भारताचा यौद्धा हरपला_9.12.2021

१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धाची सुवर्णजयंती आपण साजरी करत असतानाच अचानक चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.  देशातला सर्वात प्रथम सैनिक अशाप्रकारे आपल्याला गमवावा लागला. टेलिव्हिजनवर तात्काळ सांगताना मी बोललो की यात दहशतवाद्यांचा हात असू शकतो. हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाला किंवा वैमानिकाच्या काही चुकीमुळे हेलिकॉप्टरचा अपघात होऊ शकतो.  पण अशा बाबतीत वैमानिकाचा काहीतरी संदेश येतो. ह्या बाबतीत मिग-१७ अत्यंत सर्वश्रेष्ठ हेलिकॉप्टर आहे. त्या हेलिकॉप्टर बद्दल कोणाला शंका नाही. त्यात अपघात होण्याची शक्यता फार कमी आहे.

म्हणूनच घातपाताचा संशय येतो. सिल्लोन ते वेलिंग्टन फक्त ३५ मिनिटांचा हवाई प्रवास आहे. त्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रवास होत असताना, अचानक स्फोट व्हावा व विमान हवेतच गारद व्हाव, ही बाब कल्पने बाहेरील आहे. अपघाताच्या आधी कुठल्याही पद्धतीचे संभाषण हेलिकॉप्टर चालक  आणि इतरांबरोबर झालं नाही. त्यामुळे घातपाताचा संशय येणे साहजिक आहे. आता ब्लॅक बॉक्स तर मिळाला त्यातून बरीचशी माहिती मिळणार आहे.  पण ही माहिती मिळेपर्यंत अपघात पाहता त्याबद्दल चौकशी न करणे हे योग्य ठरणार नाही. कारण भारताचा एक अत्यंत कर्तुत्ववान धाडसी योद्धा ह्या अपघातात गेला आहे. यामध्ये प्रत्येक शत्रूचा हात असू शकतो.  हे गृहीत धरणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच मी NRA द्वारे चौकशी तात्काळ सुरू करण्याची मागणी केलेली आहे.

दुसरीकडे हा भाग आहे तो विरपनचा भाग आहे. राजीव गांधीची हत्या करणारे तामिळ वाघ यांचे समूळ उच्चाटन करण्यात आले. त्यांना त्यांच्या घरातून हाकलून लावण्यात आले. आता ते वाघ सुडाने पेटलेले आहेत आणि जिथून हेलिकॉप्टर निघाले त्या भागात मोठ्या प्रमाणात हे लोक आहेत. घातपात करण्याची त्यांची मोठी क्षमता आहे. तामिळ वाघाने आत्मघातकी पथक निर्माण केली.  त्यातून बॉम्ब ब्लास्टचा अत्यंत उच्चांक गाठला. तामिळ वाघाचा पाक आयएसआय बरोबर सुद्धा जवळचा संबंध आहे.  त्यामुळे या बाबीकडे लक्ष पुरविणे हे कर्तव्य आहे असे मला वाटते आणि म्हणूनच घातपात झाला की काय याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्याबाबत चौकशी भारतीय सेना करेल.  पण ते आतंकवादी विरोधी काम करणाऱ्या दलानी सुद्धा चौकशी करावी, हे क्रमप्राप्त ठरेल.

जनरल रावत आणि माझा संबंध अनेकदा आला. जनरल रावत हे आमच्यासारखेच  पायदळाचे आहेत व दहशतवादा विरोधात लढ्यामध्ये आघाडीची भूमिका घेतली आहे.  त्यांनी उडीमध्ये कंपनी कमांडर म्हणून काम केले. एका पायदळाचा अधिकारी याप्रमाणे भारतातील सर्व फ्रंटवर त्यांनी काम केले आहे. भारताचे पहिले सी. डी.एस. म्हणजे चीफ ऑफ द डिफेन्स स्टार स्टाफ (CDS) म्हणून त्यांची नेमणूक झाली.  भारताच्या इतिहासातील हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. आतापर्यंत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे तिन्ही दल वेगवेगळे काम करत होते. त्यांना एकत्र करून आदेश देणारी तशी कुठलीच शक्ती नव्हती. त्यामुळे युद्धाच्या मैदानामध्ये बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण झाला आहे. माझी हयात सैन्यात गेली. त्या दरम्यान एक कुणीतरी असा असावा जो तिन्ही दलाचा कमांडर असावा.  अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. पण सरकारने ते केले नाही.  शेवटी २०१९ ला सरकारने बिपिन रावत यांची CDS म्हणून नेमणूक केली. 

सर्व दलाने एकत्र काम एका कमांडरच्या हाताखाली करण्याची पहिलीच वेळ.  लोकांचा विरोध होता. पण जनरल रावत यांनी तो जुमानला नाही. ते म्हणाले कि वायुदल हे सैन्याला मदत करण्यासाठी असते, जसा तोफखाना आहे. पायदळ जेव्हा हल्ला करते त्यावेळेला शत्रूवर तोफांचा भडीमार करून तिचे डोके खाली दाबण्याचे काम तोफखाना करतो. त्याचप्रमाणे वायुदलाचे पण काम आहे. हे काय वायुदलातील लोकांना आवडले नाही. नौदलाला विमान वाहक जहाज घ्यायचे होते, पण तो प्रस्ताव जनरल रावत यांनी रद्दबातल करून टाकला. तिन्ही दलाला एकसंघ करण्याचा प्रयत्न जनरल रावतचा नेहमी राहिला होता. त्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट असायची आणि आपले मत ते धाडसाने मांडायचे.

CDS झाल्यानंतर सैन्यदलाची विभागणी सुद्धा वेगवेगळ्या थेटर मध्ये करण्यात आली.  प्रत्येक थेटरमध्ये सुद्धा वायुदल, नौदल आणि सेनादल एका कमांडखाली आणण्यात आले. कारण हल्ला करताना पूर्ण थेटर कमांडने एकत्र काम केलं पाहिजे.  त्याला सुद्धा वायुदलाचा आणि नौदलाचा विरोध होता. पण जनरल रावतांनी सगळ्यांना एकत्र केले. माझ्या बैठकीमध्ये मी त्यांना विनंती केली होती की परदेशातून हत्यार भारतात आणण्याची ही फॅशन झाली आहे, ती बंद झाली पाहिजे. माझी अजिबात अपेक्षा नव्हती कि,  जनरल रावत त्याच्यावर काही करतील पण त्यांनी सर्व दलाना ताकद दिली.  जास्तीत जास्त हत्यारे भारतात बनली पाहिजेत आणि मी मेक इन इंडियाला खरी दिशा दिली. त्याचाच परिणाम म्हणजे अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता एस ४०० क्षेपणास्त्र रशियाकडून भारतात आले. रशिया कडून हत्यार घेण्याचा फायदा हा असतो की रशिया पूर्ण तंत्रज्ञान भारताला देते आणि हत्यारांचे उत्पादन भारतात होते. जसे राफेल बद्दल झाले नाही. राफेलची अक्की विमानच घ्यावी लागतात. त्याचे उत्पादन भारतात होत नाही आणि होणार नाही हा दुर्दैवी भाग आहे. पण जनरल रावत यांच्या नेतृत्वाखाली हत्यारे देशात बनायला लागली आहेत आणि जरी परदेशातून आली तरी त्याचे उत्पादन भारतात होत आहे. 

जनरल रावत हे बुरसटलेल्या विचाराचा कधीच कदर करत नव्हते. बदल अंगीकृत करण्यासाठी त्यांनी सर्वांना सवय लावली. हे स्वतःच्या आदेशावर जरी ठाम असले तरी दुसऱ्याचं ऐकून घेत असत आणि ऐकल्यानंतर आदेश देत असत. २०१५  ला सुद्धा भीमापूर येथे एका अपघातापासून जनरल रावत वाचले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण खात्यात नव्याने एक सैन्यदलाचा विभाग निर्माण झाला.  त्याचे ते सेक्रेटरी पण होते.  त्यांना सर्व भागांमध्ये लढण्याचा अनुभव होता.  गुरखा रेजिमेंटमध्ये ते १९७८ साली अधिकारी झाले. मी कमांडो इंस्ट्रक्टर असताना पहिल्यांदा ते मला भेटले होते.  तेव्हापासून त्यांच्याबरोबर अनेकदा संपर्क आला. ते काश्मिरमध्ये आर.आर.चे प्रमुख सुद्धा होते.  त्याच बरोबर उरी डिव्हिजनचे कमांडर सुद्धा होते.  त्यावेळेला आम्ही दहशतवाद्यांना सैन्यात घेतले व ८००० चे सैन्य बनवलं आणि जास्त करून त्याचा वापर लढाऊ विभागात झाला होता.  त्यावेळेला सैन्याचा अत्यंत चांगला उपयोग करून जनरल रावत यांनी आम्हाला हे नवीन सैन्य उभे करायला मदत केली.

जनरल रावत यांना सैन्यदल प्रमुख बनवताना त्यांच्यापेक्षा दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून सैन्यदल प्रमुख बनवले होते. म्हणून ते बीजेपी धार्जिणी असल्याचे आरोप त्यांच्यावर सातत्याने झाले. प्रत्येक सैनिकाला राजकीय मत असतेच. कारण इतर नागरिकाप्रमाणे ते सुद्धा समाजाचा एक अंग आहेत. पण जनरल रावत यांनी ते कधीच कामात प्रकट केले नाही. उलट त्यांचे सासरे काँग्रेसचे आमदार होते.  त्यामुळे सैनिक अधिकाऱ्यांवर राजकीय हस्तक असल्याचा आरोप कोणी करू नये. 

जनरल रावत यांचा मृत्यू फारच धक्कादायक आहे. सैन्यदलाचे नव निर्माण होत असताना ते गेले. आता तिन्ही दलांना एकसंघ करण्याचे काम नवीन व्यक्तीवर येऊन पडले आहे. अजून तिन्ही दलात एकवाक्यता  येणे बाकी आहे. अशावेळी CDS अत्यंत महत्त्वाचे स्थान भूषवित होते. आता पुन्हा नवीन माणसाला सुरुवात करावी लागणार व भारतीय सैन्याला दिशा द्यावी लागणार. हा निर्णय योग्य होईल अशी आशा करुया.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS