विषमुक्त अन्न, प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक/ सेंद्रिय शेती हा उत्तम पर्याय आहे. शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर यामुळे जमिनीचा पोत खालावत चाललेला आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचा घटक असून जमिनीतील जिवाणूंसाठी व जीवजंतूंसाठी महत्त्वाचे माध्यम आहे. रासायनिक खतांचा अतिवापर, पिकांचे अवशेष जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, मशागतीच्या अयोग्य पद्धती, गाई म्हैशींचे घटते प्रमाण आणि त्यामुळे शेणखताचा कमी वापर इत्यादी कारणांमुळे जमिनीतील सेंद्रिय प्रमाणात लक्षणीय घट होत आहे. सद्यस्थितीत सर्वसाधारणपणे ०.४० टक्के पेक्षा कमी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असल्याचे दिसून येत असून ते १.०% पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीचा पोट बिघडून जमिन नापीक होणे,अशा जमिनीत रासायानिक खतांच्या वापरात वाढ होणे परिणामी उत्पादन खर्च वाढणे अशा दृष्ट चक्रात अडकून उत्पादनाची शाश्वत न राहणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येत आहेत. अशा जमिनीमधून उत्पादित होणाऱ्या मालाची पोषण मूल्ये खालावलेली आढळतात. अशा जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांची कीड व रोगांना प्रतिकार क्षमता कमी असल्याने रासायनिक औषधांच्या / कीड नाशकांच्या अतिरिक्त वापरांमुळे जमीन व पाणी प्रदूषितहोते. तसेच अशा पद्धतीने पिकविलेल्या अन्नामध्ये उर्वरित किटक नाशकांचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्याने एकार्थी असे अन्न मानवी आरोग्यास हानिकारक ठरते. त्यामुळे मानवी शरीराच्या प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. प्रदूषित जमीन, पाणी आणि अन्न यामुळे मानवा बरोबर पाळीव प्राणी, पक्षी तसेच संपूर्ण जीव सृष्टीवर विपरीत परिणाम होतो. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी नैसर्गिक / सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.
सद्यस्थितीत राज्यात एकूण १२.०७ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक व सेंद्रिय शेतीअंतर्गत लागवडीखाली आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे क्षेत्र २५ लाख हेक्टरवर आणावयाचे झाल्यास सद्यस्थितीतील राज्याचे एकूण १२.०७ लाख हेक्टर क्षेत्र वजा जाता उर्वरित १३.०० लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली आणणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यात नैसर्गिक/ सेंद्रीय शेतीसंदर्भात विविध योजनांमार्फत जवळपास ६.३९ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय/नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली आहे. तसेच समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाची स्थापना केली आहे. या प्रकल्पाचा मी जनक आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीची चळवळ गेली सात वर्षे महाराष्ट्र तसेच कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये उभी केली आहे. आम्ही उभ्या केलेल्या नैसर्गिक शेतीच्या चळवळीच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आले आहे. नैसर्गिक शेतीचा विषय केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी माननीय पंतप्रधान यांची भेट घेऊन मी विनंती केली होती. त्यानुसार केंद्रीय बजेटमध्ये नैसर्गिक शेतीचे स्थान प्राप्त झाले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या नैसर्गिक शेतीची दखल घेऊन तज्ञ संस्था म्हणून शिफारस केली आहे. त्याआधी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी आम्हाला प्रचंड विरोध केला आणि भारत सरकारचे धोरण नसताना तुम्ही कसे काय नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामध्ये देता? असे दरडावले. यावेळी पद्मभूषण डॉ. सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही चळवळ सुरु केली. आमच्या संस्थेच्या १५० एकर प्रक्षेत्रावर गेली सात वर्षे नैसर्गिक शेतीचा अवलंब करून पिकांची लागवड व प्रयोग करत आहोत. या माध्यमातून १०००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना व कृषी पदवीच्या ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज नॅचरल फार्मिंग अॅकॅडमीची स्थापना केली आहे. नैसर्गिक शेतीची राष्ट्रीय शिबिरे, राष्ट्रीय परिसंवाद,प्रशिक्षणे, मेळावे, पीक प्रात्यक्षिके, कृती प्रात्यक्षिके, गटचर्चा, आकाशवाणी कार्यक्रम, दूरदर्शन कार्यक्रम, साहित्य निर्मिती इत्यादी माध्यमातून सातत्याने आम्ही प्रचार प्रसार करत असतो. या माध्यमातून आमच्या संस्थेबरोबर हजारो शेतकरी जोडले गेले असून त्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे. ह्यापुढे महाराष्ट्रातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांना आम्ही मदत करणार असून त्यांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक शेतीची चळवळ जोमाने उभारणार आहोत.
महाराष्ट्र राज्यात नैसर्गिक / सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेला सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधी करिता मान्यता देण्यात आली आहे. सदर मिशनची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नियमक मंडळ गठित केले असून आयुक्त कृषी, महाराष्ट्र राज्य, पुणे हे त्यांचे अध्यक्ष आहेत. नैसर्गिक शेतीचा प्रचार आम्ही समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प स्थापन करून गावोगावी करत आहोत. समृद्ध आणि आनंदी गाव या प्रकल्पामध्ये मानवाच्या आरोग्यास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. यामध्ये क्रीडा, योगा, व्यायाम आणि आहार या घटकांचा समावेश आहे. गावातील जनतेचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर दिला असून नैसर्गिक शेती, समूह शेती, कृषी आधारित उद्योग, लघुउद्योग, पशुसंवर्धन आणि कृषी पर्यटन हे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. गावाच्या विकासासाठी गावातच उद्योग उभारणे व त्याच बरोबर त्याचबरोबर गावातील संस्कृती, शिक्षण, पाणी, स्वच्छता, पर्यावरण आणि गावातील वीज गावातच तयार करणे हे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९