ड्रग्सचा आतंकवाद (भाग -२)_21.10.2021

पैसा हा राजकारणाचा बाप आहे. म्हणून इकडे राजकारण पैश्यावर अवलंबून आहे आणि तेच आपल्याला समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांच्या केस मध्ये दिसते. सर्वाना आश्चर्य वाटेल कि शारुखखानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यावर सगळे उसळायला लागले. नवाब मलिक तर हाथ धुवून समीर वानखेडेच्या पाठी लागला आणि त्यांनी सैनिक फडरेशनचे मुंबईचे अध्यक्ष फ्लेचर पटेल ज्या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्याला टारगेट केले. एवढा सिनीअर मंत्री असा बालिशपणे बोलायला लागला, कारण त्याच्या जावयाला देखील समीर वानखेडे यांनी अटक केले होते. या हस्ती काही साध्या सुध्या नव्हत्या. तर ड्रग्सच्या तस्करीवरून होत्या. ५ ग्रॅमच्या वर ज्याच्याकडून ड्रग्स जप्त होतात, त्याला कडक शिक्षा होते व त्याला जामीन सुद्धा नाही. NDPS कायदा हा अत्यंत कडक करण्यात आला होता. सिंगापूरमध्ये तर फाशीची शिक्षा होते आणि अनेक देशात कमीत कमी १४ वर्षे शिक्षा होते. पण हळूहळू तो कायदा शिथिल करण्यात आला आहे. तरीही कडक आहे.
अशा पार्श्वभूमीवर नवाब मलिक म्हणतात कि माजी सैनिक फ्लेचर पटेल हे समीर वानखेडेचे मित्र आहेत आणि त्यांना तीनदा ड्रगच्या धाडीत पंच म्हणून घेतले. म्हणून सर्व धाडी व अटक या बेकायदेशीर आहेत. नवाब मलिकने हा जावई शोध कुठून लावला हे कळत नाही. कारण ड्रग्सच्या धाडीमध्ये पंच आणि साक्षीदार हे न्यायालयात फुटतात आणि ड्रग्स माफियाला शिक्षा होत नाही. समीर वानखेडेने एक नविन पद्धत सुरु केली. माजी सैनिकांना पंच म्हणून घेण्याची मागणी माझ्याकडे केली. सैनिक फेडरेशनने निर्णय घेतला कि ड्रग्सची तस्करी ही समाजाला लागलेली कीड आहे आणि राष्ट्र सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहे. कारण अफगाणिस्तानहून ड्रग्स घेऊन पाकिस्तान ISI च्या मदतीने दहशतवादी ड्रग्स भारतात आणतात. प्रचंड पैसा मिळवतात. त्या पैशातून ISI दहशतवाद्यांना हत्यारे आणि बॉम्ब पुरवतात. म्हणून ड्रग्सच्या व्यापारामुळेच जगामध्ये दहशतवाद निर्माण झालेला आहे. या दहशतवादापोटी १०००० भारतीय सैनिक काश्मिरमध्ये मारले गेले. पंजाबचा दहशतवाद हा ड्रग्स मुळेच होता. तो भारतीय सैन्याने मोडून काढला. पण पंजाबची युवा पिढी बरबाद झाली. नुकतेच ३००० किलो हिरोईन अडाणीच्या बंदरामध्ये सापडले. त्याच्यावर काहीच कारवाई झालेली दिसत नाही. आज ड्रग्समुळे महाराष्ट्रातील युवा पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि भारतात गुंडाराज बळकट होत चाललेले आहे. आता ड्रग्स माफिया राजकारणातही उतरलेली आहे. आणि त्यांचे अनेक हस्तक राजकीय पक्षामध्ये मोठमोठ्या पदावर आहेत. हे असे होणार याची मांडणी ही आवर्जून लोकसभेमध्ये अनेकदा मांडली. १९९३ च्या मुंबई ब्लास्टनंतर मी १०० खासदारांच्या सह्या घेऊन राजकारणी, माफिया, भ्रष्ट अधिकारी आणि उद्योगपती यांच्यातील गुन्हेगारी संबधावर आयोग नेमून घेतला. या आयोगात गृहसचिव एन.एन.व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गुप्तहेर संघटना प्रमुख कार्यरत होते. या समितीने म्हटले कि या समितीचा काय उपयोग आहे? कारण सरकराला यात काहीच करायचे नाही. तरीही मी या अधिकाऱ्यांना विश्वास दिला कि तुमच्या या अहवालावर भारतातील गुन्हेगारी नष्ट करू. त्यांच्या अहवालात स्पष्ट म्हटले गेले आहे कि, “या राष्ट्रांवर माफिया, राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकारी यांचे समांतर सरकार राज्य करत आहे.” हा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला व सरकारने देखील स्विकारला, त्या अहवालात अर्धा भाग गुप्त होता. त्यात मोठमोठ्या राजकीय नेत्यांची नावे होती. ती आजपर्यंत उजेडात आली नाहीत. व आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या अहवालाची माहिती सर्व राजकीय नेत्यांना आहे. पण त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.
त्याचाच प्रत्यय समीर वानखेडे व फ्लेचर पटेल या केस संदर्भात आला. कारण समीर वानखेडे यांनी अत्यंत धाडसाने ड्रग्स विरुद्ध धडाकेबाज कारवाई केली. आम्ही सैनिक फेडरेशनने त्यांना पंच व साक्षीदार पुरवून सगळी मदत केली. त्यामुळे अनेक गुन्हेगार अटक झाले. पण राजकीय नेते समीर वानखेडेच्या बाजूने उभे रहायचे सोडून चोरांच्या बाजूने उभे राहताना दिसत आहेत. यालाच म्हणतात ‘चोरांच्या उलट्या बोंबा’. श्री. शरद पवार सारख्या मोठ्या नेत्यांनी देखील फ्लेचर पटेल या एका शूर सैनिकाला गुन्हेगार म्हटले. ते म्हणाले कि, “फ्लेचर पटेल वर अनेक गुन्हे दाखल आहेत” हे सारासार खोटे आहे. फ्लेचर पटेल वर कुठलेही गुन्हे नाहीत. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने NCB आणि पोलिसांना मदत केली आहे. तो सैनिक फेडरेशनचा मुंबईचा अध्यक्ष आहे. नवाब मलिकने त्याचे नाव घेऊन आणि फोटो दाखवून त्याच्या जीवाला प्रचंड धोका निर्माण केला आहे. आणि पोलीस त्याला संरक्षण ही देत नाहीत. आणि मंत्र्यांनी एका गुप्त पंचाला व साक्षीदाराला लोकांसमोर आणून माफियाकडून मारायला आमंत्रणंच दिल आहे. जर का फ्लेचर पटेलच्या अंगाला इजा जरी झाली तर महाराष्ट्रातील सैनिक नवाब मलिकला सोडणार नाहीत. फ्लेचर पटेल तीन धाडीत पंच राहिला. त्यात तीनही धाडींची माहिती नवाब मलिकने माफियाला दिली. आणि म्हणाले एकच पंच तीनही धाडीत कसा?… एक पंच अनेक धाडीत राहू शकतो. पण तो साक्षीदार फुटत असल्यामुळे पोलीस अधिकारी आपल्या विश्वासू लोकांनाच पंच म्हणून घेतात. मग तो ओळखीचा किंवा मित्र असेल काय फरक पडतो. तुम्हाला गुन्हेगारांना शिक्षा करायची आहे? का मदत करायची आहे? हे नवाब मलिकने ठरवावे.
दुसरी बाब म्हणजे समीर वानखेडेची बहिण मनसेची कार्यकर्ती आहे. तिचा काही संबध या केस बरोबर नाही. तिचा फोटो दाखवून नवाब मलिक यांनी अक्षम्य अपराध केला आहे. कुठल्याही मुलीचा फोटो दाखविण्याचा अधिकार कुणालाच नाही. असे करून एक मंत्री एका सरकारी कार्यक्षम अधिकाऱ्याला व्यक्तिगतरीत्या सूड उगवत आहे. हे एका मंत्र्याला शोभत नाही. नवाब मलिक तुम्हाला अनेक दारे उघडी होती. तुम्ही कोर्टात जाऊ शकत होता. आणि जर का तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय मिळाला असता. ते सोडून तुम्ही प्रसार यंत्रणेच्या सहाय्याने एका शासकीय अधिकाऱ्याला वेठीस धरायचा प्रयत्न करीत आहात. अशाप्रकारे एका सैनिक अधिकाऱ्याला आणि सैनिक संघटनेला कुठलाही मंत्री बदनाम करू शकत नाही. याची दाद सैनिक फेडरेशन उच्च न्यायालयात घेणार आहे. तसेच अनेक निवृत्त सैनिक हे आज तपास यंत्रणेला मदत करत आहेत. त्यांचा जीव तुम्ही धोक्यात आणला आहे. यावरून मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला ड्रग माफियाला मदत करायची आहे? महाराष्ट्रात ड्रग्सचा गुंडाराज आणायचा आहे? का महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आणायचे आहे? मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कि सर्व बाबींची जातीने चौकशी करून निर्णय घ्यावा. श्री. शरद पवारांना सुद्धा विनंती आहे कि सैनिक फेडरेशनच्या शिष्टमंडळाला भेट द्यावी आणि प्रत्यक्ष विचारणा करून घ्यावी.
आता प्रश्न आला राजकारणाचा. राज्यसरकारचे मंत्री म्हणतात कि, केंद्रशासन हे ED च्या आणि तत्सम संघटनांचा उपयोग करून राजकीय विरोधकांना त्रास देतात. तस असेल तर पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना दोषी धरा. ते न करता एका सामान्य शूर अधिकाऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न हे देशद्रोहाचे उदाहरण आहे. फ्लेचर पटेल किंवा आम्ही कुठल्याही मोजमापाने भाजपला मदत करू शकत नाही. हे पूर्ण जनतेला माहित आहे. सैनिक फेडरेशन हे कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन देत नाही. उलट सर्वच पक्षातले सैनिक हे सैनिक फेडरेशनचे सदस्य आहे. त्यामुळे गुनेहागारांना वाचवण्यासाठी, माफियाचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही सरकारी यंत्रणेला बदनाम करू नका. त्यातल्या त्यात सैनिक फेडरेशनला मदत करा व सैनिकांचा उपयोग प्रशासनामध्ये चांगल्या प्रकारे करून घ्या. ड्रग्स ही समाजाला आणि राष्ट्राला लागलेली कीड आहे. जो ड्रग्स घेतो तो गुन्हेगारच असतो. ड्रग्स घेऊन महिलांवर बलात्कार करणारे नराधम, चोरी लुटमार करणारे रक्तपिपासू जनावरे यांचा बिमोड केलाच पाहिजे. आणि यासाठी सैनिक फेडरेशनचे शूर जवान ड्रग्स, गुन्हेगारी, भ्रष्टाचार विरोधात युद्ध जाहीर करत आहेत. सर्व जनतेने एकत्र येऊन या ड्रग्स वाटणाऱ्या लांडग्यांना आणि त्यांचे पाठीराखे राजकीय कोल्ह्यांना काढून टाका आणि ‘आनंदी व समृद्ध भारत’ निर्माण करा.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS