निर्दयी वृत्ती_३०.४.२०२०

कोरोना हल्ल्यामुळे जगाची घडीच बिघडली.  पुढारलेले देश पुर्णपणे त्याच्या तडाख्यात सापडले. अमेरिकेसारख्या देशात कोरोनाग्रस्थांची संख्या १० लाखाच्या पुढे गेली, ह्याचाच अर्थ तेथील आरोग्य प्रशासन पूर्ण कोलमडले आहे असा होतो.  ६०००० लोक मरण पावले. व्हिएतनाम युद्ध ८ वर्ष चालले, त्यात देखील एवढे लोक मरण पावले नाहीत. अमेरिकेसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यापाठोपाठ स्पेन, इटली, जर्मनी आणि इंग्लंड आहे. एवढी मानवहानी ह्या पुढारलेल्या देशात झाली आहे.  हे देश पुढारलेले कसे म्हणायचे? जे चीनने केले ते करू शकले नाहीत. उलट चीनला दोष देत फिरत आहेत.  दोष दिल्याने कुणी मोठ होणार नाही. आलेला संकटाला तोंड देऊन आपल्या लोकांचे सरंक्षण करणे हे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे.  गेली ३० वर्ष भांडवलशाहीच्या तडाख्यात मानव सापडला.  त्यात लोकांचे संरक्षण करणे आणि जीवन चांगले करणे हे सरकारचे काम नाही, असा प्रचंड प्रचार झाला. पण वेळोवेळी जगावर अशी संकट येत गेली की सरकार शिवाय पर्यायच उरत नाही.  आता सिद्ध झाले आहे की टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी कोरोनातून लोकांची सुटका करू शकत नाहीत.  तर सरकारलाच ते करावे लागणार आहे. 

            या पुढारलेल्या देशांनी तातडीने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालून कडक चाचणी केली असती तर हे झालेच नसते. पण ट्रम्प आणि इतर देशात कट्टर ख्रिश्चनवादी लोक आहेत. ते म्हणतात की जग बुडणार आहे मग येशूचा पुन्हा जन्म होईल आणि मानव पुन्हा चांगला होईल. असे अनेक धर्मांध लोक वैज्ञानिक दृष्टीकोनाला विरोध करत  आहेत. बरे,  धार्मिक दृष्टिकोन कुठला खरा आणि कुठला खोटा हे कोण सांगणार? शेवटी ईश्वर हा वेगवेगळ्या धर्मियांसाठी वेगळा असू शकतं नाही हे स्पष्ट आहे. म्हणून नियम चिनी लोकांना वेगळा आणि अमेरिकन/भारतीय लोकांना वेगळा असू शकत नाही. जंतूंचे परिणाम सर्व माणसांवर सारखेच असतात. जंतू समतावादी असतात. सगळ्यांना सारखाच आजार देऊन जातात. जशी बंदुकीची गोळी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती लोकांना सारखीच मारते, तसे रोग सुद्धा सारखेच होतात. म्हणून, धार्मिक अहंकार बाजूला सारून विज्ञानी उपाय लागू करावे लागतात.

            अमेरिकेत इवंजीलीकल ख्रिस्ती जमात ही अत्यंत कट्टरवादी आहे.  जे भारतात येऊन देखील या धर्माचा प्रसार करतात.  तो ट्रम्पचा पाठीराखा आहे. त्यात गोर्‍यांचे श्रेष्ठत्व जोपासणारी बहुसंख्य जमात आहे.  हे सगळे ईश्र्वरावर अवलंबून असल्यामुळे सर्व नियम धाब्यावर लावून वावरत आहेत. हे लोक कोरोना जंतूंना आयतेच सापडले आहेत म्हणून मरत आहेत.  ट्रम्पने प्रत्येक बाबतीत विज्ञानवादी विचारांना धुडकावून लावली आणि अमेरिकन स्वार्थ पुढे ठेवला. जसे जागतिक पर्यावरण करार रद्द केला. अमेरिका विषारी वायू हवेत सोडत राहील असे जाहीर केले. जगाला सर्वात जास्त प्रदुशित अमेरिकेने केले. म्हणून भारतासकट सर्व देशांनी ओबामा सकट करार केला की सर्व देशांनी प्रदुर्शन कमी करण्यासाठी उद्योगावर मर्यादा आणली पाहिजे. कोणी काय निर्बंध घालावेत हे रिओ नंतर पॅरिस करारात ठरले. ओबामाने चूक केली ती मी करणार नाही म्हणत ट्रम्पने करार धुडकावून लावला.  ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत ट्रम्पने आपली जबाबदारी टाळली. ह्या सर्वांचे परिणाम अमेरिकन जनता भोगत आहे. कितीही मेले तरी मी उद्योगधंदे चालू ठेवणार.  हे ट्रम्पचे धोरण आज अमेरिकेचा फाशीचा फंदा बनला आहे. राजकर्त्यांची अहंकाराची जोड नेहमीच राहिली आहे. त्यातून प्रचंड नरसंहार झाले आहेत. राजकर्ते चुकीचे निर्णय घेतात तेंव्हा प्रचंड यातना सामान्य माणसाला सहन करावी लागते. हिटलर मुळे ६० लाख लोकांची कत्तल झाली. जर्मनी निर्मनुष्य झाला. ट्रम्पचा निर्णय तशाच प्रकारे अमेरिकेत नरसंहार घडवू शकतो. त्यातून ट्रम्प मुक्त होण्यास तयार नाही. धंदा चालला पाहिजे हाच अट्टाहास ट्रम्पने धरला आहे.

            कोरोनामुळे जागतिकीकरणावर संकट निर्माण झाले आहे. सर्व देशांनी आपला देश बंदिस्त केला आहे. एवढेच काय तर आता जिल्हा बंदी आहे. सांसर्गिक रोग पसरू नये म्हणून लोकांनी आपल्याच घरात रहावे असे म्हटले जाते. सर्वात जास्त संसर्ग जास्त मनुष्यवस्तीच्या ठिकाणी झाला आहे. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद सारखी शहरे जास्त बाधित आहेत. तर अनेक गावे करोनामुक्त आहेत. अनेक जिल्हे करोनामुक्त आहेत. याचाच अर्थ ग्रामीण जीवनशैली मनुष्याला सुरक्षित ठेवत आहेत. म्हणूनच लोकांनी गावाकडे जावे हे भविष्यातील धोरण बनवले पाहिजे.  आपण उद्योगाचा ग्रामीण भागात प्रसार करण्याचे धोरण ठेवले होते. सरकारने इंदिरा गांधींच्या काळात ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी प्रचंड अनुदान दिले होते. १९९१ च्या अमेरिकन भांडवलशाहीचा भारतात प्रसार झाल्यावर  विपरीत परिणाम झाला. उद्योग श्रीमंत भागात त्यातल्या त्यात, मुंबई सारख्या शहरात केंद्रित झाले. त्याला जोडून रस्ते, मेट्रो, वाहने प्रचंड शहरी भागात वाढली. पाणी ग्रामीण भागातून आणून शहरात पुरवले आणि वस्ती वाढतच गेली. त्याचा जीवन शैलीवर विपरीत परिणाम झाला. मनुष्याचे आणि निसर्गाचे संतुलन बिघडले.  आता अनेक आपत्तीना मानवाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना त्यातील अलीकडचे संकट. 

            भारताची संस्कृती साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर आधारित होती. जास्त पैसा कमावल्यावर आपली संस्कृती कधीच पुढारली नव्हती. पण १९९१ नंतर मात्र धन संपादन करण्यावर आपले लक्ष केंद्रित झाले. प्रचंड धनसंकलन झाले पण माणूस मेला. माणुसकीचा खून झाला, इतका कि राजकारणात इमानदारीने काम करणारे चोर ठरले. राजकारणातून हाकलले गेले. लोक सुद्धा पैशाच्या पाठीमागे वेडे झाले.  परिणामत: हुशार आणि कर्तुत्ववान लोक राजकरणातून बाहेर फेकले गेले.  म्हणून आधुनिक राज्यकर्ते हे अत्यंत साधारण लोक आहेत.  कल्पकता, धाडस, कर्तुत्व नष्ट झाले.  राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी आपल्या चमच्यांना पुढे आणले. परिणामत: देशावर, राज्यावर येणार्‍या संकटांना पेलण्याची शक्ती नष्ट झाली.  जसे ३ लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.  पण सरकार हा प्रश्न सोडवू शकला नाही.  कोरोना काळामध्ये  हेच मोठे आव्हान आहे.  जगाला आणि आणि देशाला नेतृत्वहीन करून टाकले आहे.

            लॉकडाऊन करून लोकांना आपल्या नशिबावर सोडून देण्यात कुठला पुरुषार्थ आहे. लॉकडाऊन करत असताना सरकारने जाणीवपूर्वक लोकांच्या पोटापाण्याची सोय केली पाहिजे.  त्याला कल्पकता लागते.  शेती करायला देऊन भागत नाही, पण शेतकर्‍यांचा माल विकला गेला पाहिजे.  याची जबाबदारी सरकारची आहे.  त्यासाठी अनेक पावले उचलता येतील.  जसे आमच्या पातळीवर मुंबईत शेतकर्‍यांच्या मालाची विक्री करण्याची व्यवस्था आम्ही केली आहे.  मग सरकार का करू शकत नाही.   अनेक ठिकाणी कारखाने सुरू करण्याची शक्यता आहे. तिथे का बंदी घातली आहे?  योग्य उपाय योजना करून अर्थव्यवस्था चालू ठेवण्याचे कौशल्य आजच्या परिस्थितीत सरकारने साध्य केले पाहिजे.  कोरोना वाढू न देता,  लोकांच्या पोटापाण्याची सोय कशी होईल, हे कौशल्य सरकारकडे आहे का? हे काळच ठरवेल. दुसरीकडे अनेक ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थितीत लोकांना डांबून ठेवले आहे.  या सर्वांना आपल्या राहत्या घरी जाण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे.  ज्यांना जायचे असेल त्यांची योग्य चाचणी करून त्यांना पाठवले पाहिजे आणि जेथे जातील तेथे त्यांची चाचणी करून त्यांना घेतले पाहिजे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागणी करून सुद्धा केंद्र सरकारने ही सोय केली नाही आणि लाखो लोक मरणप्राय यातना भोगत दिवस काढत आहेत.  याला सरकारी कर्तव्य म्हणता येत नाही पण वैचारिक दिवाळखोरी आणि निर्दयी वृत्ती असे म्हणता येईल. 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS