सुशांत सिंह एक प्रसिद्ध नट व त्याची प्रेमिका सुप्रसिद्ध नटी रिया. सुशांत हे नशेच्या आहारी गेले. हशिष, कोकेन, अफिम व MDMA हे त्यांच्या घरात सापडले. १४ जून २०२० ला त्याने अचानक आत्महत्या केली. त्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एन.सी.बी.) ने जाहीर केले की सुशांत सिंहच्या आत्महत्येमुळे २.५ कोटी रुपयाचे ड्रग्स मिळाले. सुशांत सिंह यांचा मृत्यू झाला की आत्महत्या होती यावर बरीच चर्चा झाली आहे. बरेच लोक असे म्हणाले की सुशांत सिंह यांचा ड्रग्समुळे खून झालेला आहे. त्याच्या आदल्या रात्री त्याच्या घरामध्ये पार्टी होती. त्याच्यात बरीच नशा केल्याचे समोर आलेले आहे. ड्रग्सच्या आहारी जाणे म्हणजे काय याची कल्पना बऱ्याच लोकांना नसते. एकदा कोणीही ड्रग्सच्या आहारी गेला, तर त्यातून सुटका होणे फार कठीण असते. हळूहळू सेवन वाढत जातं. शरीर आणि मन कमकुवत होते. अंतिमत: मृत्यु हा एकच मार्ग आणि सुटका असते. लाखो लोक विशेषत: तरुण आज ड्रग्समुळे व्यसनी झालेले आहेत, नशेत गुंग झालेले आहेत.
पटकन प्रचंड पैसा मिळवण्याचा धंदा म्हणजे ड्रग्स आहे. इंग्लंडमध्ये १ किलो हेरोइनची किंमत ८ कोटी रुपये आहे, तीच भारतात ४ कोटी आहे. म्हणजे १ किलो ड्रग्स कुणी इंग्लंडला घेऊन गेले तर त्याला ४ कोटीचा फायदा आहे. तुम्ही कल्पना करू शकता की टनाने जेव्हा पाकिस्तान मधून ड्रग्स भारतात येतात, तर किती प्रचंड पैसा निर्माण होतो. त्यामुळे पूर्ण जगात ड्रग्स हे माफियाच्या संपत्तीचे मूळ स्त्रोत झाले आहे. ड्रग्स मधून मिळणारा पैसा हा कर मुक्त देशामध्ये गुंतवला जातो. त्यासाठी खोट्या कंपन्या निर्माण होतात. खोटे ट्रस्ट, खोट्या संस्था निर्माण होतात. यांचे खरे मालक पडद्या आड लपलेले असतात. जसे अलिकडेच २०१६ आणि २०१७ मध्ये पनामा आणि पॅराडाईज पेपरने या जागतिक व्यवस्थेचा पर्दापाश केला. HSBC बँकमध्ये गुन्हेगारीचा पैसा पांढरा केला जातो, असे अमेरिकेत निदर्शनास आले. त्याचबरोबर अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय, केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा, काही उद्योगपती वगैरे १२०० भारतीय नागरिकांची नावे आली आहेत. ज्यांनी परदेशामध्ये मध्ये खोट्या कंपन्या काढल्या, पण दुर्देवाने भारत सरकारने यावर कोणतेही कारवाई केलेली दिसत नाही. सुशांतच्या वडीलांनी २५ जुलैला पटनामध्ये तक्रार अर्ज केला. त्याच्यामध्ये रियाने सुशांतचे १५ कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केलेला आहे व त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचे सुद्धा म्हटले आहे.
या घटनेमुळे बॉलीवूड मध्ये होणार्या ड्रगच्या वापराची माहिती जगाला मिळाली. रियाने NCB समोर स्पष्ट सांगितले की बॉलीवुडचे लोक LSB, कोकेन, अश्या महागड्या ड्रग्सचा वापर करत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने चौकशी सुरू केली व ED ने देखील चौकशी सुरू केली. पोलिस तर करतच होते. NCB ही अग्रगण्य केंद्रीय पोलीस संघटना आहे. याचे काम ड्रग्स विरोधात लढा देणे आहे. ड्रग्समधून प्रचंड पैसा निर्माण होतो. गुन्हेगारांची ड्रग्स ही खरी शक्ती आहे. भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त पैसा ड्रग्सच्या तस्करीतून होतो. हा पैसा इतका आहे की पूर्ण भारत सरकारला आपल्या ताब्यात ठेवण्याची समता आहे. ह्या गुन्हेगारी पैशाचा पांढरा पैसा करणारी प्रक्रिया म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग. मी खासदार झाल्यावर या ड्रग्स विरोधात मोहीम सुरू केली व मनी लॉन्ड्रिंग हा कायदा आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण अपयशी ठरलो. नंतर 2002 ला हा कायदा आणण्यात आला. पण कायदा फार कमजोर राहिला. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका हा ड्रग्सपासून आहे. पण याच्या विरोधात कारवाई होत नाही. जी सरकारी यंत्रणा आहे तिला दाबून पूर्ण भ्रष्ट करण्याची ताकद ड्रग्स मध्ये आहे.
अफूची शेती अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जगातील ९०% अफु अफगाणिस्तान मधून येते. यातून उत्पादन होणारा माल इतका प्रचंड आहे की तालिबान आज उभा केवळ अफूच्या शेतीवर आहे. अफुवर प्रक्रिया करून हीरोइन, पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर बनते. मग हिरोइन वितरण पूर्ण जगात करण्यात येते. त्यातच पंजाब बरबाद झाला. तस्करी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. आज पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त ड्रग्सचा पैसा संघटित गुन्हेगारांच्या नेत्यांना मिळाला आहे. म्हणून दाऊद इब्राहीम हा जगातील सर्वात श्रीमंत लोंकांमध्ये गणला जातो.
१९९३च्या बॉम्ब ब्लास्टनंतर ‘व्होरा समिती’ गठीत करण्यात आली होती. त्यांनी स्पष्ट अहवाल या विषयावर दिलेला आहे. हा प्रचंड पैसा गुन्हेगारांच्या हातात गेल्यामुळे भारतामध्ये माफिया, भ्रष्ट राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी यांचे समांतर शासन भारतावर राज्य करत आहे. ही समिती प्रचंड महत्त्वाची होती. पण सर्व राजकीय पक्षांनी या समितीच्या अहवालाला गाडून टाकलं व त्यावर काहीच कारवाई केली नाही. सर्व गुप्तहेर संघटनांच्या अध्यक्षांची, ४ पोलीस प्रमुखांची ही समिती होती आणि त्यांनी असा अहवाल देणे म्हणजे आपल्या पूर्ण राजकीय सामाजिक व्यवस्थेवर चपराकच आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक घोटाळे समोर आले आहेत. त्यात असं सिद्ध झालेला आहे की भारताचे श्रीमंत लोक, गुन्हेगार, राजकीय नेते यांनी परदेशात कर मुक्त देशात आपले अकाऊंट खोट्या कंपनीद्वारे उघडलेले आहे. भारतामध्ये कर कधीच भरत नाहीत. मॉरिशियसमध्ये १५००० अशा खोट्या कंपन्या आहेत. तेथून ४३% परदेशी गुंतवणुकीचा पैसा भारतात आलेला आहे. मॉरिशियस आणि भारतामध्ये १९८२ ला इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत करार झाला. उत्पादना वरचा कर फक्त एका देशात लावायचा करार झाला. म्हणजे कंपनीने भारतात गुंतवणूक केली तर तो कर भारतात भरायचा असतो. कारण फायदा भारतात झालेला असतो. ही कंपनी जाहीर करते की, ती मॉरिशसमध्ये कर भरणार आहे. पण मॉरिशसमध्ये कर भरावा लागतच नाही. त्यामुळे भारतात झालेला फायदा हा कर मुक्त होतो. पैसा परदेशी बँकेत कंपन्या टाकतात आणि तिथून मॉरिशसच्या १५००० कंपनीमध्ये वळवतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचा पैसा, गुन्हेगारीचा पैसा व सर्व काळ्या धंद्यातील पैसा मूठभर लोकांच्या हातामध्ये एकवटला गेला आहे. अशाप्रकारे हजारो कोटी रुपये भारताचे नुकसान झालेले आहे. हा पैसा भारतात आला असता तर गोरगरिबांसाठी त्याचा प्रचंड वापर झाला असता आणि आज भारतामध्ये आरोग्य व्यवस्थेची जी धूळधाण झालेली आहे, आरोग्य व्यवस्था नष्ट झालेली आहे, ही झाली नसती. आजची शिक्षण व्यवस्था बरबाद झालेली आहे ती झाली नसती. कोविड काळा मध्ये श्रीमंत प्रचंड श्रीमंत झाले. गुन्हेगार त्याही पेक्षा श्रीमंत झाले. कारण त्यांच्याकडे वारेमाप काळा पैसा आहे. आणि दुसरीकडे काहीच पैसा नाही. श्रीमंताना फक्त बँकेतील व्याज जरी मिळाले तरी घर बसल्या प्रचंड पैसा मिळवला असता. गुन्हेगार या देशाला मूर्ख बनवत आहेत आणि आपले राजकीय नेते याच्यावर मूग गिळून गप्प बसत आहेत. दाऊद इब्राहिम तर आता या देशातच नव्हे तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत या क्षेत्रांमध्ये तो एक शहानशहा झालेला आहे. म्हणून या देशामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. त्याच्यावर नियंत्रण कोणाचे नाही.
या सर्वाला अचानक एक पर्याय निर्माण झाला. ड्रग्स प्रकरणानंतर बॉलीवूड मध्ये प्रचंड प्रमाणात व्यापार चालत असल्यामुळे त्याला प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात मिळाली आहे. NCB चे महाराष्ट्राचे प्रमूख समीर वानखेडे यांनी ड्रग्स तस्करीवर प्रचंड मोठा हल्ला केला. कोट्यावधी रुपये त्यांनी पकडले. मोठमोठे माफिया डॉनच्या हस्तकांना तुरुंगात टाकले. पण दुर्दैवाने त्यांना सहकार्य मिळायला पाहिजे ते मिळत नाही, असे अधिकारी क्वचितच निर्माण होतात. आपलं काम चोखपणे करतात, गुन्हेगारांशी लढतात. आपले कायदे इतके कमजोर आहेत की गुन्हेगार सुटतात. सहजपणे जामीन मिळतो. तरी वानखेडे यांनी आपले काम जोरात सुरू ठेवले आहे. NCB बरोबरच पोलिस, ATS, NIA, CBI, IB, ED, या सर्व संघटनांनी मिळून काम करण्याची गरज आहे. पण ते कधीच होताना दिसत नाही. त्या सर्वांना एकसंघपणे काम करायला लावणे हे सरकारचे काम आहे. ते केंद्र आणि राज्य सरकार कधीच करत नाहीत. पंजाबची जी हालत झाली आहे, तशीच परिस्थतीती महाराष्ट्रात निर्माण होत आहे. याविरोधात आपण संयुक्तपणे लढा दिला नाही तर महाराष्ट्र देखील उद्ध्वस्त होईल.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९