पाकिस्तानचा हुकूमशहा_२४.३.२०२३

पाकिस्तानचे सरसेनापती आणि नंतर हुकूमशहा जनरल परवेज मुशर्रफ दुबई येथे आपल्या ७९ व्या वर्षी मृत्यू पावले. कारगिल  हल्ला करणारे, तसेच काश्मिर प्रश्र्न सोडवण्यापर्यंत मजल मारणारे मुशर्रफ एक मोहजिर होते. मोहजिर म्हणजे भारतात जन्मलेले आणि नंतर पाक मध्ये गेलेले. एक हुकूमशहा म्हणून त्यांना भारताबरोबर चांगले संबंध  करण्याच्या अनेक संध्या होत्या. पण त्यांच्या वैयक्तिक कमजोऱ्यांमुळे त्यांनी त्या वाया घालवल्या. मुशर्रफ हा कट्टरवादी नव्हता. पण तो अशा काळात अवतरला की जगभर आतंकवाद फोफावत होता.

मुशर्रफ गेले. माझ्या सैनिकी आयुष्याशी ते जोडलेले होते. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो ते भारत पाक LC वर.  जेथे बस पाक व्याप्त काश्मिरमध्ये प्रवेश करते, त्या कमान चौकीवर. जो पूर्वी श्रीनगर ते मुजफराड रोड होता.  दोन्ही सैन्यामध्ये त्या ठिकाणी फ्लॅग मीटिंग होत होत्या. मी कॅपटन होतो, तर मुशर्रफ कर्नल होते. आमच्यात संभाषण होण्याचे कारण  मुशर्रफ SSG चे प्रमुख होते. SSG म्हणजे पाकचे कमांडो विभाग. मी सुद्धा नुकताच कमांडो विभागातून आलो होतो. साहजिकच एकमेकाच्या कमांडो दलाबद्दल उत्सुकता असतेच. कारण रणांगणात कट्टर शत्रू म्हणूनच समोर येणार होतो. कारगिल युद्धात तसेच झाले देखील.

भारताची फाळणी झालेली मने कधीच सांधली गेली नाहीत. मुशर्रफ हा त्या जखमी मानसिकेतला आहे. अशी माणसे एकमेकांचा तीव्र तिरस्कार करतात. कारगिल मध्ये मुशर्रफची द्वेष भावना प्रकट झाली, पण एक हुकूमशहा म्हणून भारताशी संबंध सुधारण्याचा कल बघून त्यांच्यातील ओढ पण प्रकट होते. मुशर्रफची आंतरिक इच्छा भारताबरोबर मैत्री करून आमेरिकेच्या बाजूला ओढून न्यायचे. दुसरीकडे  अमेरिकेचे राजकारण करून तालिबानला पण जवळ करायचे व अमेरिकेला खुश करायचे. जेणेकरून अमेरिकेकडून प्रचंड हत्याराचा साठा आणायचा व अमेरकेचा मित्र सौदीअरेबियाला पाकिस्तानचे सैन्य द्यायचे. सौदी अरेबियासाठी युद्ध करायचे, जसे आता येमेनमध्ये युद्ध चालू आहे व त्यात पाकिस्तानची सेना सक्रिय आहे. एवढेच नव्हे तर पूर्ण सौदी अरेबियाच्या राजघराण्याला संरक्षण पाकिस्तानची सेना देत आहे. असा उठपटांग धंदा करून फक्त पैसा मिळवायचा हे पाकिस्तानचे ध्येय आणि धोरण स्वतंत्र काळापासून आहे. त्यासाठी पाकिस्तानने स्वतःला अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे.

जसे पाकिस्तानने कायमच भारताला विरोध केला आहे. त्यातून भारताला रशियाच्या बाजूला ढकलले आहे. भारत रशियाकडे गेल्याचे दाखवून अमेरिकेला भारताचे शत्रुत्व घ्यायला लावले. १९७१ च्या लढाईमध्ये अमेरिकेने आणि इंग्लंडने पूर्णपणे पाकिस्तानला मदत केली व स्वतःचे सैन्य देखील पाकिस्तानच्या मदतीला पाठवले. त्याचवेळी पाकिस्तानने अमेरिकेला धरून चीनला भारताविरुद्ध भारताच्या सीमेवर उभा करण्याचा मोठा प्रयत्न केला. पण  ते चीनने मान्य केलं नाही व चीन निष्पक्षच राहिला. यातून एक सिद्ध  होते की चीन आणि भारताचे काही विवाद असले तरी तिसऱ्याच्या विरोधात चीन भारताच्या विरोधात जाणार नाही. चीनचे धोरण आहे की भारताला अमेरिकेपासून दूर ठेवणे. किंबहुना अमेरिके विरुद्ध स्वतःच्या बाजूला ओढणे. भारत अशी भूमिका घेत नाही म्हणून चीन भारताविरुद्ध काही ना काही षडयंत्र करत असतो. जर शक्य झालं तर भारताने चीन बरोबर कायमची मैत्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे भारताच्या विरोधात जो धोका आहे तो कायमचा नष्ट होईल व भारताला आपलं सैन्य मोठ्या प्रमाणात कमी करता येईल व तोच पैसा विकासाकडे वळवता येईल. या साऱ्या इच्छा आहेत. पण हे होईलच असे नाही. पाकिस्तान कायम चीनला भारताविरुद्ध पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. ते होऊ द्यायचं नसेल तर भारताला एक संयमी भूमिका घ्यावी लागेल.  जी भारताने आजपर्यंत घेतली आहे. पाकिस्तानला देखील भारतीयांविरोधात पेटवण्यात यश आले नाही. ही आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची मोठी ताकद आहे. अलिकडच्या काळात संघर्ष देखील चीनबरोबर झाले पण हत्यार उचललेच नाही. ही बाब अत्यंत समाधानकारक आहे. हे दोन्ही देशांच्या फायद्याचे आहे. पाकिस्तानच्या द्वेष भावनेमध्ये चीनला घुसवण्याचा जो प्रयत्न आहे, तो हाणून पाडला पाहिजे आणि पाकिस्तानला एकटा पाडून भारताने पाकिस्तानला संपवलं पाहिजे. हे भारताचे उद्दिष्ट असलेच पाहिजे. कारण जोपर्यंत पाकिस्तान आहे, तोपर्यंत पाकिस्तानला भारताचे रक्त शोषण करायला नेहमीच संधी मिळत राहणार.

१९६१ला मुशर्रफ पाकिस्तान मिलिटरी अकॅडमी काकुल येथे दाखल झाला व पाकिस्तान सैन्यातील अधिकारी म्हणून त्याला कमिशन मिळाले. १९६५ च्या युद्धामध्ये त्यांनी SSG मध्ये भाग घेतला आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपलं इमेज बनवली.  नवाज शरीफने त्याला सैन्याचा प्रमुख म्हणून १९९८ ला नियुक्त केले. त्यावेळेला शरीफला वाटलं की एक मोहाजीरला सेना प्रमुख बनवणे हे फायद्याचे राहील व धोका काही नसेल.  मुशर्रफनी कारगिलमध्ये शरीफला न सांगता घुसखोरी केली व एक जबरदस्त सैनिक अधिकारी म्हणून आपली इमेज पसरवण्याचा प्रयत्न केला. पण या युद्धात भारतीय सैन्य अत्यंत शिताफीने आणि शौर्याने लढले व नवाज शरीफला भिक मागावी लागली अमेरिकेकडे, या युद्धातून वाचवा. शरीफने नंतर मुशर्रफला काढायचा प्रयत्न केला. त्यावेळी मुशर्रफने बंड केले व सत्ता ताब्यात घेतली. राष्ट्रपती म्हणून त्यांनी आपली सत्ता मजबूत केली. पुढच्या इलेक्शनमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग हे २००२ च्या निवडणुकीत विजयी झाले. पुढे जाऊन एक आधुनिक उदारमतवादी मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला.  त्यांनी स्त्रियांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला, पण कट्टरवादी मुस्लिम लोक व संघटन त्याच्या विरोधातच होते. त्याने अफगाणिस्तानमध्ये देखील दहशतवादी वाढवण्याचा प्रयत्न केला व स्वतःला अफगाणिस्तानमध्ये एक शक्ती म्हणून रुजवले. भारताबरोबर युद्ध झालं तर जी देशाला खोली लागते ती खोली निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यावेळी आयएसआयचा प्रमुख मोहम्मद अहमद यांनी मुशर्रफला प्रचंड साथ दिली. ज्या वेळेला अमेरिकेवर हल्ला झाला, त्यावेळी अहमद हा अमेरिकेतच होता. त्यावेळी अमेरिकेने त्याला खडसावलं, म्हटलं की पाकिस्तानने आता निर्णायक पाऊल उचलले पाहिजे. एक तर तुम्ही आमच्याबरोबर आहात, नाहीतर तुम्ही आमच्या विरोधात आहात असं आम्ही ठरवू. त्यावेळी मुशर्रफने अहमदला  अफगाणिस्तान मध्ये पाठवले होते व तालिबानशी चर्चा करून ओसामा-बिन-लादेनला अमेरिकेच्या हवाले करायचा प्रयत्न केला होता. तालिबानचा प्रमुख मुल्ला उमरला सांगितलं होतं की अमेरिके विरोधात जिहाद सुरू करा आणि पाकिस्तान तालिबानला पूर्ण मदत करेल. पण मुशर्रफने ते केलं नाही . त्यांनी मोहम्मदला सैन्यातून काढून टाकलं.

जुलै २००१ ला वाजपेयी साहेबांनी मुशर्रफला आग्र्याच्या बैठकीला बोलवलं. सुरुवातीला चांगली बैठक झाली. पण शेवटी शेवटी ती बिघडली. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या ऐवजी मुस्लिम फक्त स्टंट केले वेगवेगळी भाषण दिली. भारत पाकिस्तानला एक संधी होती शांतता कायमची प्रस्थापित करण्याची ती मुशर्रफनी धुडकावून लावली.  अमेरिकेला खुश करण्यासाठी काहीतरी करताना दाखवत होता. त्याच्यावर अनेकदा ठार मारण्याचे हल्ले झाले. एका पुलावरून जाताना रावळपिंडी येथे बॉम्बचा हल्ला झाला, पण २५ डिसेंबरला तो वाचला. मुशर्रफ पुल पार करून गेल्यानंतर बॉम्ब ब्लास्ट झाला. जैस-ए-मोहम्मद आणि अलकायद्याच्या आतंकवाद्यानी हा हल्ला केला.  मग त्यांनी भारताविरोधात युद्ध विराम जाहीर केला. जानेवारी २००४ मध्ये इस्लामबाद येथे सारखी बैठक झाली, तिथे पाकिस्तानने चर्चा करायचे मान्य केले. पण त्याचे पुढे काही झाले नाही.  लोकसभेवर हल्ला झाला, त्यावेळी भारत पाकिस्तान जवळ जवळ युद्ध झाले.

पुढच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या. त्यात मुशर्रफची प्रचंड बदनामी झाली. त्याने पाकिस्तानचे प्रमुख न्यायाधीश मोहम्मद चौधरी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावर काढून टाकले. १३ न्यायाधीशानी पाकिस्तानच्या प्रमुख न्यायाधीशाला २०.०२.२००७ ला परत घेतले. मग सेनादल प्रमुखाचा राजीनामा दिला. पण ते राष्ट्रपती म्हणून राज्य करत होते. त्यांनी पाकिस्तानचे संविधान बरखास्त केले व आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली. राष्ट्रपतीची इलेक्शन घेतली त्यात पुन्हा स्वतःला निवडून आणले. बेनझीर भुत्तोची हत्या झाली. लाल मशिदीवर आतंकवाद्यांनी कब्जा केला आणि प्रचंड गोंधळ झाला.  त्याचवेळी तहीरिकी तालिबान पाकिस्तान बनवला गेला. पाकिस्तान सरकार विरुद्ध संघर्ष टोकाला पोहोचला. पुढच्या इलेक्शनमध्ये सर्व राजकीय पक्ष त्यांच्या विरोधात उभे राहिले व त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा आरोप लावला. २०१३ ला त्यांनी परत राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला निवडणूक लढवू देण्यात आली नाही व त्यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. २०१४ ला ते आर्मीच्या मदतीने दुबईला पळून गेला. त्यांच्या विरोधात कायमची भूमिका पाकिस्तानने घेतली व शेवटी परदेशातच त्यांना आपला प्राण ठेवावा लागला.

पाकिस्तानची ही नेहमीची कर्म कहानी राहिलेली आहे. पूर्ण सत्ता खऱ्या अर्थाने पाकिस्तानमध्ये सैन्याकडेच आहे व नागरी सत्ता व लोकशाही ही नावापुरतीच आहे आणि जोपर्यंत पाकिस्तानमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भारताचा विरोध दाखवून सैन्यदल कायम सत्तेत राहणार आहे. सत्तेवर राहण्याचा एकच मंत्र आहे ‘भारत विरोध’. तसं भारतामध्ये ‘पाकिस्तान विरोध’ हा सर्व राजकीय पक्षाचा मंत्र आहे. म्हणून खऱ्या अर्थाने पाकिस्तान भारत संबंध सुधारणा दिसत नाही. एकमेकाला विरोध करण्याचे तत्त्वज्ञान हे दोन्ही देशाचे प्रमुख तत्त्वज्ञान आहे. भारतावर दहशतवादी हल्ले होत राहणार. युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहणार. पाकिस्तान संपेपर्यंत संघर्ष राहणार.

                                                                                  लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

                                                                                    वेबसाईट : www.sudhirsawant.com

                                                                                    मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS