मराठ्यांचा इतिहास केवळ छत्रपती शिवाजी महाराजांपुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे युद्ध शास्त्र निर्माण केले. त्याला संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीने विकसित करून औरंगजेबचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा राज्य निर्माण केले. त्याचा प्रसार भारतभर झाला. एका राज्याचा उदय झाला, याचे परिवर्तन एका साम्राज्यात झाले. छत्रपती शिवरायांचा उदय अशावेळी झाला की ज्यावेळी मोगल साम्राज्य अतिउच्च पातळीवर होते. औरंगजेबच्या काळात पूर्ण भारतात अफगाणिस्तान पर्यंत मोगल साम्राज्याचा प्रसार झाला होता. पण औरंगजेबच्या मोगली सामर्थ्यात फुटीचे बीज रोवले होते. कुराणावर शपथ घेऊन आपल्या बांधवांची हत्या करणारा औरंगजेब. आपल्या पित्याला कैदेत ढकलणारा औरंगजेब अत्यंत क्रूर होता. त्याची क्रूरपणाची परिसीमा संभाजी महाराजांच्या हत्तेमध्ये उघडपणे दिसून येते. ती जखम आज देखील खळखळ वाहते आणि म्हणूनच धार्मिक कट्टरवाद्यांना हा इतिहास आज देखील एक उदाहरण म्हणून वापरता येतो.
तसे पाहिले तर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये धार्मिक सलोखा बऱ्यापैकी होता. मोगलांच्या सैन्यांमध्ये अनेक मराठा सरदार औरंगजेबासाठी लढत होते. संभाजी महाराजांच्या हत्तेनंतर तर आपले स्वराज्य बुडाले अशाप्रकारचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले होते. म्हणून अनेक मराठा सरदारांनी स्वार्थापोटी औरंगजेबच्या पायावर लोटांगण घातले होते. शिवरायांनी निर्माण केलेली स्वामीनिष्ठा म्हणजे रयतेच्या राज्याचा खंबीर पाया. स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी मर मिटणारे लोक यांनी हे मराठा साम्राज्य सावरले. अतिशय चिंताजनक काळात संभाजी महाराजांच्या हत्तेनंतर राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले आणि त्यांच्या पाठीमागे संताजी धनाजी सारखे कल्पक गनिमी काव्याला एक नवीन स्वरूप घेऊन, कमी सैन्याला अशाप्रकारे वापरले की औरंगजेबच्या सेनेला भयभीत करून सोडले. म्हणूनच छत्रपती पासून ते ताराराणी पर्यंत गनिमी काव्याचा जो विस्तार झाला, हा जगातील युद्धतंत्रांमध्ये सर्वात यशस्वी महाराष्ट्रात झाला. जेणेकरून छत्रपती शिवरायापासून ताराराणी पर्यंत जो लढा झाला, त्यात गनिमी काव्याचे तंत्र इतके विकसित झाले की शंभर विरोधात दहा सैनिक विजयी होऊ शकेल. संताजी घोरपडे यांचा दोड्डागिरीचा विजय हा आज देखील सैनिकांच्या अभ्यासाचा विषय होऊ शकतो. भारतामध्ये गनिमी काव्याचा उपयोग दहशतवादी व बंडखोर डाव्या विचाराचे सैन्य वापरत आहेत. त्याला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य धडपडत आहे. मी कमांडो प्रशिक्षित होतो म्हणून मला जाणीव आहे की छोट्या सैन्याला घेऊन मोठ्या सैन्याचा पराभव कसा करायचा. पण त्याचे प्रशिक्षण आत्ताच्या भारतीय सैन्याला मोठ्या प्रमाणात दिले जात नाही, तर सैन्याला स्वतः प्रशिक्षित व्हावे लागते. म्हणूनच दहशतवादाचा कट्टरवादाचा प्रसार भारतामध्ये इतका झालेला आहे, हे आपल्याला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या सैनिकांचे युद्धतंत्र अभ्यासून आपल्या सैन्याला प्रशिक्षित करावे लागेल. जेणेकरून आज देखील आपल्याला या प्रचंड भारतामध्ये जागोजागी यशस्वी होता येईल.
पानिपतच्या दुसऱ्या युद्धानंतर अकबरचा प्रचंड विजय झाला. मग असा एक आभास देशांमध्ये निर्माण झाला कि मोघलांना कोणीच हरवू शकत नाही. छत्रपती शिवराय हे पहिले असे योद्धा झाले की त्यांनी या परिस्थितीला परिवर्तित केले आणि मोगली सत्तेला आव्हान दिले. शिवरायांनी अनेक युद्धामध्ये मोघलांचा पराभव केला आणि त्यांनी मराठा सैन्याला भीतीपासून मुक्त केले. त्यांनी राष्ट्रभक्तीचे एक नवीन पर्व या देशांमध्ये निर्माण केले, दिल्लीवर सुद्धा कब्जा करायचा उद्देश त्यांनी उभा केला आणि आपल्या सैन्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
छत्रपती शिवरायांच्या दु:खद मृत्यूनंतर औरंगजेब एका प्रचंड सैन्यानिशी दख्खनमध्ये आला आणि मराठा साम्राज्याला नष्ट करण्यासाठी अनंत अत्याचार ह्या महाराष्ट्रावर केले. त्यात सामान्य जनता सुद्धा भरडली गेली, पण मराठ्यांनी आपले स्वराज्य वाचवले आणि तब्बल २७ वर्ष औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. जो औरंगजेब स्वतःला शहनशाह म्हणत होता, तो दक्षिणेत आल्यानंतर दख्खनमध्ये स्थिरावल्यानंतर परत कधीच त्याच्या राजधानी दिल्लीमध्ये जाऊ शकला नाही. हा त्याचा प्रचंड मोठा पराभव आहे. शेवटी ताराराणीने ही शपथ घेतली की औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडेन. ही शपथ त्यांनी पुरी केली आणि औरंगजेबाला या महाराष्ट्रातून संपवून टाकले. आपल्या सर्वांना माहीतच आहे की औरंगजेबानंतर मोगल पुन्हा उभे राहू शकले नाहीत. छत्रपती शिवरायांनी जो स्वातंत्र्य लढा सुरू केला तो त्यांच्या मरणानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीने चालू ठेवला व औरंगजेबाकडून मोगली सत्ता नष्ट करून दिल्लीवर सुद्धा आपला झेंडा फडकवला. ही काही साधारण गोष्ट नाही. प्रत्येक घरी या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे. प्रत्येक सैनिकाचे, प्रत्येक सरदाराचे हे कर्तुत्व आहे, हे योगदान आहे, हे प्रसिद्ध झाले पाहिजे आणि आपल्या मुलांमध्ये, तरुणांमध्ये, भविष्यातील सैनिकांमध्ये ही ज्वलंत राष्ट्रभक्तीची मशाल ठेवत ठेवली पाहिजे. जेणेकरून या भारतावर कोणीही वाकडे नजर करू शकणार नाही.
अनेक कादंबरीकार आणि शाहीर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अनेक दंतकथा निर्माण केल्या आहेत. पण या दंतकथेमधून खरे शिवराय आपल्याला ओळखता येत नाहीत. स्वराज्याचा पाया कुठल्या विचारसरणीवर उभा आहे, त्याचे स्पष्ट असे चित्र उभे राहिले नाही. त्याचे कारण छत्रपती शिवरायांचा उपयोग हा कट्टरवादाकडे धार्मिक भावना भडकवण्यासाठी केला जातो. यातून शिवरायांचा व्यापक असा स्वराज्याचा संकल्प स्पष्टपणे लोकांसमोर येत नाही. शिवरायांची युद्धनीती काय होती?. एका छोट्या सैन्याला घेऊन औरंगजेब सारख्या सम्राट बरोबर युद्ध करण्याचे धाडस कोणत्या जोरावर छत्रपती शिवरायांनी केले. २७ वर्ष लढणाऱ्या शिवरायांच्या मुलांनी कसे केले, याचे स्पष्ट चित्र अजून पर्यंत कोणी रेखाटले नाही. त्याचे कारण असे आहे की कुठल्या योद्ध्याने शिवरायांचे चरित्र लिहिलेले नाही आणि म्हणूनच शिवरायांची युद्धनीती स्पष्ट होत नाही. शेवटी शिवरायांनी आपले राज्य फक्त महाराष्ट्रात बनवले नाही तर तामिळनाडूमध्ये, बेंगलोरमध्ये आपले राज्य मजबूत केले. चेन्नई जवळच्या वेलोर आणि जिंजीचे किल्ले जिंकून त्यांनी कसे राज्य केले याची कल्पना कधी कोणी दिली नाही. कारण शिवरायांच्या युद्ध तंत्राचा आणि त्यांच्या स्वराज्याला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प आज पर्यंत तरी कोणी लिहिलेला मला दिसत नाही. म्हणूनच हा ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन मी केले आहे. खरे शिवराय कसे होते? आणि जनतेबद्दल एवढ्या कमालीचे प्रेम त्यांच्यामध्ये कसे होते? या सर्वांचे विश्लेषण व्हावे लागेल. कारण अंतिमतः छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील अत्यंत कुशल योद्धा म्हणून मला लोकांपर्यंत आणायचे आहे. म्हणून काम करत असताना, जनतेची सुरक्षा करत असताना, आपल्या रयतेला आपल्यावर एवढं असामान्य प्रेम करायला लावणे ह्याच्यापेक्षा मोठा नेतृत्व गुण कुणात असू शकत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.
छत्रपती शिवराय गेल्यानंतर हे शिवराज्य किती वर्ष टिकेल याची लोकांना शंका होती. त्यातच संभाजी महाराजांच्या विरोधात प्रचंड कारस्थान झाले. शिवरायानंतर संभाजी महाराज यांना छत्रपती करण्यामध्ये बराच विलंब झाला. त्याचे नुकसान देखील झाले. पण संभाजी महाराजांनी तब्बल नऊ वर्ष औरंगजेबाला नामोहरम केले. त्याचबरोबर तिथे असलेला अनेक राजांवर आपला वचक ठेवला आणि मैत्री सुद्धा संपादन केली. म्हणूनच महाराष्ट्रापासून बेंगलोर, तामिळनाडू पर्यंत मित्रांचे एक जाळे विणले गेले. शिवरायांचा युद्धनीतीचे सर्वात महत्त्वाचे धोरण म्हणजे दक्षिण दिग्विजय.
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना एक जाणीव होती. औरंगजेब लाखोचे सैन्य घेऊन दक्षिणेत उतरणार आणि त्यांच्याबरोबर संघर्ष अटळ आहे. म्हणून शिवरायांनी दक्षिण दिग्विजय सुरू केला. अनेक नायकांबरोबर मैत्री केली. कुतुबशाहीबरोबर मैत्री केली आणि बेंगलोर येथे राज्य करत असलेल्या व्यंकोजी राजांबरोबर हळूहळू संबंध सुधारले. त्या काळात अगदी तामिळनाडूमध्ये खोलवर जाऊन काही महत्त्वाचे ठिकाणावर कब्जा केला. जिंजी, वेलोर असे अनेक किल्ले अभेदय केले. शिवरायांना माहित होते की औरंगजेब आल्यानंतर त्याच्याशी कसे लढायचे. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्र ते तामिळनाडू असे रणांगण बनवले. जेणेकरून महाराष्ट्रात आल्याबरोबर औरंगजेबला तामिळनाडू पर्यंत खेचायचे म्हणजे त्यांचे सहा लाखाचे सैन्य विस्कळीत होईल. जागोजागी त्यांनी मजबूत ठिकाणे बनवली. त्याला इंग्रजीमध्ये आजच्या युद्धामध्ये आम्ही म्हणतो ‘नोडल पॉईंट कन्सेप्ट ऑफ वारफेअर’. या पूर्ण क्षेत्रांमध्ये जागोजागी किल्ले शहरांमध्ये शिबंदी ठेवली, घोडदळ ठेवली. तसेच बऱ्याच राजे राजवाड्यांना आपलेसे करून आपल्या युद्ध क्षेत्रांमध्ये जबाबदाऱ्या वाटून दिल्या. परिणामत: औरंगजेबाचे महाकाय सैन्य छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले गेले. औरंगजेबाची सर्वात मोठी चूक ही होती की ह्या तुकड्यांना एकसंघ करण्याची ताकद कुणात नव्हती. म्हणून औरंगजेबाचे सैन्य वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये लढाई देत होते. जर एका सैनिकी तुकडीला दुसऱ्या तुकडीला मदत करण्यासाठी पाठवायचे असेल तर औरंगजेबाच्या हुकुमाशिवाय ते होत नव्हते आणि ह्याला अतिशय विलंब लागायचा. त्या दरम्यान मराठी सैन्य जलद गतीने झपाट्याने येऊन शत्रू वर तुटून पडायचं आणि तेवढ्याच जलदगतीने पळून जायचे.
दुसरे महत्त्वाचे तंत्र छत्रपतींनी निर्माण केले ते म्हणजे आतापर्यंत गडकोटामध्ये बसून शत्रूशी लढा द्यायची पद्धत होती. पण शिवरायांनी स्वतःला किल्ल्यात कोंडून न घेता प्रचंड मोठे घोडदळ बाहेरच ठेवले. निष्ठावंत किल्लेदारांना किल्ले दिले व त्यात शिबंदी सकट सैन्य ठेवले. औरंगजेबाला कुठलाही किल्ला सहजगतीने कधी मिळाला नाही, त्याला पाच सहा महिने लढावेच लागले. औरंगजेब किल्ल्यावर हल्ला करत असताना पूर्ण महाराष्ट्रापासून तामिळनाडू पर्यंत मराठ्यांचे घोडदळ जलदगतीने एका क्षेत्रापासून दुसऱ्या क्षेत्रात जायचे. एकमेकाला सहाय्य करण्याची पद्धत शिवरायांनी निर्माण केली होती. तसेच सुरतेवर हल्ला करताना शिवरायांच्या निरोपावर अनेक तुकड्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं एकत्र जमल्या. सुरतेला पोहचल्यावर प्रचंड मोठे सैन्य शिवरायांचे जमले आणि म्हणून सुरत लुटायला त्यांना अतिशय मदत झाली. त्याचप्रमाणे अनेक भागांमध्ये शिवरायांचे सैन्य तुकड्या-तुकड्यांमध्ये वाटलेले जरी असले तरी मोठ्या शत्रू विरुद्ध लढण्यासाठी एकसंघ होण्याची त्यांची जलद प्रक्रिया होती. ती आज देखील सैन्याला जमणं कठीण आहे. यालाच म्हणतात ‘मोबाईल कन्सेप्ट ऑफ वारफेअर’ म्हणजेच गतिमान युद्ध. याची मोगलांना सवय नव्हती.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९