नविन पर्याय

नुकतेच मेहेकर तालुक्यातील भोर चिंचवली या गावामध्ये शेतकऱ्यांच्या आग्रहावरून गेलो. तिथे शेतकऱ्यांचे हाल बघून मला असंख्य वेदना झाल्या. शेतकऱ्यांनी त्या वेदना प्रकट केल्या. मला जाणीव झाली कि, शेतकरी हवालदिल झाला. त्याला कसलीच आशा उरली नाही. शेतकरी आपल्या शेतामध्ये मरमर राबतो त्याच्या मालाला दर मिळत नाहीत. त्यांनी केलेला उत्पादन खर्च सुध्दा मिळत नाही. वर राजकीय पक्षांनी त्यांना आंदोलनाच्या नावाखाली खोटी आशा दाखवून त्यांना बेजार करून टाकल.  येथे मनमोहन सिंग आणि मोदीने त्यांना खोटी आशा दाखवून स्वामिनाथन समितीचे अहवाल लागू करू असे म्हणून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. फडणवीसानी कर्जमाफी जाहीर करून अनेक दिवस लोटले, पण या गावातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही. सर्व शेतकरी निराश होऊन बोलत होते.  आम्ही जगायचं कसं? कोरडवाहू शेती असल्यामुळे पाण्याविना शेतीतील उत्पन्न मिळत नाही.  नोकऱ्या  नाही, रोजगार नाही, मग कस जगायचं? असा प्रश्न मला विचारला.  भारताच्या गावागावामध्ये हिच कहाणी आहे. सरकार बेदरकारपणे आपली जबाबदारी टाळत आहे.  या सर्वासाठी आपण काय करू शकतो? असा प्रश्न माझ्या सदसदविवेकबुद्धीला भेडसावत आहे.

१२ जानेवारी जिजामाता जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. सिंदखेड राजा हे जीजामातेचे जन्मस्थान. तिथूनच शिवरायांनी रयतेच्या राज्याची म्हणजेच आम आदमीचे राज्याची स्थापना केली. म्हणूनच आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आम आदमीचे राज्य म्हणजेच रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात आमंत्रित केले. जाती आणि धार्मिक द्वेष निर्माण करून, निवडणुकांचे मुख्य मुद्दे बनवण्यात नागनाथ भाजप नेहमी यशस्वी होतात. कारण सापनाथ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सुध्दा हेच विषय अल्पसंख्याक लोकांना गोळा करण्यासाठी वापरतात. जसे भीमा कोरेगाव सारखी दंगल घडवून जाती पातीमध्ये द्वेष निर्माण करण्यात सापनाथ आणि नागनाथ यशस्वी झाले. त्यापाठी  भारताची संपत्ती लुटण्यासाठी परकीय बहुराष्ट्रीय कंपन्यांना  सर्व दारे उघडी करून सापनाथ कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि  नागनाथ भाजप  देत आहेत. आपण  रोटी, कपडा, मकान विसरलो आहोत. धंद्यापाण्यात मात्र सापनाथ-नागनाथ एक दिसतात. कारण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाऊजा ) धोरण बाबरी मस्जिद पडल्यानंतर राबविले जात आहे. श्रीमंत मालामाल होतात. गरीब आणखी गरीब होतो.

सापनाथ कॉंग्रेस भाजपशी टक्कर घेऊच शकत नाही. आता नागनाथांशी  लढणार कोण?  दिल्लीत फिरलो काम बघितले शाहू महाराजानंतर केजरीवालने पहिल्यांदाच विक्रम घडवला २६% बजेटचा हिस्सा त्याने शिक्षणासाठी लावला. सरकारी शाळांना पंचतारांकित केले. सरकारी शाळेत पोहण्याचा तलाव, स्टेडीयम देशात कुठेच नाहीत.  लोक आता खाजगी शाळांच्या ऐवजी सरकारी शाळेत जाणे पसंद करतात. जनतेसाठी पाणी फुकट केले तरी दिल्ली जल बोर्ड फायद्यात आहे . अर्थसंकल्पाच्या १३% आरोग्यावर खर्च केले. सर्वाना आरोग्य मोफत केले. अगदी पंचतारांकित दवाखान्यात सामान्य माणसाचा इलाज होतो.  सर्वात स्वस्त वीज दिल्लीत आहे. अशी अनेक कामे बघितल्यानंतर मला विश्वास वाटला कि भय, भूक आणि भ्रष्टाचाराविरुद्ध एक आदर्श सरकार दिल्लीत काम करत आहे.

मी केजरीवालना भेटलो अनेक विषयांवर चर्चा केली, मग सावित्रीबाई  फुले आणि जिजामाता जयंतीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात यावे, असे निमंत्रण दिले. त्यांनीही लगेच होकार दिला व आता १२ जानेवारीला सिंदखेडराजा येथे सावित्रीबाई फुले आणि जिजाई माताना वंदन करण्यासाठी ते आले. दिलीसारखेच काम महाराष्ट्रात करू असा निर्धार व्यक्त केला. जिजामातेचा आशीर्वाद घेऊन १२ जानेवारीला महाराष्ट्रात एक नवीन पर्याय निर्माण करण्यात आला व नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी अरविंद केजरीवाल येऊन गेले.

१९९१ पासून गेली २५ वर्षे देशामध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि  जागतिकीकरण  (खाऊजा) धोरणामुळे भारताचे अर्थकारण हे उलटेच करण्यात आले. त्यातून आर्थिक विषमतावादी समाज निर्माण झाला.  आज मुठभर लोकांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे.  आणि हजारो कोटी लोकांच्या घरात दारिद्र्याचा काळाकुट अंधार त्यांना जगू देत नाही.  शेतकरी कामगारांच्या आत्महत्या ह्या नैसर्गिक वाटू लागल्या आहेत. त्यातून गरिबांनी जगण्याची इच्छाच सोडून दिली आहे.  कोट्यावधी मुलं आज कुपोषणाने बेजार झाली आहेत. त्या हलाखीच्या परिस्थितीला शासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे.  शासन आपल्या मस्तीत गुंग आहे.  भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपण सर्व नागरिकांनी स्वतःला एक संविधान दिले.  त्यात आपण स्वतःला काही अधिकार दिले.  त्यातला सर्वात मोठा मुद्दा समतेचा होता.  सरकारचं काम लोकांच कल्याण करणे आहे.  असा कायदा आपण बनवला. पण १९९१ नंतर हळूहळू खाजगीकरण, उदारीकरण आणि  जागतिकीकरण  (खाऊजा) धोरणामुळे लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत काढण्यात आली.  नरसिंहराव, मनमोहन सिंग आणि मोदीच्या कारकिर्दीत शेतकरी, कामगार आणि सैनिकांची दैन्यावस्था झाली. अंबानी- अडाणी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली.  पण शेतकरी भटका, दलित आणि आदिवासी उद्ध्वस्त झाला.

सरकार हे बेमालूमपणे झूट बोलून लोकांना मूर्ख बनवते.  जातीय – धार्मिक दंगे घडवून लोकांना फोडून राज्य करते.  सरकारच्या संपत्तीचे म्हणजेच लोकांच्या संपत्तीची उधळपट्टी करून कवडीमोल भावामध्ये सरकारची संपत्ती भांडवलादाराना विकून टाकते.  सत्ता आणि संपत्ती मुठभर लोकांनी हडप केली आहे. काही निवडक घराणी देशावर राज्य करत आहे आणि अगणित संपत्ती मिळवून परदेशी बँकामध्ये ठेवत आहे आणि गरीब दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे, लाचार होत चालला आहे.  निवडणूक हे एकमेव राजकीय हत्यार त्यांच्या हातात आहे.  पण तेही कवडीमोल भावात आपला मतदानाचा हक्क तो विकून टाकतो आणि आणखी ५ वर्षे तो दारिद्र्याच्या चक्रव्यूहात अडकून जातो.  अंधकारमय जीवनात त्याला आशेचा दिवा कुठे दिसतच नाही.

या सर्व परिस्थितीचा छेद दिला तो केजारीवालनी जनतेच्या विद्रोहावर आरूढ होवून आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये नवनिर्वाचित पंतप्रधान मोदींच्या पक्षाला भुईसपाट करून टाकले.  देशाला दाखवून दिले कि जनतेने कुठलाही निर्णय घेतला, कुणालाही कितीही मोठ्या शक्तीला नेस्तनाबूत करू शकते.  आज तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.  सापनाथ आणि नागनाथ यांच्याशिवाय जनतेला पर्यायच नाही.  या परिस्थितीला छेद देण्यासाठी मी अरविंद केजारीवालला जिजामातेला अभिवादन करण्यासाठी १२ जानेवारी २०१८ रोजी आमंत्रित केले होते.  या पवित्र भूमीतून प्रेरणा घेऊन मावळ्यांना एकत्र करून रयतेचे राज्य म्हणजेच आम आदमी पक्षाचं राज्य स्थापन करू.  सापनाथ – नागनाथाना पर्याय हा आकाशातून येणार नाही. पण हाडामासाच्या माणसातून तो पर्याय निर्माण होईल.  तर आपण सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन एक नविन पर्याय महाराष्ट्रात निर्माण करूया आणि छत्रपती शिवरायांच राज्य म्हणजे आम आदमी पार्टीच राज्य स्थापन करूया.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS