भारतातील आरोग्य आणि कोरोना_९.७.२०२०

कोविड-१९ ने भारताला जबरदस्त धक्का दिला आहे. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या नावावर १९९१ पासून भारताची आरोग्य व्यवस्था उखडून काढण्यात आली आहे. GDP च्या १.२% आरोग्यावर खर्च करून सरकार कोरोनावर मात करण्याची भाषा करत आहे.  सरकार लोकांना सांगत आहे कि काही काळजी करू नका, भारताकडे सर्व व्यवस्था आहे, त्यामुळे कोरोनावर नियंत्रण करण्यात येईल. हे सर्व बोलत असताना आपण विसरतो कि भारतीय आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या आधीच उदध्वस्त झाली आहे. आता कोरोना गाव-खेड्यात पोहोचला आहे.  लोक हवालदिल झाले आहेत. त्यात सडलेल्या आरोग्य व्यवस्थेचे दर्शन होत आहे.

            सरकारी अहवालाप्रमाणे, भारत १८५ देशात १५४ व्या जागेवर आरोग्य व्यवस्थेत आहे. भारतातील डॉक्टर्सचे लोकसंख्या प्रमाण १ डॉक्टर मागे १६५५ लोक असे आहे व who १:१००० असे प्रमाण निर्धारित केले आहे.  भारताच्या सरकारी क्षेत्रात १ डॉक्टर सरासरी ११००० लोकांच्या पाठीमागे आहे.  बिहार सारख्या गरीब राज्यात १ डॉक्टर २८००० लोकांच्यासाठी आहे.  तर राजधानी दिल्लीमध्ये १ डॉक्टर २२०० लोकांच्यासाठी आहे.  खाटे मागे लोकसंख्या प्रमाण सरासरी १००० लोकांच्या पाठी ०.५आहे, जे WHOने प्रति १०००च्या पाठी ३.५ च्या सूचनेच्या विरूद्ध आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती खूपच गंभीर आहे. सुमारे ६० टक्के भारतीय आरोग्य सेवा ही खाजगी नफा मिळविणार्‍या लोकांच्या हाती आहे, जे लोकांच्या आजारांपासून फायदा घेत आहेत.

            जगातील लोकसंख्येच्या  २५% गरीब भारतात राहतात. त्याचबरोबर, जागातील सर्वात जास्त अति भूकेलेले लोक भारतात राहतात.  यामुळे रोगराई पसरायला वेळ लागत नाही. रोगराईचा  प्रतिकार करणे तर दूरच राहिले. जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अंदाजाप्रमाणे १४.५% म्हणजेच १९.५ कोटी लोक भारतात कुपोषित आहेत.  हे तर फक्त शासकीय आकडे आहेत. खरे तर वेगळेच आहे.  मुलांमध्ये ७०% मृत्यू भुकेमुळे होतात. ५०% लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. प्रदूषण आता गावामध्येही पोहचले आहे. विषारी फवारणी, कारखान्याचे आणि गाड्यांचे प्रदूषण आरोग्यावर प्रचंड विपिरीत परिणाम करू लागले आहे. विषारी अन्न, विषारी आणि भेसळ औषधे यामुळे गरीब एकवेळ भुकेवर मात करू शकले तरी रोगराई आणि अन्न-पाण्यामुळे आजारी पडतात.  रासायनिक खते, किटकनाशके, अन्नात भेसळ. रासायनिकरित्या उत्पादन वाढणारे मटन, दुध, घाणरडे तेल, रस्त्यावरचे अन्न.  The Centre for Science and Environment Delhi  प्रमाणे, २० लाख लोकांना जगात हगवण होते. ती भेसळ अन्न आणि पाण्यामुळे होते. त्यात दक्षिण  आशियामध्ये ७ लाख लोक आहेत.

            आरोग्य सेवा मिळणे हे भारतात गरीब, श्रीमंत, मध्यम यांना वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. त्यात प्रचंड विषमता आहे.  गरिबांच्या घरात एक मोठा आजार झाला तर ते खाजगी रुग्णालयात जातात, कारण सरकारी हॉस्पिटलात सुविधा नसते. माझ्याच बाबतीत हे झाले. सरकारी जे.जे. रुग्णालयात पित्ताशयाच्या आजारात मी दाखल झालो. मी साधारणत: सरकारी दवाखान्यातच जातो. पण जे.जे. रुग्णालयाने  मला खाजगी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कारण ती शस्त्रक्रिया सरकारी हॉस्पिटलात होत नाही. त्याला रु.३ लाख खर्च आला.  माझा विमा होता म्हणून मी वाचलो. सामान्य माणसाला हे कसे परवडणार?  आजारी पडणे म्हणजे कर्जबाजारी होणे. आयुष्यभर कर्ज परत फेड करणे, नाहीतर आत्महत्या करणे हाच पर्याय गरिबांकडे  राहतो.  श्रीमंताना घरात आणि घरभर चांगल वातावरण आणि आरोग्य सोयी मिळतात. श्रीमंत नैसर्गिक अन्न महागडे असले तरी वापरतात. गरीब रस्त्यावरचा वडापाव, पोळीभाजी खाऊन जगतो. त्यामुळे, गरिबांची रोग प्रतिकार शक्ती नष्ट होते. भारतीय महिला ८०% anemic आहेत. म्हणून मुलाला जन्म देताना अत्यंत त्रास होतो.  मुल सुद्धा कुपोषित जन्मतात. त्यात अनेक औषधे घ्यावी लागतात तो खर्च वेगळाच.

            ग्रामीण शेतकरी आणि त्यांचे कुटुंब धोकादायक किटकनाशक  आणि कारखान्यातील नदीत सोडलेले प्रदूषित पाणी वापरतो. हे फारच धोकादायक आहे.  अशा वातावरणामुळे देशात कॅन्सरचा प्रसार प्रचंड प्रमाणात झाला आहे. जास्तीत जास्त रासायनिक खते आणि किटकनाशक  वापरणारे पंजाब- हरियाणामध्ये, तसेच महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. समृद्ध पंजाबमध्ये कॅन्सरचा उपचार नाही. त्यामुळे तिथून बिक्नेर, मुंबईला कॅन्सरच्या ट्रेन येत राहतात.

            सरकारी हॉस्पिटल खूपच गलिच्छ आहेत.  तिथे लोकांना जनवारांसारख वागवल जात. बहुतेक ईमारती पडायला आलेल्या आहेत. भ्रष्टाचारामुळे सरकारचा पैसा पोहचत नाही.  जसे २०१७ ला गोरखपूरमध्ये ६३ मुले श्वास कोंडून मृत्यूमुखी पडली. ८०% प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिक्षित डॉक्टर नाहीत.  ग्रामीण भारतातील लोकांना मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी गेल्याशिवाय उपचार होत नाहीत. तिथे लोकांचे किसे कापले जातात. भारतातल्या १० लाख डॉक्टर पैकी फक्त १ लाख डॉक्टर सरकारी क्षेत्रात काम करतात.  वैद्यकीय शिक्षणावर प्रचंड पैसा खर्च केल्यानंतर तो पैसा परत मिळविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केला नाही तर नवलच.  पण खाजगी हॉस्पिटलमध्ये लोकांना अधिक आजारी बनवलं जात आणि मग उपचार केले जातात.  त्यात प्रचंड पैसा खाजगी डॉक्टर कमवतात.  नंतर स्थानिक पोलिसांना व गुंडांना वापरुन पैसा वसूल केला जातो.  त्यात अवयव विक्रीचा धंदा देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.

            अंबानी, टाटा, बिर्ला, अडाणी सारख्या लोकांनी धर्मादाय कामाच्या नावावर सरकारी जमीन ताब्यात घेऊन हॉस्पिटल उघडली आहेत.  पण गरीबांवर क्वचितच तेथे  उपचार होतात.  त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय व राजकीय स्थरावर अनेक संस्था या औषधांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करत भारतात घुसल्या आहेत आणि प्रचंड पैसा कमवत आहेत. आताच कोरोनाकांडात अनेक खाजगी हॉस्पिटल लोकांना लुटत आहेत.  खाजगी आरोग्य माफियाला नियंत्रित ठेवणे सरकारला शक्य होत नाही.  औषधामध्ये प्रचंड काळाबाजार होत आहे.  गरीबांना औषधे फुकट मिळाली पाहिजेत, पण ती कधीच मिळत नाहीत.  हॉस्पिटलच्या बाजूला खाजगी औषधांची दुकाने असतात.  लोकांना औषधे तिथून विकत घ्यावी लागतात. 

            एकंदरीत परिस्थिती भयानक आहे. म्हणून कोरोनावर नियंत्रण करण्यास आपण साफ अपयशी ठरलो आहोत.  आरोग्यावर गेली ३० वर्षे GDP च्या ६% खर्च झाला असता तर आज सर्वांना मोफत आरोग्य सेवा मिळाली असती. पण १९९१ नंतर सरकारी धोरणातून गरीब, शेतकरी, कामगार, सैनिक यांना बाजूला काढण्यात आले व भारताला पुन्हा ‘शायनिंग इंडिया’ म्हणजेच ‘श्रीमंतांची इंडिया’ बनविण्यात आले.  घटना कलम २१ प्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार या भारतात प्रत्येकाला आहे.  म्हणून मोफत आणि चांगली आरोग्य सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष दुर्लक्ष झाल्यामुळे सरकारी आरोग्य सेवा कोलमडून पडलेली आहे. त्याला उभ करायचं असेल तर सरकारचा आणि लोकांचा प्रचंड निर्धार असला पाहिजे.  नाहीतर कोरोनाच्या कचाट्यात सापडलेला भारतीय नागरिक हा उभा राहू शकणार नाही.  कोरोनाबरोबर बेकारीची कुर्‍हाड गरिबांवर इतक्या तिव्रतेने पडली आहे की अनेक लोक त्यात नष्ट होत आहेत. राजकीय नेत्यांना भाषणे करणे फार सोपे असते, गरिबांचे अश्रु पुसण्याचे काम करणे फार कठीण आहे. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये भारताला या संकटातून बाहेर काढण्यासाठी खर्‍या परिस्थितीकडे पाहून योग्य पावले उचलली गेली पाहिजेत, नाहीतर एकदा लॉकडाऊन लावायचा, पुन्हा उठवायचा, पुन्हा लावायचा या द्रुष्ट चक्रात सापडलेला सामान्य माणूस पुन्हा उठू शकणार नाही.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS