भारतीय सेना हिच भारताची शक्ती (भाग -१)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. या ७५ वर्षात भारताचा स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवण्यामध्ये भारतीय सैन्याला प्रचंड यश आले आहे. परकीय शत्रूपासून असू दे किंवा अंतर्गत बंडाळी पासून असू दे, भारतीय सैन्याने कधीही देशाला निराश केले नाही. त्याशिवाय अनेक नैसर्गिक आपत्ती विरोधात भारतीय सैन्याने देशाला सावरले आहे. जिथे सर्वजण अपयशी ठरतात तिथे भारतीय सैन्य यशस्वी होते. देशाची अंतिम शक्ती म्हणजे भारतीय सैन्य आहे. यदा कदाचित भारतीय सैन्य अपयशी झाले तर तो देशाचा अंत असेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. याची जाणीव ठेवूनच सरकारने आणि जनतेने सैन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. भारतीय सैनिकांना तुमची खोटी सहानभूती नको आहे, पण या देशांमध्ये सैन्याला सन्मान हा मिळालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे.

            भारतीय सैन्याचे प्रथम काम, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता आहे. परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे व अंतर्गत धोक्यापासून देशाचे संरक्षण करून,  देशांमध्ये शांती प्रस्थापित करणे, ही प्राथमिक कर्तव्ये सैन्याने पार पाडली आहेत.  राष्ट्रीय शक्तीचा सैन्य हा फार मोठा भाग आहे. गेली अनेक वर्ष भारतीय सेना, नौदल आणि वायुदल चार युद्ध पाकिस्तान बरोबर व एक चीन बरोबर लढले आहे. भारतीय सैन्यात दाखल व्हायला कुणाची जबरदस्ती नसते.  जे स्वतःहून पुढे येतात त्यांना सैन्यात घेतले जाते. भारतीय सैन्यामध्ये १२,३७,११७ खडे सैन्यदल आणि ९,६०,००० राखीव सैन्यदल आहे. डोंगराळ भागात जंगलात फक्त पायदळ महत्वाचे ठरते. पूर्ण हिमालयाचा पट्टा, उत्तर पूर्व जंगली राज्य, पायदळावर अवलंबून असतात. म्हणून आता सैन्याच्या आधुनिकीकरणामध्ये सैन्याने सैनिक आधुनिकीकरण व्यवस्था निर्माण केली आहे. त्यात प्रत्येक सैनिकांकडून आधुनिक हत्यारे, रेडिओ, हात बॉम्ब, रात्रीची बघण्याची उपकरणे व रायफल, सुलभ ड्रेस आणि पॅक, चीलखती कपडे आणि हेल्मेट. चालता चालता सैनिक सर्व काम करू शकतो.  तसेच रणगाडे, तोफखाना आणि विमाने नावीन्यपूर्ण आणि आधुनिक बनवण्यात येत आहेत. १५ जानेवारी हा ‘सेना दिवस’ मानला जातो. कारण लेफ्टनन जनरल करिअप्पाने त्या दिवशी १९४९ साली  भारताचे पाहिले सरसेनापती पद स्विकारले . त्यांनी ब्रिटिश जनरल फ्रान्सिस बुचर कडून ताबा घेतला.

            स्वातंत्र्यानंतर काश्मिर वरून भारत पाक घामासान लढाई झाली. काश्मिरचे राजे हरिसिंग यांना स्वतंत्र काश्मिर पाहिजे होता आणि त्यांनी म्हणून भारताबरोबर येण्याचे नाकारले होते. त्याच वेळेला पाकिस्तानला काश्मिर पाहिजे होते. म्हणून २२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानी टोळ्यांनी हल्ला केला. जवळजवळ श्रीनगर पर्यंत पाकिस्तानी टोळ्या पोहोचत होत्या.  तेव्हा महाराजा हरिसिंगने भारताकडे मदत मागितली आणि भारतात सामील होण्याचे मान्य केले. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी सैन्य मदतीला पाठवले. भारतीय सैन्यांनी अतुल्यनीय शौर्य दाखवून पाकिस्तान सैन्याला व टोळ्यांना मागे ढकलत नेले व जवळजवळ आताच्या लाईन ऑफ कंट्रोल पर्यंत मागे ढकलले. त्यातच युनोच्या मध्यस्थीने  युद्धविराम करायला दोन्ही देशांना भाग पाडले. युद्ध विराम झाला नसता तर भारतीय सैन्याने पूर्ण पाक व्याप्त काश्मिर जिंकला असता. हा प्रश्न युनो मध्ये सोडवण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिले. पण तसे काही झाले नाही आणि आतापर्यंत काश्मिरचा प्रश्न रेंगाळतच राहिलेला आहे.  त्याच्यानंतर १९६५ आणि १९७१ च्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने युद्ध विराम रेषेच्या पलीकडे जाऊन कारगिल भागात बराचसा भाग परत मिळवला.  पण पाक व्याप्त काश्मिर अजून अस्तित्वात आहे आणि दोन्ही देशांमध्ये संघर्षाचे मूळ आहे. 

            पुढे जाऊन भारतीय सैन्याने  हैदराबाद आणि गोव्यावर सहजपणे कब्जा केला. त्यानंतर कोरियन युद्धामध्ये भारतीय सेना शांतता राखण्यासाठी तिथे गेले. जनरल थोरात यांच्या नेतृत्वाखाली तिथे उत्तम कामगिरी केली.  तेवढ्यात चीन भारत युद्ध १९६२ ला सुरू झाले. अकसाई चीन आणि अरुणाचल प्रदेश वर भारताचे सार्वभौमत्व सिध्द करण्यासाठी हे युद्ध झाले. अकसाई चीन हा काश्मिरचा भाग म्हणून भारताने आपला दावा सिद्ध केला आहे. पण चीन सुद्धा हा सिंक्यान भाग असल्याचा दावा करत आहे. त्यातच चीनने तिबेटला जोडण्यासाठी या भागात मोठा रस्ता बनवला आहे. हे युद्धाचे एक कारण झाले. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश मध्ये मॅकमोहन लाईन आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचा भारताने दावा केला आहे. हे चीनला मान्य नाही. हा वाद मिटविण्यासाठी फार काही चर्चा झाली नाही. व चीनने हल्ला केला.  भारतीय सैन्याने सुद्धा प्रचंड संघर्ष केला. आखरी गोली आखरी सैनिक तक हम लढे. पण त्यात मोठे यश आले नाही व चीनने आपल्या भूमीचा लचका तोडला व मग माघारी गेले. हा पराभव भारतीय सैन्याच्या जिव्हारी लागलेला आहे. म्हणूनच भारतीय सैन्याने आज पूर्ण तयारी केलेली आहे. व पुढच्या काळात भारत चीनला एक जबरदस्त टक्कर देऊ शकतो.

            १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध हे काश्मिर आणि पश्चिम सीमेवर झाले. दुसर्‍या महायुद्धानंतर हे सर्वात मोठे रणगाड्यांचे युद्ध म्हणून समजले जाते. एप्रिल १९६५ ला ऑपरेशन जिब्रायटरच्या नावाखाली  पाकिस्तानने काश्मिरमध्ये घुसखोर पाठविले. पण तिथल्या नागरिकांनी त्यांना प्रचंड विरोध केला.  पाकिस्तानच्या अपेक्षेप्रमाणे काश्मिरी लोकांनी भारताविरोधात उठाव केला नाहीच पण घुसखोरांना जागोजागी ठेचून मारले. शेवटी पाकिस्तान सैन्याने सप्टेंबर १९६५ मध्ये हल्ला केला. जम्मू काश्मिर आणि पंजाब मधील हल्ला भारतीय सैन्याने यशस्वीपणे रोखून ठेवला व प्रतिहल्ला पण चढवला.  १७ दिवसाच्या या युद्धात दोन्ही बाजूची हानी झाली व अचानक ताश्कंद करार झाला आणि शस्त्र संधी झाली.  १९६५ च्या युद्धामध्ये कोण जिंकले कोण हरले याचे मोजमाप करता येणार नाही पण निश्चितपणे भारताला उत्तम संधी होती पण युद्धविराम झाल्यामुळे निर्णायक लढाई झाली नाही.

            १९७१ च्या युद्धाला पन्नास वर्षे होत आहेत.  या युद्धामध्ये भारताला निर्णायक विजय मिळाला.  बांग्लादेश स्वतंत्र झाला आणि जवळजवळ ९०००० कैदी भारताने बांग्लादेश मध्ये पकडले.  काश्मिरमध्ये देखील हाजीपीर युद्धानंतर हाजीपीर परत द्यावा लागला.  पण कारगिल आणि तुरतुक येथे मोठा विजय झालेला आहे आणि युद्धानंतर ती सर्व भूमी भारताकडे राहिली, म्हणून १९९९ च्या कारगिल युद्धामध्ये घनघोर लढाई झाली असताना या भागामुळे पाकिस्तानला बटालिक आणि तुरतुक भागात येता आलं नाही.  आणि पाकिस्तानला परत ढकलून देण्यात आले.  अतुलनीय शौर्य दाखवून भारतीय सैन्यांनी कारगिल मध्ये घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला पराभूत करून परत ढकलून दिले.  याशिवाय अनेक छोट्या मोठ्या लढाईमध्ये भारतीय सैन्याला भाग घ्यावा लागला. जेव्हा भिंडर्ंनवाल्यांनी खालीस्थानची चळवळ उभी करून सुवर्ण मंदिराचा कब्जा केला होता.  त्या सुवर्ण मंदिरांमधून दहशतवादी काढण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करण्यात आले व दहशतवाद्यांना तिथून उखडून टाकण्यात आले.

            त्याचवेळी भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवली व शांती झालीच नाही.  त्याच्या उलट घनघोर युद्धाला सामोरे जावे लागले.  त्यात भारतीय सैन्याची प्रचंड हानी झाली.  याच वेळेला आसाम, पंजाब, काश्मिर यांनी पेट घेतला. भारतीय सैन्यावर १९८० च्या दशकात चहूबाजूंनी हल्ले झाले. पण भारतीय सैन्याने न डगमगता या पाकिस्तानी दहशतवादी कारवाई विरोधात लढून देशाला सावरले.  या काळात मला देखील युद्धाचा प्रचंड अनुभव मिळाला व भारतीय सैन्याची जिद्द, निष्ठा आणि शौर्य याची नेहमी प्रचिती आली.

            भारतीय सैन्याला भारताच्या अनेक भागांमध्ये दहशतवाद्यांशी लढा द्यावा लागला. मिझोराम, मनिपुर, नागालँड, आसाम या भागातून दहशतवादांचा निर्णायक पराभव करण्यात आला आणि  भारताची एकात्मता आणि अखंडता रखण्यामध्ये सैन्याला यश आले. मोठ्या प्रमाणात काश्मिरमध्ये या संघर्षामध्ये भारतीय सेना भाग घेत आहे.  जगाच्या इतिहासामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यामध्ये आणि अशांत भाग शांत करण्यामध्ये भारतीय सेना यशस्वी झाली.  त्याचं कारण भारतीय सैन्याचे तत्व.  भारतीय सेना म्हणते की तुम्ही आतंकवादाला बंदुकीची गोळी आणि बॉम्बने लढू शकत नाही.  तर लोकांचे हृदय आणि मन जिंकून दहशतवाद संपवता येतो. कारण मूळ मुद्दा असा आहे की दहशतवादी किंवा उग्रवादी हे काही शत्रू नसतात.  हे भारताचेच नागरिक असतात जे सरकारच्या विरोधात गेलेले असतात. त्यांना वाटेल त्या मार्गाने शांत करून आपल्यामध्ये सामावून घ्यायचे असते आणि ते काम भारतीय सैन्याने यशस्वीपणे केलेले आहे.  काश्मिरमध्ये देखील पूर्ण शांतता प्रस्थापित करण्यात आली होती.  पण २०१३ नंतर पुन्हा उग्रवाद सुरू झाला.  त्याला राजकीय कारणच आहेत.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

 मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS