मतदान केंद्रातून हुकुमशाही_१७.६.२०२१

अमेरिका ही सर्वात जुनी व पहिली लोकशाही आहे. अमेरिकेने स्वातंत्र्य बंदुकीच्या जोरावर मिळवले. इंग्लंडने भारताप्रमाणेच त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला होता. पण जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली त्यांनी युद्ध केलं आणि स्वातंत्र्य मिळवले. तसे पाहिले तर अमेरिका हा विस्थापितांचा देश आहे. जगातून अनेक देशातून लोक अमेरिकेकडे गेले. आयर्लंड हा इंग्लंडला लागूनच देश आहे, पण तो देश देखील स्वातंत्र्यासाठी लढत होता.  त्या देशात अनेकदा लोकांना दुष्काळाला सामोर जावे लागले. तेथे फक्त बटाटा हे मुख्य पीक आहे. बटाटा नष्ट झाला तेव्हा लाखो लोक मेले आणि म्हणून हे लोक मोठ्या संख्येने नवीन भविष्य बनवण्यासाठी अमेरिकेला गेले. आज सुद्धा ‘आयरिश’ हा अमेरिकेत गोर्‍यांचा मुख्य समूह आहे. ते सर्व इंग्लंडच्या विरोधातील लोक होते. तसेच जगातील अनेक भागातून लोकांनी अमेरिका हा आपला देश म्हणून  स्विकारला. त्यात अनेक गुन्हेगार, चोर, लुटारूनी सुद्धा आपल्या देशातून पळून जाण्यासाठी अमेरिका पसंद केली. अमेरिकेने मग इंग्लंड विरुद्ध बंड केले, त्याचे परिवर्तन युद्धात झालं आणि इंग्लंडला अमेरिकेतून पळून जावं लागलं.  १७८० च्या दशकात ह्या  घटना घडल्या. त्यावेळी भारतात सुद्धा इंग्लंड विरुद्ध युद्ध चालू होते.  फरक एवढाच आहे की भारतातले राजे एकमेका विरोधात लढत होते.  त्याचा फायदा घेऊन इंग्लंडने ‘ फोडा, तोडा आणि राज्य करा.’ या तत्त्वावर पुढे भारतात अनेक वर्षे राज्य केले.

            महत्त्वाची गोष्ट ही आहे की अमेरिकेने स्वातंत्र्यानंतर आपली घटना बनवली. अमेरिकेत लोकशाहीचा जन्म झाला. तेथे  कधीच कोणी राजा नव्हता आणि म्हणून ‘लोकशाहीला जोपासणारा अमेरिका’ अशाप्रकारची ख्याती अमेरिकेने मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याचा  पूर्ण अभ्यास केला आणि भारताची घटना बनवलेली आहे.  भारत हा सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे आणि साहजिकच भारत व अमेरिकेमध्ये दृढ मैत्री व्हायला पाहिजे होती. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झाले उलटेच. अमेरिका हा पाकिस्तानचा पाठीराखा आहे आणि भारता विरोधात भरपूर कारस्थान करीत आहे. किंबहुना अमेरिका आणि इंग्लंडला भारताचे तुकडे करायचे होते आणि छोट्या  राष्ट्रांवर आपला अंकुश ठेवायचा होता. जरी दोन्ही देश लोकशाही मानणारे होते, तरी लोकशाही प्रणित भारताला तोडण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला आहे. एक तत्व स्पष्ट होते की आपण लोकशाही मानतो म्हणून एकमेकाला साथ देतो असं कधीच होत नाही. अमेरिकेने पाकिस्तानला आपलं ‘फ्रन्टलाइन स्टेट’ म्हणजे आघाडीचे राष्ट्र मानले. पाकिस्तान हा हुकूमशाही देश राहिलेला आहे.

            पण हळूहळू जगातील लोकशाही देश बदलत गेले.  १९९१ ला शीत युद्धाचा अंत झाला.  रशियाचे तुकडे तुकडे झाले आणि अमेरिका ही जगातील एकमेव महाशक्ती राहीली आहे.  अमेरिकेला पूर्ण जग आपल्या ताब्यात ठेवायचे आहे. त्यानुसार अमेरिका बदलत गेली आणि जग बदलत गेलं. अमेरिकेने युद्धात निर्माण केलेले दहशतवादी आज जगभर पसरले आणि एक धार्मिक कट्टरवादाचे विषारी तत्वज्ञान मानवतेचा बळी घेत आहे. १९७९ साली रशियन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तिथल्या सरकारला मदत करण्यासाठी घुसले. त्याविरुद्ध अमेरिकेने पाकिस्तानला आपला जवळचा मित्र करून जगातील दहशतवादी तिथे आणले. त्याचे प्रशिक्षण केंद्र केले व अफगाणिस्तानमध्ये रशिया विरोधात लढण्यासाठी कम्युनिस्ट म्हणजे देवाला न मानणारे काफिर यांच्या विरोधात जिहाद  पुकारला.  त्यातूनच ओसामा-बिन-लादेन निर्माण झाले,  लष्कर-ए-तोयबा निर्माण झाले, जैसे-मोहम्मद निर्माण  झाले.  हा दहशतवाद एका वेगळ्या तत्वावर उभा होता.  धर्म, जात, भाषांच्या विषारी प्रचाराच्या पायावर एक विषारी तत्त्वज्ञान उभे राहिले. द्वेष हे मूळ तत्व झाले. आज जगभर वर्ण, धर्म, जातीवर आधारीत हिंसा पेटलेली आहे. वाटेल ते करून आपली सत्ता आणायची व विरोधकांना नष्ट करायचे हे राजकारण प्रभावी झाले आहे.

            सौदी अरेबियातून “इस्लाम खतरे में है’ असा आवाज निर्माण झाला. तो पूर्ण जगात पसरू लागला. सगळीकडे ‘मदरसा’ उभा करून सौदी अरेबियात अत्यंत कट्टरवादी लोक निर्माण केले.  राजघराण्यांची हुकुमशाही कायम करण्यासाठी इस्लामचा वापर झाला. त्याचीच परिणीती म्हणून इस्लामविरोधी असणाऱ्या लोकांची लढण्याची प्रवृत्ती उभी राहिली.  अत्यंत क्रूरपणे काही ठिकाणी लोकांना चिरडण्यात आले.  गंमत अशी की सौदी अरेबियाच्या राजघराण्याला अमेरिकेनेच जिवंत ठेवले आहे.  त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी अमेरिकेने घेतली आहे. म्हणजेच लोकशाही विरोधात असणार्‍या राजघराण्याला अमेरिकेने आश्रय दिला आहे.  त्यात पाकिस्तानी सैन्य हे सौदी अरेबियामध्ये राजघराण्याचे संरक्षण करत आहे. तसेच विरोधकांशी लढण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने सौदी अरबमध्ये ठाण मांडले आहे. एकंदरीत मुस्लिम देशातील सर्व हुकूमशहाला अमेरिका मदत करत आहे. त्यात कट्टरवाद्यांचे सामर्थ्य अमेरिका आहे. लोकशाहीला अमेरिकेचा सर्वदूर विरोध दिसतो. पण पुढे जाऊन अमेरिका हा मुख्य शत्रू आहे, अशाप्रकारची जागतिक आतंकवाद्यांची धारणा झाली. त्यातूनच न्यूयॉर्कमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ वर ११ सप्टेंबर, २००१ ला ४ विमानांनी हल्ला करून उदध्वस्त केले.  त्याचा बदला म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य पाठवले, ते आजपर्यंत तिथेच आहे.  अमेरिका आता अफगाणिस्तान मधील सैन्य मागे घेत आहे.  हा अमेरिकेचा मोठा पराभव झाला. दहशतवादामुळे  पूर्ण जगामध्ये लोकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. अनेक लोक दहशतवाद्यांच्या विरोधात उभे राहिले.  पूर्वी दहशतवाद होता, पण तो कम्युनिस्ट आणि भांडवलशाही मध्ये संघर्ष होता. त्यांच्यामध्ये लढा रोटी, कपडा, मकान या तत्त्वावर होता.  आर्थिक विषमता आणि गरीबीमुळे भांडवलशाही विरोधात मोठा आक्रोश निर्माण झाला आणि नक्षलवाद सारख्या आर्थिक कारणांवरून दहशतवाद निर्माण झाला.

            जाती द्वेष, धार्मिक द्वेष, वर्ण द्वेष मधून पूर्ण जगामध्ये लोक दुभंगले आहेत. त्याचा परिणाम राजकारणावर पुर्णपणे झाला आहे. एक बाजू हिंदूंच्या बाजूने असते तर दुसरी बाजू मुसलमानांच्या बाजूने असते. पाकिस्तानमध्ये एक बाजू दर्गा मानणार्‍या मुसलमानांबरोबर आहे तर दुसरी बाजू दर्गा न मानणार्‍या मुसलमानांबरोबर आहे. अफगाणिस्तानमध्ये एक बाजू तालिबान मानणार्‍या मुसलमानांबरोबर आहेत तर दुसरी बाजू तालिबान न मानणार्‍या मुसलमानांबरोबर आहेत. सौदी अरेबिया आणि त्यांचे मित्र देश सुन्नी मुसलमानांबरोबर आहेत, तर इराण हे शिय्या मानणार्‍या मुसलमानांबरोबर आहेत.  अमेरिकेमध्ये काळ्या आणि गोर्‍या मध्ये भयानक युद्ध सुरू झाले आहे. गोरे लोक ट्रम्प बरोबर आहेत आणि काळे लोक (त्यात भारतीय सामील आहेत) हे जो बायडनच्या डेमोक्रेटिक पक्षासोबत आहेत.

            पूर्वी राजकारण हे निवडणुकीपुरते असायचे व नंतर सर्व एक देश म्हणून वागायचे. पण आज राजकारण म्हणजे दुश्मनी झाली आहे.  अमेरिकन राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जवळ जवळ २ महीने मत मोजणी झाली आणि त्या अगोदर निवडणुकीपूर्वी १ महीना पोस्टल मतदान झाले.  डेमोक्रेटिक पक्षाने जास्तीत जास्त मतदान पोस्टाद्वारे केले आणि ट्रम्पच्या रिपबिल्कन पक्षाने जास्तीत जास्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. जो बायडन निवडून येऊ नये म्हणून डोनाल्ड ट्रम्पने सगळीकडे मतदान चुकीचे झाल्याचा प्रचार सुरू केला आणि जो बायडन निवडून आल्यावर मतदान घोटाळा झाल्याचे जाहीर केले.  व रिपब्लिकन पक्षाने निवडणूक मान्य नसल्याचे सांगितले.  सगळे गोरे लोक रस्त्यावर आले.  दंगली झाल्या, त्यात सर्वात मोठी दंगल ‘कॅपिटल हील’ म्हणजे ‘अमेरिकेची संसद’ येथे झाली.  गोरे लोक संसदेमध्ये घुसले आणि ६ जानेवारी, २०२१ ला प्रचंड तोडफोड केली.  निवडणुकीचा निकाल मान्य न करण्याचा अमेरिकन दादागिरिचा हा कळस होता. 

            एकंदरीत आता लोकशाहीचे स्वरूप मतदान केंद्रातून हुकुमशाहीकडे जाताना दिसते. भारतात सुद्धा इलेक्ट्रोनिक्स मशीनचा वाद सुरूच आहे. सरकार मतदान पत्रिकेला मान्यता का देत नाही? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पैश्याशिवाय निवडणूक लढता येत नाही असे लोक म्हणतात आणि राजकीय नेते फुशारकी मारतात.  साम, दाम, दंड, भेद हे निवडणुकीचे अस्त्र असल्याचे सांगतात.  माजी अमेरिकन राष्ट्रपती ओबामा म्हणाले की लोकशाहीचे स्वरूप ‘ऑटोकरसी थ्रु बॅलेट बॉक्स’ असा होत आहे. सर्वात जुन्या लोकशाहीमध्ये जर हे घडत असेल तर जगातल्या सर्व देशात हे घडत आहे, असे मानायला हरकत नाही. त्यात भारत पुढेच आहे, हे बंगालच्या उदाहरणावरून सिद्ध होत आहे. तरी माझ्या देश बांधवानो आणि भगिनींनो लोकशाहीला वाचवण्यासाठी तुम्हा आम्हाला घरात बसून चालणार नाही. तर साम, दाम, दंड, भेद हे तत्त्व नष्ट करावे लागेल आणि लोकमताला उघडपणे वावरण्याची संधी द्यावी लागेल.

            (पुढील भाग – नवीन लोकशाही)

 लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

 वेबसाईट : www.sudhirsawant.com

 मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS