३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सैनिकांचा मेळावा प्रथमत: फुले वाड्यात झाला. यानंतर १० दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आणि १२ जानेवारीला ‘सिंदखेड राजा’ येथे जिजाऊ उत्सव करून त्याचा समारोप झाला. या प्रसंगी हजारो महिला साखरखेडा येथे जमा झाल्या होत्या. हे बघून मला अत्यंत आनंद झाला. कारण सावित्रीबाई फुले आणि जिजामाता या महिलांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यावेळेस संमेलनात बऱ्याच महिलांनी आपले विचार मांडले आणि आज देखील भारतामध्ये महिलांवर कशाप्रकारे अत्याचार होत आहेत, त्याची अनेक उदाहरणे दिली. एक जाणीव झाली की ७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील भारतामध्ये गावा-गावांमध्ये, शहरांमध्ये महिला मुक्तपणे वावरू शकत नाहीत. महिला सुरक्षेमध्ये आपण पूर्णपणे अपयशी ठरलेले आहोत.
कोपर्डीमध्ये एका कोवळ्या मुलीवर बलात्कार झाला व तिला मारण्यात आले. महाराष्ट्र पेटून उठला लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर आले. एवढी प्रचंड मोठी लोक चळवळ कधी झाली नव्हती. पुरुष-स्त्रिया रस्त्यावर येऊन न्याय मागत होते. एवढ्या मोठ्या चळवळीचे परिवर्तन कशात झाले तर आरक्षणाच्या मागणीत. आरक्षणाची मागणी केल्याबद्दल कुठली अडचण नाही. पण त्या बलात्काराचे काय झाले? मराठा क्रांती मोर्चाची पहिली बैठक मुंबईत मीच लावली होती. पण पुढे जाऊन अनेक वादविवाद बघायला मिळाले आणि आरक्षण व इतर मागण्या समोर आल्या. |
या गोंधळात मराठा क्रांती मूक मोर्चा का निर्माण झाला? हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहिले. महिलांवर अत्याचार, बलात्कार याचे मुख्य कारण होते. पण ते कुठेतरी मागे पडले. अलिकडे एकता कपूरने एक चित्रीकरण केले. सैनिक सीमेवर असताना त्यांच्या स्त्रिया व्यभिचार करतात असे संतापजनक चित्रीकरण केले. त्याच्याविरुद्ध मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अनेकदा भेटलो आणि त्या एकता कपूरवर कारवाई करायची मागणी केली. अनिल देशमुखनी मला सांगितले पोलीस कमिशनरकडे जाऊन हा विषय मांडावा व स्वतः त्यांनी फोन केला. आम्ही पोलीस कमिशनरकडे गेलो तर कमिशनर मला म्हणाले, तुम्ही इतके का चिडता? पोलिसांवर वेगवेगळ्या प्रकारे चित्रीकरण होते पण आम्ही काहीच म्हणत नाही. त्यावर मी कमिशनरला म्हणालो, तुम्ही पोलिसांनी याचा स्विकार केला असेल, तुमचा अपमान होतोय त्या बद्दल तुम्हाला काही वाटत नसेल, पण आम्ही सैनिक आहोत आणि सैनिक सीमेवर गोटया खेळत नाहीत ते लढत आहेत आणि लढत असताना आपले प्राण देखील या भारत देशासाठी देत आहे. अशावेळी एकता कपूर यांनी सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान करावा ही गोष्ट पटली नाही आणि आम्ही हे स्विकारू शकत नाही. कारण ही बदनामी आहे. त्यांना शासन झालेच पाहिजे. पण याच्या पुढे काहीच झालं नाही. कुणी पर्वा केली नाही आणि हा सैनिक समाजाचा घोर अपमान आहे .
बलात्कार आणि महिलांवरचे अत्याचार हे समाजाने स्विकारलेले आहेत आणि राजकीय नेते संवेदनाहीन झालेले आहेत. जिजामाता जयंती निमित्त आठवण करत असताना आपण हळहळतो. कारण हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. सोळा वर्षाचे शिवराय असताना रांझ्याच्या पाटलाने एका महिलेवर बलात्कार केला. त्यावेळी त्याला ओढून शिवरायांसमोर उभे करण्यात आले. जिजामाता गरजल्या अशा माणसाला सर्वात कडक शिक्षा झाली पाहिजे. शिवरायांनी जिजामातेचा आदेश पाळून शिक्षा ठोठावली. चौरंग करा आणि त्याचे हात पाय तोडून टाकले. तेव्हा पुरा महाराष्ट्र हादरून गेला. शिवरायांच्या ह्या कठोर निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटायला लागलं की या राज्यामध्ये माझी आई, माझी बायको, माझी मुलगी सुरक्षित आहे आणि म्हणून या राजासाठी मी प्राण द्यायला तयार आहे. आज कुणालाच राजकर्त्यांसाठी अशी भावना वाटत नाही. बलात्कार वाढत चालले आहेत. आपल्या राज्यकर्त्यांना ही शरमेची गोष्ट आहे. सर्व सैनिकांनी तीव्र भावना प्रकट केली. आणि सैनिकांच्या पत्नीने आक्रमकपणे पुढे जाऊन अशा प्रकारच्या घटनांना विरोध करण्याचा निर्धार प्रकट केला. जिजामाता जयंतीनिमित्त शपथ घेतली की “सैनिक फेडरेशन” हे महाराष्ट्रामध्ये असे काम करेल की कुठल्याही महिलेला वाटले पाहिजे की ती सुरक्षित आहे. त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिवरायांचे राज्य आले असे आपण समजू.
सैनिक फेडरेशन हा एक सैनिकांच्या संघटनाचा महासंघ आहे आणि आम्ही सर्वांनी त्या वेळेला आपण घेतलेला शपथेची आठवण काढली. एक व्यक्ती जेव्हा सैनिक होतो तेव्हा तो शपथ घेतो की “ मी संविधानाचे संरक्षण करेन आणि वेळ पडली तर प्राण देखील देईन.” अशी शपथ मंत्री-संत्री, आमदार-खासदार घेतात, पण त्याचे पालन किती करतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण आम्ही सैनिकांना एवढीच आठवण करून दिली, आपण आयुष्यभर देशाच्या संरक्षणासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी लढलो आहोत, आता निवृत्त झालो म्हणून शपथ आपली कुठेतरी विरून गेले असे नाही. आज देखील लागू आहे आणि म्हणून या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था भारतामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला पुन्हा संघर्ष करावा लागेल. त्यात आपल्याला प्राण द्यावा लागला तरी आपण मागे हटायचं नाही. त्या दिवशी ठराव झाला की “सैनिक फेडरेशन महिला सुरक्षा ब्रिगेड निर्माण करेल आणि महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण करेल की कुठल्याही महिलेवर अत्याचार होणार नाही. आता पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये सैनिक महिला ब्रिगेडचे दक्षता समिती उभारली जाईल. प्रत्येक पोलिस स्टेशन बरोबर संपर्क ठेवून अशी यंत्रणा निर्माण करू ही गावगुंडांना आणि विकृत लोक महिलांवर अत्याचार करायला धजणार नाही.”
दुसरीकडे सावित्रीबाईंनी जिजामाताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रचंड चळवळ निर्माण केली. सर्वात प्रथम मुलींनी शिकले पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही प्रेरणा सावित्रीबाईंना दिली. महात्मा फुलेचे सर्वात मोठं कार्य म्हणजे त्यांनी रायगडला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकांसमोर आणली. छत्रपती शिवाजी महाराजांच आदर्श घेऊन त्यांनी लोकांना जागे केले. झोपी गेलेला समाजाला शिवाजी महाराजांचे आदर्श दाखवले आणि महिला-मुक्ती चळवळ उभी केली. सावित्रीबाई फुलेनी महिलाना उभे केले. त्यांच्या मुळेच भारतामध्ये शिक्षणाची लाट आली आणि आज आपल्या मुली अधिकारी झालेल्या आहेत. अवकाश यानातून वर जात आहेत आणि प्रत्येक क्षेत्रांमध्ये आघाडीवर जाऊन काम करत आहेत. तरी देखील महिलांच्या मनावर सामाजिक दडपण प्रचंड आहे. मुक्तपणे अजून महिला देशांमध्ये काम करू शकत नाही. अमेरिकेने महिलांच्या शरीराचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक नवीन संस्कृती निर्माण केली. ती म्हणजे ‘सेक्स आणि शराब’. महिलांचे शोषण करायचं आहे ही पाश्चिमात्य संस्कृती निर्माण झालेली आहे. त्यातूनच दारूबाजी, ड्रग्स यांचा प्रचंड प्रसार झालेला आहे. अमेरिकेतील पॉर्नोग्राफीची इंडस्ट्री सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली.
फक्त पैसा आणि पैसा हे राजकारणाचे आणि समाजकारणाचे मूळ तत्व झाले आणि पैसा निर्माण करून महिलांचे शोषण करणे ही एक पद्धत झाली आहे. त्यातूनच इतके मोठे रेपकांड या भारतात झाले आहे. आर्थिक उन्नती करताना सामाजिक अधोगती होताना आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहे, पण त्याच्या विरुद्ध बोलायला किंवा काम करायला कोणी तयार दिसत नाही. म्हणून महिलांना सक्षम करून महिलांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य हे समाजावर येते. पोलीस हतबल आहेत, कायद्याच्या चौकटीत बांधलेले आहेत. ८०%टक्के गुन्हेगार सुटले जातात. हे शासनाच्या आणि प्रशासनाचे अपयश आहे. त्यातच अमेरिकन संस्कृती भारतामध्ये पसरली. आता गावा-गावापर्यंत पोहोचलेली आहे. इंटरनेटचा चांगला उपयोग होतो, तेवढाच वाईट उपयोग सुद्धा होतो. इंटरनेट गावात पोहोचल्यामुळे सर्व तरुणही हे ज्ञान संपादन करू शकतात, पण त्याचबरोबर विकृत संस्कृतीचे दर्शन करतात. त्याचाच परिणाम म्हणजे हा रेपकांड आहे. यावर पोलिस काहीच करू शकणार नाही किंवा सरकार काय करू शकणार नाही हे आतापर्यंत सिद्ध झालेले आहे आणि त्यासाठी सामाजिक चळवळ उभी करावी लागेल. सैनिक फेडरेशनने तोच निर्धार व्यक्त केलेला आहे आणि सैनिक समाजाचा महिलांच्या सुरक्षेसाठी आणि उज्ज्वल उन्नतीसाठी काम करणार आहेत. त्याला सहकार्य देण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. महाराष्ट्रातली युवा पिढी, महिला, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांची युती घडवण्याची गरज आहे. त्या युतीतून अशा प्रकारचे सामाजिक वातावरण निर्माण केले पाहिजे. कोणीही महिलांची छेड केली तर सुटणार नाही. निर्लज्जपणे समाजात वावरणारा नाही. यासाठी योग्य ती कारवाई आणि कायदे आपल्याला करावे लागतील. ते करण्यासाठी पुढच्या काळामध्ये सैनिक फेडरेशन झटणार आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.