२७ ते २९ ऑगस्ट २०२३ रोजी, मी सागरी यात्रा काढली. सागर किनाऱ्यावरील गावागावात जाऊन तेथील मच्छीमार बांधव तसेच पर्यटन व्यवसायात काम करणारे बांधव यांना भेटलो. या सागरी यात्रेत इतक्या वर्षात किनारपट्टीच्या लोकांची काय परिस्थिती आहे आणि काय प्रश्न आहेत त्याचा अभ्यास करायची संधी मिळाली. पण त्याहीपेक्षा मला अनुभव आला की, सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांमध्ये जी काही दरी आहे तिचा नेमका सुगावा लोकांना लागत नाही. अचानक राष्ट्रीय पातळीवर इंडिया नावाचं गटबंधन तयार झालं त्याची आता मीटिंग महाराष्ट्रात लागत आहे. ती शरद पवार च्या नेतृत्वाखाली लागत आहे. आणि काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी कुठला आणि आता सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी बरोबर सरकारमध्ये सामील झाला. या सर्व पार्श्वभूमीकडे लोकांच्या मनामध्ये संभ्रम झालेला आहे. ही राष्ट्रवादीची फूट झाली आहे ती खरी आहे का ही एक शरद पवार यांची चाल आहे.
असा संशय जनतेमध्ये निर्माण होणार ती पार्श्वभूमी शरद पवार यांचे राजकारण ही आहे. कारण जवळजवळ ४० वर्ष आमदार, खासदार राहिलेले शरद पवार यांनी लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसगत केलेली आहे. एकंदरीत जे बोलतात त्याच्या अगदी उलट करतात असं लोकांचं मत झालेल आहे. म्हणून इंडिया या गटबंधनाला कोणी गांभीर्याने घेतले नाही. हे गटबंधन बनतय ते महाराष्ट्रात टिकणार नाही आणि अंतर्गत जो अविश्वास आहे तेच या गठबंधनला फोडून टाकणार, असा लोकांचा पक्का विश्वास आहे. त्यात अजित पवार व त्यांचे साथीदार यांनी राष्ट्रवादी पक्ष आपलाच आहे असा दावा केलेला आहे. कारण बहुतांश आमदार राष्ट्रवादीचे हे अजित पवार यांच्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी फुटली अजित पवार यांना शासनात घेण्यात आलं. त्यांचे दहा आमदार मंत्री झाले, श्री.एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बनवली आणि ती उबाठा शिवसेना शिवसेनाच्या बाहेर गेली. श्री एकनाथ शिंदे यांनी बहुतेक शिवसेनेच्या आमदारांना आपल्याबरोबर आणून खरी शिवसेना स्थापन केली. व त्यांना राज्य मान्यताही मिळाली. व त्यांचे आमदार मिळून भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. आणि इतक्या दिवसांमध्ये अत्यंत कार्यरतपणे महाराष्ट्रातील जुन्या समस्या हाताळून, नवीन समस्या वर मात केली व महाराष्ट्राचे भवितव्य निर्माण केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले की, एवढी मोठी सत्ता आपण निर्माण केलेली असताना आणि स्थिर सरकार निर्माण केलेला असताना भारतीय जनता पार्टीने असे काही केले कि, अशी काही गायब झाली की, राष्ट्रवादीचे आमदार घेऊन सरकारमध्ये तिसरी शक्ती निर्माण करण्यात आली.
म्हणूनच महाराष्ट्रात एक संभ्रम निर्माण झालेला आहे कि, राष्ट्रवादीची ही फूट खरी आहे का खोटी आहे? या संशयाला अनेक गोष्टीमुळे पुष्टी मिळत आहे. त्याचं कारण असं की, राष्ट्रवादीत फूट झाल्यावर शरद पवार, अजित पवार व इतर आमदारांची भेट चालूच आहे. अनेक भेटी या गुप्त पणे घेण्यात आल्या. पण ती गुप्तता राहिली नाही. अशा भेटी जर कौटुंबिक असत्या तर गुप्त ठेवण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे या भेटी राजकीय होत्या. त्यामध्येच वावड्या उठल्या की शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिमंडळात घेणार आहेत. अस वक्तव्य अजित पवार गटाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे जनता संभ्रमात आहे आणि कोकणी माणूस हा राजकारणाबद्दल फार जागरूक आहे. म्हणून किनारपट्टीच्या लोकांनी याबद्दल वक्तव्य केलं आणि त्यांची खात्री आहे की, सन्माननीय शरद पवार हे इलेक्शनच्या तोंडावर मोठा बॉम्बस्फोट करणार आहे.
म्हणून अनेक लोक आज संभ्रमात आहेत की, खरं काय आणि कोणावर विश्वास ठेवायचा. आज-काल राजकारणात कोण काय करेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. आणि त्यामुळे या सर्व बाबी राजकारणाला अस्थिर करण्याला कारणीभूत झालेले आहे.
मागे शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर पार्टी तोडणार असं मी सोनिया गांधींना सांगितलं होतं व सगळ्यांना सांगितलं होतं कारण तो त्यांचा स्वभाव आहे. माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही त्यांना वाटलं असेल की मी मजेत किंवा रागाने बोलत असेन. पण शरद पवारांनी परदेशी मुद्दा काढून सोनिया गांधीवर हल्ला केला. त्यांना पक्षाकडून काढून टाकण्याची मागणी मी केली आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बनवली आणि दोन्ही काँग्रेसने निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने लढवल्या. त्यात आम्ही सर्वजण काँग्रेसमध्ये राहिलो. त्यांनी पैसा नसताना जीवाचा आटापिटा करून प्रतापराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ८५ जागा मिळवल्या. आणि राष्ट्रवादीला पन्नास जागा मिळाल्या. त्यानंतर आघाडीचे शासन बनवण्याचा प्रस्ताव आला. त्यावेळेला मी त्याला विरोध केला होता. आणि मी म्हटलं होतं की, काँग्रेसने स्वतंत्र राहावं आघाडी करू नये. पण सत्ता बनवण्यासाठी बरेच लोक आघाडी करण्याच्या बाजूने गेले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काय झालं ते सर्वांनाच माहित आहे. काँग्रेस विकलांग होत गेली.
मध्येच मला कुणकुण लागली होती की, विरोधी पक्षाचे नेते नारायण राणे हे काँग्रेसमध्ये यायला मागत होते. तसं मी जाहीरपणे वक्तव्य केले. बदल्यात राजापूरच्या कोर्टात माझ्यावर हल्ला झाला. न्यायाधीश भिंतीवरून मारेकऱ्यांवर तुटून पडले. त्या सर्वांना अटक करायला लावले. पण झालं असं की, एक वर्षातच नारायण राणे फुटून काँग्रेसमध्ये यायची भूमिका घेऊ लागले. त्यालाही मी विरोध केला होता. मी सोनिया गांधीना म्हटलं होतं की, काँग्रेसला अजिबात नारायण राणेंची आवश्यकता नाही. पण अनेक लोकांनी मागणी केली आणि त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आले. मी त्यावेळेला आमदार होतो पण मला तसं काम करणं शक्य झालं नाही आणि मी काँग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला व बाहेर पडलो. तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या स्थरावर चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला व आता एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका पाहून आम्ही शिवसेनेमध्ये काम करत आहोत.
या सर्व पार्श्वभूमीमुळे शरद पवार केव्हा काय करतील यावर कोणाचाच विश्वास नाही. आता इंडिया गटबंधन चे मुंबईमध्ये अधिवेशन आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचे आयोजन शरद पवार करत आहे. मी पुन्हा जाहीरपणे सर्वांना सांगतो की, ते इंडिया गटबंधन बरोबर राहणं संशयास्पद आहे. त्यांचा डाव स्पष्ट आहे कि, अजित पवारला सरकारी पक्षात पाठवून त्यांना यश मिळाले तर त्याचा फायदा घेण्याचे ठरवले आहे. व जर इंडिया गटबंधनचं वर्चस्व दिसले तर ते तिकडे सुद्धा जायला कमी करणार नाहीत. म्हणून दोन्ही बाजूंनी त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. मुळात भाजपाला त्यांना गटबंधन मध्ये घेण्याची फार गरज नव्हती. कारण भाजप आणि शिवसेनेमध्येच जी युती झालेली आहे ती स्थिर करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे काम करत आहेत, ज्या गतीने विकास करत आहे. त्याला साथ देण्याची गरज आहे. पण राष्ट्रवादीच्या एक गट आघाडीमध्ये आणून सत्तेची वाटणी केलेली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते चिंतेत आहेत. पुढे जाऊन काय होणार? लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय होणार? याची चिंता अनेकांना लागून राहिलेले आहे. कारण जिथे दोन भाग होणार होते तिथे आता तीन भाग होणार आहेत. आणि तिकिटाच्या वितरणामुळे विधानसभेसाठी बरेच वाद होण्याची शक्यता असते. जशी ती इंडिया गटबंधन मध्ये आहे. पूर्वी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये बरेच वाद झाले आणि त्यांनी निवडणुकीमध्ये एकत्र जाण्याच नाटक केलं आणि एकमेकांचे उमेदवार पाडले. ते इंडिया गटबंधन मध्ये या वेळेला आणखी मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण शरद पवार काय करतील याचा कुणालाही पत्ता नाही. ज्या वेळेला शरद पवार शिवसेना काँग्रेस यांनी मिळून आघाडी केली व सरकार बनवले तेव्हा मी अनेकांना सूचित केलं होतं की, यामध्ये सर्वात मोठा तोटा शिवसेनेचा होणार आहे. कारण शरद पवार घेऊन त्यांनी जे गटबंधन केलं. आणि सरकार बनवलं. त्याच्यात राष्ट्रवादीने शिवसेनेला खाऊन टाकलं. पुढे जाऊन सन्माननीय एकनाथ शिंदेना आपल्या निष्ठावंत आमदारांचा एक वेगळा गट बनवावा लागला आणि सरकार बनवण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्राला इंडिया गट अशाच प्रकारे आत राहून विरोध करणारे गटांबरोबर शरद पवार कसे पुढे जाणार हे एक कोडेच आहे. त्याबद्दल इंडिया गटबंधन मध्ये असणाऱ्या पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी योग्य ती चिंता करावी, नाहीतर शरद पवारांना घेऊन कोणी यशस्वी झालेला नाही. त्यांचे नुकसानच झाले. त्या दृष्टिकोनातून लोकांना बघाव लागेल. आता घडणाऱ्या इंडिया गटबंधनाचे चित्र स्पष्ट होईल. पण महाराष्ट्रात ते यशस्वी होणार नाही हे मात्र स्पष्ट आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९