महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग_१४.४.२०२२

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या क्रांतिकारी चळवळीचा आज करोना काळात आपण विचार केला पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी या तिघांनी या देशासाठी बलिदान करून  ९० वर्ष झाली.  दुर्दैवाने सरकारी आणि लोकांच्या स्तरावर विशेष काही करण्यात आले नाही. कुठेतरी या क्रांतीकारकांच्या पुतळ्याला किंवा फोटोला हार घालून त्यांना सन्मानित केल्याच समाधान आपण मानतो. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो. पण त्यांचे अमूल्य विचार अंगीकारण करून हे स्वतंत्र भारताच्या जीवन पद्धतीत समावून आणण्यासाठी आपण कृतीमध्ये काय करतो याबद्दल विचार करण्याचे टाळतो.

            हे क्रांतिकारक केवळ भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढत नव्हते. पण भारत भूमीवर समतामुल्य जाती धर्मा विरहित समाज निर्माण करण्यासाठी लढत होते. म्हणून त्यांचे लिखाण, विचार आणि आचार हे आपल्या आदर्श आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढताना त्यांनी हा देश कसा असावा याचासुद्धा खोलवर विचार केला होता. समता, न्याय आणि बंधुत्व वर हा देश उभा राहिला पाहिजे, अशी स्पष्ट विचारसरणी या तरुण क्रांतीकारकांची होती. हीच मूल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटेनेमध्ये मूलभूत तत्त्व म्हणून अंतर्भूत केली आहेत. डॉ.आंबेडकरांची विचारधारा व भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या उद्दिष्टात काही फरक नव्हता.

            समतेचा विचार हे एक अदृश्य तत्व आहे.  स्वप्नवादी तत्त्वावर भारतात समता स्थापन करणे याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर आपल्या जीवनामध्ये समतेचा आधार घेऊनच काम केले.  महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा पाया महाराष्ट्रात घट्टपणे रोवला जात होता. विषमतावादी तत्वाविरुद्ध जाहीर बंड पुकारला गेला होता.  त्याचप्रमाणे १९२८ साली भगतसिंग याने चातुवर्णावर कडाडून हल्ला केला होता.  आपली क्रांतिकारी चळवळ स्वातंत्र्यासाठी पुढे नेत असताना भगतसिंग यांनी स्पष्ट मत जाहीर केलं होतं की, आपले उद्दीष्ट केवळ भारताचे स्वातंत्र्य नसून सनातन हिंदू धर्माने निर्माण केलेल्या सर्व जाती धर्मांच्या भिंतींना नष्ट करण्याचे सुद्धा आहे.

            १९९१ साली संविधानाचा पाया उखडून काढण्यात आला आहे.  मोठ्या गोंडस शब्दांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) सिद्धांत निर्माण करण्यात आला.  त्याने समतेचे सिद्धांत नष्ट झाले. हाच सिद्धांत रुजविण्यासाठी बाबरी मस्जिद पाडून हिंदुत्व हे नाव पुढे करण्यात आले. या शब्दातून हिंदू लोकांचे जर कल्याण होत असेल तर त्याचे समर्थन करायला मी तयार आहे. पण लाखो हिंदू शेतकर्‍यांना आत्महत्या करायला लावणारा खाउजा प्रकरण या हिंदुत्वाच्या आड आहे. त्यातूनच भारतात १२८ अति श्रीमंत लोकांकडे १२६ कोटी लोकांपेक्षा जास्त पैसा आहे. १९९१ पासून आजतागायत धार्मिक भावना भडकवून काही लोक अति श्रीमंत झाले आहेत व गरीब तडफडत आहेत.  कोविड काळामध्ये हे प्रकर्षाने जाणवत आहे.

            धर्मावर चर्चा करत असताना त्याचे अर्थकारणावर काय परिणाम होतात, याचा विचार प्रथम केला पाहिजे. भगतसिंगनी आपल्या लेखांमध्ये जाती व्यवस्थेवर प्रचंड हल्ला केला आहे. त्याने म्हटलं ही जाती व्यवस्था ही भारतीय समाजातील क्रूर आणि वेगळी व्यवस्था आहे.  भारताच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीमध्ये जातीव्यवस्था नष्ट करण्याचे सुद्धा प्राधान्याने काम केले पाहिजे.  अस्पृश्यता अत्यंत अमानवी आहे. अस्पृश्यानी प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध बंड केलं पाहिजे. जातीव्यवस्थेची निर्मिती आर्थिक दृष्ट्या उच्चवर्णीयांनी केली.  फुकट मजुरी करणारी जात म्हणजे अस्पृश्य. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हटले आहे की, जाती राष्ट्रविघातक आहे आणि जोपर्यंत जाती नष्ट होत नाहीत तोपर्यंत भारत एक राष्ट्र म्हणून उभे राहू शकत नाही.  भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जुळताना दिसतात.  कारण भगतसिंग, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉक्टर आंबेडकर यांच्या कर्तुत्वाचा पाठपुरावा करत होते. भगतसिंग यांनी कामगारांना, कष्टकऱ्यांना,अस्पृश्यांना सोबत घेऊन स्वतंत्र भारत निर्माण करण्याचे स्वप्न बघितले.  त्याचप्रमाणेस्वातंत्र्याच्या उपासकाने भांडवलशाही विरुद्ध आणि जाती व्यवस्थेतील शोषणाविरुद्ध बंड केलं पाहिजे, असे म्हटले.

            भगतसिंग यांनी अनेकदा स्पष्ट केले की,गोर्‍या इंग्रज साहेबांना घालून उच्चवर्णीय साहेबांना आणून काही उपयोग होणार नाही. शोषणकारी गिधाडांना नष्ट करून समाजवादी भारत निर्माण केला पाहिजे.  असं म्हणत भगतसिंग फासावर लटकवण्यासाठी पुढे झाले. ‘इन्कलाब जिंदाबाद!’ चा नारा देत फासावर लटकले.१९२८ला अस्पृश्यांची समस्या ह्या लेखाबरोबर भगतसिंग यांनी अनेक लेख त्या विषयावर लिहिलेले आहेत. ते जाणीवपूर्वक म्हणतात की, अदृश्य समतेचे तत्त्व हे दिसण्यात येत नाही, पण जाती व्यवस्थेतील विषमता ही हिंदुत्वामध्ये उघडपणे दिसत आहे.  केवळ अस्पृश्यांच्या एका स्पर्शाने उच्चवर्णीयांना भ्रष्ट केले जाते.  मंदिराच्या प्रवेशाने देवांना राग येतो.  एकाच विहिरीतलं पाणी पिल्याने ते पाणी खराब होते.  अशा प्रथा सनातन धर्मातले श्रेष्ठ जपतात. स्त्री आणि पुरुष यामध्ये दरी निर्माण करतात हे सर्व हिंदू धर्मातील कर्म या तत्त्वावर आधारित आहेत.  मागील जन्मातील केलेल्या पापावरुनव पुण्यावरून कुठल्या जातीत माणूस जन्म घेतो हे ठरवले जाते.  हे तत्त्व म्हणजे मूर्खपणाच आहे.  आपल्या पूर्वजांनी या पद्धतीचे विभाजन केवळ एका कारणासाठी केले आहे. घाणेरडी कामं कोणीतरी केली पाहिजे आणि ती फुकट झाली पाहिजे, म्हणून जाती व्यवस्था निर्माण केल्या गेल्या. काही जातींना घाणेरडी काम देण्यात आली.  थोडक्यात कष्टकरी जनतेला अस्पृश्य करण्यात आले आणि वरच्या जातीने एषोआरामची जिंदगी जगण्यासाठी हे सर्व करण्यात आलेले आहे ,असे भगतसिंग यांनी म्हटले आहे.

            १९३०ला भगतसिंग यांनी एक पत्रक काढले. “I am an Atheist” म्हणजे ईश्वराला नमानणारा.  त्यात ते म्हणतात शोषक समाज म्हणजे असा समाज आहे,ज्याने मागच्या जन्मांमध्ये फार पुण्य केल आहे.  म्हणून ते आज शोषकझाले आहेत आणि सत्तेची पूर्ण मजा लुटत आहेत. जेणेकरून सत्ता व संपत्तीचा उपभोग काही न करता घेत आहेत.  अशा क्रूर व्यवस्थेमुळे मानवी मूल्य नष्ट केलेली आहेत आणि शोषक समाज हे मुकाटपणे सहन करत आहे.  त्यांच्यावर मानसिक दबाव इतका प्रचंड वाढलेला आहे की स्वतःला ते माणूस म्हणायला ही तयार नाही.अस्पृश्यतेमुळे दुसरा भयानक परिणाम भारतीय समाजावर झाला आहे.  कष्टकरी जनतेला अस्पृश्य करून टाकले.  त्यामुळे श्रमिकांचा अपमान होऊन उत्पादक शक्तिमध्ये प्रचंड कमतरता आली आहे.  म्हणूनच स्वच्छता कामगारांनी जेव्हा जमशेद्पूरमध्ये बंड पुकारले, तेव्हा उच्चवर्णीयांना गुडघ्यावर यावे लागले.  भगतसिंग म्हणाले ही आनंदाची घटना आहे.  खरा कामगार, खरा कष्टकरी हे कुठल्याही राष्ट्राची ताकत असते.

            हिंदुत्वाचे नेते मदन मोहन मालवीयाच्या दलितांना हिंदुत्वात समाविष्ट करून घेण्याच्या प्रयत्नाला भगतसिंग हास्यास्पद म्हणाले,“एका सफाई कामगारांकडून स्वतःला माळ घालून घेण्यामध्ये हे लोक धन्य मानतात आणि नंतर आंघोळ करतात.”अशाचप्रमाणे धर्म आणि स्वातंत्र्यलढा या लेखात ते म्हणतात,“ही भली माणसं जरी वरकरणीअस्पृशता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असले तरी आतून ही कधीच बदलली नाही, बाहेर फक्त पोकळ देखावा करतात. म्हणून सर्वांनी एकसंघ झाले पाहिजे.जाती व्यवस्थेला झुगारले पाहिजे, तरच समतेचा सिद्धांत या देशांमध्ये प्रस्थापित होऊ शकतो आणि देश बलवान आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ होऊ शकतो.”

            भगतसिंग यांनी १९२६ ला नवजवान भारत सभा स्थापन केली होती.  त्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र भोजन करण्यासाठी सामाजिक भोजनाचे आयोजन केले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्व जातीच्या लोकांनी त्यांच्यावर लादलेली मानसिक गुलामगिरी नष्ट केली पाहिजे. भगतसिंगच्या सर्व संघटनेमध्ये जातीव्यवस्था झुगारून दिली आणि अनेक लोकांनी जसे नाथ गुप्ता, केशव चक्रवर्ती यांनी आपलेजाणवे काढून टाकले. रूढी परंपरा नष्ट केली.  भगतसिंग यांनी व्यवस्थेला आव्हान दिले. त्यासाठी सर्व कामगारांनी,कष्टकर्‍यांनी एकसंघ होऊन लढलं पाहिजे, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी भगतसिंग यांच्या विचारसरणीशी तंतोतंत जुळते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मला दाखवून द्यायचे आहे की सर्व जातीच्या लोकांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी भयानक प्रयत्न केलेले आहेत.  महात्मा फुले त्यांचे गुरू आहेत आणि या सदराखाली जो समाज जातीव्यवस्था धर्मातील कट्टरपंथी व्यवस्था नष्ट करण्यासाठी लढला आहे, त्यांना सलाम देण्याची वेळ आली आहे.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS