मुश्रफचा फसलेला डाव – कारगिल_२५.७.२०१९

‘दिल मांगे मोर’ गरजले कॅप्टन बत्रा.  जुलै १९९९ मध्ये १३ जॅक रायफल या बटालियनला पॉईंट ५१४० वर कब्जा करायचा हुकुम मिळाला. अत्यंत कठीण टेकडी. ५०० मीटर उघडा चढाव  चढून हल्ला करायचा होता. त्यात खंदकात बसलेले पाक सैनिक मशिनगणने आग ओकत होते. मरण सगळ्यांना दिसत होते. १०० तोफांनी ५००० गोळे मारून ५१४० ला भुईसपाट करण्याचा प्रयत्न केला. तरी खंदकात बसलेले पाक सैनिक हादरले असले तरी जिवंत होते. ९ वाजता हल्ल्याला सुरुवात झाली. कॅप्टन बत्रा आणि कॅप्टन जमवाल दोन्ही बाजूनी चढाई केली. वास्तविक २०० मीटरवर पोहचल्यानंतर तोफांचा मारा बंद केला जातो, कारण आपल्याच सैनिकावर आपल्याच तोफेचे गोळे पडू शकतात. पण बत्रानी १०० मीटरजवळ पोहचेपर्यंत बोफोर्सचा मारा शत्रूवर मागवला. तोफांचा भढीमार चालू असेपर्यंत शत्रूला खंदकातून बाहेर पडता येत नाही. हल्ला करणाऱ्या सैनिकावर गोळीबार करता येत नाही. बत्रा आघाडीवर होता. शत्रूच्या जवळ पोहचला. पहिल्या खंदकात ग्रेनेड टाकला आणि आत घुसून २ पाक सैनिकांचा खात्मा केला. हे बघून त्याचे साथी उत्साहीत होऊन आक्रमकपणे शत्रूवर तुटून पडले.  बत्राने दुसर्‍या खंदकात ही  ग्रेनेड टाकले आणि आत घुसून शत्रूला खतम केले.  ५१४० चा कब्जा झाला. तेथून त्याने आपल्या आईला फोन केला. ५१४० कब्जा केल्याचे सांगितले. तिने विचारले आता काय करणार? बत्रा म्हणाला, “दिल मांगे मोर.” त्यानंतर तो मुश्कोवर हल्ला करायला गेला आणि त्यात त्याने सर्वोच्च त्याग केला.  आपले प्राण ह्या देशासाठी अर्पण केले. अतुलनीय शौर्यासाठी त्याला परमवीर चक्र देण्यात आले.

बत्रासारख्या अनेक तरुणांनी आपल्या जीवाची परवा न करता कारगिल युद्धात आहुती दिली. तिथे आता एक फलक लिहिलेला आहे. फलक म्हणतो, “तुम्ही जेव्हा परत जाल, तेव्हा त्यांना सांगा की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला आहे.”  कारगिलमध्ये युद्ध करणे सोपे नव्हते. १५००० ते १८००० फुटावर असलेली ही जगातील सियाचीन नंतर सर्वात उंच युद्धभूमी. ह्या उंचीवर चालणे देखील अत्यंत कष्टाचे असते. त्यात पाकने द्रास, कासकर, बटालिक ह्या ७० कि.मी. लांबीच्या क्षेत्रात गुपचूप घुसखोरी केली आणि १५ ते २० कि.मी.  LOC च्या आत भारतीय भूमीचा लचका तोडला. श्रीनगर लेह रस्ता तुटला. लाधाख मधील भारतीय सैन्य धोक्यात आले. पाकने घुसखोरी कशी केली ह्याबद्दल भारतात फार माहिती नाही. मुशरफ पाक सेनादल प्रमुख झाल्यावर त्याने जुन्या योजना बाहेर काढल्या. १९८४ ला भारताने अचानक हल्ला करून सियाचीनचा निरमनुष्य प्रांत कब्जा केला. सिमला करारात  सर्व भारत पाक प्रश्न हे आपापसात चर्चेने सोडवायचे असे ठरले. ते आजपर्यत बदलले नाही. त्यामुळे सियाचीन भारत परत देणार नाही हे पाकला कळून चुकले म्हणून सैन्याने पाक हुकुमशाह झियाला प्रस्ताव दिला कि निरमनुष्य कारगिल भागात घुसखोरी करून श्रीनगर-लेह रस्ता तोडून टाकायचा. मग चर्चेत पाक वरचढ झाला असता व सियाचीनहून भारताला सैन्य मागे घ्यायला लावले असते. पण झिया सावध होता. तो म्हणाला असे झाले तर पूर्ण युद्ध होऊ शकते. त्याचवेळी झीयाने भारतात अनेक प्रांतात दहशतवादी घुसवून भारताला नामोहरम करण्याची मोहीम सुरू केली होती,  म्हणून त्याला युद्ध नको होते. पण कारगिल हल्ल्याचे पूर्ण नियोजन झाले होते.

तीच योजना ज्याला ‘गॅंग ऑफ ४’ म्हणतात त्या चांडाळ चौकडीने कार्यान्वित करायचे ठरवले. ह्या ४ लोकात मुशरफ, त्याचा सेनापती पूर्वाश्रमीचे ISI प्रमुख जनरल अझीझ, पाक १० कोरचे प्रमुख जनरल मोहम्मद आणि कारगील समोरील स्कार्डू क्षेत्राचे प्रमुख ब्रिगे.जावेद होते. ब्रिगे.जावेदला जानेवारी १९९९ मध्ये सांगण्यात आले कि, कारगिल भागाची पाहणी करावी व कुठपर्यंत पाक सैन्य घुसू शकते ते पहावे. त्यांनी पाहणी केली आणि त्याच्या लक्षात आले कि खोलवर कुठे भारतीय सैन्य नव्हते.  मुशरफने १० चौक्यावर कब्जा करायचे ठरवले होते. तसे आदेश त्याने जावेदला दिले. जावेदने आपले सैन्य घुसवले आणि त्याला जाणीव झाली कि तो आणखी पुढे जाऊ शकत होता. १० चौक्या कब्जा करण्याचा बेत बाजूला राहिला व २ महिन्यात पूर्ण बर्फ असलेल्या कारगिल भागात पाक सैन्याने १४० चौक्या वर कब्जा केला. पण हे पाकमध्ये कुणालाच माहित नव्हते व भारताला ही माहित नव्हते. पाक सैन्याच्या इतर अधिकार्‍यांना आणि पंतप्रधान नवाज शरीफला देखील ही माहिती नव्हती.  म्हणून हा कब्जा पाक सैन्याने केला नसून तो मुज्जाहुदिनने केला असे दाखवण्याचा प्रयत्न चांडाळ चौकडीने केला व सैनिकांना सलवार, पठाणी पोशाख घालून आत घुसवले, असे करून २०० चौरस कि.मी. चा प्रांत एकही गोळी न चालवता कब्जा केला. हीच चूक  पाकिस्तान सैन्याला भोवली.  युद्ध पेटल्यावर २७ मे ला भारतीय वायुदलाने बटालीकवर टेहाळणी केली आणि पाक सैन्याला आपले वायुदल वापरता आले नाही व कारागिल भागात घुसलेल्या सैन्याला पुरेशी रसद पुरवता आली नाही. एवढेच नव्हे तर मृत सैनिकांचे शव सुद्धा भारताकडे मागता आले नाहीत.

१२ फेब्रुवारीला  वाजपेयी आणि नवाज शरीफची लाहोर येथे भेट झाली. तेव्हापासून नवाज शरीफला १८ मे पर्यन्त अंधारात ठेवण्यात आले. चांडाळ चौकडीने ठरविले  पुढे असे सांगायचे कि, भारताबरोबर चर्चा करण्यासाठी नवाज शरीफचे हात मजबूत करण्यासाठी सैन्याने हा कब्जा केला आहे. जवळ जवळ २७ मे पर्यन्त नवाज शरीफ आणि इतर सैन्याचा समज होता कि हा हल्ला सैन्याने केला नसून मुज्जाहुदिनने केला. इकडे भारत सरकार देखील अंधारात होते. ३ मे ला बटालिक क्षेत्रात नामग्याल ह्या शेतकर्‍याने हरवलेला याक शोधत असताना पाक सैनिक बघितले. त्याने सैन्याला कळविले. सैन्याने पाहणी केली आणि ते खरे असल्याचे आपल्या वरिष्ठांना कळविले. त्यातच ४ तारखेला कॅप्टन शौरभ कालिया व त्यांच्या साथीदारांचा मृत्यदेह कासकर भागात सापडले. अत्यंत क्रूरपणे हाल हाल करून त्यांना मारण्यात आले होते. तरी देखील भारतीय सैन्याला व सरकारला पाक सैन्याने हल्ला केल्याची जाणीव झाली नाही.  भारताचे सर सेनापती जनरल मलिक २३ मे ला भारतात परदेशातून परत आले.  २७ मे ला वायुदलाने पाहणी करताना पाकने २ विमाने पाडली. त्यावेळी भारतीय सैन्य आणि सरकारला अंदाज आला कि हल्ला मुज्जाहुदिनने केला नसून पाक सैन्याने केला आहे व २९ मे ला भारत सरकारने पाकच्या हल्ल्याबद्दल अधिकृत घोषणा केली.  हे भारतीय गुप्तहेर खात्याचे सर्वात मोठे अपयश आहे.  वाजपेयीच्या नवाब शरीफला केलेल्या फोनमुळे नवाज शरीफला ही कळले कि ही कारवाई चांडाळ चौकडीने केली आहे.  पण तो सैन्याला माघार घेण्याचा हुकूम देऊ शकत नव्हता.  तो अमेरिकन राष्ट्रपती क्लिंटनकडे जाऊन हे युद्ध बंद करण्यासाठी सांगू लागला.

इकडे भारतीय सैन्याला घुसखोरांना उखडून टाकण्याचे हुकूम मिळाले.  चांडाळ चौकडीला भारतीय सैन्याच्या आक्रमक पावित्र्याची कल्पना नव्हती.  काश्मिरहून सैन्य आणून त्वरित तोलोलिंग टेकडीवर हल्ल्याला सुरुवात झाली. बोफोर्सचा आणि शंभर तोफाचा भडिमार सुरू झाला.  हे चांडाळ चौकडीला अपेक्षित नव्हते.  १३ जूनला पहिली चौकी तोलोलिंग सर झाली.  नंतर भारतीय सैन्याने अत्यंत कठीण परिस्थितीत इतर चौक्यांवर कब्जा केला.  टायगर हिल, ५१४० वर कब्जा करत ७ जुलै पर्यन्त पाकिस्तान सैन्याला नामोहरण करून टाकले.  इकडे क्लिंटनने पाक सैन्याला माघार घ्यायला लावली. मुश्रफचा होरा अचूक होता कि अमेरिका भारताला हल्ला करण्यापासून रोखेल, कारण दोन्ही अणुअस्त्रधारी  देश आहेत. भारतीय सैन्याने पाकमध्ये घुसण्याची मागणी केली. पण भारत सरकारने परवानगी दिली नाही.  हेच भारतीय नेतृत्वाचे अपयश आहे. आतापर्यंत ८००० भारतीय सैनिक काश्मिरमध्ये मारले गेले. आता आणखी किती लोकांचा बळी घेणार. त्यापेक्षा एकदाच निर्णायक युद्ध करून पाकला नष्ट करणे इष्ट राहिले असते. कारगिल युद्धात एक संधी गेली. पूलवामा नंतर अशीच संधी आली होती पण घोषणाबाजीत पूलवामाचा बदला  बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून काय साध्य झाले. शत्रूचे २ मेले का २०० पाकला काहीच फरक पडत नाही. भारताने लुटुपुटूची लढाई बंद करायला पाहजे आणि एकदाच पाकचा खात्मा केला पाहिजे. हीच खरि श्रद्धांजली. हजारो शहीद सैनिकाना योग्य राहील.

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट  : www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS