ड्रग्सचा आतंकवाद हा पूर्ण जगात पसरत आहे. ड्रग्सचे सेवन करणारे प्रमुख देश अमेरिका आणि युरोप आहेत. ड्रग्स उत्पादन करणारे प्रमुख देश दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया, बोलिव्हिया, मेक्सिको हे आहेत. मेक्सिको मार्गे हे सर्व कोकेन अमेरिकेत जाते. मेक्सिको अमेरिकेच्या शेजारचा देश आहे आणि पूर्ण देश हा ड्रग्स माफियाच्या कब्जात आहे. तेथील सरकार देखील ड्रग्स माफियाच्या तालावर चालते. दक्षिण अमेरिकेतून ड्रग्सचा प्रसार अमेरिकेतच नाही तर आफ्रिकेत होतो. आफ्रिकेतून ड्रग्स युरोपमध्ये जाते.
दुसरीकडे आशिया मधील देश अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण या भागाला’ गोल्डन क्रेसेंट’ म्हणतात. त्याच बरोबर भारताच्या पूर्वेकडे म्यानमार, लावोस, थायलँड याला ‘गोल्डन ट्रँगल’ म्हणतात. ह्या दोन्ही भागातून अफूची शेती होते व तिचे हिरोईन मध्ये रूपांतर होऊन प्रचंड प्रमाणात हिरोइन भारतात येते. ह्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या व्यवस्थेला ‘माफिया’ म्हणतात. गोल्डन क्रेसेंटवर पूर्ण प्रभुत्व दाऊद इब्राहिमचे आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत या क्षेत्रामध्ये ड्रग्सचा संपूर्ण व्यापार हा दाऊद इब्राहिम यांच्या नेतृत्वात चालतो. दाऊद इब्राहिमला पाकिस्तानच्या ISI चा पूर्ण पाठिंबा आहे. नव्हे, पाकिस्तान दाऊद इब्राहिमला आपला प्रमुख हस्तक समजते. त्यामुळेच १९९३ चे बॉम्ब ब्लास्ट दाऊद इब्राहिम व त्याच्या टोळीने केले. तिथून घराघरात इब्राहिम हा दहशतवादी म्हणून सुद्धा ओळखला जावू लागला. २००१ नंतर अमेरिकेवर अल-कायदाचा हल्ला झाल्यावर दाऊद इब्राहिमला युनोने अंतरराष्ट्रीय टेररिस्ट आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्स किंग पण जाहीर केले. परंतु हे सर्व होऊन देखील अमेरिकेने कधी पाकिस्तानवर दबाव आणला नाही. दाऊद इब्राहिमला थांबवा, त्यांना अटक करा. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा-बिन-लादेनला मारण्याचे नाटक केले. पण दाऊद इब्राहिमच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत काही केलेले दिसत नाही. म्हणूनच दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत आहे आणि जगामध्ये देखील मुक्तपणे फिरत आहे. साधारणत: त्याची संपत्ती हे जगातल्या पहिल्या दहा श्रीमंत लोकांमध्ये असली पाहिजे, एवढी प्रचंड आर्थिक ताकद असल्यावर कोणीही जगावर आपला प्रभाव ठेवू शकतो.
ड्रग्समधून निर्माण होणारा पैसा इतका प्रचंड आहे की तो कोणालाही विकत घेऊ शकतो आणि समीर वानखेडेने ड्रग्स विरोधात मोहीम केली तर तो भ्रष्टाचारी कसा आहे? हे समजण्या पलिकडे आहे. समीर वानखेडेवर राजकीय लोक तुटून पडत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण माझा अनुभव असाच आहे की माफियांविरोधात काम करतात त्याला एक तर मारलं जातं किंवा त्याला बदनाम करुन घरी बसवलं जात. बरेच राजकीय लोक सुद्धा घरी बसलेले आहेत, पण राजकीय पक्ष ड्रग्स विरोधात लढणाऱ्या माणसाचे संरक्षण करत नाही.
समीर वानखेडेच्या बाबतीत सुद्धा तसेच घडणार आहे. महाराष्ट्र आघाडी सरकार त्याला भाजपचं समजून विरोध करत आहे. पण समीर वानखेडेला भाजपा सुद्धा संरक्षण देणार नाही. एक दिवस असा येईल कि केंद्र सरकार समीर वानखेडेला बाजूला काढून टाकेल. कारण समीर वानखेडेने आतापर्यंत १२० च्या वर माफियाला पकडलेले आहे. समीर वानखेडेला बाजूला केल्याशिवाय ते सुटणार नाहीत. याची जाणीव ड्रग्स माफियाला आहे व त्यांच्या सर्व राजकीय पक्षांवर दबाव आलेला आहे की समीर वानखेडेला बाजूला करा. आणि मला हे निश्चित माहित आहे भाजपा सुद्धा शेवटी समीर वानखेडेला बाजूला करेल. माफियाची पकड ही सर्वच पक्षांवर आहे. आमदार-खासदार हे ड्रग माफियाचे चमचे आहेत आणि त्यातून जो ड्रग्स विरोधात काम करतो त्याच्याविरोधात व्यवस्था उभी राहते. काही लोक म्हणायला लागले की, सुधीर सावंत आणि सैनिक फेडरेशन ड्रग्सच्या विरोधात काम करणाऱ्यांना सपोर्ट करते म्हणून ते भाजपला जवळ आहेत. हे दुरुन देखील खरे असू शकत नाही. कारण मी आयुष्यभर भाजपच्या तत्वज्ञानाला विरोध केलेला आहे आणि त्याचे समर्थन आम्ही कधी करू शकत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. जितके ड्रग्स विरोधात आम्ही कट्टरपणे उभे राहतो तितकेच आम्ही जातीयवाद आणि धार्मिक कट्टरवाद या विरोधात उभे राहतो. ड्रग्स काय किंवा धार्मिक कट्टरवाद काय हे देशाला घातक आहे.
आम्ही सर्व सैनिक हे वास्तविक धार्मिक कट्टरवादाच्या विरोधात उभे राहिलो पाहिजेत. कारण आम्ही संविधानाची शपथ घेऊन सैनिक होतो. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्राण सुद्धा देण्याची तयारी दाखवतो. संविधानाचा मूळ गाभा आहे ‘समता’. त्यामुळे जातीय वाद आणि धार्मिक कट्टरवाद हे सैनिकाला शोभून दिसत नाहीत. नाही तरी मला हिंदुत्वाचे नाव घेणारे लोक हिंदूला किती मदत करतात हे समजत नाही. हिंदू शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. हिंदू शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रासायनिक विषारी कीटकनाशके फवारली जातात, त्यात शेतकऱ्यांचे डोळे जातात. अन्यायाच्या विरोधात हिंदुत्ववादी लोक काही करत नाहीत. कामगारांच्या साठी काही करत नाहीत. आता हिंदू कामगारांना या लोकांनी कंत्राटी पद्धतीने बांधून टाकले आणि उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे ‘हिंदुत्ववाद’ म्हणणारे किंवा ‘इस्लाम खतरे में है |’ म्हणणारे आपल्या लोकांसाठी काय करतात?
राजकारणातील लोक या गोष्टी विरुद्ध बोलत नाहीत. पंतप्रधान मोदी हे एक हे शक्तिशाली नेते आहेत. अनेक गोष्टींमध्ये आम्ही त्यांच्या वल्गना पाहिलेल्या आहेत. ३७० असो, सर्जिकल स्ट्राइक असो याबाबतीत ते बोलतात पण आजपर्यंत ड्रग्सचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची भाषा केलेली नाही. त्याचबरोबर अमेरिका आणि युनोने दाऊद इब्राहिमला ‘जागतिक दहशतवादी’ आणि ‘ड्रग्स माफिया’ जाहीर करून देखील त्यांना पकडण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. गुजरातचे तट दहशतवादासाठी आणि ड्रग्स तस्करीसाठी सर्वात मोठे स्थान आहे. पण गुजरातमध्ये ड्रग्स विरोधात मोहीम दिसत नाही. किंबहूना कुठल्याच पक्षाचे सरकार दहशतवादाविरोधात उघडपणे काम करताना दिसत नाही.
मला याचा अनुभव अनेकदा आला आहे, ज्या वेळेला मी १०० खासदारांच्या सह्या घेऊन व्होरा समिती गठित केली. ही समिती सर्व गुप्तहेर खात्याच्या प्रमुखांची होती. या समितीने पहिलेच म्हटलं कि या समितीचा उपयोग काय आहे? कारण सरकारला तर त्याच्याबद्दल काहीच करायचे नाही. व्होरा समितीने अहवाल दिला की या देशावर माफिया, भ्रष्ट राजकीय नेते आणि अधिकारी यांची सत्ता आहे. म्हणजे एक समांतर सत्ता आहे ही गोष्ट १९९३ला जाहीर करून देखील आजपर्यंत यावर कुठल्याही सरकारने कारवाई केलेली नाही. म्हणजे या देशातील गुन्हेगारी, या देशातील दहशतवाद, या देशातील ड्रग्सचा आतंकवाद हा सर्वांनाच माहित आहे. पण त्यावर कुठलीही कारवाई करायला कोणी तयार नाही ही वस्तुस्थिती आहे.
या ड्रग्स विरोधात कारवाई करण्याचे अधिकार केंद्रातल्या अनेक संघटनांना आहे आणि पोलिसांनाही आहे. दुर्दैवाने या सर्व संघटना आपापले काम करतात, पण एकत्र येऊन या देशासाठी काम करताना दिसत नाहीत. म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे कि केंद्राच्या संघटना असो की राज्याच्या संघटना असो त्यातील महाराष्ट्रातल्या प्रमुखांना तुम्ही बोलवा आणि ड्रग्सच्या दहशतवादाबद्दल चर्चा करा आणि एक ठोस कृती कार्यक्रम जाहीर करा. जेणेकरून महाराष्ट्र पोलीस बरोबर एन.सी.बी., डी.आर.आय., इ.डी., कस्टम, इन्कम टॅक्स, रो, आयबी या सर्व संघटनांची एक संयुक्त कृती दल बनवावे. एक संघपणे काम करून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व माफिया गुन्हेगारांना नेस्तनाबूत करावे असे व्होरा समितीने अहवालात दिलेले आहे. अशीच आम्ही अनेकदा मागणी केली आहे. पण ‘कळते तरी वाद नाही’ अशाप्रकारची स्थिती सरकारमध्ये आहे. राजकीय पक्ष एकमेकाला दोष देऊन गुन्हेगारी विरोधात मोहीम असते तिला विकलांग करून टाकतात. ड्रग्स दहशतवादामध्ये अजिबात राजकारण येऊ देऊ नका आणि जे समीरने पाऊल उचलले, जबरदस्त लढाई उभी केली, तिला पुष्टी द्यावी, तिला ताकत द्यावी ही भावना दिसत नाही. उलट ड्रग्स विरोधातील लढाई मोडून काढून पुन्हा ड्रग्स माफियाला या महाराष्ट्रात मुक्तपणे वावरायला देण्याची भूमिका राजकीय पक्षाची दिसते. ती या देशाला फार घातकी आहे आणि म्हणून वेळीच आपल्याला सावरून राजकीय पक्ष आणि सुरक्षा दल यांनी आपल्या अखत्यारीत काम करावं आणि एकत्र येऊन या देशातील वाम प्रवृत्तींना नष्ट करावे. अशाप्रकारची भावना लोकांनी उभी करावी व एका जबरदस्त लोक चळवळीची गरज देशाला आहे. भ्रष्टाचार व गुन्हेगारी ही देशाला लागलेली कीड आहे ती उखडून टाका, अशी विनंती मी करत आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९