पौष्टिक भरडधान्ये_9.3.2023

आनंदी जीवनासाठी आरोग्य सर्वात महत्त्वाचे ठरते.  कितीही पैसा कमावला तरी त्याचे सुख मजबूत आरोग्य असल्याशिवाय मिळत नाही.  यासाठी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रथम आरोग्यावरच आम्ही भर दिला आहे.  त्यात सर्वात प्रथम पोषक आहार गरजेचा असतो. आधुनिक जीवनशैलीमध्ये वडापावची संस्कृती बाजूला करून भरडधान्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. पौष्टिक भरडधान्य (मिलेट) लहान व दाणेदार अन्नधान्य पिकांचे समूह आहेत. भरडधान्य प्रतिकूल हवामान परिस्थितींना अत्यंत सहनशील असतात.  बहुतेक भरडधान्य पिके ही मूळची भारतातील आहेत आणि मानवी शरीराच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहेत. पोषक घटक पुरवत असल्याने त्यांना ‘पोषक तृणधान्ये’ म्हणून ओळखले जाते. ज्वारी, बाजरी, नाचणी, कांग/राळा, वरी, कोदरा, भगर, वरई/सावा, कुट्टू, राजगिरा ही महत्त्वाची पोषक भरडधान्ये आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोषकतेचा दृष्टिकोन समोर ठेवून वरील भरडधान्यांचे महत्व अधोरेखीत केले आहे.

भारताने २०१८ हे वर्ष “भरडधान्य वर्ष” म्हणून साजरे केले आणि जागतिक अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मान्यता दिली.  संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २०२३ हे वर्ष  भरडधान्यचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. हे संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाद्वारे स्विकारण्यात आले, ज्यासाठी भारताने पुढाकार घेतला आणि त्याला ७० हून अधिक राष्ट्रांनी पाठिंबा दिला.

भरडधान्ये ग्लूटेन-मुक्त आणि गैर-एलर्जेनिक असतात. भरडधान्यांच्या सेवनाने ट्रायग्लिसराइड आणि सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन संतुलित राहते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळता येऊ शकतात. सर्व भरडधान्ये आहारातील तंतुमय पदार्थाने समृद्ध असतात. आहारातील तंतुमय पदार्थामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. हे आतड्यात अन्नाचा संक्रमणाचा वेळ वाढवते, जे आतड्यांसंबंधी दाहक रोगाचा धोका कमी करण्यास मदत करते आणि शरीरात डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून कार्य करते.

भरडधान्य हे पारंपारिक धान्य आहे. जे भारतीय उपखंडात गेल्या पाच हजार वर्षांहून अधिक काळ पिकवले आणि वापरले जाते. भरडधान्ये गवतवर्गीय कुटुंबातील लहान, दाणेदार व उबदार हवामानातील वर्षभर पिकणारी तृणधान्ये आहेत. पावसावर आधारित काटक धान्य आहेत. ज्यांना इतर लोकप्रिय तृणधान्यांच्या तुलनेत पाण्याची आणि सुपीकतेची कमी आवश्यकता असते. दुष्काळ आणि इतर प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये अत्यंत सहनशील आहेत.

ज्वारी, बाजरी,  नाचणी, कांग, वरई, वरी, भगर, कोद्रा/हरिक, राजगिरा ही भरडधान्ये पिके अत्यंत पोषक आहेत. भरडधान्य हे अत्यंत पौष्टिक, नॉन-ग्लुटिनस आणि अॅसिड नसलेले पदार्थ आहेत. भरडधान्य मध्ये अनेक पौष्टिक आणि आरोग्यास प्रोत्साहन देणारे गुणधर्म आहेत. भरडधान्य आपल्या कोलनला हायड्रेट करते, ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता होण्यापासून वाचवते. भरडधान्य मधील नियासिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. भरडधान्यमध्ये आहारातील फायबरसह मोठ्या प्रमाणात मुख्य आणि दुय्यम खनिज घटक असतात. भरडधान्य ग्लूटेन मुक्त असतात आणि सेलिआक रूग्णांसाठी गहू किंवा ग्लूटेन असलेल्या धान्यांसाठी पर्याय ठरू शकतो.

भरडधान्यामध्ये  पोषण आणि आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते. ते प्रथिने, सूक्ष्म पोषक आणि फायटोकेमिकल्सचा चांगला स्रोत म्हणून काम करतात. भरडधान्य मध्ये ७-१२% प्रथिने, २-५% चरबी, ६५-७५ % कर्बोदके आणि १५-२०% आहारातील फायबर असतात. भरडधान्यातील प्रथिनांचे अत्यावश्यक अमीनो ऍसिड प्रोफाइल मक्यासारख्या विविध तृणधान्यांपेक्षा चांगले असते. भरडधान्य जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांचे खूप चांगले स्त्रोत आहेत. भरडधान्यामध्ये कमी क्रॉस-लिंक केलेले प्रोलामिन असतात, जे भरडधान्य प्रथिनांच्या उच्च पचनक्षमतेमध्ये योगदान देणारे अतिरिक्त घटक असू शकतात.

तृणधान्य प्रथिनांप्रमाणेच, भरडधान्य प्रथिने हे लाइसिनचे कमी स्त्रोत आहेत, परंतु ते लाइसिन-समृद्ध भाज्या (शेंगायुक्त) आणि प्राणी प्रथिने यांच्याशी उत्तम प्रकारे पूरक आहेत. जे उच्च जैविक मूल्यांचे पौष्टिकदृष्ट्या संतुलित संमिश्र तयार करतात. लहान भरडधान्ये फॉस्फरस आणि लोहाचा चांगला स्रोत आहेत. वृद्धत्व आणि चयापचय रोगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सर्व भरडधान्यमध्ये  जास्त प्रमाणात  अँटिऑक्सिडेंट असतात.

भारतामध्ये पुढीलप्रमाणे प्रमुख भरडधान्ये आढळतात. ज्वारी, बाजरी, नाचणी यामध्ये  भरपूर प्रमाणात लोह, जस्त, प्रथिने तसेच लिपिड्स मोठ्या प्रमाणात असतात. तसेच भारतामध्ये काही दुय्यम भरडधान्य म्हणजे कांग/राळा, कोद्रा/हरिक, सवान/भगर, वरई/ सावा, वरी इ. असून त्यामध्ये कर्बोदक, लोह, प्रथिने आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तसेच राजगिरा, बकव्हीट (कुट्टू) ही प्रामुख्याने आढळणारी स्युडो मिलेट आहेत. यामध्ये प्रथिने व ब, क आणि इ जीवनसत्वांचे प्रमाण जास्त असते.

गहू आणि तांदळाच्या तुलनेत भरडधान्ये खनिज सामग्रीच्या बाबतीत समृद्ध आहेत. नाचणी मध्ये असेलेली प्रथिने अद्वितीय आहेत. कारण त्यात मुबलक प्रमाणात सल्फर समृद्ध अमीनो अॅसिड असतात. भरडधान्ये त्यांच्या पौष्टिक रचनेत तांदूळ आणि गहूंपेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणूनच बहुसंख्य भारतीय लोकसंख्येला प्रभावित करणार्‍या कुपोषणावर उपाय आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आणि उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह यांसारख्या जीवनशैलीतील आजारांच्या घटना कमी करण्यासाठी भरडधान्ये हा एक व्यवहार्य पर्याय आहे. भरडधान्यामध्ये अनेक पौष्टिक आणि आरोग्यास प्रोत्साहन देणारे गुणधर्म आहेत, विशेषत: जास्त फायबरचे प्रमाण.

भरडधान्ये ग्लूटेन-मुक्त, अत्यंत पौष्टिक आणि आहारातील फायबर समृद्ध आहे. ते कॅल्शियम, लोह, फॉस्फरस इत्यादींसह सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहेत. त्यांच्यात ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी आहे.  कारण त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये मोठी वाढ होत नाही. भरडधान्ये हा आपल्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग असावा. भरडधान्यामध्ये असलेल्या फायबरमुळे पाणी शोषून घेण्याची क्षमता  असते. जे आतड्यांसंबंधी दाहक रोगाचा धोका कमी करण्यास मदत करते आणि शरीरात डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून कार्य करते.

भारतामध्ये भरडधान्य क्षेत्रामध्ये वाढ  करणे आवश्यक आहे.  तसेच सातत्याने भरड धान्याचा संतुलित आहार सेवन करून कुपोषित मुक्त भारत निर्माण करणे गरजेचे आहे. यावर्षी अनेक शेतकर्‍यांना एकत्र घेऊन जागतिक स्तरावर भरडधान्य लागवड अभियानाचे उद्दीष्ट ठेवणात आले आहे.  या अभियानामध्ये शेतकरी, शास्त्रज्ञ व विस्तार कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जनजागृती करावी.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS