ड्रग्सचा आतंकवाद (भाग-४) _11.11.2021

ड्रग्स महाकांड देशात पहिल्यांदाच घडत आहे. NCB म्हणजे “नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो” याची स्थापना १९९० साली झाली. त्यांचे मुख्य काम आहे जागतिक पातळीवर जी ड्रग्सची तस्करी होते, याची माहिती घेणे व त्याच्यावर नियंत्रण करून सेवन नष्ट करणे. १९८८ साली जगातील सर्व राष्ट्रे एकत्र येऊन ‘व्हिएन्ना’ येथे जागतिक शिखर परिषद घेतली. जगामध्ये ड्रग्सचा प्रसार होत आहे, याची चिंता व्यक्त करण्यात आली व ठरवण्यात आले की प्रत्येक राष्ट्रांमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो स्थापन केला पाहिजे. त्याचबरोबर ड्रग्सपासून प्रचंड पैसा गुन्हेगारांच्या हातात जात आहे. तो काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रकरणा विरोधात ‘मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट’ करणे.  ड्रग्स मधून निर्माण होत असलेल्या पैशाला ड्रग माफिया पासून तोडून टाकू. मग आपोआप ड्रग्सची तस्करी कमी होईल. मुख्यतः हत्यारे आणि ड्रग्समधून इतका प्रचंड पैसा निर्माण होतो की जगातील अनेक गुंड जगातील पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये आले. कोलंबीयाच्या पाब्लो एस्कोबार यांची कहाणी तर वेगळीच आहे.
१९८०च्या दशकामध्ये पाबलो एस्कोबार यांनी मेडीलीन कार्टेल (टोळी) बनवलं आणि प्रचंड कोकेन अमेरिकेमध्ये पाठवू लागला. परिणामत: कोलंबिया देशावर त्याची इतकी जबरदस्त पकड झाली की सरकारच त्याला घाबरू लागले. तो आत्मसमर्पण जेव्हा करायला तयार झाला, तेव्हा त्यांनी निर्बंध लावला. की तो आत्मसमर्पण करेल पण तो स्वतः बनवलेल्या तुरुंगामध्ये राहील. झाले तसेच त्यांनी आत्मसमर्पण केले व स्वतःसाठी तुरुंग बांधला. यामध्ये पोलिसांना यायला बंदी होती आणि त्या तुरुंगातून त्यांनी आपला धंदा सुरू ठेवला. त्याच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना त्यांनी यमसदनास पाठवले. ते ही अत्यंत क्रूरपणे. विरोधकाला तो पाठीवर पाडायचा आणि मोटर सायकल वर हात बांधायचा व दुसऱ्या मोटरसायकवर, दुसऱ्या दिशेला पाय बांधायचा आणि दोन्ही मोटरसायकल एकदमच चालून तो त्या माणसाला चिरून काढायचा. १० वर्षात त्याची दहशत इतकी प्रचंड झाली कि मिलिटरी आणि पोलीस सुद्धा काही करू शकत नव्हते. त्याचवेळी ड्रग्स विरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेमध्ये ड्रग्स एन्फर्समेंट एजन्सी (DEA) निर्माण करण्यात आली व त्यांनी कोलंबीया सरकारला सर्व मदत केली आणि जवळ जवळ गेली ४० वर्ष DEA,  मेक्सिको पासून कोलंबिया,  पनामा, बोलिव्हिया या दक्षिण अमेरिकेतल्या देशामध्ये कोकेन विरोधात युद्ध पुकारले. आज देखील ते युद्ध चालू आहे. कोलंबीया बरोबरच मेक्सिको हा अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर असलेला देश.  दक्षिण अमेरिकेतील सर्व ड्रग्स अमेरिकेमध्ये मेक्सिकोमधून जातात. एल.चापो या माफिया डॉनने मेक्सिकोवर ३० वर्ष राज्य केले. शेवटी DEA ने त्याला पकडले. आता त्याची मुल ड्रग्सचा धंदा तेवढ्याच वेगाने चालवत आहेत.
आता रसायनिक ड्रग्सची पण निर्मिती जोरात सुरु झाली आहे. त्यामुळे अमेरिकेला व्यसनाधीन बनवण्यासाठी प्रचंड  ड्रग्स तस्करी चालू आहे. या व्यापारातूनच अनेक देशांमध्ये डॉन निर्माण झाले. यांची शक्ती कुठल्याही देशाच्या सरकार पेक्षा जास्त आहे. इटलीत निर्माण झालेला माफिया पूर्ण जगभर आता पसरला आहे. आणि अनेक देश  आज ड्रग्स माफियाच्या ताब्यात आहेत.  दक्षिण अमेरिकेतून कोकेन पश्चिम आफ्रिकेत जाते. आफ्रिकेतील सर्वात मोठे केंद्र नायजेरिया आहे.  नायजेरियातील लोक हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलर आहेत.  ते दक्षिण अमेरिकेतील कोकेन युरोपमध्ये पुरवतात. भारतात देखील बॉलीवुड मधल्या लोकांना व श्रीमंत लोकांना कोकेन आवडते. भारतात तिची किंमत साधारणत: १ किलोला १० कोटी रुपये आहे. यावरून विचार करू शकता की किती पैसा हा भारतातून परदेशात जातो. भारतातील अनेक बॉलीवूड मधील नट नट्या या कोकेनच्या आहारी गेल्या आहेत.
९० च्या दशकामध्ये भारतामध्ये ड्रग्सची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. भारताच्या पश्चिमेकडे अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान या देशाला ‘गोल्डन  क्रेसेंट’ म्हणतात.  ज्यात अफू उत्पादनाचे केंद्र सुरू झाले. ९०च्या दशकामध्ये रशियन सैन्य अफगाणिस्तान सरकारला मदत करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये गेले. त्या काळात शीत युद्ध चालू होते. अमेरिकेला हे अजिबात सहन झाले नाही. पण अमेरिका डायरेक्ट हल्ला करू शकत नव्हता. कारण दोन्ही देशाकडे अणुवस्त्र होते. जे पृथ्वीला शंभरदा नष्ट करू शकत होते. म्हणून अमेरिकेने नारा दिला. ‘इस्लाम खतरे मे है |” संपूर्ण जगातून दहशतवादी टोळ्या पाकिस्तानमध्ये गोळा केल्या.  अमेरिकेने पाकिस्तानला आपले आघाडीचे राष्ट्र बनवले व पाकिस्तान ISI ला निर्माण केले. प्रचंड शक्ती दिली. पाकिस्तानने देखील याचा पूर्ण फायदा घेतला व दहशतवादी टोळ्यांना प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तानमध्ये रशियन सेनेविरुद्ध लढायला पाठवले. पण त्याचबरोबर अमेरिकेच्या आशीर्वादाने त्यांनी भारताविरुद्ध सुद्धा दहशतवादी टोळ्या पाठवायला सुरू केले. सुरुवातीला पंजाबमध्ये खालीस्थान हे वेगळे राष्ट्र बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दहशतवादी टोळ्या निर्माण केल्या. या दहशतवादी डोळ्यांना हत्यार वगैरे देण्यासाठी, पैसे देण्यासाठी पाकिस्तान नेत्यांना ड्रग्स स्मगलिंग करायला लावले. खालिस्तानी दहशतवादी भारतात ड्रग्स घेऊन यायचे, इथे विकायचे आणि त्या पैशातून हत्यारे आणि बॉम्ब घ्यायचे. हळूहळू पाकिस्तानने ही प्रथा काश्मिरमध्ये पण सुरू केली व काश्मिरचा दहशतवाद सुद्धा ड्रग्समुळे प्रचंड वाढला.  पाकिस्तानने तामिळ वाघांना देखिल हाताशी धरले. त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी करायला लावली. तामिळ वाघांना हत्यारे, बॉम्ब द्यायला लागली. श्रीलंकेमध्ये त्यावेळी मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात तामिळ वाघाने युद्ध सुरू केले. या सर्व युद्धाचा आणि दहशतवादाचा खर्च हा ड्रग्स मधून होत होता. भारतात दहशतवादाचे मूळ कारण ड्रग्सची तस्करी आणि ड्रग्सचा पैसा हेच आहे. आज देखील हा धंदा चालू आहे. 
पण भारतावर दुसरे संकट त्याच्यापेक्षा जास्त होतं. पूर्वेकडे बर्मा, लावोस आणि थायलंड या भागाला ‘गोल्डन ट्रँगल’ म्हणायची आणि जगातील सर्वात मोठं हिरोईनचे उत्पादन होतं होते. त्याचा डॉन होता खूनशा. राष्ट्रावर त्यांची सत्ता होती. त्यांच्या सैन्याने भारतातील मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मनिपुर या भागांमध्ये प्रचंड दहशतवादी टोळ्या निर्माण केल्या. या दहशतवादी टोळ्यांना प्रचंड पैसा दिला. ८० च्या दशकामध्ये आसाममध्ये पण बंड सुरु केले. ८०च्या दशकामध्ये पूर्ण भारताला आग लागलेली होती. आम्ही त्या वेळेला सैन्यात होतो. कमांडो इंस्ट्रक्टर होतो. त्या काळामध्ये दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आम्हाला सदैव सज्ज व्हायला लागायचं. पंजाब, काश्मिर, आसाम, श्रीलंका, नागालँड, मिझोरम, मणिपूर व त्रिपुरा या सर्व भागांमध्ये प्रचंड दहशतवाद निर्माण झाला.  भारतीय सैन्याला चारी बाजूंनी लढावे लागत होते.  त्यात भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिरामध्ये आणि अनेक गुरुद्वारामध्ये हल्ला करावा लागला. दहशतवादाने गुरुद्वारा हे आपलं केंद्र बनवलं होतं. त्यात प्रचंड हत्याराचा साठा होता आणि भारतीय सैन्याला युद्ध करावं लागलं. १९८४ साली इंदिरा गांधीना मारण्यात आले आणि सुवर्ण मंदिरामध्ये प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे खालिस्तानची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली. इंदिरा गांधीं, सैन्यदल प्रमुख अरुण कुमार वैद्य, पंजाबचे मुख्यमंत्री बियाणी सिंग या सर्वांची हत्या झाली. श्रीलंकेत सैन्य पाठवलं म्हणून तामिळ वाघांनी राजीव गांधीची हत्या केली. यावरून आपण समजू शकता भारतामध्ये दहशतवाद इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आणि ह्या सर्व दहशतवादाला पैसा हा ड्रग्स मधूनच मिळाला.
त्याच काळात भारतात माफिया निर्माण व्हायला लागली. त्या अगोदर गुन्हेगारी टोळ्या नव्हत्या अशा नाही. ‘हाजी मस्तान करीम लाला’ यांची मुंबईवर मोठ्या प्रमाणात पकड होती. पण त्यांची तस्करी सोन्यावर आधारित होती. म्हणून प्रचंड पैसा निर्माण होत नव्हता. पण हळूहळू या टोळ्यांनी ड्रग्सच्या तस्करीला सुरुवात केली व प्रचंड पैसा मिळू लागला. दरम्यान पाकिस्तानचे सैनिक अफगाणिस्तानमधील संघर्षाचा फायदा घेऊन भारतातील सर्व गुन्हेगारांना गोळा केले. अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती प्रचंड प्रमाणात वाढू लागली.  ह्या अफूचे पाकिस्तान, अफगाणिस्तान सीमेवर कारखाने निर्माण झाले व परिवर्तन हीरोइन मध्ये करण्यात आले. ज्याची आजची किंमत भारतामध्ये ५ कोटी रुपये किलो आहे. आणि ह्या हिरोईनची तस्करी करण्यासाठी त्यांनी भारतातील डॉन लोकांना घेतले. थोड्याच काळामध्ये दाऊद इब्राहिमला सुद्धा त्याने सामील करून घेतले. दाऊद इब्राहिम याने तस्करीमध्ये पूर्ण भागामध्ये डॉनची पदवी मिळवली. ISI मुळे त्यांना पूर्ण संरक्षण मिळालं. दाऊद इब्राहिम याला आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलर आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून युनोने जाहीर केले आहे. त्यांची पकड पूर्ण अफगाणिस्थान, पाकिस्तान, भारत, आखाती देश आणि आफ्रिकेवर आहे. युरोपमध्ये सुद्धा प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे आहे. अंबानी बरोबरच त्यांची श्रीमंती आहे.
यावरून आपण सर्व कल्पना करू शकता की भारताच्या सर्व क्षेत्रावर माफिया डॉनची किती मोठी पकड असली पाहिजे. राजकीय पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते हे अर्धी नोकरी डॉनची करतात आणि मग भारत सरकारची करतात. म्हणूनच देशातील पूर्ण सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्र ड्रग्स माफियाच्या हातात आहे. याबद्दल पूर्ण माहिती पुढच्या लेखामध्ये देऊ, पण एक गोष्ट स्पष्ट होते. समीर वानखेडेच्या केसमुळे तुमच्या लक्षात आलंच असेल. जो ड्रग्स विरोधात लढाई करतो तो संपवला जातो. राजकीय पक्षात देखील त्याला स्थान नसते व पोलीस NCB आणि या सर्व सुरक्षा दलामध्ये विरोध असतो. त्यांना एकतर ठार मारतात, नाहीतर बदनाम करून आया-बहिणीची इज्जत वेशीवर टांगून त्यांना इतकं जलील केले जाते की त्यांना बाजूला काढले जाते. यात सर्वच राजकीय पक्ष एकत्र काम करतात. समीर वानखेडे यांना केंद्र सरकार काय फार संरक्षण देणार नाही. लवकरच त्यांना बाजूला करण्यात येईल आणि त्यांनीच १२० ड्रग्स तस्कर यांना पकडले आहेत, त्यांच्या विरोधात कुठलीच केस उभी राहू दिली जाणार नाही व सर्व साक्षीदार आणि पंच फोडले जातील व हे सर्व १२० ड्रग्स तस्कर हे पुन्हा रस्त्यावर येऊन आपल्या तरुणाईच्या गळ्याचा घोट राहतील आणि लाखो लोकांना बरबाद करतील. हाच आहे खरा या दृष्टिकोनातून ड्रग्सचा आतंकवाद. जो जो ड्रग्स विरोधात उभा राहतो. तो संपवला जातो कारण ड्रग्स माफियाच्या हातामध्ये सत्ता आहे. समीर वानखेडे सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला बदनाम करून मारले जाते किंवा तारले जाते. त्यांच्या बाजूने कोणीही उभ राहत नाही आणि म्हणून आपण सर्वांनी संघटीतपणे एकत्र येऊन या अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहूया आणि ड्रग्स माफिया नष्ट करूया.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS