पाकिस्तानला संपवा_४.३.२०२१

स्वातंत्र्य काळापासून भारताच्या उरामध्ये खुपून राहिलेला हा काटा आहे.  स्वातंत्र्यापासून काश्मिरवर हल्ला करून पाकिस्तानने द्वेषाची राजनीती सुरू केली ती आजपर्यंत बदलली नाही.  दुसरीकडे पाकिस्तानने भारताला नामोहरण करण्यासाठी अनेक तंत्र वापरले.  आंतरराष्ट्रीय संबंधात पाकिस्तानने लांब उडी मारली.  १९५९ मध्ये पाकिस्तानने अमेरिकेची भागीदारी स्विकारली व अमेरिकेचा मांडलिक देश म्हणून त्याने आजपर्यंत अमेरिकेच्या आदेशावरून कामगिरी चालू ठेवली.  आजपर्यंत पाकिस्तान हा अमेरिकेचा गुलामच आहे.  एवढेच नव्हे तर त्याचे अस्तित्व अमेरिकेमुळे आहे.  हे मी मिलेटरीच्या दृष्टिकोनातून बोलत नाही, तर आर्थिक दृष्ट्या पाकिस्तान अमेरिकेचा मांडलिक देश नसता तर छिन्नविछिन्न झाला असता  आणि म्हणूनच १९५९ ला शीत युद्धामध्ये शिटो करारामध्ये सामील होऊन अमेरिकेचा मांडडलिक देश झाला.  त्याउलट भारत अमेरिका किवा सोवियत संघाच्या बाजूला गेला नाही, पण गटनिरपेक्ष (Non aligned) राहिला. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला आपले मित्र राष्ट्र म्हणून वागवले. आज काय परिस्थिती बदललेली नाही.

          पाकिस्तानची ताकत आणि शक्ती आज देखील अमेरिकाच आहे.  अमेरिकेच्या तंत्रामध्ये भारताला एकटे पाडायचे होते, पण सुरुवातीला चीनने भारताला साथ दिली, म्हणून अमेरिकेने आपल्या गुप्त खात्यालाच विकत घेतले. इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख मुळीक हे चीनचे विरोधक होते आणि अमेरिकेचे मित्र होते.  तिकडे पंडित नेहरूच्या काळात ‘हिंदी चीनी भाई भाई’ असा नारा उठला.  एकत्रितच स्वतंत्र झालेले दोन्ही देश घनिष्ट मित्र होऊ लागले.  हे अमेरिकेला बघवेना, म्हणून पंडित नेहरूचे सुरक्षा सल्लागार मुळीक यांच्या करवी दोन्ही देशांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.  त्याचे परिवर्तन भारत चीन युद्धात झाले. याचे अत्यंत नुकसान भारताला सहन करावे लागले.  त्यावेळी जर आपण आठवले, तर चीन हल्ला करण्याच्या मनस्थितीत नव्हता.  चीनचे म्हणणे होते की आपण सीमेवरचा जो वादा आहे तो चर्चेने सोडवावा.  त्यावेळी अमेरिकेने पंडित नेहरू यांना अप्रत्यक्षपणे आपण मदत करतो, तुम्ही चीनसमोर नमु नका असे आश्वासन मुळीक यांच्या आधारे दिले होते.  पण युद्ध झाले तेव्हा अमेरिका फरार झाला. पाकिस्तानने चीनला भारताचे शत्रू करण्यामध्ये जोरदार प्रयत्न केले.  पाकिस्तान यशस्वी झाला, युद्ध झाले आणि चीन हे बलाढ्य राष्ट्र भारताच्या सीमेवर कायम शत्रु म्हणून उभे राहिले.  आज देखील तणावाची स्थिती आहे.  भारता विरुद्ध राजकीय कुरघोडी सुरू आहे.

          माझं मत ह्याच्यावर स्पष्ट आहे कि चीन विरुद्ध १९६२ जे युद्ध झाले त्यात भारताचा दारुण पराभव झाला.  आपल्या झालेल्या नुकसानीमुळे व त्या पराभवामुळे आम्हाला अपमानाचा बदला घ्यावासा निश्चित वाटतो.  कारण आमचे असंख्य सैनिक या युद्धामध्ये मारले गेले.  पण भावनेचा विषय बाजूला ठेवला तर आपण दोन्ही देशानी एकमेकाविरुद्ध उभे राहणे आणि लढणे यात दोन्ही देशाचे नुकसान आहे. त्यात पाकिस्तानचा प्रचंड फायदा आहे.  त्याचबरोबर अमेरिकेला सुद्धा दोन्ही देशांना झुंजवत ठेवायचा आहे, जर पाकिस्तानचा मनसुबा यशस्वी होऊ द्यायचा नसेल, तर चीनबरोबर सलोखा ठेवला पाहिजे व पाकिस्तानला आधी संपवले पाहिजे.

          यात आपण यशस्वी झालो नाही. १९७१च्या युद्धामध्ये आपल्याला माहित असेल की अमेरिकेने इंदिरा गांधीला धमकी दिली होती.  पाकिस्तान वर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य पाकिस्तानच्या बाजूने उभे राहील, असे बजावले होते. चीनला सुद्धा अमेरिकेने सांगितले की भारताच्या सेमीवर चीनने चीनच्या सैन्याची  जमवाजमव करावी व शक्य झाल्यास भारतावर हल्ला करावा. त्यामुळे बांग्लादेशची मुक्ति करणारी भारतीय सैन्य हे जायबंद होईल.  चीनने त्याला स्पष्ट नकारा दिला व १९७१ च्या युद्धामध्ये चीन तटस्थ राहिला. त्यामुळेच अवघ्या १३ दिवसात आपण पाकिस्तानचा पराभव करू शकलो.  त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की चीन भारताविरोधात उभा राहणार नाही म्हणून चीनला फिजवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आधी पाकिस्तान मग चीन.  हे धोरण भारताने ठेवले पाहिजे.   भारताने कधीच विसरू नये की पाकिस्तान हा अमेरिकेच्या सीटो कराराचा सदस्य आहे.  या करारात कलमे आहेत, त्यात कुठल्याही देशावर संकट आले तर उभयतांनी एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे गेले पाहिजे.  या करारामुळे १९७१ला अमेरिकन सैन्य भारतीय सैन्याविरुद्ध उभे राहिले.  पण रशियाबरोबर आपल्या मैत्रीचा करार इंदिरा गांधींनी केल्यामुळे रशियन पाणबुड्या आपल्या मदतीसाठी आल्या व अमेरिकन सातवा बेडा बंगालच्या महासागरात रोखून धरण्यात आला. हे आताच्या अमेरिकन प्रेमी लोकांनी विसरू नये. अमेरिका आपला प्रमुख शत्रू स्वातंत्र्यापासूनच आहे.  त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे – भारताचे तुकडे करायचे आणि म्हणूनच अनेकदा अमेरिकेने काश्मिरच्या प्रश्नावर पाकिस्तानची बाजू धरली आहे.  हे आपण विसरता नये की सिटो करार आपण विसरता कामा नये. सिटो करार अजूनही संपलेला नाही. याचे प्रत्यंतर आपल्याला कारगिल युद्धामध्ये आले. पाकिस्तानने आपल्या भूमातेचा लचका तोडला होता.  श्रीनगर ते लेह रस्ता तोडून टाकला होता.  भारतीय सैन्याने या संधीचा फायदा घेऊन पिकस्तांनामध्ये घुसण्याचा निर्णय घेतला होता.  हे अमेरिकेला माहिती झाले आणि भारतावर दबाव आणला की कुठल्याही परिस्थितीत पाकीस्तांनवर हल्ला करायचा नाही. या दबावाखाली भारत सरकाऱ नरम झाले व भारतीय सैन्याला हल्ला करण्यापासून बंदी घालण्यात आली.

          अमेरिकेचा सर्वात मोठा हल्ला भारतावर १९८० पासून ते १९९१ पर्यंत झाला आहे.  त्यावेळी रशियन सैन्य अफगाणिस्तानच्या मदतीला गेले होते.  यांच्या विरोधात अमेरिका आणि सौदी अरेबिया यांनी दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये निर्माण केले.  पाकिस्तानला प्रचंड हत्यारे दिली, आर्थिक मदत दिली आणि अफगाणिस्तान मध्ये रशियन सैन्याविरुद्ध लढायला लावले.  पण अमेरिकेने दुसरीकडे भारताविरुद्ध देखील या दहशतवादी टोळ्या वापरल्या.  आम्ही सैन्यात असताना अनेक फ्रंटवर लढायला लागत होते.  पंजाब मधील खालिस्तानी दहशतवाद, आसाम मधील दहशतवाद, काश्मिरमधील दहशतवादी आणि खतरनाक श्रीलंकेतील लिट्टे विरोधात जीवघेणा संघर्ष करावा लागला.  या सर्वाचा सूत्रधार जरी समोर पाकिस्तान दिसत असला, तरी मुख्यत: अमेरिकेचा होता. मी अमेरिकेत अनेकदा व्याख्याने द्यायला गेलो आहे आणि त्यांचे विचारवंतांचा दूरगामी प्रयत्न भारताची फाळणी करण्याचा दिसला.  भारत खंडप्राय देश आहे.  भारतामध्ये प्रचंड साधनसामुग्री आहे.  त्याहीपेक्षा अत्यंत हुशार मनुष्यबळ आहे.  भारत जर खऱ्या अर्थाने समृद्ध झाला, तर तो पुढच्या काळामध्ये अमेरिकेला आव्हान देणारा देश बनू शकतो आणि म्हणून भारताची फाळणी केली पाहिजे हे अमेरिकेचे स्पष्ट धोरण आहे. त्यामुळेच लोकशाहीचा प्रसार करण्याच्या नावाखाली अमेरिकेने पाकिस्तानच्या हुकूमशहांना मोठे केले.  अमेरिका-पाकिस्तान सैन्याला मोठेच करत आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही अमेरीकेने टिकू दिली नाही.  कारण हुकूमशहाणा हुकूम  देणे सोपे असते आणि सर्व पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी हे अमेरिकेतील सेना प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित झालेले आहेत.  इस्लाम तर फक्त नावासाठी वापरतात.  पण पूर्ण विचारसरणी आणि राहणीमान अमेरिकेच्या ‘सेक्स आणि शराब’ संस्कृतीमध्ये बनलेले आहे.  पाकिस्तानी अधिकारी कधी आपापसात उर्दूमध्ये बोलताना दिसत नाही.  त्यांची भाषाच इंग्लिश आहे, त्यांचे संस्कार अमेरिकन आहेत.  त्यांचा मनोवृत्तीचे पूर्ण परिवर्तन अमेरिकेने केले आहे आणि म्हणूनच पाकिस्तान आज अमेरिकेसाठी वाटेल ते करायला पुढे येतो.  त्यातला मुख्य भाग आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानला अमेरिकेच्या अधिपत्याखाली आणायचे आहे.  अफगाणिस्तानमध्ये अप्रत्यक्षपणे राज्य करायचे आहे.  सुदैवाने अफगाणी लोक हे पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात असतात आणि अफगाणी लोक हे भारताच्या बाजूने राहिलेले आहेत.  ही सर्व परिस्थिती ओळखून भारताने पाकीस्तानचा डाव उधळून लावला पाहिजे.  पाकिस्तान आणि अमेरिकेच्या दबावाखाली चीनला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.  मला वाटते भारत सरकारने ही बाजू ओळखून चीनविरुद्ध तणाव केला आहे व आपले संबंध सुधारण्याच्या दृष्टीने चीन बरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे.

(उर्वरित भाग -२ मध्ये)

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS