ट्रम्प आणि राष्ट्रद्रोह

एका राष्ट्रपतीवर किंवा पंतप्रधान मंत्र्यावर राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप  लोक करू शकतात का? आणि ते ही अमेरीके सारख्या महाकाय महासत्तेच्या राष्ट्रपतीवर आरोप होऊ शकतात का? नेमके तेच झाले आहे. ट्रम्प हा राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप अमेरिकेत अनेकांनी केला. तसाच आरोप रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील केला. ट्रम्प ह्याने रशियाला देश विकला हा ट्रम्प आणि रशियाचे प्रधानमंत्री पुतीन ह्यांच्या शिखर बैठकीचा परिणाम आहे. असे भयानक  आरोप लोक कसे करू शकतात आणि त्याला प्रसारमाध्यमे प्रसिद्धी कशी देऊ शकतात? भारतात  प्रसारमाध्यमे काही अपवाद सोडला तर असे आरोप प्रसिद्ध होऊ देत नाहीत. पण अमेरिकेत पत्रकारितेला खरी मोकळीक आहे म्हणूनच अमेरेकेत लोकशाही सक्षम आहे. ही परिस्थिती निर्माण झाली त्याला एक पार्श्वभूमी आहे. २०व्या शतकात प्रामुख्याने ३ गोष्टी घडल्या. पहिले म्हणजे वसाहतवादातून निर्माण झालेली गुलाम राष्ट्र व त्यांचा स्वातंत्र लढा. दुसरे म्हणजे जागतिक पातळीवर तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर महायुद्ध आणि महायुद्धानंतर १९४५ ते १९९१ पर्यंतचे शीत युद्ध. तिसरे म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण.

दुसरे महायुद्ध हे वर्ण वर्चस्वाच्या पायावर उभे राहिले. हिटलर आणि मुसलोनी यांनी निवडणुकीद्वारा, जर्मनी आणि इटली मधील सत्ता काबीज केली. फासिम्झ ह्या तात्विक बैठीकीवर ही राष्ट्रे उभी राहिली. त्यात जपान सुद्धा सामिल झाले. फासिम्झ म्हणजे लोकशाहीच्या मुखवट्या आड  असलेली हुकुमशाही. १९३३ ला हिटलर निवडून आला व आपल्या पक्षाच्या सैन्याच्या आधारावर ज्यु विरुद्ध आर्यन असा वर्ण संघर्ष निर्माण केला. विरोधकांना नेस्तनाबूत केले. जसे आज हिंदुत्वाच्या नावाखाली खोटे ऐतिहासिक पुरावे निर्माण करून भारतात हिंदू-मुस्लिम संघर्ष लावून दिला आहे. फासिम्झ म्हणजेच हुकुमशाही मोठ्या भांडवलदारांच्या  फायद्याची असते. कारण सगळे कायदे हुकुमशाहीत भांडवलदारांच्या म्हणजेच श्रीमंतांच्या बाजूने करता येतात. म्हणून सगळ्या भांडवलदारांनी आणि ख्रिश्चन धर्मगुरुनी हिटलर आणि मुसलोनीला पाठींबा दिला. जसे आज सर्व श्रीमंत उद्योगपती आणि धर्माचे ठेकेदार संघ परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. असे म्हणतात कि जे इतिहास विसरतात ते भविष्य निर्माण करू शकत नाहीत. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.

आज जगात तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, रशिया अशा अनेक देशात फासिम्झ निर्माण झाला आहे, तोही लोकशाहीच्या मुखवट्यात. त्यातील सर्वात भयानक राक्षस म्हणजे ट्रम्प. फासिम्झचा परिणाम म्हणजे हिटलरची  आत्महत्या. दुसरीकडे, जनतेने मुसालोनीला सुळावर  चढवले आणि त्याच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना घातले. फ्यासिष्ट तत्त्वज्ञान हे जाती-धर्म-वर्ण-द्वेषावर आधारीत असते. श्रीमंत उद्योगपतींना ते फावते कारण लोक रोजी-रोटी, नोकरी-रोजगारचा विषय विसरून जातात. जसे शेतकरी आत्महत्या/ कंत्राटी कामगार व्यवस्था कॉंग्रेस/भाजपने देशात निर्माण केली. त्याचबरोबर बाबरी मस्जिद पाडून हिंदू/ मुस्लिम द्वेष भावना निर्माण केली. जनता जाती/धर्मासाठी मर मिटायला तयार झाली, म्हणून शेतकरी/ कामगार आंदोलनात सहभागी झाले नाही. हा इतका सरळ परिणाम आहे. मराठी माणसाच्या कल्याणाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलले तरी तो मराठी माणूस त्यांच्याच पाठी.  कारण हिंदुत्वाची नशा काहीं औरच आहे. उपाशीपोटी मेलो तरी चालेल, कुंटुंब देशोधडीला लागले तरी चालेल, पण जाती साठी माती खायीन. असे म्हणणारे अनेक लोक तुम्हाला दिसतील. हेच फासिम्झचे यश आहे.

ट्रम्प हा त्याच प्रवृतीचा प्रतिनिधी आहे. फरक एवढाच आहे कि त्याच्या हातात अणुअस्त्राचे बटन आहे. तो जगाला उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून आजचे फ्यॅसिष्ट लोकांची विध्वंसाची शक्ती प्रचंड वाढली आहे. अमेरिकेकडे अणुअस्त्र आले म्हणून जपान, हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुस्फोटानंतर जपानने शरणागती पत्करली. तेच हत्यार हिटलरकडे गेले असते तर त्या वेड्याने जग उद्ध्वस्त केले असते. आजचे हिटलर जगाला बेचिराख करू शकतात हे विसरू नका. म्हणूनच धर्म,जात,वर्ण ही आजची राजकीय हत्यारे, तत्कालीन फायदा राजकीय पक्षांना मिळवून देत असतील, पण दूरगामी परिणाम देशाला नष्ट करण्यात होऊ शकतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. इंदिरा गांधीने भिंद्रनवाले निर्माण केले आणि सिख आतंकवादात तब्बल १० वर्ष देश होरपळून निघाला. मोदीने मुफ्ती-मेहबूबाशी मिळून सरकार बनवले आणि काश्मिरमध्ये दहशतवाद पुन्हा फोफावला. म्हणून तत्कालीन फायद्यासाठी द्वेष निर्माण करून जनतेला फोडणे याच्यापेक्षा मोठा राष्ट्रद्रोह कुठलाच नाही, असे माझे  स्पष्ट मत आहे.

तेच ट्रम्प करत आहे. महिलांविरुद्ध अश्लील भाषा आणि विचार त्याने प्रकट केले. महिला ह्या वापरणाच्या वस्तू आहेत असे तो जाहीर म्हणतो. तो  निवडून आल्यावर अमेरिकेत महिलांनी प्रचंड आंदोलन केले. तरी देखील ५३% गोऱ्या महिलांनी त्याला मतदान केले. कारण त्याने गोऱ्या वर्णाच्या वर्चस्वाची भाषा केली. काळ्याविरुद्ध  दंड थोपटले. त्याचाच परिणाम म्हणून हिंदू भारतीयांचे खून अमेरिकेत पाडले गेले. आता आपल्या लोकांना ते म्हणतात कि अमेरिकेत नोकरी का करता? तुम्ही आपल्या देशात परत जा. युरोपमध्ये देखील तसेच. त्याबाबत आपले सरकार का गप्प आहे? त्याविरुद्ध मुस्लिम राष्ट्रात भारतीयांना सन्मानाने जगता येते. कारण जागतिक पातळीवर मुस्लिम राष्ट्र आणि भारत हा एकाच मापाने तोलला जातो. श्रीमंत राष्ट्रांविरुध्द संघटीतपणे लढा देण्याची परंपरा जगात पंडित नेहरुपासून सुरु आहे. भारत हा अमेरिकेत अनेक माल निर्यात करतो. त्याच्यावर बंदी कशी घालायची किंवा त्या मालावर कर वाढवायचा निर्णय अमेरिका  घेत आहे. भारतीय मालावरच नव्हे तर युरोपियन माल, चीनी माल ह्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बंदी  घालण्यात येत आहे. जसे कोकणातील आंब्यावर किंवा महाराष्ट्रातील फळांवर /शेतमालावर बंदी आहे. गोऱ्या माणसाने हेच केले आहे पूर्ण जग लुटून फस्त केले व आता सुद्धा तेच करत आहेत.

अशा पाश्वभूमीवर, ट्रम्पने  त्यांचा शीत युद्धातील साथीदार नाटो म्हणजेच २८ राष्ट्राचे संरक्षण  कवच ह्याच्यावर प्रचंड टिक्का केली, इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यावर इंग्लंडमध्ये जावून टिका केली व रशियाबरोबर मैत्रीचा हात पुढे केला. पुतीनने ट्रम्पला निवडणुकीत मदत केली, असे अमेरिकेत एका गटाला वाटते. त्यावरून अनेक रशियन लोकांवर अमेरिकेत खटले भरले आहेत. तरी ट्रम्प रशियाची बाजू घेतो असे अमेरिकेतील पुरोगामी विचारांच्या लोकांना वाटते. म्हणून ट्रम्प देशद्रोही आहे असा आरोप होत आहे. लंडनमध्ये ट्रम्प जावूच शकला नाही. ‘चले जाव’ हा इंग्लडंच्या नागरिकांचा नारा लंडनमध्ये गाजला. कारण ट्रम्प हा वर्णद्वेषी, स्त्रीशोषक, जातीयवादी  आहे हा समज पूर्ण जगात गाजत आहे. पॅरीसच्या पर्यावरण करारातून तो बाहेर पडला. इराण अणु समझोत्यातून तो बाहेर पडला. ‘अमेरिका फस्ट’ हा नारा त्याने दिला. जगाचे शोषण करण्यासाठी तो काम करत आहे. जगातील १% श्रीमंत लोकासाठी तो काम करतो. अमेरिकन वितीय्य संस्था दुसरी जागतिक बँक हिचा पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर कब्जा आहे. त्यावरून अमेरिका जगात दादागिरी करत आहे. भारताला  तेल आयात करावे लागते. स्वस्त आणि हुकमी तेल आपल्याला इराणकडून मिळते. इराण-भारत संबंध फारच जवळचे आहेत. आता अमेरीकन आदेश आला आहे कि भारताने इराणवर बंदी घालायची. तेल घ्यायचे नाही आता भारताला तेल दुसरीकडून घ्यावे लागणार. तेल आणखी महागणार त्यात गरीब माणूस महागायीने पुन्हा भरडला जाणार. युरोपेने बंदी घातलेले मॉन्सेन्टोसारखे  बियाणे अमेरिकेच्या दबावामुळे भारतीय शेतकऱ्यांना घ्यावी लागणार. खत, कीटकनाशके, अमेरिकन कंपनीकडून घ्यावी लागतात. हिंसाचार वाढल्याने हत्यारे  घ्यावी लागतात. भारत आणि पाकिस्तान लढतात व दोघे  हत्यारे अमेरिकेकडून घेतात. शेवटी फायदा  गोऱ्या अमेरिकन कारखान्यांचा होतो आणि आम्ही हिंदुत्व घेवून बसतो त्यात हिंदूचा विनाश होतो, ते आपण बघत नाही. ह्या चक्रव्यूहातून निघण्यासाठी भारताला काय करावे लागणार हे स्पष्ट आहे. आपण आपली सर्व धोरणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने आखली पाहिजेत. अमेरिकन दादागिरीला दबून नाही. स्वावलंबन, स्वदेशी आणि ग्रामस्वराज्याकडे आपण जेव्हा वळणार तेव्हाच  भारत सुजलाम सुफलाम होणार.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS