भारतीय सैन्याला वाचवा

जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. सध्या मीरा रोड येथे वास्तव्य होते. भारतीय सैन्यदलात ३६ राष्ट्रीय रायफल बटालियन मध्ये मेजर म्हणून ते कार्यरत होते. दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्या सोबत अन्य तीन जवानाना वीरमरण आले. मेजर कौस्तुभ राणे व त्यांच्या सहकार्‍यांनी नियंत्रण रेषेवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मी एक सैनिक म्हणून त्यांना सलाम करतो. आपल्या देशामध्ये सातत्याने अशा घटना घडत असून आपल्या असंख्य जवानांना वीरमरण पत्करावे लागत आहे. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडत आहेत, म्हणून भारतीय सैन्याला वाचविण्यासाठी सरकारने आपली धोरणे आखणे अत्यंत गरजेचे आहे.

कौस्तुभ राणे ह्यांना लहानपणापासूनच सैन्यामध्ये जाण्याची प्रचंड जिद्द होती. प्रचंड मेहनत करून ते भारतीय सैन्यामध्ये अधिकारी पदावर रुजू झाले. कमांडो कोर्स सारख्या कठीण प्रशिक्षणात त्यांनी उच्च दर्जा प्राप्त केला. २६ जानेवारीला त्यांना सेना शौर्यपदकाचा बहुमान मिळाला होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई, वडील व  2 वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय आला होता. सगळ्यांच्या मनात हळहळ होती. त्यांच्या वडिलांनी अग्नि दिला. 2 वर्षाच्या मुलालाही अग्नि देताना बघून अत्यंत वेदना झाल्या. कुटुंबाकडे बघताना माझ्या मनामध्ये संवेदनाची घालमेल होत होती. असे किती वीरजवान आपला देह देशाला अर्पण करणार आणि अशी किती लहान मुले आपल्या शूर पित्याला कधीच बघणार नाहीत. अलीकडे काश्मीर रक्तबंबाळ झाला आहे. असंख्य सैनिकांची आपण आहुति देत आहोत. हे कधिपर्यंत चालणार ह्याला कुठेतरी अंत असला पाहिजे. ह्याला शेवट दोन प्रकारेच होऊ शकतो. पहिले म्हणजे दोन्ही देशांनी संनवाय साधून हिंसाचाराचे पर्व थांबवले पाहिजे नाहीतर युध्हाशिवाय पर्याय नाही. अमेरिकेने किती दबाव आणला तरी पाकीस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करावे लागेल. राजकीय नेतृवतात ही हिम्मत आहे की नाही हे आपल्याला दिसतच आहे. फक्त घोषणा देऊन हे प्रश्न सुटत नाही.

सैन्यामध्ये आंतकवाद विरुद्ध लढण्याचे सर्वात मोठे तत्व आहे. आंतकवाद विरुद्ध आपण बंदुकीच्या गोळीने विजय मिळवू शकत नाही. फक्त हृदय आणि मन जिंकून आंतकवादाच्या विरुद्ध जिंकता येते. आपण सर्वांनी बघितलं आहे की काश्मीर मध्ये हिंदू सैनिका बरोबरच असंख्य मुस्लिम सैनिक देखील मारले गेले. आणि असंख्य मुस्लिम तरुणांना सैन्यामध्ये घेतले. २००३ पासून जवळजवळ ०८ फलटणी ८००० सैन्याचे आम्ही उभे केले. आणि हळूहळू स्थानिक काश्मीर युवक हा दहशतवादापासून दूर गेला. स्थानिक मदत असल्याशिवाय दहशतवाद उभाच राहू शकत नाही. त्यामुळे २००३ ते २०१४ आम्ही भारतीय सैन्यांनी आणि त्यातील ०८ फलटणीनी लोकांची मने  जिंकली. आणि दहशतवाद जवळजवळ संपत आला. पण मोदी आणि मोफ्तीमहम्मद   ह्यांचे सरकार बनले. माफिया टोळ्यांना मोकळे रान मिळाले. त्यात बरेच राज्यकर्ते सामील होते. पुन्हा दहशतवादी गटांना प्रोत्साहित करून आंतकवाद पेटवला. पाकिस्तानमधून भारतात आंतकवादी अफू प्रचंड प्रमाणात आणतात. पंजाब तर बरबाद झाला. भारतातील तरुण मुले व्यसनाधीन होत चालले आहेत. त्यात गुन्हेगार प्रचंड पैसा कमवतात. त्याचबरोबर गुन्हेगारांचे पाठीराखे, राजकीय नेते सुद्धा त्यात कमवत आहेत. काश्मीरचा दहशतवाद म्हणजे अफुजी तस्करी दहशतवाद अफू घेऊन काश्मीरमध्ये येतात आणि त्याच पैशातून माफिया त्यांना हत्यारे देतात. म्हणूनच राजकीय नेत्यांना दहशतवाद पाहिजे. नाहीतर मला कळत नाही की, शांत झालेला काश्मीर मोदी आल्यावर का पेटला? कुठल्याही युद्धापेक्षा जास्त सैनिक काश्मीरमध्ये  मारले गेले. पण एखही आमदार,खासदार किंवा मंत्री  मारला गेला नाही.

कुठल्याही देशाची शक्ती ही त्या देशाचे सेनादल असते. युध्द असो, दहशतवादी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो, दंगल असो, प्रत्येक वेळी सैन्य दलांनी त्या त्या देशांना स्थैर्य दिले आहे.  नोव्हेंबर २००८ च्या मुंबर्इवरील दहशतवादी हल्ल्यावेळी पोलीस दलाला १० दहशतवाद्यांनी जायबंदी करून टाकले. शेवटी एनएसजीच्या कमांडोंनाच येउन दहशतवाद्यांना मारावे लागले. कुठलीही दंगल झाली तरी गॄह खात्यातील सुरक्षा दले असून देखिल शेवटी सैन्यालाच पाचारण करावे लागते. सैन्यातल्या शुर शिपायांचे आयुष्य फार खडतर असते. हिमालयाच्या शिखरावर, त्यापलिकडे मिझोरामर् नागालँडच्या जंगलामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना जगावे लागते व लढावेही लागते.  नैसर्गिक आपत्तीला तोंड देणे हे त्यांना अंगवळणी पडून जाते. कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यास लागणारी निर्भीडता, मानसिक संतुलन व धाडस यात निर्माण केले जात.

जोपर्यंत भारताचे सैन्यदल अबाधित आहे तोपर्यंत या देशाला धोका नाही.  आणि म्हणूनच देशाचे शत्रु भारताची अंतिम शक्ती सैन्यदल बरबाद करण्याचा प्रयत्न करत नसेल तरच नवल आहे. सैन्यदलाचा दुरूपयोग नैसर्गिक आपत्तीत, दंगलीत करू नये. ज्यावेळी दांतेवाडयात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ७२ जवानांना मारले त्यावेळी तातडीने मी सेनादलप्रमुख व्ही. के. सिंग यांना भेटलो व त्यांना विनंती केली की, कुठल्याही परिस्थितीत लष्कराला नक्षलवाद्यांच्या विरोधात वापरू देऊ नका.  गॄहमंत्री चिदंबरम यांनी लगेचच लष्कराला पाचारण करण्याची भुमिका घेतली. त्याला लष्कराने विरोध केला व सरकारने जनरल व्ही. के. सिग्ं . यांना लवकर निवृत्त करण्याचे कटकारस्थान सुरु केले.

दुसरीकडे भारतीय सैन्य दलाचा उपयोग. राष्ट्रउभारणीसाठी कसा हाऊे शकतो हे पाहणे हेही  आवश्यक आहे. अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी प्रत्यक्ष सांगितले की, ‘सैन्यदलात ७-८  वर्षे सेवा बजावलेल्या सैनिकांना पोलिस दलात व इतर विभागात घेण्यात यावे. म्हणजे पोलीस भरतीच्या प्रशिक्षणाचा खर्च वाचेल व काश्मिरमध्ये लढलेला जवान हा पोलीस दलात असेल तरच पोलीस दल दहशतवादाचा सक्षमपणे मुकाबला करू शकेल’. परंतु असे न करता राज्य सरकार फोर्स वन निर्माण करून त्याला कमांडो नाव देऊन जनतेची फसवणुक करीत आहे.  केंद्र शासनाने डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी, रॅपीड अॅक्शन फोर्स, आयटीबीपी असे अनेक दल उभारले आहेत.  अशाने पैशाचा चुराडा तर केलाच व सुरक्षा दलातही प्रचंड गोंधळ निर्माण केला.

आज सैन्यातून बाहेर आल्यावर ३५ वर्षाचा जवान नोकरीसाठी दारोदार भटकतो. १० – १० वर्ष नोकरी मिळत नाही. अशा प्रकारे आपल्या सैनिकांचा अपमान सातत्याने होत आहे. तरी भारतीय तरुण स्वत:ची पर्वा न करता युद्धामध्ये उडी घेतो. मेजर राणेच्या कुटुंबाकडे बघताना ह्याची सातत्त्याने जाणीव होते. जन पळभर म्हणतील हाय हाय. ह्याची जाणीव मला होत होती. त्यांच्या मुलाला व पत्नीला आयुष्य काढायचे आहे. त्यामुळे आपले जवान शहीद होऊन गेले पण कुटुंबाला आयुष्यभर हा विरह सहन करावा लागणार आहे. राज्य व केंद्र शासनाने अगडबंब फुगलेली सरकारी यंत्रणा व त्यातील मनुष्यबळ वापराचे एक वास्तववादी धोरण आखले पाहिजे. सैन्यदलातील अधिकारी आणि सैनिकांना प्रशासकिय सेवेत आपसुक समाविष्ट केले पाहिजे. सैन्यदलाकडे एका व्यापक दॄष्टीकोनातून पाहण्याची नितांत गरज आहे. राजीव गांधींच्या काळात अरूण सिंग समितीने २१व्या शतकातील सुरक्षा व्यवस्थेबाबत योजना बनवली आणि सैन्यदलाला आधुनिक करण्यास सुरूवात झाली. पण वाजपेयी, मनमोहन सिंग व मोदी सरकारने पुर्ण संदर्भ बदलून अमेरिकन भांडवलशाहीसमोर शरणागती पत्करली. भारताच्या एकेक संस्था भांडवलशाहीसमोर कोलमडून पडत असताना भारतीय सैन्याला बदनाम करून पाकिस्तान आणि इतर राष्ट्रांच्या सेनादालाप्रमाणे आपल्या प्रभावाखाली घेण्यास अमेरिका पाताळयंत्री षडयंत्र करत आहे. म्हणूनच भारताला वाचवण्यासाठी भारतीय सैन्याला वाचवणे, ही आपल्या सर्वांची पहिल्या क्रमांकाची जबाबदारी आहे.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS