पर्यावरण_६.६.२०१९

राजस्थान येथील चुरू जिल्ह्यात तापमान सरासरी ५०डिग्रीच्या वर होते. विदर्भ  मागे राहिला नाही. ४५ डिग्री तर सामान्य तापमान ह्या उन्हाळ्यात  होते. पावसाचे अजून नाव नाही. सगळीकडे बातम्या येतात कि महाराष्ट्रात पाण्याची अवस्था बिकट आहे. कुणाला कळत नाही कि काय करावे. धरण सुखी पडत चालली. टँकर हा मुख्य पाण्याचा स्रोत झाला. मुंबईत मात्र पाण्याची चिंताच नाही. कारण श्रीमंतांच्या वस्तीत पाणीच पाणी असते. मंत्री-संत्री, उद्योगपतींना हा त्रास होत नाही. सत्तेत असलेल्या आणि श्रीमंत लोकांना झळ  पोहचत नाही. म्हणून ह्या विषयावर सरकार काहींच करत नाही. फक्त तेवढ्यापुरते तात्पुरते काहीतरी केल्यासारखे दाखवायचे आणि परत ये रे माझ्या मागल्या. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे जगच उद्ध्वस्त होऊ शकते ह्याची चिंता कुणालाच दिसत नाही. २६ जुलै २००५ ला मुंबई बुडाली. त्सुनामी आली. चक्रीवादळ तर दैनदिन प्रकार झाले आहेत. हिमशिखरे वितळत आहेत. भूगर्भातील जलसाठे पण धोक्यात येत आहेत. असा सर्व क्षेत्रातून भयानक परिणाम समोर येत आहेत. पण पर्यावरण संतुलनाकडे कुणाचे लक्ष नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर मी मुंखमंत्र्यांचा जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याचा कार्यक्रम बघितला. मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे, रामदास कदम खुशीत दिसले. प्लॅस्टिक बंदीचा शिवधनुष्य ह्या पुस्तकाचे विमोचन बघितले. पण गाव खेड्यामध्ये ख़ुशी नाही. तिथे दु:ख आणि यातना आहेत. दिवसेंदिवस जगाचा आपण नाश करत आहोत पण जाणीव कुणलाच नाही. हिच शोकांतिका आहे. “मरणे वालोंको  मौत नही दिखती”.  पूर्वी कुणीतरी म्हटले होते कि जगात पाण्यासाठी युद्ध होतील. ती छोट्या प्रमाणात सुरु झाली. जर आपण तातडीने काही उपाय केले नाहीत तर उशीर झालेला असेल. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मला एक साधी गोष्ट सांगायची आहे. महाराष्ट्रात कुठेही फिरताना माळरान दिसतील. लाखो एकर जमिनीवर एक झाड नाही. जंगल माणसाच्या हव्यासापाठी नष्ट करण्यात आली आणि येत आहेत. झाडे लावण्याचे काम कोण करत नाही. तर सरकार प्रयत्न केल्याचे दाखवते. पण त्या नावाखाली, पैसे खाण्याचा धंदा चालतो. म्हणून आम्ही भारतीय सैन्याच्या प्रादेशिक सैन्यदलाने इकॉलॉजिकल टास्क फोर्स बनविले. राजस्थान येथील वाळवंटात ५ कोटी झाडे लावली आणि जगवली. आता जैसेल्मेर ह्या जागी वाळवंट उरले नाही. तसेच हिमाचल, मध्य प्रदेश, देल्ही येथे देखील अशीच मोहीम राबवली. जवळ जवळ २० कोटी झाडे लावली आणि जगवली. फार वर्ष मी  प्रयत्न केल्यानंतर महाराष्ट्रात औरंगाबाद येथे असा टास्क फोर्स आणण्यात यशस्वी झालो. गेल्याच वर्षी तिथे ९०,००० झाडे लावण्यात आली. आता ५ कोटी झाडे लावण्याची मनीषा आहे. पण हा प्रयत्न एक दिशादर्शक ठरू शकतो. प्रत्येक कलेक्टरने पुढाकार घेऊन तरुणांकडून ही मोहीम राबविली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात १ कोटी झाडे लावून ती जगवली पाहिजेत, तर महाराष्ट्रात क्रांती होईल, हे घडवून आणण्यासाठी लोकांनी मोहीम उघडली पाहिजे. रस्ते बांधण्यात लाखो झाडांचा खून करण्यात आला, पण लावण्याची भाषा कोण करत नाही.

झाडे जमीन झाकतात. जंगलात आपण बघितले कोणी खत घालत नाही, कोणी पाणी घालत नाही, कोणी कीटकनाशक घालत नाही. तरी जंगले वाढत जातात. ह्याला निसर्ग म्हणतात. जंगलात पाला पाचोळ्याचे आच्छादन असते. त्यामुळे जमीन झाकली जाते. त्यात रात्रीचे दव पडते,  दवाचे पाण्यात रुपांतर होते आणि जमिनीत जाते. हवा म्हणजे पाण्याचा समुद्र आहे. ते पाणी जमिनीत कसे जाईल हा विचार केला पाहिजे. जमीन वृक्षहीन झाली कि उघडी पडते. त्यात असलेले पाणी बाष्पीभवन होते. पाणी उडून जाते. म्हणून जमीन ही आच्छादनाने झाकली पहिजे. व जमिनीवर झाडे लावली पाहिजे. हा मूळ सिद्धांत विघडला म्हणून दुष्काळ वाढत चालला आहे. लोकांनी पावसाळ्याचा उपयोग करून शक्य तितकी झाडे लावणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

विकास आणि पर्यावरण ही एका रथाची २ चाके आहेत. फक्त विकास  करत शाश्वत पर्यावरण व्यवस्था जोपासली नाही तर गाडी चालणार नाही. वृक्षसंपदा नष्ट झाल्यामुळे वातावरणात कर्ब वायू वाढत चालला. हा सूर्यप्रकाशातील उष्णता खेचून घेतो आणि वातावरण उष्ण करतो. त्यामुळे वातावरणात बदल होतो. त्याचबरोबर, रासायनिक खते आणि कीटकनाशके पाण्याबरोबर भुगर्भात जातात व भुगर्भातील पाणी प्रदुर्षित होते. भारतात अनेक ठिकाणी जमिनी उद्ध्वस्त होत आहेत. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवणे सरकारला कठीण होत जाणार. भुपृष्ठावरील पाण्यापेक्षा भूगर्भातील पाणी साठा, ३० % लोकसंख्येला पाणी पुरविते. ५० ते ४०० फुट पाणी आपण वापरू शकतो. पाउस पडल्यावर, जमिनीतील छिद्रातून पाणी खाली जाते व भुगर्भात साठा होतो, ह्याला जमिनीखालील रीचार्ज म्हणतात. जितके पाणी रुजते तितकेच पाणी आपण वापरावे. जास्त वापरले तर भुगर्भातील पाणी साठे नष्ट होतील. खोल बोरवेलची संख्या वाढत गेली तर पाणी वापराचे प्रमाण वाढत जाते व झरे आटत जातात. त्यामुळे जमिनीखाली पाणी वाढवण्यासाठी आपण काय करतो हे अत्यंत महत्वाचे आहे.

पाण्याच्या त्रासामुळे, गावे ओस पडत चालली आहेत. झपाट्याने शहरीकरण होत आहे. हा शाप समाजाला लागला आहे. पण आपण डोळे मिटून हा विध्वंस बघण्याचे टाळतो. असंतुलित विकास शाश्वत विकासाच्या बदल्यात आपण करत चाललो आहोत. सिमेंटची जंगले उभारताना निसर्ग व वातावरणाची हेळसांड करतो. बदलत्या हवामानाची, वाढत्या उष्णतेची कोणी काळजीच करत नाही. भीषण पाणी टंचाईला आपल्याला सामोरे जावे लागते. ग्लोबल वॉर्मिंगने जगाला धोक्यात आणले. २०३० पर्यंत जर जगाचे तापमान २ डिग्री पेक्षा वाढले तर प्रलय येईल हे माहित असून देखील जगातील देश काहींच करत नाहीत. पाण्याचा वापर आपण काटकसरीने करायचा सोडून नळ वाहत आहेत. लोक दाढी करत आहेत, तोंड धूत आहेत. बादलीने आंघोळ करायची सोडून शॉवरने करत आहेत.

प्लॅस्टिकचा वापर नागरिक म्हणून आपण कमी करू शकतो.  नागरी घन कचर्‍यामध्ये ५ ते ६% प्लॅस्टिक  कचरा असतो.  देशामध्ये ६२ दशलक्ष टन घनकचरा दरवर्षी तयार होतो. त्यापैकी ५.६% दशलक्ष टन  कचरा प्लॅस्टिक  असतो. महाराष्ट्रातील शहरामध्ये ८ दशलक्ष टन नागरी घनकचरा प्रती वर्षी तयार होतो त्या पैकी ५ लक्ष टन कचरा प्लॅस्टिक  असतो.  प्लॅस्टिक  मुख्य विषारी प्रदुशाकापासून बनले आहे त्यामुळे वातावरणात हवा, पाणी आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.  प्लॅस्टिक तयार झाल्यापासून ते नष्ट होण्यासाठी १००० वर्ष लागतात.  समुद्राचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकमुळे झाले आहे.  १ टन प्लॅस्टिक उत्पादनासाठी  २५००० किलो वॅट तास इतकी ऊर्जा तर सुमारे ४५००० लीटर पाणी लागते.  एका अंदाजानुसार भारताच्या एकूण वीज वापरात ४% वीज प्लॅस्टिक  बनवण्या साठी वापरली जाते.  महाराष्ट्रभर सगळीकडे कचर्‍यात प्लॅस्टिक  आपल्याला उठून दिसते. प्लॅस्टिक वर बंदी आणून देखील याचा फार उपयोग झाला नाही. प्लॅस्टिकचा दुष्परिणाम हा सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर लोकांनी करावा आणि  प्लॅस्टिकचे समूळ उच्चाटन करावे.

अवकाशात धूर सोडल्याने सर्वात जास्त प्रदूषण होते . जंगलातील वणवे हे जंगले तर नष्ट करतातच त्याचबरोबर पर्यावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते.  शेतकर्‍यांना विनंती आहे कि त्यानी शेती जाळू नये शेती जाळल्यामुळे शेतातील जीवाणू तर नष्ट होतातच, पण आच्छादनासाठी ज्याचा वापर होऊ शकतो अशा पिकांच्या अवशेषातील भाग सुद्धा नष्ट होतो व पर्यावरणाचे कमालीचे नुकसान होते.  त्यामुळे सर्वसाधारणतः आग लावण्याची सवय बंद करावी. लाकूड जाळून अन्न शिजवणे लवकरात लवकर कसे बंद होईल ह्याची सरकारने काळजी घ्यावी.

शहरीकरण हे २०व्या शतकात झपाट्याने वाढले. म्हणून जीव, जंगल, जमिनीचा -हास पण झाला. गोर्‍या लोकांनी जगभर वसाहत स्थापन करून जगाला ओरबाडून फस्त  केले. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. म्हणून जगात एक मोठा वाद चालू आहे. विकसिनशील देशांनी आपला विकास साधण्यासाठी काही प्रमाणात असे तंत्रज्ञान वापरावे, ज्यात मर्यादित पर्यावरणाचा -हास होतो. कारण अनेक शतके विकसित देशांनी जसे इंग्लंड, अमेरिका, युरोपनी जगाच्या पर्यावरणाचा -हास केला व आपला विकास करून श्रीमंत झाले. आत त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे नियम काटेकोरपणे राबवावे व असे तंत्रज्ञान वापरावे ज्यांनी अजिबात पर्यावरणाला दगा होत नाही. असे तंत्रज्ञान उद्योग आणि शेतीत महाग असते म्हणून श्रीमंत देश ते वापरू इच्छित नाहीत. गरीब देशांना आपला विकास करण्यासाठी  काही अंश घातक तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी द्यावी, अशी गरीब देशांची मागणी आहे. हा संघर्ष चालू आहे. जगातील देशानी १९७२ ला पहिल्यांदा स्टॉकहोलमन येथे परिषद घेऊन  स्टॉकहोलमन जाहीरनामा प्रकाशित केला. त्यात विकास हा शाश्वत असला पाहिजे असे जाहीर केले. म्हणजेच विकास करताना पर्यावरणाची हानी होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.  जगातील तापमान वाढ होऊ नये, म्हणून १९९२ ला रिओ येथे व नंतर २०१४ ला पॅरीस येथे शिखर संमेलन झाले. जगातील सर्व देशांनी पर्यावरणाला हानिकारक तंत्रज्ञान वापरण्याचे स्वतावर काही निर्बंध घालून घेतले हे जागतिक करार झाले. पण अचानक अमेरिकेत  ट्रम्प अध्यक्ष झाले त्यांनी हे सर्व करार नामंजूर केले व अमेरिका काहींच करणार नाही असे जाहीर केले.  आता पूर्ण जग संकटात आले आहे. तरी एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य करावे व सरकारवर सुद्धा दबाव आणावा.

लेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS