नवीन वर्षाचा जल्लोष– सेक्स आणि शराब_२.१.२०२०

इंग्रजी नवीन वर्ष हे भारताचे नवीन वर्ष झाले आहे.  नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषामुळे हे स्पष्ट होत आहे. त्याबरोबर स्वागताची पद्धतही बदलली आहे. भारतीय संस्कृतीचा लवलेश देखील या उत्सवात दिसत नाही. दारूचे प्रचंड सेवन हे बदलत्या संस्कृतीचे प्रदर्शन आहे. दारू पिल्याशिवाय नवीन वर्षाचे स्वागत होत नाही. त्याचबरोबर हिंदी सिनेसृष्टीचे अनेक नटनट्यांचे अनुकरून करून अचकट-विचकट नृत्याचे प्रकार बघायला मिळतात. सेक्स आणि शराबचे हे अभूतपूर्व दर्शन जगाला टि.व्ही.वरून बघायला मिळते. यूट्यूब, नेटफिक्स आणि अनेक चॅनेलवरून सेक्सचा नंगानाच दिसतो. ३१ डिसेंबरच्या एका रात्रीत दारूवाल्यांचा किती फायदा होत असेल त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. पूर्ण देशात, नवीन वर्षाच्या नावावर दारूच्या भट्टया लागत आहेत. पाण्यासारखी दारू वाहत जाते. दारूच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रचंड फायदा होतो.

            अमेरिकेत जाणीवपूर्वक सेक्स आणि शराबचा उपयोग एक नवीन संस्कृती घडवण्यात झाला. ‘सेक्स आणि शराब’ ला आपण आज अमेरिकन संस्कृती म्हणतो. अमेरिकेला संस्कृतीच नव्हती. २०० वर्षाच्या राष्ट्राला काय संस्कृती असणार. अमेरिका बनलीच मुळात दादागिरितून. जिथे तुम्ही झेंडा लावल ती जागा आपली ही संस्कृती. ‘खून करा, चोरी करा पण यशस्वी व्हा.’  ही अमेरिकेची सांस्कृतिक नीती.  अमेरिकेत गोरे घुसले तेथील मूळ निवासीना ‘रेड इंडियन’ म्हणायचे. त्यांच्या जागा जमिनीवर आपला हक्क सांगून गोर्‍यांनी अमेरिकेला आपला देश करून टाकला.  तेथिल मूळ निवासींची कत्तल केली.  अमेरिकेची निर्मिती ही रक्तरंजीत आहे.  सुदैवाने हे गोरे भारतात ते करू शकले नाहीत, हे आपले नशीब.  पण त्याला मुख्य कारण म्हणजे भारताची प्राचीन संस्कृती आणि भारत देशाची कल्पना. अमेरिकेच्या घडवणुकीत ब्रिटीनचे अर्थशास्त्र लागू करण्यात आले.  भांडवलशाही अमेरिकेच्या नसानसात आहे.  प्रचंड श्रीमंती ही अमेरिकेच्या राजवटीचा पाया झाला आहे.  म्हणूनच अमेरिकेत १% लोकांकडे ९०% संपत्ती आहे.  त्या विरुद्ध नवीन वर्षात होणार्‍या अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प विरूद्धचे उमेदवार गर्जत आहेत.  पूर्ण भांडवलशाही असल्यामुळे अमेरिकन सरकारची अर्थनीती लोककल्याण नसून मुक्त अर्थव्यवस्था आहे.  याला लोकांनी विरोध करू नये म्हणून ही नवीन अमेरिकन संस्कृती निर्माण करण्यात आली.   सेक्स आणि शराबची संस्कृती निर्माण करून अमेरिकन सत्ताधार्‍यांनी जनतेला विकलांग केले. अति श्रीमंत लोक लोकशाहीवर आरुढ झाले. आपल्या फायदयाच्या आड कोणी येवू नये म्हणून ही नीती बनवली.  लोकांचे लक्ष सेक्स, शराब, सूद, श्रद्धा वर आधारित केले. ह्यालाच मी S4 ची नीती म्हणतो. त्याचप्रमाणे जगावर राज्य करायची नीती बनली. ह्यालाच मी भांडवलशाही तंत्र म्हणतो. सेक्स आणि शराबने तरुणांचे मन जखडून टाकायचे. सूद म्हणजे व्याजाने जग आपल्या पायाशी आणायचे. जगाला कर्जबाजारी करून टाकायचे. श्रद्धेचा वापर करून जातीवाद पसरून तोडा आणि फोडाचे राजकारण करायचे. ही अमेरिकन सांस्कृतिक नीती.

            सेक्स आणि शराबवर प्रचंड अमेरिकन पैसे उभे राहिले.  सौंदर्य प्रसाधनांचा प्रचंड खप वाढला.  फॅशनची दुनिया निर्माण झाली.  नाईट क्लब निर्माण झाले.  जेथे स्त्रियांचे विकृत अंगप्रदर्शन रोज होत आहे.  भारताच्या बारबाला कितीतरी बर्‍या निदान अंग प्रदर्शन करावे लागत नाही.  दारू तर उघडपणे आहेच, पण ड्रग्सचा उद्योग हा जगातील सर्वात मोठा उद्योग झाला आहे. युरोप आणि अमेरिका ही सर्वात मोठी ड्रग्सची बाजारपेठ झाली आहे.  जिथे १ किलो हेरोईन किंवा कोकेन रुपये २ कोटीला विकले जाते.  त्यावरच जगातील माफिया निर्माण झाली.  माफियामुळे दहशतवादी निर्माण झाले.  जो रोज सामान्य माणसाची कत्तल करत आहे. त्यावर कुठलेही सरकार काहीही करत नाही.

            S4 चे हे दृष्ट चक्र जगाला गिळंकृत करून टाकणार आहे. भांडवलशाहीचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे नीतीमत्तेचा खून.  भांडवलशाहीचे तत्त्वज्ञान हे अमेरिकन तत्त्वज्ञान आहे.  त्यात प्रत्येक कंपनीचा अधिकारी आपल्या हाताखाली काम करणार्‍या लोकांना सांगतो काही करा चोरी करा, लूटमारी करा, बलात्कार करा पण दिलेले काम पूर्ण करा.  त्यामुळे हे सगळे उद्योगपती राजकर्त्यांना गुलाम करतात.  लोकशाहीत आपण पाहतो की आपला गावातला राजकीय कार्यकर्ता आपल्यासाठी झटतो, आपले काम करतो, पण आमदार- खासदार झाल्यावर मात्र तो दिसत नाही.  तो कुठल्यातरी कंपनीचा दलाल बनतो.  किंवा दाऊद गॅंगमध्ये सामील होतो.  त्यामुळे राजकारण हे भ्रष्ट होत गेले आणि आता तर पुर्णपणे पैशाचे राजकारण झाले आहे.  त्यामुळे संसदीय लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे शासन /प्रशासन, विधिमंडळ आणि न्यायपालिका हे लोकांची राहिलेले नाहीत.  तर श्रीमंतांची खेळणी झालेली आहेत.  साहजिकच त्याचा परिणाम राजकारणावर पुर्णपणे झालेला आहे. 

            ह्या सर्व परिणामाचे प्रदर्शन म्हणजे २०१९.  वर्षाची सुरुवात लोकसभेच्या इलेक्शनच्या तयारीत झाली.  भाजपचा बट्याबोळ झाला होता.  बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, नोटबंदीमुळे मोदी सरकार बेजार झाले होते.  अचानक पूलावामात काही  ४० CRPF जवान मारले गेले. अचानक पाकिस्तान प्रचंड मोठा व्हिलन झाला.  तिथे टि.व्ही. वर हे नाट्य रंगविण्यात आले. ‘हिंदू – मुस्लिम द्वेष भावना पेटविण्यात आली.  वास्तविक ४० जवान मारले गेले त्याची पूर्ण जबाबदारी भारत सरकारची आहे.  कारण हा जम्मू श्रीनगर रस्ता पूर्वी सैन्याच्या ताब्यात होता.  मोदी सरकार आल्यावर काश्मिरच्या बर्‍याच भागातून सैन्य काढण्यात आले व केंद्रीय पोलिस दलाकडे देण्यात आले.  सैन्यासारखा केंद्रिय पोलिस दलांना काश्मिरचा अनुभव नाही.  म्हणूनच केंद्रीय पोलिस दलाचे जवान मारले गेले.  वास्तविक गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता.  हे तर सोडाच पण पाकिस्तानची भुजगावणे उभे करण्यात आले आणि हे त्याला धोपटत राहिले.  यांचे पौरुष्य म्हणजे बालाकोट वरील वायुदलाचा हल्ला.  त्यात १ दहशतवादी मेला की ३०० मेले हे आपल्याला माहीत नाही.  पण पाकिस्तान प्रधानमंत्री ईमराहीन खानचा फायदा झाला.  अमित शहा सांगतील का यात भारताचा काय फायदा झाला?  पाकिस्तानवर हल्ला करायची हिम्मत झाली नाही. उगाच प्रसार माध्यमाचा उपयोग करून फार काहीतरी केल्यासारखे दाखवले  आणि लोक शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई  विसरले आणि मोदी परत निवडून आले.

            २०१९ मध्ये हा तमाशा चालू राहिला. गाय-बैलचे राजकारण, कलम ३७०, भारतीय नागरिकत्व असे विषय निर्माण करून भारताच्या विकासाचा मूळ मुद्दा दाबून टाकण्यात आला आहे.  महागाई, बेकारी, गरीबी झपाट्याने वाढत आहे.  तर हे लोकांपासून लपविण्याठी हिंदू–मुस्लिम द्वेषाची दोरी साप साप म्हणून बडविण्यात येत आहे.  त्यातच ही लबाडी ओळखून एक नवीन पण विचित्र सरकार महाराष्ट्रात आले.  ३ पक्ष आता सत्तेचा वाटा आपल्याकडे फेकण्यात मग्न आहेत.  जनतेकडे कोणाचेच लक्ष नाही.  यातून काहीतरी चांगले निर्माण होईल अशी २०२० मध्ये सुतराम शक्यता वाटत नाही.  त्यामुळे २०२० चा जन्म हा काही आशादायी दिसत नाही.  पण काळ्याकुट्ट अंधाराला उष:कालाची कोवळी किरणे भेदू शकतात. हीच २०२० ची आशादायी बाब असू शकेल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS