अफगाणीस्थानमध्ये अनेक घटना सुरु आहेत. नुकतेच तालिबान सरकार गठीत करण्यात आले आहे. त्यात मुल्ला अखुंड नेतृत्व करत आहेत. दोन नंबरला मुल्ला बाराबार आहेत. तालिबानने ३३ मंत्र्यांचे अंतिम सरकार जाहीर केले. मुल्ला अखुंड हा तालिबानचा एक संस्थापक आहे. १९९६ च्या सरकारमध्ये तो विदेश मंत्रालय सांभाळायचा आणि नंतर उपपंतप्रधान सुद्धा होता. हंगामी पंतप्रधानाचे पद सांभाळताना जुन्या आणि नवीन तालिबानना एकत्र करण्याची क्षमता ठेवतो व आंतरराष्ट्रीय राजकारणाची बऱ्यापैकी माहिती सुद्धा त्याला आहे. तो तालिबान संस्थापक प्रमुख मोहम्मद ओमरच्या अतिशय जवळ होता आणि तो कंधारहून येतो, जिथे तालिबानची निर्मिती झाली. त्याला ओमरचा निकटचा सहकारी म्हणतात व राजकीय सल्लागार सुद्धा म्हणतात. अखुंड याला तालिबान चळवळीमध्ये मानाचे स्थान आहे. अखुंड हा राजकीय माणूस आहे व धर्म हा मुखवटा आहे. भारतात सुद्धा आपण बघतो की बरेच लोक वेगवेगळ्या धर्माचे नाव घेऊन राजकारण करतात. तालिबानमध्ये अशाप्रकारचे भरपूर लोक आहेत. तालिबान मध्ये सर्वात मोठी संस्था रेहाबरी सुराचे प्रमुख राहिले आहेत. तालिबानची ही शिखर संस्था आहे, जिथे सर्व निर्णय होतात. दुसरा एक संस्थापक मुल्ला अब्दुल गणी भारदार हा अमेरिकेबरोबर चर्चा करण्यामध्ये कतारमध्ये काम करत होता. त्याच्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून पलायन केले. भारदार हा मुल्ला ओमरचा जवळचा मित्र होता. मुल्ला ओमरने त्याला नाव दिले भारदार म्हणजे ब्रदर. १२.१०.१९९६ च्या सरकारमध्ये उपसंरक्षण मंत्री होता. २० वर्षाच्या स्वतंत्र युद्धामध्ये भारदार हा उच्च सैनिकी कमांडर होता. त्याने प्रचंड हल्ले अमेरिकन सैन्यावर केले. त्याला पाकिस्तानने २०१० मध्ये अटक केली आणि २०१८ ला सोडले. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मंत्री म्हणजे सिराजुद्दीन हक्कानी हा पाकिस्तानमधील तालिबानी लीडर आहे. २०१८ मध्ये त्याचे वडील मारले गेले, मग तो प्रमुख झाला. सुरुवातीला रशिया बरोबर लढण्यासाठी तो अमेरिकेबरोबरच होता. त्यांची संघटना आत्महत्त्या करणार्या दहशतवाद्यांची आहे. हक्कानी हे ड्रग्स मध्ये एक मोठे नाव आहे व दाऊद इब्राहिम बरोबर सुद्धा त्याचे जवळचे संबंध आहेत असे सर्व म्हणतात. हक्कानी अफगाणिस्थान पाकिस्तान बॉर्डरवरचा आहे. त्याला अफगाणीस्थानाचे पंतप्रधान व्हायचे होते. हक्कानी हा अमेरिकेचा सर्वात वांटेड आतंकवादी होता. त्याच्या डोक्यावर १ कोटीचे बक्षीस होते. तालिबान सरकारचे सर्व मंत्री संत्री हे ‘पस्तून’ आहेत. अफगाणिस्तान मध्ये सर्वात मोठी टोळी ‘पस्तून’ जातीच्या लोकांची आहे. ते जुनाट विचारसरणीचे आहेत. तालिबान राजवट १९९६ पासून २००१ पर्यंत होती. २००१ च्या पराभवानंतर २० वर्ष अमेरिकेबरोबर युद्धामध्ये हीच मंडळी नेतृत्व करत होती. तालिबानने जाहीर केले होतं की मंत्रिमंडळात सर्वांना घेऊ. पण तसं काही दिसत नाही. स्त्रिया तर त्याच्यात नाहीत.
हंगामी प्रधानमंत्री अखुंड हे गेले २० वर्ष तालिबानच्या नेतृत्वाचा प्रमुख होते. हे सरकार इस्लामिक एमीरेट ऑफ अफगाणिस्थान आहे, असे जाहीर करण्यात आले. सिराजुद्दीन हक्कानी हा हक्कानी टोळीचा प्रमुख आहे. त्याला गृहमंत्री म्हणून नेमण्यात आले. मुल्ला अहमद याकुब तालिबानच्या संस्थापक प्रमुख मुल्ला ओमरचा मुलगा आहे, त्याला संरक्षण मंत्रीपद मिळाले. याकूब याने याच्यापूर्वी तालिबानचा प्रमुख पद मिळवायचा प्रयत्न केला होता. पण त्यात तो अपयशी राहिला. त्यामुळे तालिबानमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला होता. पण शेवटी ते सर्व एकत्र आले. तो ३० वर्षाचा आहे आणि तालिबानच्या कंधार भागातील लोकांचे तो नेतृत्व करतो. तो संरक्षण खात्याचा प्रमुख आहे. अखुंडने अफगाणिस्तानचा जनतेचे अभिनंदन केले. सर्वांनी मिळून परदेशी सैन्याला पळवून लावलं आणि अफगाणिस्तानला स्वतंत्र केले. ते म्हणाले सर्व नेते प्रचंड कष्ट करतील व इस्लामी कायदा आणि शरिया या देशात लागू करतील, त्याचबरोबर शांतता आणि विकास या आधारावर सरकार काम करेल असे म्हणाले. सर्व देशाबरोबर एक चांगल्या मैत्रीचं वातावरण निर्माण करायचे आहे व परस्पर सन्मानाने एकमेकाला पुढे न्यायचा आहे. अर्थात हे भाषण आहे. प्रत्यक्षात ते काय करतात हे आपण पुढे बघूच.
तालिबानचे खरे स्वरूप हळूहळू पुढे यायला लागलेले आहे. मोर्चे आंदोलन झाले तर ते गोळीबार करतात. पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड आंदोलन सुरू झाले आहे. महिलांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू झाले आहे. तरीही आंदोलनाला तालिबान परवानगी देत नाही आणि आंदोलन तोडून टाकण्याची भूमिका तालिबानने ठेवलेली आहे. त्यामुळे प्रचंड भीती निर्माण झाली आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की तालिबान पुन्हा सत्तेवर पाकिस्तानमुळे आले. त्यामुळे अफगाण लोक पाकिस्तान विरोधात सुद्धा गेले. तसे अफगाण लोक हे पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात असलेले लोक आहेत. भारताबद्दल अफगाण लोकांना प्रचंड सहानुभूती आहे. तालिबान मधील बरेच लोकांना ही सहानुभूती आहे, पण सत्ताधारी आणि भारतातले अनेक लोक हिंदू-मुस्लिम या चष्म्यातून तालिबानकडे बघतात. वास्तविक तालिबान हे भारताबरोबर मैत्री करायला तयार होते आणि आज सुद्धा असू शकतात. आपल्याला तालिबानला पाकिस्तानपासून तोडावे लागेल. राजनिती वास्तवाची राजनिती आहे आणि नुसते धार्मिक कट्टर भावनेतून राजनिती कोणी करू नये. यात देशाचे प्रचंड नुकसान होते. म्हणूनच आज देखील तालिबानची सत्ता असताना काबूलमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद!’ हा नारा म्हणत लोकांनी आंदोलन केले आहे. त्याला चिरडून टाकण्याचे काम आता सध्या तालिबान करत आहे. पण जर लोक सांभाळून राहिले तर पाकिस्तान मुर्दाबादचा नारा हा कायम चालू शकतो. ‘पाकिस्तान चले जाव’ चे नारे निर्माण झाले. पाकिस्तानच्या हवाईदलाने पंजशीर क्षेत्रावर हवाई हल्ले केले असा आरोप करण्यात आला. स्त्रियांनी मागणी केली कि आम्हाला राजकारणात भाग घ्यायचा आहे आणि सर्व स्त्री-पुरुष वेग वेगळे शिकण्याचे जे कॉलेज आणि विद्यापिठांने धोरण जाहीर केले त्याला आमचा विरोध आहे. तालिबानने पत्रकारांना हे आंदोलन कव्हर करायला विरोध केला आणि पत्रकारांचे साहित्य व सामान जप्त केले. आंदोलनाचे चित्रीकरण करणार्या पत्रकारांना अटक करण्यात आली. गेले दोन आठवडे स्त्रिया आंदोलन करत आहेत आणि आता तालिबानने त्या स्त्रियांवर हल्ला केला आणि लाठी-काठीने, चाबुकाने त्यांना मारले. आंदोलन अशा अनेक जागी झाले. या सर्व घटनांमुळे तालिबानचा सुरुवातीचा पवित्रा, मुलींना काम करायला परवानगी देण्याची तयारी आणि चांगल्या जागी नेमण्याची पण तयारी आहे. हे सर्व खोटे ठरत आहे आणि कट्टरवादी भूमिका घेण्याची शक्यता आहे व त्याला पाकिस्तानची फुस आहे.
दुसरीकडे अमेरिकेने पलायन केल्यानंतर आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी अमेरिकन राष्ट्रपती आणि अमेरिकन मंत्री बिनबुडाचे वक्तव्य करत आहेत. जवळजवळ ६०,००० अफगाण लोक अमेरिकेत पलायन करून गेले आहेत. तरी देखील काही अमेरिकन अजून पर्यंत अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना तिथून सुटण्याची कुठली आशा दिसत नाही. तालिबानने अजून परदेशी नागरिकांना बाहेर जाण्यापासून थांबवले जरी नसले, तरी त्यांच्याकडे अधिकृत असे कागदपत्र असले पाहिजे. २० वर्षांनी सत्तेवर आलेले तालिबान विकासाच्या दृष्टिकोनातून काम करताना दिसत नाही आणि फक्त आपला वैचारिक अजेंडा पूर्ण करायच्या प्रयत्नात दिसतात. लोक अत्यंत गरिब आहेत आणि गरिबीत जगत राहणार. नेहमीप्रमाणे त्यांना धर्माचं खाद्य देण्याचा प्रयत्न तालिबान करत आहे, पण धर्माच्या खाद्यातून पोट भरत नाही हे ते विसरले असावेत. सरकार बनवतात त्यांनी आदेश काढले की कोणीही आंदोलन करणार नाही व आंदोलनाचे फोटोग्राफ घेणार नाही. तसेच बऱ्याच पत्रकारांना मारण्यात आले.
चीन या संधीचा फायदा घेऊन आपला दूतावास काबूलमध्ये सुरू ठेवला आहे व तालिबान सरकार बरोबर संबंध प्रस्थापित केले आहेत. या घटनेमुळे भारताला एक धोका निर्माण होतो. येथील पाकिस्तान आणि तालिबानला जबरदस्त ताकत मिळेल. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तालिबानला म्हटले की तुमच्या घोषणा आम्ही मान्य केल्या आहेत पण या प्रत्यक्षात उतरवून दाखवाव्या लागतील. तालिबानने दहशतवादाविरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्धार प्रत्यक्षात जमीनीवर दिसला पाहिजे. त्यामुळे बरेच देश तालिबानवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
तालिबानचा पुढचा प्रवास कसा असेल हे आताच सांगता येत नाही, सर्व देश तालिबानला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तंत्र वापरायला सांगत आहेत. दहशतवादाविरोधात संघर्ष करायला सांगत आहे आणि भारताचा सुद्धा तालिबानला हाच सल्ला आहे. तालिबानला सुद्धा अशाच प्रकारे काम करावं लागणार त्याचं कारण म्हणजे ईसीसचा वाढता प्रभाव अफगाणिस्तानमध्ये होऊ लागला आहे. ज्या दिवशी तालिबान सत्तेवर आली त्या दिवशी ईसीसने आपला आक्रमक पवित्रा वाढवला व लोकांना दाखवायला बघत आहेत की अमेरिकेविरोधात लढणारे फक्त ईसीस आहे. तालिबानला आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान मिळवायचं नाही. ईसीस हे काश्मिरच्या बाबतीत वक्तव्य करत आहेत आणि काश्मिर स्वतंत्र करण्याचा निर्धार प्रकट करत आहेत. त्या उलट तालिबान हा काश्मिरपासून अलिप्त आहे आणि आपल्या देशाच्या पलीकडे इस्लाम किंवा आपली सत्ता वाढवायची नाही. म्हणून भारताच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला तालिबानला पाकिस्तानपासून तोडायचे आहे व जसे आपण इराणला आपल्या बाजूने वळवून घेतले तसेच अफगाणिस्तानला सुद्धा आपल्या बाजूने असणे हे अत्यंत गरजेचे आहे. अमेरिकेने पाकिस्तानला पूर्ण साथ दिली आहे, पूर्ण मदत केली आहे. आज भारताची परिस्थिती अशी आहे की आपण अमेरिकेचे सोबत असल्यासारखे आहोत असा समज पूर्ण जगाचा झाला आहे व ज्यांच्या साठी लढतो त्या अमेरिका आपल्या विरोधातच आहे. बाकीचे सुद्धा आपल्या विरोधात चालले आहेत. अमेरिकेच्या नादी न लागता आपल्या देशाचे हित कुठे आहे ते बघितलं पाहिजे. तालिबान बरोबर अमेरिकेचा संघर्ष झाला. पण आपल्यावर झालेला नाही हा प्रमुख विषय आहे आणि आपल्या देशाचा हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पावले उचलली पाहिजेत, अशी आशा आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९