सूर्य होता.  त्या परिस्थितीत भारत सरकारने शेतीला प्राधान्य द्यायला पाहिजे होते.  भारत जगातील अन्नधान्याचे कोठार झाले असते.  पण इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत आपण उद्योगाला प्राधान्य दिल व भारताचा घात झाला. म्हणूनच भारतात १०% लोक सूट बूट घालून फाड फाड इंग्लिश बोलून मज्जा मारत आहेत आणि ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत.  भारताला जर सर्वांना रोजगार पुरवायचा असेल तर शेती शिवाय पर्याय नाही.  हे सत्य २०१९ च्या निवडणुकीत कुठेच दिसले नाही.

जेष्ट वैज्ञानिक स्व.डॉ पुष्प भार्गव सर्वोच्च न्यायालयाने जी.एम. बियांण्याबाबत नेमलेल्या तांत्रिक  समितीचे सदस्य होते. त्यांनी जी.एम.बियाण्याच्या खुल्या वातावरणातील वापराला /चाचण्यांना कायम विरोध केला होता. जागतिक किर्तीचे फ्रेंच वैज्ञानिंक श्री.एरिक सेरालिनी यांचे जी.एम.खाद्यांच्या उंदीरावरील प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रयोगावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी पुन्हा तेच प्रयोग केलेत, तेव्हा सुद्धा निष्कर्ष आधीसारखेच आहेत. उंदराना अंगावर गाठी आल्यात, प्रजनन संस्थेवर परिणाम झालेत. आर्जेन्टिना मध्ये २००० ते २००९ दरम्यान बालकामध्ये कर्करोगाचे परिणाम तिपटीने वाढल्याचे अभ्यास आहेत. आर्जेन्टिना सरकारने घाईघाईत जी.एम.बियाण्याना परवानगी दिल्याचे मत तेथील वैज्ञानिक आंद्रे कारास्को नोंदवितात. तेथे  मोठ्या प्रमाणावर जी.एम.बियाणे आणि तणनाशके वापरात आहेत. कारास्को जन जागरणासाठी आपल्या सहकार्‍यांसह सभा घेण्यासाठी गेले असता गुंडांनी जीवघेणा  हल्ला केला, बचावासाठी  त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तासभर स्वतःला कारमध्ये कोंडून घ्यावे लागले होते. कृषी रसायन विक्रेते  आणि  अन्य हितसंबंधियानी  हा हल्ला घडवून  आणला  होता. आम जनते पर्यंत  खरी माहिती  पोहचू  नये अशाप्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे  भारतातही होतच असतात. आमचा सुद्धा आवाज दाबण्याचा गेले २० वर्ष प्रचंड प्रयत्न झाले.

दिल्ली विद्यापीठाने विकसित केलेल्या जी.एम.मोहरीची कथा तर  महानच आहे. विकासकांनी लबाडी करून उत्पादन वाढ दाखवलेली आहे. त्यांनी कमी उत्पादन देणाऱ्या मोहरीच्या  वाणाची तुलना केली. गतवर्षी ही कथा माध्यमामधून प्रसारित झाली होती. जी.एम. मोहरी बायर कंपनीच्या BASTA या तणनाशकाला (herbite Tolerant) सहिष्णू आहे. (ही बाब उघड केलेली नाही.) त्यात बायर कंपनीने विकसित केलेले जुणूक वापरले आहेत. याचा अर्थ जी.एम.मोहरी स्वदेशी आहे. हा दावा फसवा आहे. मोन्सटो आणि जर्मनीची बायर कंपनी आता एकत्र आले आहे. या कंपन्या आणि जी. एम. बियाणे आणि कृषी रसायने सुद्धा निर्माण करतात. उत्पादन वाढीसाठी जी.एम.बियाणे ही शुद्ध थाप आहे. तशी व्यवस्था जी.एम.बियाण्यात नाही. जी.एम.मोहरीचा विकास बायर कंपनीच्या BASTA या  तणनाशकाचा वापर वाढविण्यासाठी केला गेला आहे. (तणनाशकामुळे अन्न,पाणी, भूमी, दुषित होत आहे.  ग्लायफोसेट तणनाशकाचा कर्करोगाशी संबध असल्याचे विश्व स्वास्थ्य संघटनेने जाहीर केले आहे . यंदा (२०१८-२०१९) बी.टी.कापसावर बोंड अळीचा प्रचंड हल्ला झाला. कंपनीचे दावे फेल ठरले, कीटकनाशकांचा वापर वाढला.  हे वास्तव आहे.  BG II कापूस बियाणे निष्प्रभ ठरले, म्हणून त्या पुढील पिढ्यांना परवानगी देण्याची मागणी होत आहे. तसे करणे म्हणजे आधीपेक्षा अधिक विषारी बियाणे वापरणे होय. अशा बियाण्यांचा मानवी आरोग्य आणि एकूण पर्यावरणावर काय परिणाम होणार याची कोण चिंता करणार? नुसती उत्पादन वाढ काय कामाची?  जनतेला विषारी अन्न देऊन आम्ही काय साधणार आहोत?

आज घडीला भारतात सर्वत्र तणनाशकांचा अनिर्बंध वापर होत आहे. ग्लायफोसेट या तणनाशकाचा संबंध जुळत असल्याचे विश्व स्वास्थ्य संघटनेने जाहीर केले आहे. श्रीलंकेने ग्लायस्फोसेटवर बंदी आणली आहे. आपल्या देशात यांचा सर्रास वापर होत आहे. जी.एम.बियाणे आणि तणनाशकाची जोडी आहे. RRF (रेडी राउंड अप फ्लेक्स ) हे तणनाशक सहिष्णू कापूस बियाणे देशात मान्यता नसताना शेतकऱ्यापर्यंत चोर मार्गाने पोहोचले आहे. हे बियाणे मोन्सेंटो कंपनीने विकसित केलेल्या राउंडअपं तणनाशकच्या सोयीसाठी आहे.  जी.एम.बियाणे कोणासाठी, कशासाठी हा खरा मुद्दा आहे. जनतेला विषमुक्त अन्न खाऊ घालायचे असेल तर पर्यावरण संतुलन साधायचे  असेल तर नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही. अशा प्रकारच्या शेतीसाठी पारंपारिक बियाणी सर्वश्रेष्ठ आहेत. (नैसर्गिक शेतीत जी.एम. बियाणे निषिद्ध आहे.) अशा बियाण्याची भारतातू उणीव नाही. गरज आहे ती बियाणे मोठ्या प्रमाणावर निर्माण करून शेतकऱ्यांना पुरवण्याची, आज शेतकरी बिगर बी.टी. कापूस बियाणे मागत आहेत. पण दुर्दैवाने ते उपलब्ध नाही.

गावरान पपई ग्राहक शोधतात. धान्य, भाजीपाला सुद्धा ग्राहकांना नको, प्रथम पसंती गावरान जातींना असते. ग्राहकांच्या या वागण्याला आपण मागासलेपण  आणि जी.एम.खाद्याला विकास म्हणणार आहोत काय? शेतीची उत्पादक्ता बियाण्यावर अवलंबून असते. अशा तऱ्हेने चित्र वारंवार रंगविले जाते. वास्तव वेगळे आहे. पिकांची उत्पादकता बियाण्याशिवाय मातीचे आरोग्य मृदाजल (जमिनीतील ओलावा)  सुयोग्य हवामान, पिकांची योग्य मिश्रणे  (सहचारी पिके  उदाहरणार्थ कापसासोबत चवळी, अंबाडी, मका, कोबी, सोबत मोहरी, लसूण, कांदा इत्यादी) आणि सुयोग्य ‘पिकचक्र’ यावर अवलंबून असते. जगातील बहुतेक देशांनी जी.एम. बियाण्यांवर बंदी घातली आहे.  युरोपातील प्रगत देशांनी जी.एम. बियाण्यांना हद्दपार केले आहे.  भारतात चोरीने वांगी आणि काही भाजीपाल्यावर जी.एम. बियाणे आणून वापर सुरू आहे.  ते तात्काळ बंद झाले पाहिजे.  अनैसर्गिक, रासायनिक खते कीटकनाशके भारतातून हद्दपार केली पाहिजेत.  यासाठी एक जबरदस्त चळवळ आपण उभी केली पाहिजे.  विषमुक्त अन्न हा आमचा एकमेव ध्यास आहे.  या चळवळीत सर्व शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे ही विनंती.

 

संदर्भ – निनावी पत्र.

लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS